Thursday 13 July 2017

सोशल मिडिया फोरमची गोष्ट



फेसबुक, व्हॉटसअप या माध्यमांची खरी ताकद ओळखली ती नाशिकमधल्या एका तरुणाने. प्रमोद गायकवाड, ‘सोशल नेटवर्किंग फोरम’चे ते संस्थापक. प्रमोद यांना सामाजिक कार्याची आवड. या माध्यमांची बलस्थाने लक्षात घेत त्यांनी कामाची सुरूवात केली. समाजातील वंचित घटकांची आणि दानशूर व्यक्तींची गाठभेट उपक्रम घेत असतांना फोरम आकारास आला. आदिवासी पाड्यांवर आरोग्य शिबीरं, बालकांसाठी शाळा, शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम. 
त्याचवेळी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाने प्रमोद अस्वस्थ झाले. तेथील पाणी टंचाई लक्षात घेऊन फोरमने आपल्या संकेतस्थळावरून मदतीसाठी आवाहन केलं. निधी जमा झाला आणि बीड जिल्हातील राजपिंप्री गावात पाण्याच्या तीन टाक्या आणि टँकर आला. तिथल्या हरणांच्या अभयारण्यासाठीही त्यांनी सिंमेटच्या टाक्या बसवून दिल्या. हे काम करत असतांना दुष्काळाचे चटके सर्वत्र सारखेच असतात हे त्यांना जाणवलं. प्रमोद यांनी फोरमच्या माध्यमातून दुष्काळ हटविण्यासाठी काय करता येईल यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली. ग्रामीण भागात अभ्यासदौरे, अडचणी, त्यामागील कारणं शोधणं सुरू झालं.
निधीची जमवाजमव सुरूच राहिली. संकलित निधीतून नाशिक जिल्हातील पेठ तालुक्यात गढईपाडा येथे १० हजार लिटर पाण्याचा स्टोरेज टँक बसवला गेला. तोरणगावात जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्यात आली. सध्या एक रुपयात २० लीटर स्वच्छ पाणी तेथील ग्रामस्थ घेत आहेत. अशाच काही समस्या शेवखंडी, खोटरेपाडा, फणसपाडा या तीन गावात होत्या.
शेवखंडी गावातील विहिरीला पाणी नाही हे लक्षात येताच कमी खर्चात कसं काम करता येईल यासाठी समितीने चाचपणी केली. पाणी मुबलक रहावं यासाठी गावात तज्ञांच्या मार्गदर्शनाने ‘पाणी आडवा आणि पाणी जिरवा’ प्रयोग करण्यात आला.
गावकऱ्यांना सोबत घेतलं गेलं. त्यामुळे आपण काम करू तर काम लवकर होईल आणि जास्त चांगल्या पध्दतीने होईल हा विचार ग्रामस्थांमध्ये रुजला. गाव परिसरात श्रमदानातून जलवाहिनी टाकण्यात आल्या. या विहिरीला जोडत पावसाचं पाणी संकलित होण्यास सुरूवात झाली. जमा झालेलं पाणी मग कोरड्या विहिरीत सोडण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर ग्रामस्थच पर्याय सुचवू लागले. समितीचा सल्ला आणि पर्याय यांची सांगड घालत फोरमने काम केलं. जवळपासच्या आठ ते दहा गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा फोरमचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रमोद गायकवाड 

- प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment