Thursday 13 July 2017

आगळावेगळा स्वच्छता सत्याग्रह


आंदोलन म्हणून सत्याग्रह केला जातो. पंरतु, चंद्रपुरात गेल्या दोन महिन्यांपासून काही युवकांचा स्वच्छता सत्याग्रह सुरु आहे. हा कृतिशील सत्याग्रह म्हणजे स्वच्छता अभियान. चंद्रपूरच्या ‘इको-प्रो’ संघटनेचं हे काम.
चंद्रपूरला साधारणत: पाचशे वर्षांचा इतिहास आहे. शहरात असलेले गोंडकालीन किल्ले, शहराच्या सभोवताल असलेले परकोट शहराची ऐतिहासिक साक्ष देत आहेत. १५९७ ते १६२२ या काळात चांद्याच्या परकोटाचं काम पूर्ण झालं. राजा बल्लाळशहा याने परकोटाचा पाया रचला. त्याचा मुलगा हिरशहा याने चार दरवाजे आणि खिडक्या उभारल्या. हिरशहाचा नातू कर्णशहा याच्या कारकिर्दीत तट तयार झाले. तर पुढे धुंड्या रामशहाच्या कार्यकाळात परकोटाचं काम पूर्ण झालं.
दोन मुख्य द्वार, दोन उपद्वार, पाच खिडक्या हे परकोटाचे विशेष. संपूर्ण परकोट सात किमींचे लांब असून, ऐतिहासिक चीनच्या भिंतीप्रमाणे या परकोटाला सात किमीचं रॅम्प आहे. यावरून रपेट मारून अर्ध्या चंद्रपूर शहरला भ्रमंती घालता येणं शक्य होणार आहे.
मात्र, चंद्रपूरचं हे ऐतिहासिक वैभव अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलं आहे. सध्या परकोटावर राज्य आहे ते झाडाझुडुपांचं. त्यामुळं परकोटाला तडे पडू लागले आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अतिक्रमणामुळे परकोटाचं अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूरचं ऐतिहासिक वैभव कायम राहावं, किल्ले, परकोटाचं संवर्धन व्हावं, यासाठी ‘इको-प्रो’चे स्वयंसेवक एकत्र आले. संघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्यासोबत गेल्या ७० दिवसांपासून हा स्वच्छता सत्याग्रह सुरू आहे.
शिस्तबद्धतेनं त्यांनी परकोटाची स्वच्छता हाती घेतली. स्वयंसेवकांनी फावडे, टिकास, सबल घेत परकोटावरील झाडं-झुडुपं स्वच्छ करण्यास सुरुवात केली. ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. या काळात परकोट बऱ्यापैकी स्वच्छ झाला. प्रसंगी विंचू, सापांचाही सामना स्वयंसेवकांनी केला. मात्र त्यांनी अभियानातून माघार घेतली नाही. ज्या बुरुजावर लोकांना चढायला भीती वाटायची तिथं आता परिसरातील लहान मुलं खेळू लागली आहेत. झाडाझुडुपांनी व्यापलेलं परकोट आता चंद्रपूरकरांच्या गर्दीनं फुललं आहे.
बंडू धोतरे म्हणतात, ‘‘चंद्रपूरला लागून ताडोबासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्रप्रकल्प आहे. रोज शेकडो देशीविदेशी पर्यटक येथे येतात. त्यांना चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा पाहता येणं शक्य होणार आहे. त्यासाठी चंद्रपूरकरांनी हा समृद्ध वारसा जतन करणं आवश्यक असून, सर्वांनीच पुढं येऊन परकोट, किल्ले स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे’’. हे खरं स्वच्छता अभियान! या युवकांच्या स्वच्छता सत्याग्रहाची प्रेरणा सर्वांनीच घ्यायला हवी, नाही का?
बंडू धोतरे

- प्रशांत देवतळे.

No comments:

Post a Comment