Saturday 24 March 2018

केदारवाकडीची पोरं हुशार

जालन्यातील केदारवाकडीची जिल्हा परिषद शाळा. इथले कल्याण अंभोरे सर विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आहेत. कारण आहे अंभोरे सरांची नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धत. आपल्या शाळेतील विद्यार्थी कोणत्याच विषयात मागे राहू नयेत यासाठी अंभोरे सरांची धडपड असते. प्रत्येक विषयासाठी काही ना काही नावीन्यपूर्ण साहित्य तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
गणितासारख्या विषयात केदारवाकडीची तिसरी- चौथीची मुलंही तरबेज झालेली आहेत. शाळेत ‘भास्कराचार्य गणित समृद्धीकरण’ या शिक्षण विभागाच्या उपक्रमाची साहित्य पेटीही आहे. या पेटीतील साहित्याच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या गणिती क्रिया करतात. यातील एकमेकांना जोडता येणाऱ्या ठोकळ्यांच्या साहाय्याने विद्यार्थी आपण सांगितलेला अपूर्णांक तयार करून दाखवितात आणि तो लिहूनही दाखवतात. उदा. 5/10. या पेटीत असलेले भौमितिक आकार हातात घेऊन विद्यार्थी तो आकार ओळखतात. उदा. चौकोनाला चार कोन असतात, प्रत्येक कोन 90 अंशांचा असतो अशा प्रकारची गणिती माहितीही ते सांगू शकतात.
   मात्र या पेटीव्यतिरिक्त इतरही बरेच साहित्य अंभोरे सरांनी तयार केलेले आहे. त्यात मुख्य उल्लेख करायला हवा तो गणिती क्रियांच्या कार्डसचा, एकक- दशक कार्डसचा. अंभोरे सर म्हणतात, “गणित हा सरावानेच पक्का होणारा विषय आहे. अभ्यासात वेगळेपणा, रंजकता आणि सातत्य असेल तर विद्यार्थी गणिताला कंटाळत नाहीत हा माझा अनुभव आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे गणित करायला मिळाले पाहिजे असे मला वाटते. पाठ्यपुस्तकात दिलेली उदाहरणे मर्यादित असतात. फळ्यावर जरी उदाहरणे द्यायची ठरवली तरी फळ्याच्या जागेला मर्यादा असते, म्हणून मी ही बेरीज- वजाबाकी- गुणाकार- भागाकाराची कार्डस् तयार केली.”
सरांनी प्रत्येक गणिती क्रियेची किमान 100 वेगवेगळी कार्डस तयार केलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन गणित करायला मिळतं आणि एकमेकांचं बघून गणित सोडविण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय सरांनी स्केचपेनने रंगांच्या विशिष्ट खुणा करून या कार्डमध्ये शतक, दशक, एककाचीही कार्ड बनविली आहेत. या कार्डच्या आधारे आणि आईस्क्रीमच्या काड्यांच्या आधारे विद्यार्थी वही पेन न वापरता गणितं तोंडी करु शकतात. उदा. 31 फुगे 4 विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती फुगे मिळतील आणि किती शिल्लक राहतील हे गणित विद्यार्थी काड्यांच्या सहाय्याने सोडवितो. तो दशकाच्या 3 काड्यांचे गठ्ठे आणि एककाची एक काडी घेऊन त्याचे चार विद्यार्थ्यांत समान हिस्से कसे करता येतील ते पाहतो. दशकाचा प्रत्येकी एक गठ्ठा चौघात वाटता येणार नाही हे लक्षात आलं की तो दशकाचा गठ्ठा सोडवून समान वाटणी करतो आणि प्रत्येकाला 7 फुगे मिळतील तर 3 फुगे शिल्लक राहतील असे उत्तर तोंडीच देऊ शकतो.
केदारवाकडीचे विद्यार्थी भागाकारच नव्हे तर गुणाकार, वजाबाकी आणि बेरजाही तोंडी करू शकतात. या शिवाय अंगणवाडी किंवा पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुळाक्षरांची ओळख व्हावी म्हणून शब्दचित्र कार्डही तयार केलेली आहेत. ही चित्रं काढण्यात अंभोरे सरांना त्यांची कर्णबधीर मुलगी स्नेहा मदत करते. तिची चित्रकला सुंदर आहे आणि तिला मुलांच्या अभ्यासासाठी असे शैक्षणिक साहित्य तयार करायला खूप आवडते.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment