Friday 18 August 2017

घरबांधणीचा ‘अजंदे पॅटर्न’

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका. इथलं अजंदे बुद्रुक गाव. सर्व जातीधर्माच्या बेघरांसाठी एकाच वस्तीत १०० घरकुलं इथं बांधण्यात आली आहेत. स्थानिक कामगारांकडून ही घरं बांधण्यात आली. विशेष म्हणजे शासन निकषापेक्षा जास्त क्षेत्रफळाची ही घरं आहेत. संमिश्र वस्तीमुळे, ही घरकुल योजना सामाजिक सलोख्याचं प्रतीक बनली आहे.
ग्रामपंचायतीने २६९ स्क्वेअर फुटाच्या घरांऐवजी लाभार्थ्यांना तब्बल ३६० स्क्वेअर फुटाची घर बांधून दिली आहेत. या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्यांना दुमजली घर बांधण्याची इच्छा झाली. तेव्हा घर दगडाच्या पायावर नव्हे तर आरसीसी कॉलमवर उभारण्यात आलं आहे.
सुरुवातीला घरं बांधायला जागा नव्हती. शासनाकडून मिळणारं अनुदान ९५ हजार रुपये आणि खर्च दीड लाखावर, अशा परिस्थिती मेळ कसा बसवायचा ? सगळा विचार करून ग्रामपंचायतीने महात्मा गांधींचा विचार प्रमाण मानला. आणि घर बांधण्यासाठी लागणारं साहित्य, कुशल - अकुशल कामगार हे गावातूनच घेतले. मात्र, ना नफा ना तोटा या तत्वावर काम करण्याची अट ठेवली गेली. ही अट सर्वानीच मान्य करीत दीड लाखांचा खर्च लाखांच्या घरात आणला.



घरकुलांचं हे काम कमी खर्चात करत असताना गुणवत्तेत कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही. उत्कृष्ट दर्जाचं साहित्य वापरून शौचालयासहित परिपूर्ण अशी ही घरकुलं आहेत. दुतर्फा पक्के रस्ते, झाडं, पथदिवे, गटारी अश्या सर्व पायाभूत सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. घरकुलामध्ये राहणाऱ्या सर्व समाजबांधवांना आपले सण उत्सव साजरे करण्यासाठी समाजमंदीरही बांधण्यात आलं आहे.
या कामासाठी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विरोधातील सदस्यांनाही विश्वासात घेतल्याने या सर्वधर्मीय घरकुलांचे निर्माण पूर्ण झाले. या कामात अजंदे ग्रामपंचायतीला स्थानिक आमदारांनी खंबीर साथ दिली. सध्या उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावातील ग्रामस्थ आणि पदाधिकारी हे घरकुल पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे घरकुलाचा 'अजंदे पॅटर्न’ लवकरच नावारूपाला येईल यात दुमत नाही.
प्रशांत परदेशी.

No comments:

Post a Comment