Thursday 31 August 2017

त्यांचा प्रवास सोपा व्हावा म्हणून...

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :  विवेक नवरे यांना मला आदरार्थीच संबोधायचंय खरं तर, पण याला त्यांचा तीव्र नकार. मैत्रीत वयाच्या लहानमोठेपणाला कशाला आणायचं असं त्याचं म्हणणं. मला आधी ते अवघड गेलं, पण आता सवय करतेय. म्हणून त्यांच्याबद्दल लिहिताना आदर ठेवून एकेरीत येतेय. - तर मला अगदी पहिल्यांदा फोन आला तेव्हा विवेक म्हणाला, ‘‘सोनाली, तुझं ‘ड्रीमरनर’ वाचून माझ्यातली चिकाटी आणखी थोडी जागी झालीय. काही युक्त्याही मिळाल्यात त्यातून. तुझ्या ऑस्करसारखाच जे आकाराचा पाय लावून मी मुंबईत नुकताच ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ला धावलोय. आता कोल्हापुरात येतोय. भेटूया. - तू प्रत्यक्षात हा ‘कार्बन फ्लेक्स फूट’ पाहिला नसशील तर तो दाखवतो.’’
२०१३ मध्ये कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्‍या मॅरॅथॉनमध्ये सामील होण्यासाठी विवेक आला होता. झालं असं होतं की त्याचं ‘ऑटोबॉक’ प्रायोजित मुंबईतल्या मॅराथॉनमधलं धावणं ‘झळकलं’ तेव्हा ते कोल्हापुरातल्या भूलतज्ज्ञ असणार्‍या डॉ. किरण भिंगार्डे यांच्या पाहण्यात आलं. अशा माणसाला धावताना कोल्हापूरकरांनीही पाहायला हवं म्हणून डॉ.भिंगार्डे यांनी आयोजकांच्या वतीनं विवेकला निमंत्रण दिलं. या मॅराथॉनमध्ये वाहतुकीचा भर असणार्‍या रस्त्यावरून जवळपास तीन किलोमीटर अंतर एका कृत्रिम पायासह एका तासात विवेकनं पार केलं. पुढं चेंबूरमधल्या मॅराथॉनमध्ये तर ५ किलोमीटर धावला तो आणि मुंबई महापौर सायक्लॉथॉनमध्ये विशेष व्यक्ती म्हणून ३ किलोमीटर अंतर सायकलनं कापायची सवलत असताना ‘जाऊन तर बघू’ म्हणत त्यानं एकूण १६ किलोमीटर सायकल चालवली नि बक्षीस मिळवलं. - पण या टप्प्यापर्यंत येईतो विवेकनं स्वत:ला प्रचंड कष्टवलंय. रक्ताळून घेतलंय.
ऑक्टोबर १९९०. डोंबिवलीत डेअरी व्यवसायानं नावारूपाला आलेला साधारण सत्ताविशीचा विवेक असाच रस्त्याच्या बाजूला अगदी सुरक्षित अंतरावर उभा होता इतक्यात समोरून एक ट्रक येताना त्यानं पाहिला. बघता बघता क्लिनरच्या बाजून ट्रक त्याच्या डाव्या पायाला घासून गेला नि त्या फटक्यात पायाची पोटरी नि नडगी जवळपास लोंबकाळू लागली. तुटलीच. त्वचेच्या पांघरूणामुळं हे सगळं बाहेर न येता लटकत राहिलं. अपघात झाला तेव्हा विरुद्ध दिशेला झेप गेल्यामुळं पाय संपूर्ण तुटला नाही किंवा जीव गेला नाही इतकंच. जवळच्या हॉस्पिटलमध्ये लोकांनी नेलं तेव्हा त्यांनी उपलब्ध सुविधेनुसार प्लास्टर स्लॅब घातला, जवळपास तीस बाटल्या रक्त लागलं नि ४८ तासांनी केईएम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं. त्यानंतर जबरदस्त फटका बसला संसर्गाचा. या क्षेत्रात चिकित्सेतील कौशल्यामुळं अधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ.अरविंद बावडेकरांचं नाव कुणी सुचवल्यावर विवेक तिकडं गेला. डाव्या पायाच्या घोट्यापासून ते मांडीपर्यंत जवळपास १३ किलो वजनाच्या स्टीलच्या स्क्रूंचा भार सांभाळत विवेक चिकाटी ठेवून होता याचं कारण डॉ.बावडेकरांचा विश्वास! २ महिन्यांनी हे स्क्रू फिक्सर काढले, प्लास्टर उरलं. मात्र जवळपास दोनअडीच वर्ष दर तीन आठवड्यांनी एक्सरे काढून स्थिती तपासायची व नवं प्लास्टर चढवायचं चालू राहिलं. पाय असा प्लास्टरमध्ये अडकल्यामुळं पाऊल सुजायचं, केशवाहिन्या व रक्तवाहिन्या हालचालीअभावी गोळा झाल्या होत्या त्या ठणकायच्या. संसर्ग त्यामुळं ताप हे चक्र चालूच. पाय वाचवायचे सगळे उपाय थकल्यामुळं शेवटी (१९९६) डॉ.बावडेकर म्हणाले, ‘विवेक, मी कोनिकल शेपमध्ये पाय ऍम्प्यूट करतो. त्यानंतर कृत्रिम पाय वापरून तुम्ही धावाल असं काही मी म्हणणार नाही, पण औषधं, ताप हे सगळं चक्र थांबेल.’ - या सगळ्या काळात झालेला खर्च विवेकनी स्वत:च्या कमाईतून केला होता. आता पुढचं पाहायलाच हवं होतं. पण मन नाराज होतं की हे सगळं करून अखेर काय फायदा? - मात्र ही मनोवस्था काहीच क्षण टिकली. त्यांनी डॉक्टरांना होकार दिला... डावा पाय गुडघ्यापासून काढण्यात आला. दोन महिने आराम करून विवेकनं निष्ठेनं फिजिओथेरपी सुरु केली. यातून काहीतरी भलं होणारे म्हणत थकवलं स्वत:ला. १९९७ ला कृत्रिम पायानं विवेक चालायला लागला. त्याचा सराव तोंडात बोटं घालायला लावेल असा... दादर स्टेशनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत ४-६ वेळा किंचित टेकत जवळपास ८ ते १० किलोमीटर अंतर चालून हा पठ्ठ्या फॉलोअपसाठी पोहोचायचा! डॉक्टर नि ज्यांच्याकडून कृत्रिम पाय घेतला ते मि.नेगी दोघंही म्हणाले, ‘‘नवरे, तुमच्यासारखे तुम्हीच!’’
आज, अशा अपघातानं धक्का बसलेल्या-खचलेल्या, अवयव गमावलेल्या माणसांच्या खाचखळग्यांच्या प्रवासात खारीचा वाटा उललण्यासाठी विवेक पदरमोड करत पोहोचतो व पुढचा प्रवास निराशाजनक नाहीये हे समजावतो. लागेल ते मार्गदर्शन करतो. मागच्या वर्षी त्यानं रिक्षा घेतली. का? - तर अशा पेशंट्सना गावातल्या गावात फिजिओथेरपीसाठी योग्य वेळेत सोडणं, आणणं याकरिता इतर वाहनांवर अवलंबून रहायला नको म्हणून! विवेक गप्पिष्ट... मनानं स्वच्छ पण थोडासा कडक बोलणारा. का करावं वाटतं हे सगळं विचारल्यावर एरवी लांबलचक बोलणारा विवेक लांबड न लावता सांगतो- ‘‘जी मदत मला मिळाली असती तर माझा प्रवास सोपा झाला असता अशी मदत मी इतरांना करतो, त्यांचा प्रवास सोपा व्हावा म्हणून!’’
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment