Monday 21 August 2017

पोळ्याच्या झडत्या

पोळ्याच्या झडत्या

बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. पूर्व विदर्भात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो. पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात. हा लोककलेतील काव्यप्रकार. गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात. झडत्या वाचण्यापेक्षा त्याचं सादरीकरण मनोरंजक ठरतं. विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात.
दरवेळी पोळ्याला झडत्यांचा विषय बदलतो. वर्तमानातील समस्या, राजकारण, व्यक्ती, महागाई, भ्रष्टाचार यावर झडत्यांमधून व्यंगात्मक टीका केली जाते. गेली तीन वर्षे झडत्या पीएम, सीएम यांना केंद्रस्थानी ठेवून झडल्या जात आहेत. यावर्षी पीककर्ज माफी, नोटबंदी, जीसटी, दुष्काळ हे विषय झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. झडत्यांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील वेदनेला व्यंगातून व्यक्त करतात.



खांदशेकणीचे आवत न दिल्यावर पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना नदी, नाल्यावर स्वच्छ धुवून त्यांच्या अंगावर नवीन झूल चढवितात. या दिवशी बैलांच्या खांद्यावर जू दिले जात नाही. गळ्यात घुंगराच्या, कवड्यांच्या माळा घालतात, गळ्यातील दोर व वेसन बदलविण्यात येते. बेगड, गेरूने शरीरभर ठप्पे मारले जातात. सजविलेले बैल मारुतीच्या मंदिरापुढे नेवून देवदर्शन घेतात. दुपारी तोरणाखाली पोळा भरवला जातो. त्यांना खास पुरणपोळीचा पाहुणचार दिला जातो. शेतातील गडी माणसांनाही धोतर, बंडी असे नवीन कपडे देण्याची प्रथा आहे. पोळा फुटण्यापूर्वी गर्दीतील एखादा शेतकरी झडत्याची सुरूवात करतो.
माह्या पायाला रूतला काटा,
झालो मी रिकामा,
नाही पिकलं यंदा,
तर जीव माह्या टांगनिला
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
आम्ही करतो पराटीची शेती,
परावटीवर पडली बोंड अळी,
नागोबुडा म्हणते बुडाली शेती,
प्रकाश पाटील म्हणते लाव मातीले छाती,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
वाटी रे वाटी, खोबऱ्याची वाटी
महादेव रडे दोन पैशासाठी
पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी
देव कवा धावंल गरीबासाठी
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देल्ली गुरूच्या हाती
गुरूनं घडविला महानंदी
ते नेला हो पोळ्यामंदी,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
आभाळ गडगडे, शिंग फडफडे
शिंगात पडले खडे,
तुही माय काढे तेलातले वडे
तुया बाप खाये पेढे
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
सत्तेत आली काशी, पण विमान सदा आकाशी
म्हणे प्यारे देशवासिंयो, लाऊंगा काळे धन मै
तुम ना रहोंगे उपाशी
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
शेतकऱ्यायले देल्ल पीक कर्ज
भरतच आहो आम्ही अजून अर्ज
सरकारनं आम्हाले दावणी बांधलं
तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आणलं
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
उदंड झाले पीक पण हातावर तुरी
गोड बोलून आमच्या छातीत खुपसली सुरी
घोषणेचा सुकाळ, कृतीचा दुष्काळ
देवे इंद्रा तुझ्या राज्यात कसा आला काळ
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव

No comments:

Post a Comment