Tuesday 1 August 2017

पालकत्व जास्तीत जास्त आनंददायी कसं होईल


मी आणि माझा नवरा तुषार, दोघंही गडचिरोलीत आदिवासी क्षेत्रात, डॉ. अभय आणि डॉ राणी बंग यांच्या सर्च संस्थेत १९९३ पासून कार्यरत आहोत. आपल्या मुलांना कसं वाढवायचं याबाबतीत आम्हाला काहीच स्पष्टता नव्हती. आमच्या मुली तन्वी आणि गुंजन यांच्यासोबत जगतानाच पालकत्वाचा उलगडा होत गेला. संस्थेची मूल्य, गांधी विचारसरणीची दिशा यामुळे रोज प्रार्थना, नियमित श्रमदान, खेळण्यासाठी सुविधा, मुलांसाठी समृद्ध वाचनालय असं मुलांसाठी संस्कारात्मक खाद्य आजूबाजूला उपलब्ध होतं. तुषारची अतिशय सकारात्मक दृष्टी आणि साथ होतीच.
मुलींनी डॉक्टर किंवा आमच्यासारखंच सामाजिक कार्यकर्ता व्हावं का, यावर चर्चा व्हायची. मोठ्या मुलीने इंजिनिअरिंग निवडलं. मुंबईला VIT ला Biomedical Engineering ला प्रवेश घेतला. कुवतीच्या पलीकडे जाऊन आम्ही तिच्या इच्छेचा मान राखला. पण तिच्यासाठी ते शिक्षण कठीण गेलं. गडचिरोलीसारख्या गावातून मुंबईत जाऊन शिकताना, जुळवून घेताना ती स्वत:ला हरवून बसली. सहा महिन्यानंतर घरी परतली तेव्हा विचलित मनस्थिती आणि तब्येत ढासळलेली. मला हे सोडायचं आहे, म्हणून ढसा ढसा रडली. आम्ही हादरलो. लोक काय म्हणतील, झालेला खर्च आणि आता पुढे काय करायचं? मग आम्ही दोघांनीही ठरवलं, की तिने शिक्षण enjoy करायला हवं. पर्यायांचा विचार करताना BSC Nutrition करायचं तिने ठरवलं. नातेवाईक, मित्र यांच्याकडून बोलणी खाऊनही आम्ही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो.
लक्षात आलं की आपलं मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. विरोध न करता समतोल सांभाळून शांतपणे त्यांचं ऐकणं, संवाद साधणं, अजिबात रिॲक्ट न होता समजावणं, पुढील दिशा दाखविणं मी शिकले. यात तुषारच माझा गुरु होता. ज्या मुंबईत ती काही वर्षांपूर्वी adjust झाली नव्हती, तिथेच ती आता BSc अंतिम वर्षात शिकत आहे.
एकदा मुलींसोबत सायकल रिक्षा केली. मी रिक्षावाल्यासोबत भाव करू लागले. माझी 9 वर्षाची मुलगी म्हणाली, आई, त्या काकांचं, त्यांच्या मुलांचं त्या रिक्क्षामुळे पोट भरतेय. तू कशाला घासाघीस करतेस? त्या क्षणी माझीच मला लाज वाटली. आपली पोर किती संवेदनशील आहे याचा प्रत्ययही आला.
माझी 80 वर्षाची आई माझ्याकडे असायची. (अलिकडेच ती गेली.) म्हातारं माणूस - सतत सूचना, चौकशा. मी वैतागून जायचे. कधी कधी त्याचा स्फोट व्हायचा. एकदा माझी धाकटी मुलगी गुंजी शांतपणे म्हणाली, “आई, तू नानीवर का ओरडतेस? पुढे तू म्हातारी झाल्यावर मी अशीच ओरडले, तर तुला आवडेल का?” मी विचारात पडले. पालक म्हणून कोणी कोणाला शिकवलं? कळत नकळत असं मुलं आपल्याला शिकवत असतात. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग मी मुलींकडूनच शिकले.
मी कामानिमीत्त दौ-यावर असण्याच्या काळात मुलींना भावनिक असुरक्षितता जाणवायची. वहीत “आई, लवकल ये” लिहिणं. माझ्या ओढण्या, साड्या घेऊन झोपणं. का? तर आई तुझा सुगंध आम्हांला येतो, तू आमच्याजवळच आहेस, असं वाटतं. त्या काळात तुषार रोज मुलींना कुशीत घेऊन झोपायचा. छान सांभाळायचा.
सुटीच्या दिवशी मात्र मुलींसाठी पूर्ण वेळ द्यायचा, हे ठरलेलं. जंगलात ट्रेकला जाणं, तिथे काड्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करणं, प्रवासात गाणी म्हणणं, कविता रचणं वगैरे. साधी घरची गाडी दुरुस्त करायलाही तुषार मुलींना घेऊन बसायचा, गाडीच्या पार्टची ओळख करून द्यायचा. मुलींसोबत बसून तासंतास गप्पा मारायचा. आज कदाचित त्यामुळे मुलींनाही माझ्यापेक्षा आपल्या बाबाच्या कुशीत जास्त सुरक्षित वाटतं. रोज झोपण्याच्या आधी त्यांना काहीतरी वाचून झोपायची सवय लागली ती अजूनही आहेच.
त्यांच्या दहावी-बारावीचा ताण आम्हालाही होताच. मी या काळात दोन वर्ष बिनपगारी रजा घेऊन मुलींसोबत नागपूरला शिफ्ट झाले. पूर्ण वेळ त्यांच्यासोबत राहता आल्याचा मला, मुलींना बराच फायदा झाला. आम्हा दोन पिढ्यांतलं अंतर कमी करणं साधता आलं. पालकत्व जास्तीत जास्त आनंददायी कसं होईल तेच आम्ही बघत आलो आणि बघू. हा प्रवास अविरत सुरूच आहे.
 प्रवास पालकत्वाचा – सुनंदा खोरगडे


No comments:

Post a Comment