Sunday 30 July 2017

स्वतःचं एक मूल जन्माला घालून दुसरं दत्तक घ्यायचं


लग्नाआधीच आम्ही सहजीवन, एकमेकांच्या सवयी, स्वभाव, मुलं याविषयी चर्चा केली होती. तेव्हाच हर्षदानं एक मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मलासुद्धा ही कल्पना आवडली. स्वतःचं एक मूल जन्माला घालून दुसरं दत्तक घ्यायचं, असं लग्नाआधीच ठरवून टाकलं आम्ही. जे मूल होईल त्याच्या भिन्नलिंगी मूल दत्तक घ्यायचं, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांना वाढवल्याचा समान आनंद घेता येईल, हेही नक्की केलं.
लग्नानंतर दोन वर्षांतच मनस्वीच्या संगोपनात आम्ही गुंतलो. पहिली मुलगी असल्यामुळे तिचं कौतुक, तिच्याबरोबर पालक म्हणून रोज नव्याने शिकणं! हर्षदानं तिच्यासाठी नोकरीतून काही काळ विश्रांती घेतली होती. `जे जे उत्तम उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते` तिला दाखवण्याचा आग्रह होता. त्यातलं चांगलं-वाईट तिनं ठरवावं, असं वाटत होतं.
दोन मुलांमध्ये तीन-चार वर्षांचं अंतर असावं म्हणून मनस्वी तीन वर्षांची झाल्यावर दत्तक मुलासाठी प्रयत्न सुरू केले. `श्रीवत्स` संस्थेत नाव नोंदवलं. दत्तक प्रक्रिया लगेच पूर्ण होणार नव्हती. मुलांची संख्या कमी आणि दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची संख्या जास्त, असं व्यस्त प्रमाण सध्या असल्याची माहितीही मिळाली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन बाळ ताब्यात मिळायला दोन वर्षं गेली. हा काळ कसोटीचा होता. दोन मुलांमध्ये तीन-चार वर्षांचं अंतर असावं, हा विचारही कोलमडून पडला होता. मनस्वी पाच वर्षांची झाल्यानंतर निमिष घरी आला.
मनस्वीला नवीन बाळ आल्याची उत्सुकता आणि तोवर घरात तिचंच राज्य असल्यामुळे आपल्या आनंदातला वाटेकरी आल्याची भावनाही होती. घरी कुणी मोठं माणूस नव्हतं. हर्षदा पुन्हा नोकरी करू लागली होती. निमिषला सांभाळण्यासाठी आम्ही बाई ठेवली. काही प्रमाणात ती मुलगा-मुलगी भेद करणारी होती, हे उशिराने लक्षात आलं. तोपर्यंत तिच्याकडून निमिषचे लाड आणि मनस्वीकडे कळत-नकळत दुर्लक्ष झालं होतं. त्या काळात मनस्वी थोडी बिथरलीही होती. आम्ही आवर्जून तिच्यासाठी वेळ देऊन तिला समजावण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घरच्या आईवडिलांची आमच्या निर्णयाला आधी पसंती नव्हती, पण नंतर आमचं प्रेम बघून त्यांचा विरोध मावळला. आता त्यांनीही नातंवडांना आपलंसं केलं आहे.
दत्तक घेतलेल्या मुलांना मोठेपणी अचानक धक्का नको, म्हणून लहानपणापासूनच त्यांच्या जन्माबद्दलची जाणीव हळूहळू द्यावी, याची कल्पना होतीच. संस्थेनेही तसं मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे निमिषला लहानपणापासूनच देवकी, कृष्ण आणि यशोदाच्या गोष्टी सांगितल्या. `श्रीवत्स`मध्ये जाऊन दरवर्षी आम्ही त्याचा वाढदिवसही साजरा करतो. त्याला वेगळेपणाची जाणीव होणार नाही, याची काळजी घेण्याची कसरतही कधीकधी करावी लागते.
जगताना कायम आजूबाजूच्या समाजाचं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं भान बाळगावं, हे आम्ही मुलांना पहिल्यापासून शिकवलं. अन्न टाकू नये, निष्कारण उधळपट्टी करू नये, हे वेगवेगळ्या माध्यमांतून शिकवलं. मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान देण्याचा पहिल्यापासूनच प्रयत्न केला.
आता मनस्वी बारा वर्षांची झाल्यानंतर तिचे विचार, स्वभाव, व्यक्तिमत्त्व पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. काही मुद्दयांवरून तिच्याशी खटके उडायला लागल्यानंतर तिला कुठलीही गोष्ट थेट करायला न सांगता आपोआप समजेल, अशा पद्धतीने पोचवण्यावर आमचा भर असतो. पुढच्या आयुष्यातही तिचं करिअर तिनं निवडावं, आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या स्वरूपात असावं, अशीच आमची भूमिका आहे. पालक म्हणून शिकण्याची ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार आहे.

प्रवास पालकत्वाचा : हर्षदा आणि अभिजित पेंढारकर

No comments:

Post a Comment