Wednesday 12 July 2017

‘असण्याचे’ दिसणे हवे...

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी 
सतरा वर्षांपूर्वी मी आईबाबांसोबत असताना दिनक्रमाबाबतीत आजच्यासारखी अजिबातच स्वावलंबी नव्हते. स्वत:चा अभ्यास करणं व वेळेवर खाणं यात कसलं आलंय स्वावलंबन? संस्थेत काम करायचे तेव्हा रोजची स्वत:ची कामं स्वत: करायची सवय लागली तरी आजूबाजूला सतत माणसं होती. प्रत्येक वेळेला कुणाला हाक मारायला लागली नसली तरी हाक मारण्याची सोय असण्यानं रिलॅक्स असतो आपण.
२००७ मध्ये जेव्हा स्वत:च्या घरी प्रथमच आईबाबांशिवाय मिळेल ती मदतनीस घेऊन राहायचा निर्णय घेतला तेव्हा नवीनच वेळ होती आयुष्यात. स्वत:च्या शारीरिक स्थितीसह येणार्‍या अडचणी झेलून स्वत:चं घर करून राहायचं हे ठरवलं तरी ‘कसं’ हे कुठं ठाऊक होतं? आपण राहतो त्या घराची एक शिस्त ठरलेली असते लहानपणापासून. प्रत्येकाचं विशिष्ट काम, प्रत्येक गोष्टीची विशिष्ट जागा नि वेळ. एकूण रांग लागून गेलेली असते. मात्र २००७ मध्ये मी जेव्हा स्वत:च्या घरी राहायला आले तेव्हा हा प्रयोग कसा मार्गी लावायचा हे काहीच ठाऊक नव्हतं. व्हीलचेअरशिवाय अजिबात जगता येत नाही अशी माझ्या माहितीतली माणसं एकतर आपल्या कुटुंबाबरोबर राहात होती किंवा एखाद्या संस्थेत. मी आईबाबांच्या सपोर्टने एकटी राहायचं ठरवल्यावर माझ्यासमोर फॉलो करण्यासाठी काही मॉडेलच नव्हतं. तर एकूण सगळंच शिकत जाण्याची एक जबरदस्त लाट आली. लाट आणखीही एक होती... ‘बघूया ही काय करते!’ असं कुत्सिततेनं पाहणारे अनेक डोळे मला टोचताहेत नि आता माझं कसं होणार या भीतीची नि असुरक्षिततेचीही. स्वत:बद्दलच्या शंकाकुशंकांच्या समुद्रात मी गटांगळ्या खात असताना कशामुळं सावरायला झालं असेल बरं? - तर मी पुढे जाऊन काय करणारे याचा माझा मलाही पत्ता नसताना ज्या माणसांनी माझ्यावर निव्वळ माणूस म्हणून विश्वास टाकला त्यांच्यामुळं मी एकूण समाजाचा एक भाग आहे असं मला वाटायला लागलं. संस्थेत राहून काम करायचे तेव्हा प्रत्येक गोष्ट ‘मोठ्या सामाजिक बदला’शी निगडित केली जायची अपरिहार्यता होती. एकेकट्या माणसाचं जगणं अगदी शून्य. त्याच्या यशाचं कौतुक स्वतंत्र करायची गरज अशा सिस्टीममध्ये असत नाही. त्यामुळं आपण कुणीतरी धुगधुगी असणारं माणूस असतो याचा विसरच पडलेला. आजूबाजूच्या ह्या वेगवेगळ्या माणसांमुळंच आपल्यासारखी धडपडणारी एकटी माणसं बिनमहत्त्वाची नसतात असं दिसू लागलं. २००० सालापर्यंत शिराळ्याच्या घराच्या आसपास राहणारे शेजारी ‘आमचे’ होते... आता इथं कोल्हापुरात फ्लॅटच्या आसपास राहणारे ‘माझे’ शेजारी झाले होते. ‘माझं’ म्हणताना एक गंमतशीर थ्रील जाणवत होतं नि धडधडतही होतं. सगळेच शेजारी काही गुणी नसतात, ते कळत जातं पुढेपुढे, पण त्यावेळी माझी गरज वेगळी होती. आजूबाजूच्या घरातली लहानथोर माणसं, ‘कोण आलंय नवीन राहायला’, ‘सारखी ठाकठोक चाललीवती, काय केलेत बदल?’ असं बघायला घरात डोकावू लागली होती. व्हीलचेअर फ्रेंडली घर बघतानाचं त्यांचं कुतूहल नि निरर्थक प्रश्न राग आणत नव्हते. सतत वाजणार्‍या बेलमुळं मला आणखी आणखी जिवंत वाटत होतं. नॉर्मल माणसासारखा फील येत होता. नंतर कधीतरी टॉम हॅन्क्सचा ‘कास्ट अवे’ पाहिल्यावर कळलं की मला नेमकं काय होत होतं नि नेमकी कशाची भूक जाणवत होती ते. आपण एकमेकांना पटू अगर न पटू, आपण एक नखभरतरी कुणीतरी आहोत याची जाणीव व त्याचे मिळणारे दाखले आपल्या जगण्याचं भरणपोषण करतात. एखाद्याचे शत्रू जरी असू तरी काहीतरी ‘वर्थ’ असणार ज्यामुळं शत्रूत्व करावं वाटतं एखाद्याला हा इगो पॉझिटिव्हही करतो. - अपंगत्त्व आल्यानंतर प्रथमच मला स्वत:चा अवकाश भेटत होता... आपण जिवंत आहोत याची धडधड समोरच्या हृदयांमध्ये जाणवत होती व हुरूप येत होता. - माझ्या आसपास अशी कितीतरी माणसं विशिष्ट नवखेपणाशी झुंजत असतील जी अशा दोस्तीच्या नुस्त्या नजरभेटीसाठी साठी तहानलेली असतील, मी अलीकडे याचा अदमास घेऊ लागलेय.
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment