Thursday, 31 August 2017

त्यांचा प्रवास सोपा व्हावा म्हणून...

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :  विवेक नवरे यांना मला आदरार्थीच संबोधायचंय खरं तर, पण याला त्यांचा तीव्र नकार. मैत्रीत वयाच्या लहानमोठेपणाला कशाला आणायचं असं त्याचं म्हणणं. मला आधी ते अवघड गेलं, पण आता सवय करतेय. म्हणून त्यांच्याबद्दल लिहिताना आदर ठेवून एकेरीत येतेय. - तर मला अगदी पहिल्यांदा फोन आला तेव्हा विवेक म्हणाला, ‘‘सोनाली, तुझं ‘ड्रीमरनर’ वाचून माझ्यातली चिकाटी आणखी थोडी जागी झालीय. काही युक्त्याही मिळाल्यात त्यातून. तुझ्या ऑस्करसारखाच जे आकाराचा पाय लावून मी मुंबईत नुकताच ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ला धावलोय. आता कोल्हापुरात येतोय. भेटूया. - तू प्रत्यक्षात हा ‘कार्बन फ्लेक्स फूट’ पाहिला नसशील तर तो दाखवतो.’’
२०१३ मध्ये कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या मॅरॅथॉनमध्ये सामील होण्यासाठी विवेक आला होता. झालं असं होतं की त्याचं ‘ऑटोबॉक’ प्रायोजित मुंबईतल्या मॅराथॉनमधलं धावणं ‘झळकलं’ तेव्हा ते कोल्हापुरातल्या भूलतज्ज्ञ असणार्‍या डॉ. किरण भिंगार्डे यांच्या पाहण्यात आलं. अशा माणसाला धावताना कोल्हापूरकरांनीही पाहायला हवं म्हणून डॉ.भिंगार्डे यांनी आयोजकांच्या वतीनं विवेकला निमंत्रण दिलं. या मॅराथॉनमध्ये वाहतुकीचा भर असणार्‍या रस्त्यावरून जवळपास तीन किलोमीटर अंतर एका कृत्रिम पायासह एका तासात विवेकनं पार केलं. पुढं चेंबूरमधल्या मॅराथॉनमध्ये तर ५ किलोमीटर धावला तो आणि मुंबई महापौर सायक्लॉथॉनमध्ये विशेष व्यक्ती म्हणून ३ किलोमीटर अंतर सायकलनं कापायची सवलत असताना ‘जाऊन तर बघू’ म्हणत त्यानं एकूण १६ किलोमीटर सायकल चालवली नि बक्षीस मिळवलं. - पण या टप्प्यापर्यंत येईतो विवेकनं स्वत:ला प्रचंड कष्टवलंय. रक्ताळून घेतलंय.
ऑक्टोबर १९९०. डोंबिवलीत डेअरी व्यवसायानं नावारूपाला आलेला साधारण सत्ताविशीचा विवेक असाच रस्त्याच्या बाजूला अगदी सुरक्षित अंतरावर उभा होता इतक्यात समोरून एक ट्रक येताना त्यानं पाहिला. बघता बघता क्लिनरच्या बाजून ट्रक त्याच्या डाव्या पायाला घासून गेला नि त्या फटक्यात पायाची पोटरी नि नडगी जवळपास लोंबकाळू लागली. तुटलीच. त्वचेच्या पांघरूणामुळं हे सगळं बाहेर न येता लटकत राहिलं. अपघात झाला तेव्हा विरुद्ध दिशेला झेप गेल्यामुळं पाय संपूर्ण तुटला नाही किंवा जीव गेला नाही इतकंच. जवळच्या हॉस्पिटलमध्ये लोकांनी नेलं तेव्हा त्यांनी उपलब्ध सुविधेनुसार प्लास्टर स्लॅब घातला, जवळपास तीस बाटल्या रक्त लागलं नि ४८ तासांनी केईएम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं. त्यानंतर जबरदस्त फटका बसला संसर्गाचा. या क्षेत्रात चिकित्सेतील कौशल्यामुळं अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ.अरविंद बावडेकरांचं नाव कुणी सुचवल्यावर विवेक तिकडं गेला. डाव्या पायाच्या घोट्यापासून ते मांडीपर्यंत जवळपास १३ किलो वजनाच्या स्टीलच्या स्क्रूंचा भार सांभाळत विवेक चिकाटी ठेवून होता याचं कारण डॉ.बावडेकरांचा विश्वास! २ महिन्यांनी हे स्क्रू फिक्सर काढले, प्लास्टर उरलं. मात्र जवळपास दोनअडीच वर्ष दर तीन आठवड्यांनी एक्सरे काढून स्थिती तपासायची व नवं प्लास्टर चढवायचं चालू राहिलं. पाय असा प्लास्टरमध्ये अडकल्यामुळं पाऊल सुजायचं, केशवाहिन्या व रक्तवाहिन्या हालचालीअभावी गोळा झाल्या होत्या त्या ठणकायच्या. संसर्ग त्यामुळं ताप हे चक्र चालूच. पाय वाचवायचे सगळे उपाय थकल्यामुळं शेवटी (१९९६) डॉ.बावडेकर म्हणाले, ‘विवेक, मी कोनिकल शेपमध्ये पाय ऍम्प्यूट करतो. त्यानंतर कृत्रिम पाय वापरून तुम्ही धावाल असं काही मी म्हणणार नाही, पण औषधं, ताप हे सगळं चक्र थांबेल.’ - या सगळ्या काळात झालेला खर्च विवेकनी स्वत:च्या कमाईतून केला होता. आता पुढचं पाहायलाच हवं होतं. पण मन नाराज होतं की हे सगळं करून अखेर काय फायदा? - मात्र ही मनोवस्था काहीच क्षण टिकली. त्यांनी डॉक्टरांना होकार दिला... डावा पाय गुडघ्यापासून काढण्यात आला. दोन महिने आराम करून विवेकनं निष्ठेनं फिजिओथेरपी सुरु केली. यातून काहीतरी भलं होणारे म्हणत थकवलं स्वत:ला. १९९७ ला कृत्रिम पायानं विवेक चालायला लागला. त्याचा सराव तोंडात बोटं घालायला लावेल असा... दादर स्टेशनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत ४-६ वेळा किंचित टेकत जवळपास ८ ते १० किलोमीटर अंतर चालून हा पठ्ठ्या फॉलोअपसाठी पोहोचायचा! डॉक्टर नि ज्यांच्याकडून कृत्रिम पाय घेतला ते मि.नेगी दोघंही म्हणाले, ‘‘नवरे, तुमच्यासारखे तुम्हीच!’’
आज, अशा अपघातानं धक्का बसलेल्या-खचलेल्या, अवयव गमावलेल्या माणसांच्या खाचखळग्यांच्या प्रवासात खारीचा वाटा उललण्यासाठी विवेक पदरमोड करत पोहोचतो व पुढचा प्रवास निराशाजनक नाहीये हे समजावतो. लागेल ते मार्गदर्शन करतो. मागच्या वर्षी त्यानं रिक्षा घेतली. का? - तर अशा पेशंट्सना गावातल्या गावात फिजिओथेरपीसाठी योग्य वेळेत सोडणं, आणणं याकरिता इतर वाहनांवर अवलंबून रहायला नको म्हणून! विवेक गप्पिष्ट... मनानं स्वच्छ पण थोडासा कडक बोलणारा. का करावं वाटतं हे सगळं विचारल्यावर एरवी लांबलचक बोलणारा विवेक लांबड न लावता सांगतो- ‘‘जी मदत मला मिळाली असती तर माझा प्रवास सोपा झाला असता अशी मदत मी इतरांना करतो, त्यांचा प्रवास सोपा व्हावा म्हणून!’’
- सोनाली नवांगुळ

Tuesday, 29 August 2017

प्रिय अगस्तीप्रिय अगस्ती,
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा.
महाराज, अरे तू जन्मलास, एकेका वर्षानं मोठा होत गेलास. आणि आता तू पूर्ण अठरा वर्षांचा झालायस! किती दिवसांत तुला पत्र लिहिणं झालं नाही. आज मुद्दाम लिहितो आहे. पालकत्व म्हणजे नेमकं काय असतं, हे नीटसं समजलेलं नसताना छोट्या मोठ्या प्रसंगातून, घटनांतून तू आम्हाला काही नवं शिकवत राहिलास. पालक म्हणून घडवत राहिलास.
आपली साथसोबत अठरा वर्षांची कधी झाली, हे कळलंच नाही. तुझं आमच्या आयुष्यात येणं ही गोष्टच केवढी सुंदर होती आणि हे. तुझं आनाव अगस्ती. अवकाशातल्या एका ताऱ्याचं नाव. खगोल भौतिकशास्त्र तुझ्या आवडीचं, हा योगायोग! दंडकारण्यातला पहिला शेतकरी अगस्ती. आपण शेतकरी, कष्टकरी समाजातून आलेलो. त्या परंपरेशी नातं सांगणारं नाव! गणित, विज्ञानाचा तू विद्यार्थी आहेस. चिकित्सक आहेस. सतत प्रश्न विचारत आलास. आम्ही जमतील तशी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत आलोय. कोणतीही वस्तू घेताना तू किती बाजूंनी विचार करत असतोस. या बाबतीत आपले मतभेद होत. पुढं मात्र मी बॅकफूटवर गेलो. कारण मला हे समजलं होतं,की तुझ्या मनातल्या शंका मिटेपर्यंत तू काहीच मनापासून स्वीकारत नाहीस.
लहानपणी हातात पुस्तक घेतलं की ते संपवताना आम्ही झोपी गेलो, तरी तू एकटा जागायचास. हे सारं तू दुसरी-तिसरीत असताना. तुझ्या वाचनयोगाने घरातली आपली लायब्ररी समृद्ध होत गेली. पुस्तकांनीच तुला स्टिव्ह जॉब्ज, थोर गणिती रामानुजन आणि यांसारख्यांच्या प्रेमात पाडलं. अगदी वाचायला यायला लागल्यापासून तू वृत्तपत्रं वाचत आला आहेस.
‘अमूकच कर’ असा आग्रह आम्ही तुला कधीच केला नाही. अगदी लहान असल्यापासून तुझं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मान्य करत आम्ही पुढं गेलो. विज्ञान तुझ्या खास आवडीचं. विज्ञान प्रदर्शनात तू भाग घ्यावास, असं आम्हाला मनापासून वाटे. “कोणीतरी तयार करून दिलेलं मॉडेल मी बाहुला बनून मांडणार नाही. मला काहीतरी भारी सुचलं तर मांडीन”, असं बाणेदार उत्तर देऊन तू मला पूर्णपणे निरुत्तर केलं होतंस! तू इंटरमिजीयटसाठी चित्र काढत होतास. बहुतेक मुलं हॉलबाहेर आली होती. मी तुला शोधत आलो. तेव्हा हॉलमधल्या तुझ्या बाकाभोवती मुलांनी गर्दी केली होती. तू दंग होऊन चित्र काढत होतास. वाव...असं म्हणत मुलं तुला दाद देत होती. चौथी, सातवीत शिष्यवृत्त्या मिळवल्यास. मी रानवेडा माणूस. माझ्याबरोबर तू जंगलात भटकायला येऊ लागलास. तूदेखील जंगलाच्या प्रेमात पडलास. माझ्या हातातला कॅमेरा नकळत तू तुझ्या हातात घेतलास. रानातले भन्नाट फोटो घेऊ लागलास. निसर्गात हिंडताना पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील बनलास. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना, समजून घेताना ती अगदी मनापासून, खोलात जाऊन कशी समजून घ्यावी याचा वस्तूपाठ तू अनेकदा दाखवून दिलास. शिक्षक म्हणून वर्गात शिकवत असताना अडचणी आल्यावर तुला फोन लावला की, तू लगेच रस्ता दाखवायचास.

मला आठवतं, भारतानं सोडलेलं मंगळयान मंगळ ग्रहावर उतरलं होतं. सातवीतल्या मुलांनी दुसऱ्या दिवशी ‘यान मंगळावर कसं गेलं?’ असं विचारलं. मला कसं सांगावं, हेच समजेना. तेव्हा ‘बेंचेस बाजूला सरकवून वर्गात फरशीवर अशी आकृती काढून दाखवा, म्हणजे मुलांना समजेल,’ असं तू सुचवलंस आणि केवळ मुलंच नाहीतर आम्ही शिक्षकदेखील ते नीटपणे समजलो. माझ्या पालकत्वाच्या प्रवासादरम्यान माझ्यातला शिक्षकदेखील समृद्ध होत गेला. कसं वागलेलं मुलांना आवडतं? कसं नाही? याचा उलगडा तुझ्यामुळे नेमकेपणाने होत गेला. अनेक पुस्तकं वाचून समजलं नसतं, हे तुझ्यासारख्या मुलानं आम्हाला शिकवलं.
एखादी गोष्ट समजली नाही की त्याचा तुला त्रास होतो. पण सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही समजत. कधी कधी वेळही लागतो नव्या गोष्टी, अपरिचित संकल्पना समजायला. सगळंच समजलं पाहिजे, यातूनही तुला बाहेर पडायला हवं. तू बुद्धिमान आहेस. पण गुणांपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व देशील. पैशाच्या मागे तू धावू नकोस. कारण पैशांच्या मागे धावणारे लोकं सुखी, समाधानी नसल्याचे आम्ही रोज बघतोय. तुझ्याकडं असलेलं ज्ञान, माहिती, कौशल्य भोवतीच्या समाजाच्या उन्नयनासाठी वापरशील तर तुझा आम्हाला जास्त अभिमान वाटेल. अर्थातच हादेखील आग्रह नाहीये. तू तुझा स्वतंत्र आहेस. आयुष्यात आरोग्य फार महत्त्वाचे आहे. पैशांच्या मागे लागलेल्या अनेक लोकांच्या तब्बेतीचा पाढा सुरु झाल्याचं दिसतं. तेव्हा काळजी घे. तब्बेतीला जप. आनंदी राहा! सध्याच्या जगातले ताण-तणाव बघताना असं सतत जाणवतं की, आनंदी राहायला छंद जोपासायला हवेत. माणसांशी नातं जोडावं. गॅझेट्सना जे लोकं सुरक्षित अंतरावर ठेवतील, ते लोकं सुखी असतील! अशी एकूण स्थिती आहे.
ऊन-पावसासारखं सुख-दु:खं असतं. या गोष्टी कोणालाच चुकल्या नाहीत. यश-अपयशही पचवता आलं पाहिजे. आयुष्य कठोर परीक्षा घेतं. धीरानं त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. तुझ्या पिढीची मुलं एखादी गोष्ट नकारात्मक घडली, की फार लवकर निराश आणि नाउमेद होऊन जाता रे. अशा वेळी तुमच्या पिढीची खरेच काळजी वाटते. तू खूप संवेदनशील, जास्त हळवा आहेस. माणूस म्हणूनही उंच आहेस. हे खूप छान आहे. निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कितीही काहीही मनाविरुद्ध घडलं तरी खचून जायचं नाही. कोसळून पडायचं नाही. नवा दिवस नव्या संधी घेऊन उगवतो. जी गोष्ट केल्यानं तुला आनंद मिळतो, अशा आवडीच्या क्षेत्रात तू तुझं करिअर करावंस. बाकी तुझी मर्जी. आता तू कायद्यानं सज्ञान झाला आहे. तू या देशाचा जबाबदार नागरिक बनला आहेस.
स्तूती, कौतुक तुला आवडत नाही. तू नेहमी जमिनीवरच असतोस. इतकं असं लिहिणं तुला कदाचित रुचणारही नाही. तरीही लिहिलं आहे. तू समजून घेशील. कारण आपलं नातं इतकं औपचारिक नाहीचये. बापलेकापेक्षाही आपण चांगले दोस्त आहोत. पुन्हा एकदा तुला आभाळभरून सदिच्छा! तुझ्या लाडक्या स्टीव्ह जॉबच्या भाषेत सांगायचं तर stay hungry stay foolish!
तुझा,
आबा.
भाऊसाहेब चासकर.

Monday, 28 August 2017

रोपट्यांची गणेश मूर्तीलोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करायचं तर गणेशोत्सव हा उत्तम मार्ग. हेच ओळखलं वाशीम शहरातल्या देवपेठ येथील महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाने. एक हजार एकशे अकरा रोपट्यापासून दहा फूट उंच गणेश मूर्ती त्यांनी साकारली आहे. ही आगळी वेगळी गणेश मूर्ती बघण्यासाठी शहरातील नागरिकांची एकच गर्दी होत आहे. विशेष म्हणजे गणेश विसर्जनानंतर या रोपट्यांचं वाटप भक्तांना करून ती जगवण्याची शपथ दिली जाणार आहे.चिमुकल्या हातांनी देव झळाळतो..!

औरंगाबाद शहरातल्या सेवन हिल चौकातून सूतगिरणी चौकाकडे निघालं की डाव्या बाजूला वेगवेगळ्या मुर्त्या बनवणाऱ्या अनेक झोपड्या आहेत. बांबूच्या आधार देऊन, वर बेगड टाकून बनवलेल्या तकलादू झोपड्या... पण याच झोपड्यांमध्ये चिमुकल्या हातांचा एक चित्रकलाकार आकार घेताेय. मूर्तीवर रंगाचा सफाईदारपणे हात फिरवणारा हा चिमुरडा आहे जितेंद्र बसनाराम सोलंकी मूळ राजस्थानातला, पण याच्या जन्मापूर्वीच कधीतरी याचे वडील रोजगाराच्या शोधत महाराष्ट्रात निघून आलेले. जीतेंद्र हा मूळ बंजारा समाजतला, त्याची घरातली भाषा गोरमाटी त्यामुळे इथे मराठी भाषेत शिक्षण देणाऱ्या पालिकेच्या शाळेशी त्याचं काही जमलं नाही... 

दुसरी पर्यंत कसतरी ढकलपास झाला नि दुसरीत शाळेला त्याने जय सेवालाल केलं... काही दिवस भंगार वेचून कुटुंबाला मदत केली. पण तो व्यवसाय फारसा न रुचल्याने त्याने मूर्त्यांच्या झोपड्यांमधला कलरचा ब्रश हातात घेतला... आता चांगलं वळण लागलंय त्याच्या हाताला... दिवसाकाठी दहा ते 12 छोट्या आणि पाच ते सहा मोठ्या मुर्त्या तो रंगवतो... सुरुवातीला पांढरा कलर मारून घेऊन त्यावर बेसिक कलर मारायचा नि मग मूर्तीला लेकरसारखं गोंजारत नक्षीदार रंग द्यायचा... जीतेंद्र या मूर्त्यांना इतक्या तन्मयतेने रंगवतो की चूक व्हायला त्याच्याकडे चॅनसच नाही. आता वय वर्ष फक्त बारा असलेला हा कलाकार इतक्या सफाईदारपणे मुर्त्या रंगवतो की जर याला तांत्रिक शिक्षण मिळालं तर चित्रकलेच्या क्षेत्रात नाव काढील पण आज तरी चित्रकला याचा छंद नसून आहे ते फक्त उवजीविकेच साधन... याला वर्षाकाठी या मुर्त्या रंगवण्याचे 30 हजार रुपये मिळतात...  आता सात महिने झालेत त्याला या सात महिन्याच्या काळात किती मुर्त्या रंगवल्या असतील याने हे यालाही आठवत नाही. "पुढे चालून काय व्हायचंय तुला" असा प्रश्न विचारला तर तो "बस अच्छा पेंटर बन जाऊं" इतकी माफक अपेक्षा व्यक्त करतो तो...  आयुष्याकडून खूप कमी मागणाऱ्या या मुलाच्या नशिबात पुढे काय मांडून ठेवलंय हे देवालाच माहीत पण सध्या तरी देवाला झळकवनं त्याचा सुंदर मेकअप करणं हे याच्या चिमुकल्या हातात आहे...                 
दत्ता कानवटे, औरंगाबाद. 9975306001

Sunday, 27 August 2017

गोष्ट फुलपाखरु आणि बेडूकमामाची!!


जिल्हा रायगड. तालुका कर्जत. बीड बुद्रुक गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या प्राथमिक शिक्षिका सविता आष्टेकर. मुलांना थोडं मोकळं अवकाश दिलं, त्यांच्या शोधक वृत्तीला चालना दिली की काय घडतं याविषयी त्यांचं मनोगत -
“जिल्हा परिषद शाळेतील चौथीचा वर्ग! ‘परिसर अभ्यास-1’ या पाठ्यपुस्तकातील पहिलाच पाठ, ‘प्राण्यांचा जीवनक्रम’. या पाठातील ‘बिबळ्या- कडवा फुलपाखरांच्या जीवनावस्था’ प्रत्यक्षात दाखविता येतील का? हा प्रश्न सहजच माझ्या मनात चमकून गेला. आमच्यासाठी सोपे होते ते – कारण ग्रामीण भागात, डोंगरांच्या कुशीत वसलेलं आमचं बीड बुद्रुक गाव. रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातलं हे छोटंसं, पण निसर्गाचं वरदान लाभलेलं, जैवविविधतेनं नटलेलं संपन्न गाव. त्यात दिवस पावसाळ्याचे. डोंगररांगांची हिरवी दुलई, खळाळणाऱ्या झऱ्यांची मंजुळ अंगाई आणि आकाशाची गर्द निळाई अशा जादुई वातावरणात अवघड ते काय असणार?

बेडकाची पाण्यातली डिंबं

छोटीशी शेपटी असणारा बेडूकमासा

छोटीशी शेपटी असलेला बालबेडूक

पूर्ण वाढ झालेला बेडूकमामा

सर्वप्रथम मी मुलांनाच विचारलं, “शाळेजवळच्या परिसरात ‘रुई’ ची झाडं कुठं-कुठं आहेत?” विद्यार्थ्यांनी पटापट हात वर करून उत्तरं दिली. मग आम्ही शाळेबाहेर रूईच्या शोधात निघालो. मुलांसोबत जवळच असलेल्या रूईच्या झुडुपांची पाहणी केली. एका झाडावर पानांच्या मागील बाजूला छोटे-छोटे पिवळसर ठिपके दिसत होते. ती होती, फुलपाखराची अंडी! मग रूईचं एक मोठं पान तोडून काळजीपूर्वकरीत्या शाळेत घेऊन आलो. एका स्वच्छ, पारदर्शक बरणीत झाकणाला जरा मोठी छिद्रे पाडून ते पान त्या बरणीत ठेवलं. काही दिवसांतच ती अंडी फुटली आणि ती फुटलेली अंडी स्वत:च्या पायांनी बरणीत फिरू लागली.
कोंबडीच्या पिल्लासारखे अंडे फुटून पिल्लू बाहेर येत नाही, तर अंड्यालाच चक्क पाय फुटले आहेत, ही मुलांसाठी फार आश्चर्याची गोष्ट होती. मग त्या अंड्याचंच हळूहळू अळीत रूपांतर झालं. या अळीच्या अंगावर सुंदर हिरवे- काळे पट्टे होते. मी मुलांना सांगितले, “आता ती अळी मोठी होणार आहे, तिला पुरेसं खायला मिळायला हवं.” त्यामुळं मुलं उत्साहाने रोज त्या बरणीत न चुकता हिरवी पाने टाकू लागली. अळी आता पानेच्या पाने फस्त करत होती. मुलं उत्साहाने त्या बरणीभोवती जमून अळीची प्रगती पाहत होती, इतकंच नव्हे तर त्या अळीची मोहरीच्या दाण्यासारखी असलेली हिरवट विष्ठाही साफ करत होती. अळी वाढविताना एक सजग भान मुलांच्या वागण्यात डोकावित होते. अळीमध्ये होत जाणाऱ्या बदलांचं निरीक्षण मुलं दररोज करत होती.

पानावरील फुलपाखराची अंडी

कोषातून बाहेर पडू पाहणारे फुलपाखरू

अंगावर पिवळे-काळे ठिपके असलेलं सुरवंटं

अंगावर पिवळे-काळे रंग मिरवणारे फुलपाखरू


एक दिवस त्या अळीने रूईच्या पानाच्या देठात आपले पाय खुपसले आणि तोंडातून चिकट स्राव काढून स्वत:ला टांगून घेतलं. दिवसभरात अळीने स्वत: भोवती सुंदर जाळीदार कोष विणला. अळीचं सुरवंटात होणारं हे रूपांतर मुलांची उत्सुकता वाढवीत होते. आता पुढे काय होणार, हाच विषय मुलांच्या चर्चेत असायचा.
आणि फक्त दहा दिवसांत मुलांची प्रतिक्षा संपली. कारण तो कोष फोडून एक काळ्या-पिवळ्या ठिपक्यांचे चमकदार फुलपाखरू बाहेर आलं. तो क्षण आम्ही कॅमेऱ्यात टिपला आणि बरणीचं झाकण उघडलं. ते देखणं फुलपाखरू क्षणार्धात बाहेर झेपावलं आणि मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मुलं मुळात आजूबाजूच्या जगाकडे शोधक वृत्तीने पाहातच असतात. त्यांना थोडं खतपाणी दिलं की त्यांच्यातला संशोधक जागा होतो, याची प्रचिती मला लवकरच आली. कारण आमच्या शाळेतल्या मुलांनी असाच डिंबापासून बेडूकही तयार होताना पाहिला..
लेखन - सविता आष्टेकर.

चिमुकल्या हातांनी जेंव्हा देव झळाळतो..!औरंगाबाद शहरातल्या सेवन हिल चौकातून सूतगिरणी चौकाकडे निघालं की डाव्या बाजूला अनेक झोपड्या आहेत. इथंच वेगवेगळ्या मुर्त्या बनवल्या जातात. बांबूच्या आधार देऊन, वर बेगड टाकून बनवलेल्या तकलादू झोपड्या. पण याच झोपड्यांमध्ये चिमुकल्या हातांचा एक चित्रकलाकार आकार घेतो आहे. मूर्तीवर रंगाचा सफाईदारपणे हात फिरवणारा हा चिमुरडा आहे जितेंद्र बसनाराम सोलंकी. मूळ राजस्थानातला, पण याच्या जन्मापूर्वीच कधीतरी याचे वडील रोजगाराच्या शोधत महाराष्ट्रात आलेले.
जितेंद्र मूळ बंजारा समाजातला, घरातली भाषा गोरमाटी. त्यामुळे इथं मराठी भाषेत शिकवणाऱ्या पालिकेच्या शाळेशी त्याचं काही जमलं नाही. दुसरीपर्यंत ढकलगाडी झाली नि त्याने शाळेला जय सेवालाल केलं. काही दिवस भंगार वेचून कुटुंबाला मदत केली. हा व्यवसाय त्याला फारसा रुचला नाही. मग मूर्त्यांच्या झोपड्यांमधला कलरचा ब्रश हातात आला. आता चांगलं वळण लागलंय त्याच्या हाताला. दिवसाकाठी १० ते १२ छोट्या आणि पाच ते सहा मोठ्या मुर्त्या तो रंगवतो. सुरुवातीला पांढरा कलर मारून त्यावर बेसिक कलर मारायचा नि मग मूर्तीला लेकरसारखं गोंजारत नक्षीदार रंग द्यायचा. जितेंद्र या मूर्त्यांना इतक्या तन्मयतेने रंगवतो की चूक व्हायला त्याच्याकडे वावच नाही. वय वर्ष फक्त बारा. पण आताच इतक्या सफाईदारपणे मुर्त्या रंगवतो की जर याला तांत्रिक शिक्षण मिळालं तर चित्रकलेच्या क्षेत्रात नाव काढील. पण, आज तरी चित्रकला याचा छंद नसून आहे ते फक्त उवजीविकेच साधन. यातून वर्षाकाठी रंगकामाचे 30 हजार रुपये मिळतात. गेले सात महिने तो हे काम करतो आहे. या काळात किती मुर्त्या रंगवल्या असतील त्याने हेही त्याला आठवत नाही. "पुढे जाऊन काय व्हायचंय तुला" विचारल्यावर तो म्हणतो, “बस अच्छा पेंटर बन जाऊं" इतकी माफक अपेक्षा तो व्यक्त करतो. या मुलाच्या नशिबात पुढे काय मांडून ठेवलंय हे देवालाच माहीत पण सध्या तरी देवाला झळकावणं या चिमुकल्या हातात आहे. 

- दत्ता कानवटे.

Friday, 25 August 2017

खामगावचा लाकडी गणेश

एकाच खोडामध्ये तयार केलेली ही अडीच ते तीन क्विंटलची गणेशमूर्ती भाविकांचे आराध्य दैवत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात खामगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे खामगावात मोठमोठय़ा कंपनीच्या जिनिंग-प्रेसिंग होत्या. या जिनिंग-प्रेसिंगवर काम करणाऱ्या अधिकार्‍यांचे जेवण बनवण्यासाठी दक्षिणेतील अय्या (आचारी) ठेवण्यात आले होते. हे अय्या राहायचे तो भाग म्हणजे 'अय्याची कोठी' म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. त्याकाळी या अय्या लोकांनी एकाच खोडावर कोरीव काम करून अखंड लाकडी गणेशाची स्थापना एका ओट्यावर केली होती. कालातरांने १९९५ मध्ये या मंदिराची रजिस्टर संस्था स्थापन झाली. आणि विश्‍वस्त मंडळाने मंदिर बांधून घेतले. शहरातून निघणार्‍या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा मान या गणपतीला असतो. मिरवणुकीनंतर या गणेशाची मंदिरात पुन्हा स्थापना केली जाते. सध्या या मंदिराचा कार्यभार अध्यक्ष म्हणून अँड.आर.बी.अग्रवाल पाहत आहेत. 

Tuesday, 22 August 2017

एका दत्तक घेतलेल्या मुलीची आई..

प्रवास पालकत्वाचा -
आई असण कळलं त्या वयापासुन आई होण्याच स्वप्न. आई तेही एका मुलीची आई, आणि तेही एका दत्तक घेतलेल्या मुलीची आई... हे स्वप्न वाढवित मोठे झाले. मोठे होत राहीले तसतसे स्वप्नही वाढत राहिलं. स्वप्नाचा मार्ग दुर्धर आहे हे कळत होतं. तसं होतही गेलं, रितीभातीच्या अडचणी आल्यात, सामाजिक मापदंडाचे नैतिक नितीनियम आलेत. उभयतांमधील वैचारिक संघर्ष आला. जवळच्या माणसांची रोकटोक आली...
भिती दिली, असहकार दाखवला, मग मुलगीच का? घेतली तीही सावळी..? अश्या एक ना अनेक कारणाचा प्रश्नांची ढग फुटी झाली. तरी मजल दर मजल गाठत या सरयांना एक बहारदार उत्तरं दिलं ‘श्रावणी’.
श्रावणातला जन्म म्हणून श्रावणी. ती हे नाव घेऊनच आली त्यामुळे मग तेच कायम राखलं. घरी आणल्याचा दिवस वाढदिवस करं, असेही सुचविण्यात आले. पण मला तिच्या निर्मीणाचा सन्मान करायचा होता, स्विकार करायचा होता संपुर्ण.
१८ ऑगस्ट २००५ चा जन्म. गेल्या अठराला श्रावणी १२ वर्षाची झाली. बारा वर्ष, एक तप. एका तपाची साधाना, एका तपाची श्रावणी.
पहिल्यांदा कुशीत घेतले. तेंव्हाचे तिचे डोळे आठवतात. निरव, कुठलीच वस्ती नसलेले. प्रेषीतासारखे. माझ्यात शोध घेत असल्याची तेवढी एक उघड झाप. पाय आक्रसुन पोटाशी घेतलेले. शरिराची छोटीशी गाठोडी करुन मिटून घेत… आव्हानच वाटलं तेंव्हा या कळीला फुलवायच म्हणजे…?
अगदी म्हणतात तसा ओल्या मातीचा गोळा तो…त्याला आकार द्यायचा, या तळहातावर घडवायच, कुशीत वाढवायच, बोट धरुन शिकवायच सारं…
सुरवातीला जरा एकएकटीच राहायची. खुप शांत, सर्वसामान्य मुलांसारखी दंगामस्ती नाहीच… एकदम शिस्तीत. खाणे, झोपने, उठने... पण मग एक सात आठ महिन्यानी मी दिसायला लागले तिच्या डोळ्यात, तिच्या स्पर्शात… मायेचा पान्हा भरुन पावला. आता तिच्या तान्हुल्या जगात आम्ही तिचे होऊन वावरत होतो. तिची काळजी घेत होतो. तिला जपत होतो.
माझे हात राकट म्हणून मालीशची जवाबदारी देवेनला. देवेनचे हात फार मऊसुत… त्यानंतर तिची उन उन आंघोळ, मग तिची छानशी तयारी, मग तिच्या सोबत खेळणे, दोघांनी मिळून भरवने, मग तिची झोप… ती झोपली की घर शांत. त्यामाघारी घरची सगळी काम आटोपून संध्याकाळी तिला बेबी बॅगमधे टाकून भुर्रर्रर्र…फार स्वप्नवत होते ते दिवस…
त्या दिवसात नवराष्ट्र सोडले होते मी यासाठी.
तरी बाल संगोपणाची फारसी माहिती नव्हती, जवळ कुणी सांगणार नव्हतं त्यामुळे तिला काही झालं ते पटकन कळायच नाही त्यावेळेस जरा हालच झाले माझ्याकडून श्रावणीचे. पण मग सांभाळून घेतले. शिकले.
देवेन त्याच्या या ना त्या कारणामुळे दुरच असायचा. त्यामुळे जस्तीत जास्त आम्ही दोघीच असायचो. एकमेकींसोबत; एकमेकींसाठी. तिला भातुकलीची फार आवड. ती तिच्या भातुकलीत ती, मी, आणि तिची बाहुली असा खेळ मांडत असे…एकदा देवेन बोललाही हिच्या संसारात मी कुठे दिसत नाही…
देवेन गेल्यावर सगळीकडून जरा पोरक्या, परक्या झालोत आम्ही. तेंव्हा दोघी सुन्न… तिला इथे तिथे गुंतवून मी सैरभैर. शुन्य. पण मग सावरलं तिने हसत-खेळत मनवलं जिंदगीला. आणि मलाही.
ती देवेनला बबुडी म्हणायची. बोलायला लागल्यावर तिचा पहिला शब्द बाबाच! तिचा बाबा मी तिला देऊ शकणार नाही याचं शल्य राहील.
मी श्रावणीला तिच्या वास्तवापासुन कधीच दुर ठेवलं नाही. तिला शब्द अर्थ कळायला लागल्यापासुन मी तिला ती माझ्यासाठी विशेष असल्याच सांगत आलेय. ती सर्वसामान्य मुलांसारखी पोटातून नाही तर मनातुन जन्माला आलेली आहे असे समजावत आले. बिंबवत राहीले, तश्या गोष्टी सांगीतल्या. कथा कथुल्या बनवल्या. प्राणी, पाखरं, पान यांचे संदर्भ दिले. सृष्टीतला प्राण समजावून सांगीतला... तिने ते समजून घेतले. स्वसन्मानाने आपले असणे स्विकारले सोबत माझेही… तिचा तो स्विकार सृष्टीने आमच्यातील अद्वैत स्विकारण्यासारखा…
मित्रांनो, श्रावणी सुनीता देवेंन्द्र वानखेडे खुप गुणी मुलगी आहे. तिला प्रत्येक गोष्टीची आवड आहे. ती सगळ करुन पाहाते. अभिनयाच अंग आहे तिला. आवाज चांगला आहे. उच्चारही. खुप स्वप्न आहेत तिची. ती law of attraction ला मानते. तिच्यासाठी, माझ्यासाठी खुप काही काही करेल म्हणते. आणि प्रत्येक वेळेस यासारयात एक महत्त्वाच सांगून जाते,
आई, मोठी झाल्यावर ना मी ही एक मुलगी दत्तक घेईल…तुझ्यासारखी!
  सुनिता झाडे

Monday, 21 August 2017

आधी शिवावी वाकळ, मग मिळते भाकर


“चिंध्या द्या, जुने कपडे द्या, गोधडी, वाकळ शिवून घ्या” असं ओरडत दोन बाया गल्लीत आल्या. कालही आल्या होत्या पण आज त्यांना काम मिळालं.
नांदुसा येथील पद्मीनबाई रामजी आंतळकर आणि लोहा येथील रुक्मिणी बाबुराव मोरे, या सख्या दोन बहिणी. माहेर लोहा. दोघींची बालवयातच लग्ने झालेली. आज पद्मिनबाई ४० तर रुक्मिणीबाई ६० वर्षाच्या. पतीला, मुलांना हाताला काम नाही. या दोघी आणि त्यांच्या सुनाही गोधडी ,वाकळी शिवून संसारांचा गाडा ओढत आहेत.
पद्मीनबाई सांगत होत्या, “आम्ही सात बहिणीं गोधडी, वाकळी शिवतो. आमच्या आई, सासूने आम्हाला हे काम शिकविलं. तेच काम आम्ही आमच्या लेकीसुनांना शिकवलं. हा आमचा परंपरागत व्यवसाय आता दुष्काळातही साथ देत आहे”. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा काहीही असो, या दोघींचं हेच काम अखंड सुरू आहे. पद्मीनबाई म्हणतात, “वयाच्या बारा वर्षापासून लांब सुया आणि जाड दोरा आमची सोबत करतो आहे. मुक्त भटके जीवन जगत, कधी शाळॆत, पारावर, तर कधी मोकळी जागा बघून आश्रय घेतो. कधी पाल टाकून मुक्काम करतो. आकाशाचं पांघरून आणि जमिनीचं अंथरून करून आम्ही जगत आहोत. विहीर, आड, नदीचं पाणी घेऊन आंघोळ करायची. तीन दगडांची चूल मांडून भाकरी बडवायच्या, तांदूळ शिजवायचे. कधी जे शिळेपाके मिळेल त्यावरच गुजराण करायची. आणि पोटाची खळगी भरायची”.
वाकळ आणि गोधडीतला फरक रुक्मिणीबाई समजावून सांगतात. त्या म्हणतात, यात फारसा फरक नसतो. शिवणीत अंतर असते. वाकळ एकदा फाटली की पुन्हा शिवता येत नाही. रुक्मिणीबाईंचा मुलगा मोलमजुरी करतो. तर मुलीचं लग्न झालेलं आहे. या दोघी बहिणी एकमेकांसोबत महाराष्ट्र पालथा घालतात. कष्टांची कमाई आणतात. मुलीचे लग्न, आजारपण, घर बांधकामासाठी घेतलेली सावकाराची कर्जे या कमाईमधूनच फेडतात.
सध्या गावात काम नाही. दुष्काळामुळे शेतीची कामं मिळत नाहीत. पद्मीनबाईचे पती, तीन मुलं घरीच बसून आहेत. त्यांच्या दोन्ही सुना सध्या भोकर तालुक्यात वाकळ, गोधड्या शिवण्याचं काम करीत फिरत आहेत. शेतात दिवसभर राबून १०० रुपये रोज मिळतो तिथे एका गोधडीचे दीडशे ते अडीचशे रुपये मिळतात. पण रोजच हे काम मिळत नाही. कधी लगेच तर कधी चारचार दिवस काम मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद, पुणे, सोलापूर, लातूर इत्यादी महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हे या दोघीनी पालथे घातले आहेत.
दारिद्रयरेषेखाली येत असल्याने स्वस्त धान्य दुकानावर धान्य मिळतं पण महिन्याला चार पायल्या गहू आणि चार पायल्या तांदूळ घरातील तेरा माणसाना पुरत नाही. या गल्लीत चार गोधड्या शिवून “चरैवती चरैवती चालू लाग बाई ..” हा मंत्र जपत दोघी बहिणी उदगीरला निघाल्या ...


- सु.मा.कुळकर्णी.

पोळ्याच्या झडत्या

पोळ्याच्या झडत्या

बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. पूर्व विदर्भात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो. पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात. हा लोककलेतील काव्यप्रकार. गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात. झडत्या वाचण्यापेक्षा त्याचं सादरीकरण मनोरंजक ठरतं. विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात.
दरवेळी पोळ्याला झडत्यांचा विषय बदलतो. वर्तमानातील समस्या, राजकारण, व्यक्ती, महागाई, भ्रष्टाचार यावर झडत्यांमधून व्यंगात्मक टीका केली जाते. गेली तीन वर्षे झडत्या पीएम, सीएम यांना केंद्रस्थानी ठेवून झडल्या जात आहेत. यावर्षी पीककर्ज माफी, नोटबंदी, जीसटी, दुष्काळ हे विषय झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. झडत्यांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील वेदनेला व्यंगातून व्यक्त करतात.खांदशेकणीचे आवत न दिल्यावर पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना नदी, नाल्यावर स्वच्छ धुवून त्यांच्या अंगावर नवीन झूल चढवितात. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. गळ्यात घुंगराच्या, कवड्यांच्या माळा घालतात, गळ्यातील दोर व वेसन बदलविण्यात येते. बेगड, गेरूने शरीरभर ठप्पे मारले जातात. सजविलेले बैल मारुतीच्या मंदिरापुढे नेवून देवदर्शन घेतात. दुपारी तोरणाखाली पोळा भरवला जातो. त्यांना खास पुरणपोळीचा पाहुणचार दिला जातो. शेतातील गडी माणसांनाही धोतर, बंडी असे नवीन कपडे देण्याची प्रथा आहे. पोळा फुटण्यापूर्वी गर्दीतील एखादा शेतकरी झडत्याची सुरूवात करतो.
माह्या पायाला रूतला काटा,
झालो मी रिकामा,
नाही पिकलं यंदा,
तर जीव माह्या टांगनिला
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
आम्ही करतो पराटीची शेती,
परावटीवर पडली बोंड अळी,
नागोबुडा म्हणते बुडाली शेती,
प्रकाश पाटील म्हणते लाव मातीले छाती,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
वाटी रे वाटी, खोबऱ्याची वाटी
महादेव रडे दोन पैशासाठी
पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी
देव कवा धावंल गरीबासाठी
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देल्ली गुरूच्या हाती
गुरूनं घडविला महानंदी
ते नेला हो पोळ्यामंदी,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
आभाळ गडगडे, शिंग फडफडे
शिंगात पडले खडे,
तुही माय काढे तेलातले वडे
तुया बाप खाये पेढे
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
सत्तेत आली काशी, पण विमान सदा आकाशी
म्हणे प्यारे देशवासिंयो, लाऊंगा काळे धन मै
तुम ना रहोंगे उपाशी
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
शेतकऱ्यायले देल्ल पीक कर्ज
भरतच आहो आम्ही अजून अर्ज
सरकारनं आम्हाले दावणी बांधलं
तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आणलं
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
उदंड झाले पीक पण हातावर तुरी
गोड बोलून आमच्या छातीत खुपसली सुरी
घोषणेचा सुकाळ, कृतीचा दुष्काळ
देवे इंद्रा तुझ्या राज्यात कसा आला काळ
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव

Sunday, 20 August 2017

वृध्द आजोबांची घोडेसवारी...


सोलापूर जिल्हा. करमाळा तालुक्यातील करमाळा-जेऊर महामार्गापासून २ किलोमीटरवरचं झरे गाव. इथले ८७ वर्षीय आजोबा अर्जुन केशव कदम. आजोबा आजही कुठंही जाण्यासाठी घोड्याचा वापर करत आहेत. त्यांची दररोज २५ ते ३० किलोमीटरची घोडेसवारी होते. या वयातही तरूणांना लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये जाणवतो. विशेष म्हणजे त्यांनी आजपर्यंत वाहतूकीसाठी घोड्याशिवाय कोणत्याच साधनांचा वापर केलेला नसल्याचं ते सांगतात.
कदम यांना वयाच्या सहाव्या वर्षापासूनच घोडसवारीचं आकर्षण निर्माण झालं. ते आज ८७ व्या वर्षीही कायम राहिलं आहे. काम असेल तिथं घोड्यावर बसूनच जायचं हा लहानपणापासूनचा नियम त्यांनी आजपर्यंत मोडलेला नाही. लहान असताना घोड्यावर बसून जनावरं राखण्याचं काम ते करत. शेतातील भाजीपाला विक्री करण्यासाठी करमाळा, जेऊर, कंदर, केम या ठिकाणी आठवडी बाजारात, नातेवाईकाकडे, कुणाच्या लग्नकार्यासाठी प्रवास करताना ते घोड्याचाच वापर करत आले आहेत. आजची तरूण मंडळी शौक म्हणून दररोज चार पाच किलोमीटर घोडेसवारी करणं वेगळं, पण कदम आजोबा दिवसभर घोड्यावरून खाली न उतरता सहज तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास न थकता करतात. सध्याचा हा त्यांचा पाचवा घोडा. प्रत्येक घोड्याला त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं आहे.
प्रवासात ओळखीचं कुणी दिसलं की घोड्यावरूनच दोन हात जोडून मोठ्याने राम-राम आजोबा दोन शब्द बोलतात आणि “हं...बुगडी...चल..” असं म्हणत पुढं जातात.
आज वृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडायचं तर आधाराची गरज भासते. पण, कदम आजोबा दिवसभर घोड्यावरूनच फिरताना दिसतात. लहानपणापासूनची घोडेसवारीच त्यांच्या या वयातील उत्तम आरोग्याचे रहस्य असेल कदाचित.

 - गणेश पोळ.

विदर्भातील पारंपारिक खांदेमळण, आवतणची जुनी परंपरा

पोळा विशेष
उद्या पोळा. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण. शेतकऱ्याचा सहकारी असलेल्या बैलजोडीला यादिवशी विशेष मान दिला जातो.आजचं या सणाची खरी लगबग सुरु होते. आधी बैलाला आमंत्रण दिलं जातं. नदीवर स्वच्छ धुवून, त्याच्या खांद्याला पळसाच्या पानांनी लोणी-हळदीचं मालिश होते. या खांदेमळणानंतर बैलाला पोळ्यापर्यंत विश्रांती दिली जाते. पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी व ज्वारीच्या ठोंबराच्या जेवणाचं आमंत्रण बैलाच्या कानात दिलं जातं. हेच बैलाचं पारंपारिक मानाचं आवतन. बैलाला तेलाने मालीश करून वर्षभर झालेल्या इजा दूर केल्या जातात. शिंगाची रंगरंगोटी केली जाते. 
- अमोल सराफ.

खरंच, छडी लागे छमछम?

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
चंद्रपूर जिल्ह्यातील थेरगाव प्राथमिक शाळेत शिकवणारे हरीश ससनकर. त्याआधी काही काळ ते तळोधी गावातील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१६ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारही ससनकर यांनी मिळवला आहे. ‘मुलांना मार देऊन खरंच सुधारणा घडते का?’ याविषयीचं हे त्यांचं चिंतन त्यांच्याच शब्दात -
माजी विद्यार्थ्यांना भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो, या भेटींनी मला बरंच काही दिलंय. सध्या मी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या थेरगाव प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी मी कोरपणा तालुक्यातील तळोधी गावातील शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावित होतो. त्याच गावातील माझ्या माजी विद्यार्थिनीने स्नेहाने, मला तिच्या घराच्या वास्तुशांतीचे निमंत्रण दिलं होतं.
खरंतर ती शाळा सोडून मला सहा वर्षं झाली होती. पण स्नेहाचं आग्रहाचं निमंत्रण आलं आणि मी सकाळची शाळा करुन तळोधीला पोहोचलो. गावात हरीशसर आले आहेत हे ऐकताच अनेक माजी विद्यार्थी रस्त्यातच भेटू लागले. शिक्षक जरी कालांतराने विद्यार्थ्यांचे चेहरे विसरुन जात असले, तरी विद्यार्थ्यांच्या मात्र ते चांगलेच स्मरणात असतात हे मला जाणवलं. अनेक विद्यार्थी मला त्यांच्या घरी येण्याचा आग्रह करु लागले.
असाच वाटेत सुयोग भेटला आणि त्याने मला घरी नेले. चहा पाणी झाल्यावर सुयोग निर्भिडपणे म्हणाला, “सर तुम्ही मला मारलं होतं’’ मीही लगेच म्हणालो, “हो सुयोग, मला चांगलंच आठवतंय तुला मी मारल्याचं, इतकंच काय तेव्हाचा तुझा चेहराही आठवतोय मला! “तेव्हा सुयोगची आई म्हणाली, “सर, याने तुम्ही जाईपर्यंत सांगितलंच नाही मला की, तुम्ही त्याला मारलं होतं’’ मला अगदी गहिवरून आलं. माझ्या मारात या लहानग्याला काय चांगलं दिसलं असेल तेव्हा? त्याला मारल्याची चूक आठवून वाईट वाटायला लागलं. पण आता हा सुयोग सैनिकी शाळेत शिकतोय, हे ऐकून समाधानही वाटलं.


सकाळपासून भेटलेल्या मुलांपैकी बहुतेकांनी माझ्या हातचा मार खाल्लेलाच होता. भेटलेल्य़ा अनेक विद्यार्थ्यांना मी मिठीच मारली. मुलांना मी म्हणत होतो, “किती रे तुमचं प्रेम! मी तुम्हांला मारलं तरी तुमच्या प्रेमात, आदरात तसूभरही फरक पडला नाही” मी विचार करत होतो- खरंच काही गरज होती का मुलांना मारायची? मारलेल्या छड्यांचे वळ गेलेही असतील, पण सुयोगसारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनाला झालेल्या जखमांचं काय? हा विचार मी त्याकाळी केलाच नव्हता.
पण आता मात्र मी निश्चयाने बदललो आहे. विद्यार्थ्यांना न मारता अध्ययनाची पद्धत बदलून त्यांच्यात चांगले बदल घडविता येतात यावर आता माझा विश्वास आहे. सारखी शाळा बुडविणाऱ्या, वर्गात झोपणाऱ्या काजल सिडाम या विद्यार्थिनीमध्ये मी असा बदल घडवला आहे. आधीच्या शिक्षकांनी तिच्यासमोर हात टेकले होते. मी मात्र न रागावता, न मारता काजलला अभ्यासाची गोडी लावली. तिच्याशी मैत्री केली. ती वर्गात झोपू नये म्हणून वर्गात जास्तीत जास्त खेळ आणि गाणी घेऊ लागलो. तिला मुद्दाम सगळ्यात सोपा प्रश्न विचारून तिने उत्तर दिले की मुलांना टाळ्या वाजविण्यास सांगू लागलो. ही गोष्ट होती साधीशी- पण त्यामुळे आपल्याला अभ्यास येतो, यावर काजलचा विश्वास बसला आणि ती नियमित शाळेला येऊ लागली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना न मारताही त्यांच्याच हवी ती सुधारणा करता येते यावरचा माझा विश्वास दृढ झाला आहे. आणि सुयोगला मारण्यासारखी चूक माझ्या हातून यापुढे घडणार नाही याचा मला विश्वास वाटतो.
मुलांना मार देऊन खरंच सुधारणा घडते का
 - हरीश ससनकर.

Friday, 18 August 2017

घरबांधणीचा ‘अजंदे पॅटर्न’

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका. इथलं अजंदे बुद्रुक गाव. सर्व जातीधर्माच्या बेघरांसाठी एकाच वस्तीत १०० घरकुलं इथं बांधण्यात आली आहेत. स्थानिक कामगारांकडून ही घरं बांधण्यात आली. विशेष म्हणजे शासन निकषापेक्षा जास्त क्षेत्रफळाची ही घरं आहेत. संमिश्र वस्तीमुळे, ही घरकुल योजना सामाजिक सलोख्याचं प्रतीक बनली आहे.
ग्रामपंचायतीने २६९ स्क्वेअर फुटाच्या घरांऐवजी लाभार्थ्यांना तब्बल ३६० स्क्वेअर फुटाची घर बांधून दिली आहेत. या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्यांना दुमजली घर बांधण्याची इच्छा झाली. तेव्हा घर दगडाच्या पायावर नव्हे तर आरसीसी कॉलमवर उभारण्यात आलं आहे.
सुरुवातीला घरं बांधायला जागा नव्हती. शासनाकडून मिळणारं अनुदान ९५ हजार रुपये आणि खर्च दीड लाखावर, अशा परिस्थिती मेळ कसा बसवायचा ? सगळा विचार करून ग्रामपंचायतीने महात्मा गांधींचा विचार प्रमाण मानला. आणि घर बांधण्यासाठी लागणारं साहित्य, कुशल - अकुशल कामगार हे गावातूनच घेतले. मात्र, ना नफा ना तोटा या तत्वावर काम करण्याची अट ठेवली गेली. ही अट सर्वानीच मान्य करीत दीड लाखांचा खर्च लाखांच्या घरात आणला.घरकुलांचं हे काम कमी खर्चात करत असताना गुणवत्तेत कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही. उत्कृष्ट दर्जाचं साहित्य वापरून शौचालयासहित परिपूर्ण अशी ही घरकुलं आहेत. दुतर्फा पक्के रस्ते, झाडं, पथदिवे, गटारी अश्या सर्व पायाभूत सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. घरकुलामध्ये राहणाऱ्या सर्व समाजबांधवांना आपले सण उत्सव साजरे करण्यासाठी समाजमंदीरही बांधण्यात आलं आहे.
या कामासाठी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विरोधातील सदस्यांनाही विश्वासात घेतल्याने या सर्वधर्मीय घरकुलांचे निर्माण पूर्ण झाले. या कामात अजंदे ग्रामपंचायतीला स्थानिक आमदारांनी खंबीर साथ दिली. सध्या उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावातील ग्रामस्थ आणि पदाधिकारी हे घरकुल पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे घरकुलाचा 'अजंदे पॅटर्न’ लवकरच नावारूपाला येईल यात दुमत नाही.
प्रशांत परदेशी.

Thursday, 17 August 2017

रियाज ...


व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
मनाच्या किंवा शरीराच्या दुखण्यांमुळं कधी कधी परिस्थिती अगदी नाजूक होऊन बसते. मनाचं ठीकाय, ते चार भिंतीत आपण काबूत आणू किंवा कोंडून घालू किंवा अगदी खासगीतल्या मित्रमैत्रिणींच्या विश्वासाच्या खांद्याचा टेकू घेऊ. मात्र शरीराच्या दुखण्याची बिकट असते अवस्था. अशावेळी आपण कितीही खंबीर असू तरी जखम सतत उघडी पडते. यानं आपल्याला फार कानकोंडं होतं. दुखतंय याचं रडू, आपल्या दुखण्याच्या शांत होण्याचे मार्ग इतरांवर अवलंबून आहेत याचं रडू आणि आपण असे चारचौघात सारखे का फुटतोय याचं रडू. अगदी बिकट अवस्था होऊन जाते. - अशावेळी आपल्याला कोणती व्यवस्था लाभते नि ती कशी वागते यानं आपल्या मनाचे ऋतू झरझर बदलतात. माझ्या सुदैवानं मला ही फार छान लाभलीय.
मला मिळालेले डॉक्टर्स फार मस्तयत. वेगवेगळ्या उपचारपद्धतीत तज्ज्ञ असणार्‍या आठनऊ मित्रांनी सुरु केलेल्या हॉस्टिलचं आज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालंय. ही सगळी फळीच मला गरजेनुसार लागणार्‍या उपचाराशी निगडित आहे. - आणि उपचाराचं सत्र वगळता एरवी हे सगळे माझे मित्र आहेत. तर अशा या ऍस्टर आधार हॉस्पिटल’मध्ये एका मिटिंगच्या निमित्तानं जमलो असताना माझी एक मैत्रीण म्हणाली, ‘‘मिटींगचं ठीकाय गं, पण नक्को वाटतं हॉस्पिटलच्या या विशिष्ट वातावरणात. आजार आणखी वाढेल असा ताण येतो मनावर.’’ - पण खरंतर, मला मिटिंग नि आजारपणाशिवायही या व्हीलचेअर फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये नुसती चक्कर मारायला आवडते. जिथं आपल्याला सहजपणानं अत्यंत चांगली वागणुक मिळते व दुखणं बरं होतं त्या जागेविषयी ममत्वच वाटत राहातं.

  ऍस्टर आधार’ खूप लांब असल्यामुळं माझ्या फॉलिस कॅथेटरच्या अडचणींसाठी माझ्या घराजवळ असणारं ‘वात्सल्य हॉस्पिटल’ माझ्या मैत्रिणीनं डॉ.रचना संपतकुमारनं मला सुचवलं. म्हणाली, अगं डॉ.विद्या नि डॉ.भरत ठकार म्हणजे माझे मावशी नि काका. भेटल्यावर या दोघांनीही अतिशय मोकळेपणानं माझं सगळं समजून घेतलं. डॉ.अश्विनी मुळ्येंशी गाठ घालून दिली. चोविस तासातल्या कुठल्याही मिनटाला मी हाक मारली तर आम्ही आहोत असा विश्वास दिला नि माझा मनाचा त्रास निवळत गेला. शरीराचा निवळायला वेळ लागणार होता, पण ते आहेत याच्या खात्रीमुळं तो ही आवाक्यात आहे.
डॉ.विद्या नि डॉ.भरत यांचा ऍप्रॉच सगळ्यांच्याच बाबतीत असा असतो. या ‘वात्सल्य’ कुटुंबात गेली चार वर्ष मी दर आठवड्याला ब्लॅडरवॉशसाठी जातेय. यातल्या व्यवहाराला या दोघांनी पूर्णविराम दिलाय. इथं जाताना मी फार उत्साहात नि मस्त नटून जाते, कारण हे सगळेही खूप उत्साहात असतात. डॉ.विद्या, डॉ.अश्विनी, डॉ.भरत दरवेळी भेटतातच असं नाही, पण सगळ्या कर्मचार्‍यांना ‘सोनालीचं कुटुंब आपण आहोत’ याची खूण त्यांनी पटवून दिल्यामुळं कुठं काही अडत नाही. इथं कधी चिडाचिड नि आदळआपट मी आजवर ऐकलेली नाही. बारीकसारीक धुसपूस असेल तर ती हलक्या हातानं तर कधी दुर्लक्षानं कशी निपटायची ते डॉ.विद्या फार मस्त जमवतात. एखादी मदत तर त्या चाकोरीपलीकडं जाऊनही करतात नि आपल्या आसपासच्यांना स्वत:च्या वागण्यातून जाणवून देतात की तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही मागं हटू नका. त्यामुळंच तर जवळपास दोन वर्ष, ड्युटी संपल्यावर त्यांच्याकडं त्यावेळी काम करणार्‍या सरिता आणि कविता या सिस्टर्स ब्लॅडर वॉशसाठी मला न्यायला नि सोडायला नियमितपणानं यायच्या... आम्ही कशी मदत करतो याचा डांगोरा पिटू नये, फक्त एकमेकांचं समाधान पाहावं अशी रीतच आहे या ‘वात्सल्य’ कुटुंबाची. प्रत्येकाच्या वाढदिवसाचा केक डॉ.भरत नि डॉ.विद्या जरूर आणतात नि दणक्यात वाढदिवस साजरे होतात. छोट्यामोठ्या पार्ट्या तर होतंच असतात.


अलीकडं बरेचदा असं होतं की रिक्षावाले रिक्षात उचलून ठेवायला नि व्हीलचेअर फोल्ड करून आत ठेवायला तयार नसतात. आपण तयार नाही असं कधी ते थेट सांगतात, कधी वेगळं काही कारण देतात. अनेकदा पायर्‍या चढवायला कुणी नसतं. अशावेळी मन खूप दुमडतं. - पण जे डाचतंय ते हलक्या हातानं, समजुतीनं सोडवून किंवा कधी कधी तसंच सोडून देऊन मन मोकळं ठेवावं नि सगळ्याला सामोरं जावं हा ‘वात्सल्यमयी’ दृष्टीकोन मला या कुटुंबाकडून मिळालाय. त्यामुळंच धीर धरून, सहजता ठेवत समोरच्याची ‘वेळ’ समजून घ्यायची नि त्याला बदलायला वेळ द्यायचा... बदल नाही झाला तर कडवटपणा ठेवण्याऐवजी त्यापाठीमागचं कारण समजून घ्यायला वेळ घ्यायचा असा सगळा रियाज चालू झाला. अशा ‘ऍटिट्यूड’ मुळं जो सोपेपणा येतो तो आपल्या नसा मोकळ्या करत जातो हा अनुभव मी घेतेय.
- सोनाली नवांगुळ

Tuesday, 15 August 2017

प्रत्येकालाच आदर्श पालक व्हायचं असतंसमाजाभिमुख वकिलीची कल्पना प्रत्यक्षात आणणारे अॅड असीम आणि त्यांच्या पत्नी अॅड रमा सरोदे यांची स्वतःच्या बाळासोबत एक दत्तक मुलं असावं अशी इच्छा होती. पण, घरच्यांच एकमत झालं नाही. आज त्यांचा मुलगा रिशान १२ वर्षाचा आहे. रिशान शब्दाचा अर्थ आहे - गुड हयुमन बिईंग. पालकत्वाच्या प्रवासाविषयी असीम भरभरून बोलले.
“परिपूर्ण पालकत्व असं काही नसतं. प्रत्येकालाच आदर्श पालक व्हायचं असतं. पण प्रत्यक्ष जीवनाची लढाई, पैसे कमावण्याचे ताण हा विचार क्षणभंगुर ठरवितात. आपण खरोखर जसे आहोत, तसं राहाणं अणि आपल्या मुलासोबत स्वतःला विकसित करत जाणं ही एक प्रक्रीया आहे.
रिशान माझ्यासोबत माझ्या विविध जाहीर सभांना, वेश्या, अपंग, एचआयव्हीबाधी, कारागृहातले कैदी अशा समाजघटकांच्या कार्यक्रमांना, भारतात आणि ऑस्ट्रेलिया- दुबईतल्या न्यायालयांमध्ये येत असतो. अशा ठिकाणी येण्याचा एक वेगळा प्रभाव त्याच्यावर पडतोच. त्याची विचार करण्याची प्रक्रिया, एखादया विषयावर भूमिका घेण्याची ताकद मला आत्ताही जाणवते. मला कामामुळे ब-याचदा समाजकंटकांकडून धमक्या येतात, जिवालासुध्दा भीती असते. यामुळे रिशानला नक्कीच असुरक्षित वाटतं. अशा वेळी मी त्याला केसेसबद्दल माहिती देतो. चांगलं काम केलं, तरी लोक त्रास देतात हे समजावून सांगतो.
रिशानच्या मनात माझ्या आणि त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या खूप आठवणी असाव्यात असं मला वाटतं. यात खरं तर रमाने आई म्हणून बाजी मारली आहे. रिशानच्या काही आठवणी मला आजही महत्वाच्या वाटतात.
एकदा त्याने मला विचारलं, की टु झीरो व्टेन्टी, थ्री झीरो-थर्टी, फोर झीरो फोर्टी, फाईव्ह झीरो फिफ्टी - तर मग वन-झीरो वन्टी असं आपण का नाही म्हणत? अत्यंत लॉजिकल विचार करणारा हा मुलगा असल्याची त्याने दाखविलेली चुणुक मला सुखावून गेली होती. माझ्यातल्या काही वाईट गोष्टीही त्याच्यात आहेत. उदा - गणिताचा त्याला असलेला कंटाळा. मी त्याला गणिताचं महत्व सांगायला जातो तेव्हा तो सांगतो, “बाबा, अरे जवळपास 85 % मुलांना गणित आवडत नाही. मी काही एकटाच नाही.” यावर काय बोलणार? मी त्याच्या वयात इतका स्मार्ट नव्हतो. कदाचित प्रत्येकच आई-बापाला आपल्या मुला/मुलीबद्दल असंच काहीतरी वाटत असेल
.
रमाचे आणि माझे अनेकदा वादविवाद होतात. एकदा रिशानने मला बाजूला नेउन समजावणीच्या सुरात म्हटलं “बाबा, तू जे आईला सांगतोस ते बरोबर असतं. पण ते तू न ओरडता सांगत जा ना!” नंतर मला कळलं की तो असंच रमाशीही बोलला. हा मुलगा तर माझाच बाप आहे, असं मला वाटलं.
रिशानसाठी पुरेसा वेळ देणं योजलं तरी शक्य होत नाही. तरी वेळ काढून मी त्याला बातम्या आवर्जून वाचून दाखवतो. कधी टीव्हीवरील बातम्या बघताना चर्चा करतो. रिशान मुळात चौकस आहे. त्याची स्वतःची अशी मतं असतात. एखादी समस्या असते, तेव्हा तो नक्कीच आम्हा दोघांशी बोलतो.
आपल्या मुलाने खूप पुस्तकं वाचावी असं बहुतेक पालकांना वाटतं. रिशानच्या वाचण्याचा फॉर्म वेगळा आहे. तो व्हिज्युअल वाचनाने म्हणजे गुगल सर्च, यु- टयुबवरील माहीतीपट याने स्वतःला अपडेट ठेवतो. त्याची या वयात सगळयांशी मिळून-मिसळून राहण्याची वृत्ती, जनसंपर्क याचं आम्हाला कौतुक आहे. आमच्याकडे येणा-या परदेशातील मुला-मुलींशीसुध्दा रिशान सहज संवाद साधतो.
७ वर्षांच्या रिशानने नागपूर आकाशवाणीने घेतलेल्या मुलाखतीत, अगदी आत्मविश्वासाने वाघांना वाचवा, प्राण्यांना-झाडांना जगू द्या हे पोटतिडकीने सांगितलं होतं. त्याला लिखाणाची, कवितांची,फुटबाँल, स्विमिंग, कुकींग याची आवड आहे. त्याने मोठेपणी वकील बनावं की शेफ की आणखी काही, याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याने एक संवेदनशील आणि काळजी घेणारी व्यक्ती असणं महत्वाचं आहे.
काहीही कारण नसतांना आनंदी राहाण्याचं बालवय रिशानने पार केलं आहे. कारण हल्ली तो अनेकदा ‘बोअर’ होतो. आधी तो खेळणी खेळण्यात मग्न असायचा, वहया-पुस्तकांच्या इमारती करायचा. पण आता तो नेहमी टिव्ही बघतो किंवा मोबाईलवर यु-टयुब बघतो. मला हे आवडत नाही असं त्याला सांगायचं आहे. त्याच्यातील सर्व ताकदीने त्याला जे पाहिजे ते मागतो. अनेकदा इमोशनल करून मागतो. पण मग आम्हालाही त्याला काहीतरी चांगलें सांगायचं आहे. ते तो ऐकेल कां? त्याच्या सर्व क्षमता त्याने वापराव्यात, वाचन वाढवावं, सगळं जग पुस्तकातूसुध्दा बघावं असं त्याला पटवुन दयायचं आहे.
आम्हा बाप-लेकाचे खटके उडतात आणि तो रागात मला काही बोलतो. तर मीही अजाणतेपणे माझ्या वडिलांना असंच बोलून गेलो होतो आणि माझ्या बाबांना त्याचं वाईट वाटले असेल, हे मला आता उमजतंय.
एकदा मी आणि रमा आपापल्या कामांसाठी घराबाहेर होतो. रिशानची आजी (डॉ.मंगल)आजारी होती. आम्ही घरी आलो आणि आश्चर्यचकीत झालो. आजीला त्रास होउ नये म्हणून रिशानने अक्षरशः पोळया आणि बाकी स्वयंपाक स्वतः केला होता. बेडवर झोपलेल्या आजीला वस्तू कुठे आहेत, कशानंतर काय करायचं, असं विचारत त्याने स्वयंपाक केला होता. त्याची ही संवेदनशीलता आणि समजदारी नक्कीच महत्वाची आहे. आजीवर त्याचा जीव आहे. आजी आजारी असली की, तिला गरम पाण्यात पाय शेकायला सांगणार, हातपाय चेपून देणार असा त्याचा सेवाभाव. वाटतं की रिशान असाच चांगला माणूस रहावा. समाजातल्या ताकदवान प्रवाहात तो भलतीकडेच वहावत जाउ नये.
आम्ही येरवडा आणि इतर कारागृहांमध्ये मोफत कायदासहाय्यता, कैदयांची सुटका झाल्यावर त्यांना काम मिळवून देण्यासाठी मदत करायचो. नव-याचा खून केल्याबद्दल अटक झालेल्या एका बाईला जामिनावर सोडवल्यावर तिनेही काम मागितलं. आपण कुणाला नेहमीसाठी गुन्हेगार समजू नये, प्रत्येकावर विश्वास ठेवावा इत्यादी सांगणं सोपं असतं. कारण तिला आमच्या घरी काम द्यायचं नाही यावर माझी आई, रमाची आई व इतर ठाम होते. लहानग्या रिशानला घरी तिच्यासोबत कसे ठेवायचं, हा मुद्दा होता. पण आम्ही तिला रिशानला सांभाळायचं काम दिलं. ती 2 वर्षे आमच्यासोबत होती. माझा मदतनीस संजय जाधव आमच्या घरातलाच सदस्य. हा रिशानचा संजयकाका. त्याला मी थोडं जरी ओरडून बोललो तरी रिशान माझ्याशी अबोला धरायचा. संजयकाकाला सॉरी म्हण, असं सांगायचा. मला वाटतं, रिशानचा स्वभाव संजयसारखा सेवाभावी व्हावा. रिशानवर परिणाम करणारी अशी अनेक माणसं आहेत. अशा अनेक छान लोकांसोबत तो मोठा झाला आहे.
पुस्तकं वाचून पालकत्व निभावता येत नाही. उलट पुस्तकी पालकत्वामुळे नैसर्गिक वागणं गायब होउ शकतं. जीवनानुभवातून आपलं मूल माणूस म्हणून घडवणं आणि त्याला पाठींबा देणं हे इतर गोष्टींपेक्षा महत्वाचं.

प्रवास पालकत्वाचा: मानवी हक्क विश्लेषक अॅड.असीम सरोदे
  मेघना धर्मेश

#Parenting #नवीउमेद

Sunday, 13 August 2017

व्हॉट्स ग्रुपची वाचन चळवळ

नाशिक मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून WhatsApp च्या मदतीने एक वाचन चळवळ सुरू आहे. मुलं आणि पालकांचा सहभाग हे या चळवळीचं वैशिष्टय. एका वर्तमानपत्राचं वाचन करायचं. त्यातून WhatsApp वर प्रश्नमंजुषा तयार करायची आणि तिथूनच वाचकांनी उत्तरं पाठवायची. जो स्पर्धक विशिष्ट स्कोअर पूर्ण करेल त्याला बक्षीस असं या स्पर्धेचं स्वरूप. नाशकातल्या डॉ. क्षमा अघोर यांची ही कल्पना. त्या सांगतात, “चारचौघांमध्ये गप्पा मारायला बसलो आणि समोरचा एकदम रेडीरेकनरचे दर, घरांच्या किंमती, नवे शैक्षणिक प्रयोग, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सध्याचे विश्वस्त कोण असे काही प्रश्न-चर्चा सुरु झाल्या की माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असायचं. हे लोक नेमकं काय, कशाविषयी बोलत आहेत हे मला न समजल्यामुळे त्या गप्पाच्या मैफलीतून ‘बॅक टू पेव्हिलयन’ अशी माझी स्थिती व्हायची. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायचं हा विचार यातूनच सुरु झाला”. आणि समोरच्या टेबलावर पडलेल्या दैनिकामुळे क्षमा यांना रस्ता दिसला.
त्या म्हणतात, “लहानपणापासून मला अवांतर वाचनाची आवड नव्हती. त्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकापलीकडे कधी काही वाचल्याचं मला आठवत नाही. त्यामुळे अर्थतच आपल्या सभोवताली काय सुरू आहे, काय बदल होताहेत हे मला फारसं माहीत नसायचं. डॉक्टरी पेशाकडे वळल्यानंतर रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधतांना वाचनाची कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागली”. मुलांचं आपल्यासारखं होईल, या विचारने त्या अस्वस्थ झाल्या. मुलगा अद्वय हाही मोबाईलशी खेळतांना दिसायचा. या सगळ्याला योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांनी ‘वर्तमानपत्राचे वाचन’ हा पर्याय निवडला. आधी त्यांनी मुलांना पेपर वाचायला सांगितलं. पण असं नुसतं सांगितलेलं मुलं थोडंच ऐकतात? म्हणून मग त्यांनी मुलांच्या मित्रांनाही यात सहभागी करून घ्यायचं ठरवलं. आणि ‘व्हॉट्स ग्रुपवरची वाचन चळवळ’ सुरू झाली.
रोज पेपर वाचन करायचं, निवडक बातम्यांवर प्रश्न काढायचे आणि उत्तरं मुलांना शोधायला सांगायची. असं सुरु झालं. रोज १० गुणांची ही परीक्षा व्हॉट्स अपवर व्हायची. त्यात आठवड्यात ५०च्या पुढं जाईल त्याला बक्षीस द्यायला सुरूवात केली. सुरुवातीला केवळ ५ ते १० जण असलेला आमचा ग्रुप आज ६३ पालकांवर पोचला असल्याचं, क्षमा सांगतात. मुलांच्या शाळा, परीक्षा, क्लासेस यामुळे हा उपक्रम मासिक झाला आहे. मुलांनी लिहितं व्हावं म्हणून एखाद्या बातमीवर त्यांचं मत तीन-चार ओळीत मागवायला आता त्यांनी सुरुवात केली आहे. आणि त्यालाही मुलांचा प्रतिसाद मिळतो आहे. नव्या तंत्रज्ञानाचा असा उत्तम उपयोग होऊ शकतो, हेच या नाशिककर मंडळींनी दाखवून दिलं आहे. 

 
- प्राची उन्मेष.

Saturday, 12 August 2017

द पष्टेपाडा पॅटर्न!!

एक छोटीशी रंगीबेरंगी शाळा, मुलांच्या पाठीवरुन दप्तराचं ओझं गायब, प्रत्येकाच्या हाती स्वत:चा टॅब!! सराईतपणे टॅबवर बोटं चालवत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचा गृहपाठसुद्धा ऑनलाईनच तपासला जातो आणि त्यांना मेलवर उत्तर पाठवलं जातं. एकदम परदेशातली वाटते ना ही शाळा? पण नाही, ही आहे ठाणे जिल्ह्यातील पष्टेपाडा डिजिटल जिल्हा परिषद शाळा!
शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरची ही शाळा घडवली संदीप गुंड या शिक्षकाने. संदीप सर या शाळेत रुजू झाले तेव्हा शाळा गळक्या छपराची होती. बहुतांश विद्यार्थी शाळेकडे फिरकायचेच नाहीत. अगदी गुंड सरांनाही इथं नोकरी करायला नकोच असं वाटत होतं. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तशी विनंती केली आणि चांगलं काम करण्यासाठी एखाद्या चांगल्या शाळेत नेमणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. पण तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी 'चांगलं काम करायचं असेल तर हीच शाळा सुधारुन दाखव' असं आव्हान दिलं आणि मग घडला पष्टेपाड्याचा कायापालट!
संदीप सर मनापासून शिकविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मुलं शाळेत यायचीच नाहीत. मुलं नेमकी जातात तरी कुठं याचा शोध घेतला आणि सरांना कळालं की गावातला एकुलता एक टीव्ही पाहण्यासाठी पाटलांच्या घरात मुलं गर्दी करतात. टीव्हीवर कोणत्याही भाषेत काहीही चालू असलं तरी मुलांना फरक पडत नाही, त्यांना फक्त टीव्ही हवा असतो. शिवाय त्यांना मोबाईलवरचे गेम्स, फोटो काढणं हे सुद्धा आवडतं हे सरांच्या लक्षात आले. मुलांचे स्क्रिनप्रतीचं वेड लक्षात आलं आणि सरांनी मग शाळेत कॉम्प्युटर आणायचा ठरवला.


''कॉम्प्युटरची युक्ती चांगलीच यशस्वी ठरली. मुलं कॉम्प्युटरच्या ओढीनं दररोज शाळेत येऊ लागली. मी मुलांना मुक्तपणे कॉम्प्युटर हाताळू द्यायचो. पेंटसारखं साधं सॉफ्टवेअर, वेगवेगळे शैक्षणिक गेम्स, मराठी आणि इंग्रजी बडबडगीतं आम्ही डाऊनलोड करुन घेतली. शिवाय त्यांच्या अभ्यासाला पूरक ठरतील असे व्हिडिओज, गेम्स, इंटरअक्टिव्ह सॉफ्टवेअर यांचाही वापर सुरु केला आणि मुलांना अभ्यासाची गोडी लागली.


हे सगळं त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवावं, म्हणून संदीप सरांनी गावात एक सभा घेतली. त्यात मुलांचा अभ्यासात वाढत चाललेला रस, भविष्यकाळातील कॉम्प्युरचे महत्त्व, शाळासुधारणेसाठी राबविण्याचे प्रकल्प याविषयी ते बोलत होते. आणि तेवढ्यात एका मोलमजुरी करणाऱ्या आजीबाईंनी चुरगाळलेल्या 50-100 च्या नोटा टेबलवर ठेवत शाळेला एक हजार रुपयांची मदत जाहीर केली. संदीप सर सांगतात, "त्या आजीबाईंच्या मदतीने मी भारावूनच गेलो. कारण हातावर पोट असणाऱ्या या आजीबाईंचे कोणतंच नातवंड शाळेत शिकत नव्हतं, तरीही गावाच्या भल्यासाठी म्हणून त्यांनी मदत दिली."
आणि मग मदतीचा ओघच सुरु झाला. गावातल्या पेंटर्सने रात्र- रात्र जागून शाळा सुंदर रंगवून दिली, पुण्याच्या श्रद्धा शहा यांनी आपल्या लग्नाचे रिसेप्शन रद्द करुन शाळेला चार लाखांची मदत दिली. ज्यातून संपूर्ण शाळेसाठी सरांनी टॅब खरेदी केले. संदीप सर एवढ्यावरच थांबले नाहीत. आपल्या शाळेप्रमाणे इतरही शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी राज्यभरात 'प्रेरणा सहविचार सभां'च्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन सुरु केले आहे. त्यातून महाराष्ट्रातल्या 11,200 शाळा लोकसहभागातून 110 कोटी रुपये मिळवत डिजिटल झालेल्या आहेत. 


- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे

दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या या अवलिया शिक्षकाच्या प्रवासाविषयी विस्ताराने जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/the-pashtepada-pattern/

Friday, 11 August 2017

मुक्काम पोस्ट स्मशानभूमी !चंद्रकांत नारायण लाड. वय ७७. मुक्काम पोस्ट स्मशानभूमी! ही कथा कादंबरी नव्हे, वास्तव आहे. तो वेडा नाही आणि संतही नाही. तो आहे तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात घावनाळे खुटवळवाडीच्या स्मशानभूमीत गेली सतरा वर्षं त्याचं वास्तव्य आहे.दहावी शिकलेला चंद्रकांत मुबंईत आपली चित्रकलेची कला जोपासत होता. त्यात जम बसेना म्हणून घावनाळे गावी आला. दरम्यान फातिमा नावाच्या ख्रिश्चन मुलीशी आंतरजातीय प्रेम विवाह केला. परंतु फातिमाची साथ त्याला फारकाळ लाभू शकली नाही. तिच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेला चंद्रकांत आजारी पडला. त्याला कुणी आसरा देईना. माणसाचा शेवट ज्या स्मशानभूमीत होतो तिथंच त्याने नव्याने आयुष्य सुरु केलं. भुताखेतांचं वास्तव्याचं ठिकाण म्हणजेच स्मशानभूमी अशी सर्वसामान्यांची अंधश्रद्धा. पण स्मशानभूमीत राहूनच त्याने अंधश्रद्धा झुगारली. त्याचा स्वानुभव ऐकण्यासाठी मुक्काम पोस्ट घावनाळे खुटवळवाडी-तील स्मशानभूमीला अवश्य भेट द्या. 
 - विजय पालकर.

Thursday, 10 August 2017

प्रेम हवं बाई!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
गाण्याशिवाय इतर कशात अत्यंत काटेकोरपणे रस घेताना मी तिला पाहिलं असेल तर स्वयंपाकघरात. प्रचंड नेमकी नि प्रचंड शिस्तीची अशी ती.
ती रजनी करकरेची १९८५ मध्ये देशपांडे झाली. त्यावेळेपर्यंत संपूर्ण स्वयंपाकाची वगैरे जबाबदारी कधी तिच्यावर पडली नव्हती... पण हां, विशेष काही करायचं तर ती अतिशय खपून नि निगुतीनं सगळं करायची, अगदी परवा परवापर्यंत! तिचं नि प्रमोद देशपांडेंचं लग्न चर्चेत होतं ते फक्त प्रेमविवाहामुळंचं नव्हे तर तिचं पोलीओग्रस्त असणं नि त्या दोघांच्या वयात पठडीला चालून जातं त्यापेक्षा अधिक अंतर असल्यामुळं. रजनी-प्रमोदनी मात्र लोकांच्या उत्सुकतेच्या ‘या’ कोनाला कधीच खाद्य पुरवलं नाही... हो, रूचकर, चवदार दडपेपोहे, खुसखशीत सामोसे, घरी केलेला चक्का, गंध हुंगत राहावा अशी ‘टॉक्क’ करायला लावणारी कॉफी जरूर पुरवली.
तिच्याकडे गाणं शिकण्यासाठी येणारे सगळे तिला मॅडम म्हणतात, काहीजण रजनताई. मी आयडी म्हणते. तिला बघतेय तेव्हापासून तिचं स्वयंपाकघराशी असणारं ‘अफेअर’ मी न्याहाळते आहे. तिच्या स्वयंपाकघरात प्रचंड शिस्त. मिसळणाचा डबा बघितला की ही शिस्त कळावी. मी नव्यानं स्वयंपाक शिकायला लागले त्यावेळी एखादी भाजी कशी केली हे तिला सांगायचे तेव्हा ती म्हणायची, ‘‘कशा गं तुम्ही सोने? उपलब्ध आहे म्हणून हिंग घातला, जिरे घातले असं नसतं करायचं. उग्र वास असणार्‍या पदार्थासाठीच्या फोडणीत केवळ आहे म्हणून हिंग नि बाकी मसाले नसतात घालायचे. आपण एखादा जिन्नस बनवताना काय काय नि किती किती घालतो यावर त्याची चव व रंग अवलंबून नसतो गं, तो कुठल्या क्रमाने नि कुठल्या टप्प्यावर घालतो यावर अवलंबून असतो.’’ - तिची जिभ अत्यंत जालीम. दोन्ही अर्थांनी! आत्ता संदर्भ आहे तो पदार्थांच्या नेमक्या चवीबाबत नि पोताबाबत. त्यामुळं अनेकांना तिच्यापर्यंत पदार्थ पोहोचवताना जाम टेन्शन असतं. मात्र पदार्थ तिला आवडला तर कौतुकही ती हातचं राखून करत नाही.
तिचं लग्न झालं तेव्हा ती पोलीओसह वयानुसार खूपच कार्यक्षम होती. नव्यानं स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी तिनं मन:पूर्वक घेतलेली. सुरुवातीच्या काळात कट्ट्यावर स्टोव्ह किंवा हॉटप्लेट ठेवून कट्ट्यालाच रेलून उभं राहात तिनं आपलं पाककौशल्य आजमावायला सुरुवात केली होती, जे आधी फक्त त्यावेळी नव्या असणार्‍या ब्रेडरोल्स नि डोसे वगैरेपर्यंत मर्यादित होतं. त्या काळात एकदा ती रात्रीची अस्वस्थ झालीय असं दिसल्यावर नवर्‍यानं विचारलं, काय झालंय म्हणून तर म्हणाली, नीट विरजण लागेल का याची शंका त्रास देतेय. तिच्या संवेदना अतिशय तीव्र. एखादा पदार्थ चाखला की त्यात काय काय वापरलं गेलंय याची ९०% यादी ती अचूक सांगू शकते. याच तीव्र संवेदना तिला परिस्थिती बिकट झाली तरी जगण्याशी धरून ठेवतात!
आता ती जवळपास बेडवर असते. पोलीओची तीव्रता वाढत गेल्यामुळं तोल जाण्याचे प्रकार खूप वाढले नि वीस-तीस पावलं कुबड्यांच्या आधारे चालून संडासपर्यंत जाणंही कठीण झालंय. एकेकाळी आकाशवाणीची मान्यताप्राप्त कलाकार म्हणून भरपूर दौरे करणारी नि मजलेच्या मजले चढून जाणारी, सतत गर्दीत असणारी आयडी टी.व्ही.लावून बेडवर पालथी झोपलेली असते. झोपलेली हा शब्द सोयीसाठी वापरला, पण हीच तिची आयडियल पोजिशन आहे. ती तिच्या गाण्याच्या तासासाठी फक्त तक्याला थोडी रेलून बसती होते. त्यात्यावेळी तेही नाही जमलं तर तसाच पडून क्लास घेते. पूर्वी कितीही तोल गेला तरी साडी नेसायची ती, आता गाऊनशिवाय पर्याय नाही. मात्र योग्य रंगाचं कानातलं, डोक्यात एखादं फूल, नखांना चढलेला ताजा मेंदीचा रंग हे असतंच. सतत काही ना काही दुखणं, अतिरेकी डायबिटीसमुळं अंग काळं पडणं नि सतत खाज येणं, जिभेची चव जाणं, जिभेला जराही तिखट लागू न देणं वगैरे गोष्टी आहेत. खूप कर्तृत्त्व गाजवल्यानंतर आता एका खोलीला नव्हे, एका बेडलाच जग मानून महिनोन्महिने तिथं शक्य तितका सकारात्मक मूड ‘टिकणं’ खूप अवघडंय, ती तो टिकवते. मन आवडत्या गोष्टीत लावते. ती माणूस आहे, त्यामुळं मधून मधून भावनेचा तोल जातो, रागराग होतो. तरी तिची तीव्रताच तिला जगण्याकडं आणते. तिची सहकारी अनिता स्वयंपाकघरात काहीतरी गरम करत असते तेव्हा भांड्याच्या नुसत्या आवाजावरून नि आतल्या हालचालीवरून हिला काही कळतंच. ती ताबडतोब सुचवते, ‘‘अनू, अगं त्या पातळ कुंड्यात पदार्थ गरम केलास तर तो तापून नुसता काळा पडेल. ते मध्यम अंगाचं, अमुक नाव असलेलं पातेलं आहे, ते घे. कसं गं कळत नाही रोज रोज करूनही? काय करणार म्हणा! प्रेम करावं तरच आत्मसात होतं बाई सगळं!’’
- सोनाली नवांगुळ

Tuesday, 8 August 2017

मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको

प्रवास पालकत्वाचा: मुमताज शेख
“मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको हे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं”, १८ वर्षाच्या मुस्कानची आणि १० वर्षांच्या कबीरची आई आणि गेली १७ वर्षे कोरो नावाच्या सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या मुमताज शेख सांगत होत्या. मुमताजचं स्वतःचं आयुष्य संघर्षमय राहिलं आहे. या संघर्षाच्या काळात कोरो या संस्थेचे सुजाता खांडेकर, महेंद्र रोकडे आणि पती राहुल गवारे प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत राहिल्याचं मुमताज सांगतात. पारंपरिक वळणाच्या गरीब मुसलमान कुटुंबात जन्म, भावाच्या जन्मानंतर वडील सोडून गेल्याने एकट्या आईसोबत राहताना हालअपेष्टांमध्ये पडलेली भर, शाळा नववीतच सुटलेली, पहिलं लग्न लवकर होऊन साडेसोळाव्या वर्षीच मुस्कानचा जन्म. लग्न झाल्याझाल्या सुरू झालेला छळ, दरम्यान वस्तीत काम करणाऱ्या कोरो संस्थेशी झालेली ओळख, आत्मभान...असा प्रवास. मुसलमान स्त्रीला स्वतःहून तलाक मागता येत नाही. मुमताजने प्रयत्नांती मिळवलेल्या घटस्फोटानंतर आईनेही आसरा नाकारला. मुस्कान होती अवघी ६ वर्षांची. प्रत्येक क्षणी आईच्या पाठीशी उभं राहणार्‍या मुस्कानसाठी हा मोठाच धक्का होता. ''मला जे बालपण मिळालं नाही, ते माझ्या मुलीला मिळावं यासाठी माझी सगळी धडपड सुरू होती. तिचीच अशी अवस्था होण्याने मी खचून गेले.'' मुमताज सांगतात. मुमताजला पुन्हा माणसात आणलं, राहुल गवारे यांनी. मुस्कानचे आणि राहुलचे बंध मुस्कान अडीच वर्षांची असल्यापासूनचे.'' हे बंध इतके दृढ आहेत की आजही मुस्कान तिची प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा राहुलकडे जास्त शेअर करते.'' मुमताज सांगतात. पहिल्या वाईट अनुभवामुळे पुन्हा लग्न करण्याबाबत मुमताज साशंक होत्या. त्यावेळी मुस्काननेच आईला बळ देत ''राहुल के साथ शादी कर ले, अपने साथ रहेगा'', असं सांगत पुढाकार घेतला. मुमताजप्रमाणे राहुलही कोरोमध्येच घडले असून कष्ट करतच मोठे झाले आहेत. त्यामुळे धर्म वेगळा असला तरी दोघांमध्ये अनेक सामायिक गोष्टी होत्या.
लग्नाबाबत राहुलच्या घरातून नाराजी होती. पण कबीरच्या जन्मानंतर परिस्थिती पालटली. कबीरचं नामकरण बौद्ध पद्धतीने झालं. कबीरला राहुल यांच्या घरातून मराठी बोलण्याचा आग्रह व्हायचा. तो मराठी येत असूनही मुद्दामच त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचा. पण या गोष्टी आम्ही ज्याच्यात्याच्यावर सोपवल्या आहेत. त्यात मध्ये पडत नाही, मुमताज सांगतात.
''मुस्कानने स्वतःहून तिचं नाव बदलेपर्यंत आठवीपर्यंत शाळेत तिचं पूर्वीचेच नाव होतं. त्यामुळे शाळेत तिघांची वेगवेगळी नावं असल्याबद्दल गोंधळ उडायचा. धर्माबद्दल प्रश्न विचारले जायचे. त्यावेळी आम्ही सांगायचो की आम्हाला कोणत्याच धर्माचा उल्लेख करायचा नाही. तुम्हीही त्याचा आग्रह धरू नका. कबीरच्या वेळीही प्रश्न उपस्थित व्हायचे पण तेव्हा कबीरनेच एकदा उत्तर दिलं होतं की मेरी मम्मी कहती है की हम इन्सान है. मुमताज सांगतात. ''दोन्ही मुलांना सगळे सण आवडतात. कठीण काळात मी आणि मुस्कान भाड्याने एका घरात राहत होतो. घरमालक आणि आजूबाजूची वस्तीही मुस्लिम होती. तेव्हा सात-आठ वर्षांच्या मुस्कानने घरी गणपती बसवण्याचा आग्रह धरला. मला खूप धाकधूक वाटत होती. कारण माझ्या लहानपणी मी रांगोळी जरी काढायला घेतली तरी नजरा बदलायच्या. पण मुस्कानने गणपती बसवला. आमच्या गैरहजेरीत मुस्कानने सांगितल्याप्रमाणे शेजार्‍यांनीही देवापुढे दिवा अखंड तेवत ठेवला.''
मुस्कान आणि कबीर दोघेही खूप समजूतदार आहेत. कबीर स्पायडरमॅनचा चाहता आहे पण तो कधी त्यासाठी हट्ट करत नाही. टीव्हीच्या बाबतीत सोडलं तर मुलं बाकी सगळ्या गोष्टीत ऐकतात. कबीरला कार्टून्स बघायला आवडतात. तेव्हा प्रश्न विचारून त्याला योग्यायोग्यतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात. अर्धवट माहिती मिळाल्यामुळे नुकसान होतं त्यामुळे पालकांनी मुलांच्या टीव्ही, इंटरनेट वापराबाबत सजग राहाणं, मुमताज यांना आवश्यक वाटते.
पालक म्हणून मुलांची बरीचशी जबाबदारी राहुलने पेलली आहे. मुस्कानही कबीरला सांभाळते, त्याचा अभ्यास घेते. याखेरीज आपल्या मामी आणि प्रणाली या मदतनीस मुलीचाही त्या आवर्जून उल्लेख करतात. मुमताज,राहुल करत असलेलं मुस्कान,कबीर यांचं पालकत्व असं अनोखं आहे.
वंचित घटकातल्या मुलामुलींना अगदी घरापासून बाहेरच्या जगापर्यंत अनेक अडचणींना, आव्हानांना सामोरे जावं लागतं. त्यांना विश्वास, आपुलकी देणार्‍या, कायम सोबत करणार्‍या सपोर्ट सिस्टिमची गरज असते, जी कोरोच्या रूपाने आपल्याला मिळाली. इतरांनाही ती मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात.
- शब्दांकन: सोनाली काकडे

Monday, 7 August 2017

जागतिक स्तनपान सप्ताह

१ ते ७ ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून ओळखला जातो. १९९० पासून हा सप्ताह सुरु झाला.गरोदरपण, बाळंतपण आणि मुलांना वाढवणे यासगळ्या बाबतीत जगातल्या प्रत्येक संस्कृतीत वेगळे समज-गैरसमज आहेत. पण, प्रत्येक आई-बाबा, कुटुंबीय, समाज आणि आता प्रशासनानेही याबाबत सजग होणं गरजेचं आहे. आईचं दूध हा बाळाचा पहिला हक्क त्याला मिळवून देण्यासाठी सगळीकडूनच प्रयत्न व्हायला हवेत.
‘एकत्र येऊ, स्तनपानाला प्रोत्साहन देऊ’ ही यावर्षीची स्तनपान सप्ताहाची संकल्पना आहे.
#नवीउमेद

अनोखी राखीपौर्णिमा

राखीपौर्णिमेचा आजचा दिवस बहीण भावंडांसाठी महत्वाचा. बुलढाण्यातील खामगाव येथील 'किडझी संस्कार ज्ञानपीठ' या शाळेने मात्र तो अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. गावातील महिला पालकांनी महिला शिक्षिकांना आज राखी बांधली आहे. शिक्षक आणि पालक यांच्यातील नातं मजबूत व्हावं, यासाठी हा उपक्रम शाळेने घडवून आणला.
- अमोल सराफ, बुलढाणा


Sunday, 6 August 2017

अंध मुलांच्या डोळस ‘राख्या’वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा गाव. यावर्षी गावातील अंध मुलांनी राख्या तयार करायचा उपक्रम हाती घेतला आहे. चेतन सेवांकुर दिव्यांग फाउंडेशनची ही मुलं सदस्य आहेत. फावल्या वेळात राख्या बनवून त्यांची विक्री करून निराश न होता जीवन जगू शकतो, असा संदेशच त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला आहे
या अंध कलाकारांनी तयार केलेल्या राख्या औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, अकोला जिल्ह्यात विक्रीसाठी पोचल्या आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्येही राखी विक्री त्यांनी सुरु केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी पाच हजार राख्या तयार केल्या आहेत. अजूनही राख्यांचे काम सुरु असून त्या वाशीमच्या शाळेत आणि बाजारात विकणार असल्याचं मुलांनी सांगितलं. यातून मिळणाऱ्या पैशातून आमच्या उदरनिर्वाहाला मदत मिळणार असल्याचंही मुलं सांगतात. 
एकीकडे नियतीकडून अंधकारमय जीवन मिळालेलं, तरीही निराश न होता जगण्याची जिद्द आणि काही करत राहण्याची धडपड खरीच कौतुकास्पद. 

 - मनोज जयस्वाल.

सरितानं तर ऑलिम्पिकमध्ये खेळावं!!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : सरितानं तर ऑलिम्पिकमध्ये खेळावं!!
लेखन: स्नेहल बनसोडे-शेलुडकर, पुणे.

15 जानेवारी, 2017. ‘स्टॅडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॉथॉन’ स्पर्धा. देशोदेशीचे कसलेले स्पर्धक या स्पर्धेत भाग घेतात. या मॅरॉथॉनमधील 6 किलोमीटरच्या‘ड्रीम रन’ स्पर्धेत एक काटक चिमुरडी जोशात धावते आहे आणि थोड्याच वेळात निकाल जाहीर होतो – “…and the First Prize for the Dream Run goes to Miss Sarita Gawade!”टाळ्यांच्या कडकडाटात 14 वर्षांची सरिता पुरस्कार घेते. तिच्याहून मोठ्या असलेल्या, शहरात राहून उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या देशी- परदेशी महिलांना मागं टाकत सरिताने ही स्पर्धा जिंकली आहे.

सरिता कोल्हापूरची. चंदगड तालुक्यातील सोनारवाडीत राहणारी. कालानंदीगड विद्यालयात ती सध्या आठवीत शिकते आहे. गावापासून शाळा सुमारे आठ किलोमीटरवर. स्कूल बस किंवा रिक्षा असे लाड त्यांच्या छोट्याशा गावात नाहीत. तिच्या गावाच्या आसपासचा सगळा परिसर डोंगराळ, तीव्र चढ उताराचा आहे. सरिता या डोंगर-दऱ्यांमधून वाट काढत धावत-पळतच शाळेत येते.“सरिताची जिद्द वाखाणण्याजोगीच आहे, सरिताच्या गावाला साधा रस्ता सुद्धा नाही. बऱ्याचदा घरातली, शेतीची कामं करून सरिताला शाळेत यावं लागतं. वडिलांची थोडीफार शेती आहे, पण एकूण परिस्थिती गरिबीचीच आहे.” सरिताचे शिक्षक तानाजी पाटील सर सांगत होते, “मात्र तिच्यामधले उत्कृष्ट खेळाडूचे गुण आम्ही हेरले होते. तिला वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धांमधे भाग घेण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो. आणि तीही ज्या स्पर्धेत जाईल त्या-त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवूनच येते!”

सरिता या प्रतिष्ठित मॅरॉथॉन स्पर्धेत पोहोचली कशी? याचं उत्तर सोनारवाडीतच मिळालं. गावातली एक मुलगी धावण्याच्या स्पर्धेत पारितोषिकं मिळविते, हे गावातल्या जयेंद्र नाईक यांच्या नजरेत भरलं. ते ‘राजर्षी शाहू महाराज कला अकादमी’शी देखील जोडले गेले आहेत. ही अकादमी श्रीकांत नाईक यांनी स्थापन केलेली आहे. शिवाय दोघेही मुंबईच्या ‘कोरो’ संस्थेचे कार्यकर्ते. या अकादमीतर्फे गावातल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण आणि खेळासंबंधित उपक्रम घेतले जातात.याच अकादमीमार्फत जयेंद्र नाईक यांनी सरिताचा शास्त्रशुद्ध सराव घेण्यास सुरूवात केली. गावाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर धावण्याचा सराव घेतला. दमसाँस टिकावा यासाठी काही विशिष्ट व्यायामप्रकार शिकविले. सरितानेही उत्तम सराव केला. तिची कामगिरी पाहून श्रीकांत नाईक आणि जयेंद्र नाईक यांनी तिला मुंबईच्या स्टॅडर्ड चार्टर्ड मॅरॉथॉन स्पर्धेत पळविण्याचे नक्की केले. 

“सरितानं तर ऑलिम्पिकमध्ये खेळावं, असं आमचं स्वप्न आहे” असं तिचे वडील रामू गावडेंनी सांगितलं. तिनं खेळातच करिअर करावं, या मताला आई सविता गावडे यांनीही दुजोरा दिला. तिने शिक्षणही घ्यायलाच हवं, याबद्दल ते आग्रही आहेत.
ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सरिताची कथा विस्ताराने वाचण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/sarita-should-be-in-the-olympics/