Sunday 30 July 2017

खणखणीत...



व्हीलचेअरवरून गुजगोष्टी खणखणीत...
काल अचानक सिद्धेश, ऋजुता, प्रियांका आणि संगीता पुण्यातून कोल्हापूर फिरायचं म्हणून आले आणि घरी भेटायला आल्यावर गप्पांचा जो फड जमला की नंतर पन्हाळा, बर्फाचा गोळा, पिठलंभाकरी वगैरे कॅन्सल करून सगळे इथंच थांबले. यातली ऋजुता सिद्धेशची बायको आणि प्रियांका-संगीता विद्यार्थिनी. अर्थात ‘सर’ असणारा सिद्धेश काही फार ज्येष्ठबिष्ट नाहीये. बरेचदा त्याचे विद्यार्थी त्याच्यापेक्षा वयानं मोठेही निघतात. सिद्धेश युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करतो. अतिशय तंत्र कुशल! तो पूर्ण अंध आहे, अगदी अंधार उजेडाची जाणीवही होत नाही. प्रेमात पडून, पळूनबिळून जाऊन त्याचं नि ऋजुताचं लग्न झालेलं. त्यानं नि ऋजुतानं कसा सगळ्याचा मेळ जुळवला हे सांगताना स्वारी भलतीच रंगात आलेली आणि संगीता व प्रियांका अस्वस्थ झालेल्या की सर, नंतर सांगा तुमची श्टोरी... आत्ता पन्हाळ्याला जाऊया.
स्वत:च्या शारीरिक अडचणींशिवाय फार काही कळत नव्हतं अशा काळात कधीतरी माझ्या मैत्रिणीला, परिमला भटला मी विचारलेलं, काय गं, अज्जिबात दिसत नसताना कस्सकाय हिमालय चढायचा? नि बघायचं काय? दिसत नाही म्हटल्यावर भीती जास्त की गं! का केलं तू हे सगळं? तर म्हणालेली, ‘‘अगं येडे, दिसत नाही म्हणून भीती कमी. दिसलं की माणूस खोल दरीकडेच आधी बघतो, मग त्याचं अवसान जातं. मी दिसत नसल्यामुळं वरही नाही नि खालीही नाही बघत. फक्त तिथं असते. जे करायचं ते करते म्हणजे फक्त जाणवणारी वाट चढते किंवा उतरते. आणि का करायचं म्हणशील तर आपल्या भोवतीची हवा कळते. तिचं विरळ होत जाणं, वारा, उंची नीट समजतं. हे अनुभवायसाठी करायचे प्लॅन्स.’’ - या उत्तराची खूण मनात नीट जपल्यामुळं सिद्धेश अचानक सुट्टी घेऊन पर्यटनाचा प्लॅन का करतो हे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. फिरायची प्रत्येकाची एक वेगळी तर्‍हा असते. अनुभवण्याचा प्रत्येकाचा एक आपलासा पैस असतो. एका जागी बसून माणसं सतत फिरती व पाहती असू शकतात. एका कार्यक्रमात मेघना पेठेंना व्याख्यान संपल्यावर कुणी विचारलं होतं, ‘लेखक होण्यासाठी खूप भटकंती करावी लागते का? कारण त्यातूनच अनुभव गोळा होतात!’ तेव्हा मेघना पेठे म्हणाल्या होत्या, मला जे उमगलेलं असतं ते लिहिण्यासाठी मला घराचा उंबरा ओलांडण्याचीही गरज वाटत नाही. लिहिणं कशातून येतं याचं ज्याचंत्याचं संचित निराळं असतं. 

एक कुतूहल होतं म्हणून सिद्धेशला म्हटलं, अनेक विकलांगांची विशेषत: बँकेसारख्या व्यवस्थेशी संबंधित अंध माणसांची तक्रार आहे की त्यांच्या क्षमतेप्रमाणं त्यांच्याकडून काम घेतलं जात नाही, आवश्यक ती पायाभूत सुविधा मिळत नाही. तुझा काय अनुभव? सिद्धेशनं उत्तरादाखल जो अनुभव सांगितला त्यानं मी व्हीलचेअरमध्येच आणखी थोडी ताठ बसले नि न राहवून टाळ्याही पिटल्या. आपल्या कामाची गुणवत्ता सिद्ध केली नि आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं की सिस्टीम तुमच्यासाठी जरूर उभी राहते! काम करणारा माणूस अपंग आहे की सुदृढ यात फरक न करता व अवाजवी सहानुभूती किंवा हेटाळणी न दाखवता माणसं तुमच्यासाठी आवाज उठवतात तेव्हा कामाचा हुरुप जो काही वाढतो की बोलायची सोय नाही.
सिद्धेशनं उत्तर दिलं होतं ... ‘‘काम भर्रपूर आहे गं. उलट इतरांपेक्षा जास्तच. अलीकडचंच सांगतो, बँकेत नेहमीप्रमाणं मी एटीएम व डिफॉजिटिंगचं बघत होतो. गर्दी चिक्कार होती त्यामुळं वेळ लागत होता. एकजण तणतणत गर्दी का आहे हे बघायला आले. त्यांना दिसलं की सगळं ऑपरेट करणारा माझ्यासारखा अंध माणूस आहे. ते वैतागत मॅनेजर साहेबांकडे गेले, म्हणाले, ‘‘असली माणसं भरून तुम्ही कामाची नि वेळेची खोटी कशाकरता करता? गर्दी आवरेना झालीय, कुणीतरी व्यवस्थित माणूस नेमा नि याला बाजूला करा.’’ मॅनेजर साहेबांनी फार काही न बोलता त्या माणसाच्या हातात अकाऊंट बंद करण्याचा फॉर्म दिला नि म्हणाले, आमच्या माणसांच्या कामाची खात्री आहे म्हणून ते 'जे' काम करताहेत 'ते' करताहेत नि उत्कृष्ट करताहेत. त्याविषयी तक्रार नसताना ती निर्माण करत असाल तर तुम्ही आमच्या बँकेत नाही आलात तरी चालेल!’’
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment