Monday 21 August 2017

आधी शिवावी वाकळ, मग मिळते भाकर


“चिंध्या द्या, जुने कपडे द्या, गोधडी, वाकळ शिवून घ्या” असं ओरडत दोन बाया गल्लीत आल्या. कालही आल्या होत्या पण आज त्यांना काम मिळालं.
नांदुसा येथील पद्मीनबाई रामजी आंतळकर आणि लोहा येथील रुक्मिणी बाबुराव मोरे, या सख्या दोन बहिणी. माहेर लोहा. दोघींची बालवयातच लग्ने झालेली. आज पद्मिनबाई ४० तर रुक्मिणीबाई ६० वर्षाच्या. पतीला, मुलांना हाताला काम नाही. या दोघी आणि त्यांच्या सुनाही गोधडी ,वाकळी शिवून संसारांचा गाडा ओढत आहेत.
पद्मीनबाई सांगत होत्या, “आम्ही सात बहिणीं गोधडी, वाकळी शिवतो. आमच्या आई, सासूने आम्हाला हे काम शिकविलं. तेच काम आम्ही आमच्या लेकीसुनांना शिकवलं. हा आमचा परंपरागत व्यवसाय आता दुष्काळातही साथ देत आहे”. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा काहीही असो, या दोघींचं हेच काम अखंड सुरू आहे. पद्मीनबाई म्हणतात, “वयाच्या बारा वर्षापासून लांब सुया आणि जाड दोरा आमची सोबत करतो आहे. मुक्त भटके जीवन जगत, कधी शाळॆत, पारावर, तर कधी मोकळी जागा बघून आश्रय घेतो. कधी पाल टाकून मुक्काम करतो. आकाशाचं पांघरून आणि जमिनीचं अंथरून करून आम्ही जगत आहोत. विहीर, आड, नदीचं पाणी घेऊन आंघोळ करायची. तीन दगडांची चूल मांडून भाकरी बडवायच्या, तांदूळ शिजवायचे. कधी जे शिळेपाके मिळेल त्यावरच गुजराण करायची. आणि पोटाची खळगी भरायची”.
वाकळ आणि गोधडीतला फरक रुक्मिणीबाई समजावून सांगतात. त्या म्हणतात, यात फारसा फरक नसतो. शिवणीत अंतर असते. वाकळ एकदा फाटली की पुन्हा शिवता येत नाही. रुक्मिणीबाईंचा मुलगा मोलमजुरी करतो. तर मुलीचं लग्न झालेलं आहे. या दोघी बहिणी एकमेकांसोबत महाराष्ट्र पालथा घालतात. कष्टांची कमाई आणतात. मुलीचे लग्न, आजारपण, घर बांधकामासाठी घेतलेली सावकाराची कर्जे या कमाईमधूनच फेडतात.
सध्या गावात काम नाही. दुष्काळामुळे शेतीची कामं मिळत नाहीत. पद्मीनबाईचे पती, तीन मुलं घरीच बसून आहेत. त्यांच्या दोन्ही सुना सध्या भोकर तालुक्यात वाकळ, गोधड्या शिवण्याचं काम करीत फिरत आहेत. शेतात दिवसभर राबून १०० रुपये रोज मिळतो तिथे एका गोधडीचे दीडशे ते अडीचशे रुपये मिळतात. पण रोजच हे काम मिळत नाही. कधी लगेच तर कधी चारचार दिवस काम मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद, पुणे, सोलापूर, लातूर इत्यादी महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हे या दोघीनी पालथे घातले आहेत.
दारिद्रयरेषेखाली येत असल्याने स्वस्त धान्य दुकानावर धान्य मिळतं पण महिन्याला चार पायल्या गहू आणि चार पायल्या तांदूळ घरातील तेरा माणसाना पुरत नाही. या गल्लीत चार गोधड्या शिवून “चरैवती चरैवती चालू लाग बाई ..” हा मंत्र जपत दोघी बहिणी उदगीरला निघाल्या ...


- सु.मा.कुळकर्णी.

No comments:

Post a Comment