Sunday 20 August 2017

खरंच, छडी लागे छमछम?

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
चंद्रपूर जिल्ह्यातील थेरगाव प्राथमिक शाळेत शिकवणारे हरीश ससनकर. त्याआधी काही काळ ते तळोधी गावातील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१६ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारही ससनकर यांनी मिळवला आहे. ‘मुलांना मार देऊन खरंच सुधारणा घडते का?’ याविषयीचं हे त्यांचं चिंतन त्यांच्याच शब्दात -
माजी विद्यार्थ्यांना भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो, या भेटींनी मला बरंच काही दिलंय. सध्या मी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या थेरगाव प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी मी कोरपणा तालुक्यातील तळोधी गावातील शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावित होतो. त्याच गावातील माझ्या माजी विद्यार्थिनीने स्नेहाने, मला तिच्या घराच्या वास्तुशांतीचे निमंत्रण दिलं होतं.
खरंतर ती शाळा सोडून मला सहा वर्षं झाली होती. पण स्नेहाचं आग्रहाचं निमंत्रण आलं आणि मी सकाळची शाळा करुन तळोधीला पोहोचलो. गावात हरीशसर आले आहेत हे ऐकताच अनेक माजी विद्यार्थी रस्त्यातच भेटू लागले. शिक्षक जरी कालांतराने विद्यार्थ्यांचे चेहरे विसरुन जात असले, तरी विद्यार्थ्यांच्या मात्र ते चांगलेच स्मरणात असतात हे मला जाणवलं. अनेक विद्यार्थी मला त्यांच्या घरी येण्याचा आग्रह करु लागले.
असाच वाटेत सुयोग भेटला आणि त्याने मला घरी नेले. चहा पाणी झाल्यावर सुयोग निर्भिडपणे म्हणाला, “सर तुम्ही मला मारलं होतं’’ मीही लगेच म्हणालो, “हो सुयोग, मला चांगलंच आठवतंय तुला मी मारल्याचं, इतकंच काय तेव्हाचा तुझा चेहराही आठवतोय मला! “तेव्हा सुयोगची आई म्हणाली, “सर, याने तुम्ही जाईपर्यंत सांगितलंच नाही मला की, तुम्ही त्याला मारलं होतं’’ मला अगदी गहिवरून आलं. माझ्या मारात या लहानग्याला काय चांगलं दिसलं असेल तेव्हा? त्याला मारल्याची चूक आठवून वाईट वाटायला लागलं. पण आता हा सुयोग सैनिकी शाळेत शिकतोय, हे ऐकून समाधानही वाटलं.


सकाळपासून भेटलेल्या मुलांपैकी बहुतेकांनी माझ्या हातचा मार खाल्लेलाच होता. भेटलेल्य़ा अनेक विद्यार्थ्यांना मी मिठीच मारली. मुलांना मी म्हणत होतो, “किती रे तुमचं प्रेम! मी तुम्हांला मारलं तरी तुमच्या प्रेमात, आदरात तसूभरही फरक पडला नाही” मी विचार करत होतो- खरंच काही गरज होती का मुलांना मारायची? मारलेल्या छड्यांचे वळ गेलेही असतील, पण सुयोगसारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनाला झालेल्या जखमांचं काय? हा विचार मी त्याकाळी केलाच नव्हता.
पण आता मात्र मी निश्चयाने बदललो आहे. विद्यार्थ्यांना न मारता अध्ययनाची पद्धत बदलून त्यांच्यात चांगले बदल घडविता येतात यावर आता माझा विश्वास आहे. सारखी शाळा बुडविणाऱ्या, वर्गात झोपणाऱ्या काजल सिडाम या विद्यार्थिनीमध्ये मी असा बदल घडवला आहे. आधीच्या शिक्षकांनी तिच्यासमोर हात टेकले होते. मी मात्र न रागावता, न मारता काजलला अभ्यासाची गोडी लावली. तिच्याशी मैत्री केली. ती वर्गात झोपू नये म्हणून वर्गात जास्तीत जास्त खेळ आणि गाणी घेऊ लागलो. तिला मुद्दाम सगळ्यात सोपा प्रश्न विचारून तिने उत्तर दिले की मुलांना टाळ्या वाजविण्यास सांगू लागलो. ही गोष्ट होती साधीशी- पण त्यामुळे आपल्याला अभ्यास येतो, यावर काजलचा विश्वास बसला आणि ती नियमित शाळेला येऊ लागली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना न मारताही त्यांच्याच हवी ती सुधारणा करता येते यावरचा माझा विश्वास दृढ झाला आहे. आणि सुयोगला मारण्यासारखी चूक माझ्या हातून यापुढे घडणार नाही याचा मला विश्वास वाटतो.
मुलांना मार देऊन खरंच सुधारणा घडते का
 - हरीश ससनकर.

No comments:

Post a Comment