Wednesday 12 July 2017

शिव्या द्याल तर चहा पाजावा लागेल!!


सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : 
बीडमधील केज तालुका. कानडीमाळी गाव. या गावात एक गंमतशीर आणि चांगला पायंडा पाहायला मिळतोय. तरुण पोरांचा ग्रुप जमला की आपापसांत शिव्या देणं हे सगळीकडेच घडतं. कानडीमाळीत मात्र कोणी शिवी दिली की त्याला आसपासच्या लोकांना स्वखर्चाने चहा पाजावा लागतो. त्याआधी कोणी शिव्या दिल्या तर समोरच्याने शिवी देणाऱ्याच्या पाठीत धपाटा घालायचा अशी पद्धत होती, अर्थातच त्यातून हाणामाऱ्या वाढल्या. तेव्हा गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणभाऊ यांच्या सूचनेनुसार 'शिव्या द्या आणि चहा पाजा' ही नवीन पद्धत सुरु झाली. एकेकाळी उठता-बसता सहज शिव्या देणाऱ्या गावात ही पद्धत पडली तरी कशी?
याचं उत्तर आहे 'मीना- राजू मंचा'त. कानडीमाळी गावातील शाळेत स्त्री- पुरुष समानतेला चालना देणाऱ्या 'मीना- राजू मंच' उपक्रम सुरु आहे. शाळेबाहेरही समाजप्रबोधनाचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. खासकरून तरूण मुलांशी आणि गावकऱ्यांशी सातत्याने संवाद साधला जातो. ‘समाजाचा विकास म्हणजे स्त्री आणि पुरूष या दोघांचाही विकास’ हे ठसविण्यात मीना- राजू मंचाला काही प्रमाणात यश येतंय. या गावातले तरूण स्वत:ला खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र ग्रामपंचायतीकडे मैदानाचा तगादा लावताना हे मैदान पुरूषांसोबत महिलांनाही खेळण्यासाठी मोकळं असेल, असा आवर्जून उल्लेख ही तरूण मुलं करतात. इतकंच नव्हे तर त्यांच्या तरूण मंडळाला त्यांनी कुठलंही फॅन्सी नाव न देता ‘सावित्रीबाई फुले युवा मंच’ असं नाव दिलं आहे.

युवा मंचाच्या बैठकीत ‘कोरो’संघटनेने शिवीबंद अभियानाचा मुद्दा मांडला तेव्हा सर्वच तरूणांनी ते हसण्यावारी नेलं. त्यांचं म्हणणं होतं, गावातल्या लहान- थोर सर्वांच्याच तोंडात शिव्या आहेत आणि म्हणूनच या गावात शिवी बंद होणे ही अशक्य गोष्ट आहे. मात्र शिव्यांमधून प्रामुख्याने स्त्रियांच्याच चारित्र्याची निर्भत्सना केली जाते. भांडण करणारी माणसं राहतात बाजूलाच आणि विनाकारण त्यांच्या आया- बहिणींच्या चारित्र्यावर मात्र आपण कोरडे ओढतो. हे योग्य आहे काय? असा प्रश्न ‘कोरो’च्या कार्यकर्त्यांनी विचारला. याबद्दल चर्चा आणि विचार केल्यावर तरूणांना ‘आपलं चुकतंय’ हे लक्षात आलं आणि गावातले तरूण शिव्या बंद करण्यासाठीच्या प्रयत्नाला लागले. आणि त्यातूनच जन्माला आली- 'शिव्या द्याल, तर चहा पाजावा लागेल' ही पद्धत!
काय आहे हा मीना- राजू मंच? महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधे सध्या हा उपक्रम सुरू आहे. 2012 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे लिंगभावसमानता, शिक्षणाचा हक्क आणि लैंगिक शोषणाविषयी जनजागृती केली जाते. सध्या राज्यभरात सुमारे 23,000 शाळांमधे हा कार्यक्रम राबविला जातोय. ‘युनिसेफ’ तसेच मुंबईच्या ‘कोरो’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम चालतो. ‘स्त्री -पुरूष समानता’ ही केवळ पुस्तकी संकल्पना राहू नये, तर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या आचरणातही बदल व्हावेत असा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जातो. मीना- राजू मंचाची’ स्थापना होताना विद्यार्थी समानतेची आणि या शिवीबंद अभियानाची शपथ घेतात.
लेखन- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment