Tuesday 8 August 2017

मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको

प्रवास पालकत्वाचा: मुमताज शेख
“मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको हे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं”, १८ वर्षाच्या मुस्कानची आणि १० वर्षांच्या कबीरची आई आणि गेली १७ वर्षे कोरो नावाच्या सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या मुमताज शेख सांगत होत्या. मुमताजचं स्वतःचं आयुष्य संघर्षमय राहिलं आहे. या संघर्षाच्या काळात कोरो या संस्थेचे सुजाता खांडेकर, महेंद्र रोकडे आणि पती राहुल गवारे प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत राहिल्याचं मुमताज सांगतात. पारंपरिक वळणाच्या गरीब मुसलमान कुटुंबात जन्म, भावाच्या जन्मानंतर वडील सोडून गेल्याने एकट्या आईसोबत राहताना हालअपेष्टांमध्ये पडलेली भर, शाळा नववीतच सुटलेली, पहिलं लग्न लवकर होऊन साडेसोळाव्या वर्षीच मुस्कानचा जन्म. लग्न झाल्याझाल्या सुरू झालेला छळ, दरम्यान वस्तीत काम करणाऱ्या कोरो संस्थेशी झालेली ओळख, आत्मभान...असा प्रवास. मुसलमान स्त्रीला स्वतःहून तलाक मागता येत नाही. मुमताजने प्रयत्नांती मिळवलेल्या घटस्फोटानंतर आईनेही आसरा नाकारला. मुस्कान होती अवघी ६ वर्षांची. प्रत्येक क्षणी आईच्या पाठीशी उभं राहणार्‍या मुस्कानसाठी हा मोठाच धक्का होता. ''मला जे बालपण मिळालं नाही, ते माझ्या मुलीला मिळावं यासाठी माझी सगळी धडपड सुरू होती. तिचीच अशी अवस्था होण्याने मी खचून गेले.'' मुमताज सांगतात. मुमताजला पुन्हा माणसात आणलं, राहुल गवारे यांनी. मुस्कानचे आणि राहुलचे बंध मुस्कान अडीच वर्षांची असल्यापासूनचे.'' हे बंध इतके दृढ आहेत की आजही मुस्कान तिची प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा राहुलकडे जास्त शेअर करते.'' मुमताज सांगतात. पहिल्या वाईट अनुभवामुळे पुन्हा लग्न करण्याबाबत मुमताज साशंक होत्या. त्यावेळी मुस्काननेच आईला बळ देत ''राहुल के साथ शादी कर ले, अपने साथ रहेगा'', असं सांगत पुढाकार घेतला. मुमताजप्रमाणे राहुलही कोरोमध्येच घडले असून कष्ट करतच मोठे झाले आहेत. त्यामुळे धर्म वेगळा असला तरी दोघांमध्ये अनेक सामायिक गोष्टी होत्या.
लग्नाबाबत राहुलच्या घरातून नाराजी होती. पण कबीरच्या जन्मानंतर परिस्थिती पालटली. कबीरचं नामकरण बौद्ध पद्धतीने झालं. कबीरला राहुल यांच्या घरातून मराठी बोलण्याचा आग्रह व्हायचा. तो मराठी येत असूनही मुद्दामच त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचा. पण या गोष्टी आम्ही ज्याच्यात्याच्यावर सोपवल्या आहेत. त्यात मध्ये पडत नाही, मुमताज सांगतात.
''मुस्कानने स्वतःहून तिचं नाव बदलेपर्यंत आठवीपर्यंत शाळेत तिचं पूर्वीचेच नाव होतं. त्यामुळे शाळेत तिघांची वेगवेगळी नावं असल्याबद्दल गोंधळ उडायचा. धर्माबद्दल प्रश्न विचारले जायचे. त्यावेळी आम्ही सांगायचो की आम्हाला कोणत्याच धर्माचा उल्लेख करायचा नाही. तुम्हीही त्याचा आग्रह धरू नका. कबीरच्या वेळीही प्रश्न उपस्थित व्हायचे पण तेव्हा कबीरनेच एकदा उत्तर दिलं होतं की मेरी मम्मी कहती है की हम इन्सान है. मुमताज सांगतात. ''दोन्ही मुलांना सगळे सण आवडतात. कठीण काळात मी आणि मुस्कान भाड्याने एका घरात राहत होतो. घरमालक आणि आजूबाजूची वस्तीही मुस्लिम होती. तेव्हा सात-आठ वर्षांच्या मुस्कानने घरी गणपती बसवण्याचा आग्रह धरला. मला खूप धाकधूक वाटत होती. कारण माझ्या लहानपणी मी रांगोळी जरी काढायला घेतली तरी नजरा बदलायच्या. पण मुस्कानने गणपती बसवला. आमच्या गैरहजेरीत मुस्कानने सांगितल्याप्रमाणे शेजार्‍यांनीही देवापुढे दिवा अखंड तेवत ठेवला.''
मुस्कान आणि कबीर दोघेही खूप समजूतदार आहेत. कबीर स्पायडरमॅनचा चाहता आहे पण तो कधी त्यासाठी हट्ट करत नाही. टीव्हीच्या बाबतीत सोडलं तर मुलं बाकी सगळ्या गोष्टीत ऐकतात. कबीरला कार्टून्स बघायला आवडतात. तेव्हा प्रश्न विचारून त्याला योग्यायोग्यतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात. अर्धवट माहिती मिळाल्यामुळे नुकसान होतं त्यामुळे पालकांनी मुलांच्या टीव्ही, इंटरनेट वापराबाबत सजग राहाणं, मुमताज यांना आवश्यक वाटते.
पालक म्हणून मुलांची बरीचशी जबाबदारी राहुलने पेलली आहे. मुस्कानही कबीरला सांभाळते, त्याचा अभ्यास घेते. याखेरीज आपल्या मामी आणि प्रणाली या मदतनीस मुलीचाही त्या आवर्जून उल्लेख करतात. मुमताज,राहुल करत असलेलं मुस्कान,कबीर यांचं पालकत्व असं अनोखं आहे.
वंचित घटकातल्या मुलामुलींना अगदी घरापासून बाहेरच्या जगापर्यंत अनेक अडचणींना, आव्हानांना सामोरे जावं लागतं. त्यांना विश्वास, आपुलकी देणार्‍या, कायम सोबत करणार्‍या सपोर्ट सिस्टिमची गरज असते, जी कोरोच्या रूपाने आपल्याला मिळाली. इतरांनाही ती मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात.
- शब्दांकन: सोनाली काकडे

No comments:

Post a Comment