Thursday 17 August 2017

रियाज ...


व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
मनाच्या किंवा शरीराच्या दुखण्यांमुळं कधी कधी परिस्थिती अगदी नाजूक होऊन बसते. मनाचं ठीकाय, ते चार भिंतीत आपण काबूत आणू किंवा कोंडून घालू किंवा अगदी खासगीतल्या मित्रमैत्रिणींच्या विश्वासाच्या खांद्याचा टेकू घेऊ. मात्र शरीराच्या दुखण्याची बिकट असते अवस्था. अशावेळी आपण कितीही खंबीर असू तरी जखम सतत उघडी पडते. यानं आपल्याला फार कानकोंडं होतं. दुखतंय याचं रडू, आपल्या दुखण्याच्या शांत होण्याचे मार्ग इतरांवर अवलंबून आहेत याचं रडू आणि आपण असे चारचौघात सारखे का फुटतोय याचं रडू. अगदी बिकट अवस्था होऊन जाते. - अशावेळी आपल्याला कोणती व्यवस्था लाभते नि ती कशी वागते यानं आपल्या मनाचे ऋतू झरझर बदलतात. माझ्या सुदैवानं मला ही फार छान लाभलीय.
मला मिळालेले डॉक्टर्स फार मस्तयत. वेगवेगळ्या उपचारपद्धतीत तज्ज्ञ असणार्‍या आठनऊ मित्रांनी सुरु केलेल्या हॉस्टिलचं आज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालंय. ही सगळी फळीच मला गरजेनुसार लागणार्‍या उपचाराशी निगडित आहे. - आणि उपचाराचं सत्र वगळता एरवी हे सगळे माझे मित्र आहेत. तर अशा या ऍस्टर आधार हॉस्पिटल’मध्ये एका मिटिंगच्या निमित्तानं जमलो असताना माझी एक मैत्रीण म्हणाली, ‘‘मिटींगचं ठीकाय गं, पण नक्को वाटतं हॉस्पिटलच्या या विशिष्ट वातावरणात. आजार आणखी वाढेल असा ताण येतो मनावर.’’ - पण खरंतर, मला मिटिंग नि आजारपणाशिवायही या व्हीलचेअर फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये नुसती चक्कर मारायला आवडते. जिथं आपल्याला सहजपणानं अत्यंत चांगली वागणुक मिळते व दुखणं बरं होतं त्या जागेविषयी ममत्वच वाटत राहातं.

  ऍस्टर आधार’ खूप लांब असल्यामुळं माझ्या फॉलिस कॅथेटरच्या अडचणींसाठी माझ्या घराजवळ असणारं ‘वात्सल्य हॉस्पिटल’ माझ्या मैत्रिणीनं डॉ.रचना संपतकुमारनं मला सुचवलं. म्हणाली, अगं डॉ.विद्या नि डॉ.भरत ठकार म्हणजे माझे मावशी नि काका. भेटल्यावर या दोघांनीही अतिशय मोकळेपणानं माझं सगळं समजून घेतलं. डॉ.अश्विनी मुळ्येंशी गाठ घालून दिली. चोविस तासातल्या कुठल्याही मिनटाला मी हाक मारली तर आम्ही आहोत असा विश्वास दिला नि माझा मनाचा त्रास निवळत गेला. शरीराचा निवळायला वेळ लागणार होता, पण ते आहेत याच्या खात्रीमुळं तो ही आवाक्यात आहे.
डॉ.विद्या नि डॉ.भरत यांचा ऍप्रॉच सगळ्यांच्याच बाबतीत असा असतो. या ‘वात्सल्य’ कुटुंबात गेली चार वर्ष मी दर आठवड्याला ब्लॅडरवॉशसाठी जातेय. यातल्या व्यवहाराला या दोघांनी पूर्णविराम दिलाय. इथं जाताना मी फार उत्साहात नि मस्त नटून जाते, कारण हे सगळेही खूप उत्साहात असतात. डॉ.विद्या, डॉ.अश्विनी, डॉ.भरत दरवेळी भेटतातच असं नाही, पण सगळ्या कर्मचार्‍यांना ‘सोनालीचं कुटुंब आपण आहोत’ याची खूण त्यांनी पटवून दिल्यामुळं कुठं काही अडत नाही. इथं कधी चिडाचिड नि आदळआपट मी आजवर ऐकलेली नाही. बारीकसारीक धुसपूस असेल तर ती हलक्या हातानं तर कधी दुर्लक्षानं कशी निपटायची ते डॉ.विद्या फार मस्त जमवतात. एखादी मदत तर त्या चाकोरीपलीकडं जाऊनही करतात नि आपल्या आसपासच्यांना स्वत:च्या वागण्यातून जाणवून देतात की तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही मागं हटू नका. त्यामुळंच तर जवळपास दोन वर्ष, ड्युटी संपल्यावर त्यांच्याकडं त्यावेळी काम करणार्‍या सरिता आणि कविता या सिस्टर्स ब्लॅडर वॉशसाठी मला न्यायला नि सोडायला नियमितपणानं यायच्या... आम्ही कशी मदत करतो याचा डांगोरा पिटू नये, फक्त एकमेकांचं समाधान पाहावं अशी रीतच आहे या ‘वात्सल्य’ कुटुंबाची. प्रत्येकाच्या वाढदिवसाचा केक डॉ.भरत नि डॉ.विद्या जरूर आणतात नि दणक्यात वाढदिवस साजरे होतात. छोट्यामोठ्या पार्ट्या तर होतंच असतात.










अलीकडं बरेचदा असं होतं की रिक्षावाले रिक्षात उचलून ठेवायला नि व्हीलचेअर फोल्ड करून आत ठेवायला तयार नसतात. आपण तयार नाही असं कधी ते थेट सांगतात, कधी वेगळं काही कारण देतात. अनेकदा पायर्‍या चढवायला कुणी नसतं. अशावेळी मन खूप दुमडतं. - पण जे डाचतंय ते हलक्या हातानं, समजुतीनं सोडवून किंवा कधी कधी तसंच सोडून देऊन मन मोकळं ठेवावं नि सगळ्याला सामोरं जावं हा ‘वात्सल्यमयी’ दृष्टीकोन मला या कुटुंबाकडून मिळालाय. त्यामुळंच धीर धरून, सहजता ठेवत समोरच्याची ‘वेळ’ समजून घ्यायची नि त्याला बदलायला वेळ द्यायचा... बदल नाही झाला तर कडवटपणा ठेवण्याऐवजी त्यापाठीमागचं कारण समजून घ्यायला वेळ घ्यायचा असा सगळा रियाज चालू झाला. अशा ‘ऍटिट्यूड’ मुळं जो सोपेपणा येतो तो आपल्या नसा मोकळ्या करत जातो हा अनुभव मी घेतेय.
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment