Thursday 10 August 2017

प्रेम हवं बाई!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
गाण्याशिवाय इतर कशात अत्यंत काटेकोरपणे रस घेताना मी तिला पाहिलं असेल तर स्वयंपाकघरात. प्रचंड नेमकी नि प्रचंड शिस्तीची अशी ती.
ती रजनी करकरेची १९८५ मध्ये देशपांडे झाली. त्यावेळेपर्यंत संपूर्ण स्वयंपाकाची वगैरे जबाबदारी कधी तिच्यावर पडली नव्हती... पण हां, विशेष काही करायचं तर ती अतिशय खपून नि निगुतीनं सगळं करायची, अगदी परवा परवापर्यंत! तिचं नि प्रमोद देशपांडेंचं लग्न चर्चेत होतं ते फक्त प्रेमविवाहामुळंचं नव्हे तर तिचं पोलीओग्रस्त असणं नि त्या दोघांच्या वयात पठडीला चालून जातं त्यापेक्षा अधिक अंतर असल्यामुळं. रजनी-प्रमोदनी मात्र लोकांच्या उत्सुकतेच्या ‘या’ कोनाला कधीच खाद्य पुरवलं नाही... हो, रूचकर, चवदार दडपेपोहे, खुसखशीत सामोसे, घरी केलेला चक्का, गंध हुंगत राहावा अशी ‘टॉक्क’ करायला लावणारी कॉफी जरूर पुरवली.
तिच्याकडे गाणं शिकण्यासाठी येणारे सगळे तिला मॅडम म्हणतात, काहीजण रजनताई. मी आयडी म्हणते. तिला बघतेय तेव्हापासून तिचं स्वयंपाकघराशी असणारं ‘अफेअर’ मी न्याहाळते आहे. तिच्या स्वयंपाकघरात प्रचंड शिस्त. मिसळणाचा डबा बघितला की ही शिस्त कळावी. मी नव्यानं स्वयंपाक शिकायला लागले त्यावेळी एखादी भाजी कशी केली हे तिला सांगायचे तेव्हा ती म्हणायची, ‘‘कशा गं तुम्ही सोने? उपलब्ध आहे म्हणून हिंग घातला, जिरे घातले असं नसतं करायचं. उग्र वास असणार्‍या पदार्थासाठीच्या फोडणीत केवळ आहे म्हणून हिंग नि बाकी मसाले नसतात घालायचे. आपण एखादा जिन्नस बनवताना काय काय नि किती किती घालतो यावर त्याची चव व रंग अवलंबून नसतो गं, तो कुठल्या क्रमाने नि कुठल्या टप्प्यावर घालतो यावर अवलंबून असतो.’’ - तिची जिभ अत्यंत जालीम. दोन्ही अर्थांनी! आत्ता संदर्भ आहे तो पदार्थांच्या नेमक्या चवीबाबत नि पोताबाबत. त्यामुळं अनेकांना तिच्यापर्यंत पदार्थ पोहोचवताना जाम टेन्शन असतं. मात्र पदार्थ तिला आवडला तर कौतुकही ती हातचं राखून करत नाही.
तिचं लग्न झालं तेव्हा ती पोलीओसह वयानुसार खूपच कार्यक्षम होती. नव्यानं स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी तिनं मन:पूर्वक घेतलेली. सुरुवातीच्या काळात कट्ट्यावर स्टोव्ह किंवा हॉटप्लेट ठेवून कट्ट्यालाच रेलून उभं राहात तिनं आपलं पाककौशल्य आजमावायला सुरुवात केली होती, जे आधी फक्त त्यावेळी नव्या असणार्‍या ब्रेडरोल्स नि डोसे वगैरेपर्यंत मर्यादित होतं. त्या काळात एकदा ती रात्रीची अस्वस्थ झालीय असं दिसल्यावर नवर्‍यानं विचारलं, काय झालंय म्हणून तर म्हणाली, नीट विरजण लागेल का याची शंका त्रास देतेय. तिच्या संवेदना अतिशय तीव्र. एखादा पदार्थ चाखला की त्यात काय काय वापरलं गेलंय याची ९०% यादी ती अचूक सांगू शकते. याच तीव्र संवेदना तिला परिस्थिती बिकट झाली तरी जगण्याशी धरून ठेवतात!
आता ती जवळपास बेडवर असते. पोलीओची तीव्रता वाढत गेल्यामुळं तोल जाण्याचे प्रकार खूप वाढले नि वीस-तीस पावलं कुबड्यांच्या आधारे चालून संडासपर्यंत जाणंही कठीण झालंय. एकेकाळी आकाशवाणीची मान्यताप्राप्त कलाकार म्हणून भरपूर दौरे करणारी नि मजलेच्या मजले चढून जाणारी, सतत गर्दीत असणारी आयडी टी.व्ही.लावून बेडवर पालथी झोपलेली असते. झोपलेली हा शब्द सोयीसाठी वापरला, पण हीच तिची आयडियल पोजिशन आहे. ती तिच्या गाण्याच्या तासासाठी फक्त तक्याला थोडी रेलून बसती होते. त्यात्यावेळी तेही नाही जमलं तर तसाच पडून क्लास घेते. पूर्वी कितीही तोल गेला तरी साडी नेसायची ती, आता गाऊनशिवाय पर्याय नाही. मात्र योग्य रंगाचं कानातलं, डोक्यात एखादं फूल, नखांना चढलेला ताजा मेंदीचा रंग हे असतंच. सतत काही ना काही दुखणं, अतिरेकी डायबिटीसमुळं अंग काळं पडणं नि सतत खाज येणं, जिभेची चव जाणं, जिभेला जराही तिखट लागू न देणं वगैरे गोष्टी आहेत. खूप कर्तृत्त्व गाजवल्यानंतर आता एका खोलीला नव्हे, एका बेडलाच जग मानून महिनोन्महिने तिथं शक्य तितका सकारात्मक मूड ‘टिकणं’ खूप अवघडंय, ती तो टिकवते. मन आवडत्या गोष्टीत लावते. ती माणूस आहे, त्यामुळं मधून मधून भावनेचा तोल जातो, रागराग होतो. तरी तिची तीव्रताच तिला जगण्याकडं आणते. तिची सहकारी अनिता स्वयंपाकघरात काहीतरी गरम करत असते तेव्हा भांड्याच्या नुसत्या आवाजावरून नि आतल्या हालचालीवरून हिला काही कळतंच. ती ताबडतोब सुचवते, ‘‘अनू, अगं त्या पातळ कुंड्यात पदार्थ गरम केलास तर तो तापून नुसता काळा पडेल. ते मध्यम अंगाचं, अमुक नाव असलेलं पातेलं आहे, ते घे. कसं गं कळत नाही रोज रोज करूनही? काय करणार म्हणा! प्रेम करावं तरच आत्मसात होतं बाई सगळं!’’
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment