Sunday 30 July 2017

इन्सानियत की बरकत दिल्ला...


व्हीलचेअरवरून गुजगोष्टी : इन्सानियत की बरकत दिल्ला...
शाळा नं ३. चौथीपर्यंत. त्यावेळी जातीधर्म वगैरे काही कळत नव्हतं. अनेक मैत्रिणींप्रमाणेच नफिजा आणि हसीना सुद्धा. फक्त इतकंच की त्या इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत असं जाणवायचं. त्यांना इतक्या लहानपणी ओढणी नि सलवारकमीज घालायला मिळायचा यामुळं त्यांचा दुस्वास वाटायचा. आम्हाला फारच सहन नाही झालं तर आम्ही टॉवेलवर ओढणीची तहान भागवायचो. - त्यांच्या घरापाशी कुतूहल म्हणून घुटमळायचो. कधीतरी आतही जायचो. घर घरासारखंच. परिस्थिती बेताची असणार्‍यांचं असतं तसं. मात्र घरामध्ये एक विशिष्ट वास जाणवायचा. तो कशाचा किंवा चांगला की नकोसा हे कळायचं नाही. पण पुढे कधी मुस्लिम मुलामुलींना भेटले तेव्हा तो विशिष्ट वास शोधत राहिले. त्या बाळबोध वयात वाटायचं की कुणी मुसलमान असेल तर असा वास असणार त्यांच्या घरात नि अंगाला. कुणीतरी मुलींपैकीच सांगितलं की ते दर शुक्रवारी अंघोळ करतात वगैरे नि त्यांना पाच वेळा नमाज पढावा लागतो. मी त्यावेळी मनात म्हटलं होतं, एकावेळी शुभंकरोती म्हणताना इतकं बोलणं खायला लागतं, पाच शुभंकरोत्या कुणी पढाव्यात! मग पुढे माझ्या आयुष्याला निराळं वळण लागलं नि त्या मुली भेटल्याही नाहीत. गावातल्या मशीदीतून अजान यायची ती ऐकायला आवडायची, सवयीची होती. मोठं होत जाताना बाबरी मशीदीविषयी नि निमित्तानं फार दिसत गेलं, दहशतवाद्यांचं जगभरचं जाळं नि त्यातल्या मुसलमान लोकांची संख्या वगैरे बातम्यांमधून पोहोचत गेली. तरीही मुसलमानांविषयी काही टोकाचं मनात तयार झालं नाही. बातम्यांमधून जे नकारात्मक दिसायचं तसं गावात मुळात नव्हतंच. अजूनही तसं चित्र नाही.

खूप वर्ष वाटायचं की मुसलमान कुटुंबाशी आपण जोडलं जायला हवं होतं. त्यांच्याकडच्यांना गणपतीगौरीदिवाळीदसर्‍यापासून सगळं ठाऊक असतं, आपल्याला त्यांच्या सणवारांचे तपशील ठाऊक नाहीत. हे काही बरोबर नाही. कामाच्या रगाड्यात ते तसंच राहिलं. पुढे खलील मोमीन सारखे अब्बू आणि नवं कुटुंब मिळालं, पण ते फार लांब. रोजचं काही समजणं शक्यच नाही. त्यांची मुलगी-माझी बहीण नासरीन मला टिपिकल शिरखुर्मा शिकवून गेली तितकंच. महाद्वाररोडवर खरेदीची हौस भागवताना एक दिवस अनिस भेटला. कितीतरी दिवस मी त्याला अनिल नि पुढे अंनिस म्हणून हाक मारायचे. त्याच्या कॉस्मॅटिक्सच्या दुकानात मी येऊ शकावे म्हणून त्यानं रॅम्प बनवला नि तिथंच आमची मैत्री सुरु झाली.
कैक वर्ष राहिलेली हौस यावर्षी आपसूक भागायची होती. अनिसच्या कुटुंबानं मला इफ्तारीसाठी बोलावलं. रोजाचा तो सोळावा दिवस होता. ७ वाजून १० मिनीटांनी रोजा सोडायचा म्हणून गडबड करत त्याच्या घरी जेमतेम दहा मिनिटं आधी पोहोचलो. त्याची आजी महाबुब्बी, आई रझिया, आत्त्या लतिफा, आत्तेबहीण आयेशा, आत्तेभाऊ जुनैद, चुलतभाऊबहिण अकिब आणि आफिया असे सगळे आमची वाट बघत बसले होते. हॉलमध्ये मध्यभागी एक सुंदर मंद रंगाचं टेबलक्लॉथसारखं कापड बिछवलेलं नि त्यावर सगळे पदार्थ मांडलेले. या कापडाचं खूप महत्त्व. दस्तरखान म्हणतात त्याला. अन्नाला देवासारखं मानून आदराच्या भावनेनं दस्तरखान बिछवून मग त्यावर कलाकुसरीनं अन्न मांडलेलं असतं. मी इराणी सिनेमांमध्ये असं गोल करून खाताना पाहिलं होतं, पण त्यात दस्तरखानचं वेगळं महत्त्व लक्षात नव्हतं आलं. अनिसची आई आज खर्‍या अर्थानं दमलेली कारण पहिल्यांदाच सगळं काही शाकाहारी रांधण्याचं बरंच टेन्शन तिनं घेतलेलं. अनिसच्या भावानं ‘नियत’ केली नि दुवॉं म्हणायला लागला. मी, रामदास नि मंदा वगळता सगळेच दुवॉं म्हणू लागले. ‘बिस्मिल्लाह वालहा बरकत दिल्ला' - या अल्लाह हमारे खाने में बरकत अदा फरमा.. नंतर तीन घोट पाणी पिऊन खजूर खाऊन आम्ही रोजा सोडला. लालचुटुक सरबतासह दिमतीला बरंच खानपान सजलेलं होतं. हेच जेवण वाटल्यामुळं आम्ही उभाआडवा हात मारलेला, पण अस्सल शाकाहारी जेवण इतकं भारी होतं की ठिक्याला आपटून धान्याला जागा करतात तसं आम्ही ठाकूनठोकून पुन्हा दोन तासांनी खाण्यासाठी सज्ज झालो.
नुकतीच भारतपाक मॅच झाली होती. पुढं गप्पा मारताना अनिस म्हणाला, आम्ही इथलेच, पण मॅच पाकिस्ताननं जिंकल्यावर नमाजला जाताना घातलेला नक्षीदार कुर्ता बदलून साधा शर्ट घातला. उगीच कुणाला वाटू शकतं की मला पाकच्या जिंकण्याचा आनंद झालाय.
- आपलं मिसळून जाणं सिद्ध करण्यासाठी कुणाला काही करावं लागतं यानं माझ्या मनात तेव्हापासून अपराधीपण तयार होत गेलंय... 
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment