Monday 31 July 2017

हिरव्या ऋतुचा मॉल

 औरंगाबादहून पैठणच्या दिशेने निघालं की संताजी पोलीस चौकीसमोर अर्धा किलोमीटरवर एक तीन मजली मॉल दिसतो. हा मॉल नेहमीसारखा वस्तू, कपड्यांचा नाही. मग कशाचा? तर झाडांचा आहे. तब्बल पाच लाख झाडं इथं उपलब्ध आहेत. हा आगळावेगळा मॉल सुरु झाला जूनमध्ये. रोपांबरोबर झाडं लावण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही आहेत. अत्यंत सुबक, आधुनिक रचना हे ‘पल्लवांकुर’ मॉलचं वैशिष्ट्य.
झाडांचा मॉल सुरु केला सुहास वैद्य यांनी. तब्बल चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी नर्सरी चालू केली. आणि इथंच मॉलचा पाया घातला. सुहास वैद्य म्हणतात, “माझे वडील लक्ष्मणराव वैद्य हे सर्वोदयी कार्यकर्ते, त्यांना हिंदी राष्ट्रभाषा सभेने औरंगाबादेत नोकरी आणि संस्थेच्या आवारातच राहायला घर दिलं. घराच्या परिसरात खूप मोठी रिकामी जागा होती. तीच माझ्यासाठी पर्वणी ठरली. माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. इंजिनिअरिंगची चारही वर्षे मी फास्ट क्लासमध्ये पास झालो. पण पाचव्या वर्षी परीक्षाच दिली नाही. कारण पास झालो असतो आणि नोकरी करावी लागली असती. आणि नंतर झाडांकडे कधीच वळलो नसतो. सोयीचे सगळेच दोर कापून टाकले. आणि 1977 साली घराच्या आवारातच नर्सरी सुरु केली.”
सुहासने आईवडील आणि भाऊ यांनी दिलेल्या 450 रुपयातून व्यवसाय सुरु केला. आता थेट 5 लाख झाडांपर्यंत हा व्यवसाय पोचलाय. सुरुवातीच्या दिवसांत सायकलवर फिरून त्यांनी रोपांची विक्री घरोघरी केली. सुहास सांगतात, “मी ज्या काळात या व्यवसायाला सुरुवात केली तो काळ झाडं विकत घेऊन लावण्याचा नव्हता, त्यामुळे झाडं विकत घ्यायची सवय लोकांमध्ये रुजवावी लागली.” सुहास यांच्या या श्रमाला यश आलं. कारण आज या मॉलमधून रोज किमान 1 हजार झाडांची विक्री होऊ लागली आहे.
प्रत्यक्ष मॉल तीन मजली दिसत असला तरी याचा व्याप सहा एकरात पसरलेला आहे. इथं 3 हजार प्रजातींची तब्बल पाच लाख रोपं एकाच वेळी उपलब्ध आहेत. या रोपांना दररोज 2 लाख लिटर पाणी लागतं. हा पाणीपुरवठा एका विहिरीतून होतो. देखभालीसाठी पन्नास मजूर इथं काम करतात. तर दहा गुंठ्याचे तीन पॉलिहाऊसही इथे आहेत. महिन्याकाठी जवळपास तीस हजार झाडांची विक्री या मॉलमधून होत असते. गार्डन डेव्हलपमेंट, आणि कंपन्यांचा परिसर सुशोभीकरणाचंही काम या मॉलमधून चालतं. औरंगाबाद शहरातले सत्तर टक्के बगिचे सुहास वैद्य आणि त्यांच्या ‘पल्लवांकुर’ने सुशोभित केल्या आहेत.
खरं तर व्यवसाय कशाचा करावा यावर कुणाचंही बंधन नाही. समाजाला घातक ठरणारे व्यवसाय करून वारेमाप संपत्ती कमावणारेही असतात. म्हणूनच हिरव्या ऋतुचा मॉल उभारून समाजहित जपणारे सुहास वैद्य आदर्श ठरावेत.


- दत्ता कानवटे.

No comments:

Post a Comment