Thursday 13 July 2017

शेतकऱ्यांचं एटीएम

बीड - अहमदनगर रस्त्यावरचं शेरी बुद्रुक. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जेमतेम पाच हजार लोकवस्तीचं गाव. गावातील बहुतेकांचा शेती हा मुख्य व्यवसाय. पाऊस, पाण्याच्या उपलब्धतेवर इथले शेतकरी पारंपरिक पिकं घेतात. एकेकाळी पान मळे आणि भाजीपाला उत्पादन हे इथलं वैशिष्ट्यं. सध्या मात्र कागदी लिंबांचं पीक घेणारं गाव अशी शेरीची ओळख झाली आहे. 
लक्ष्मण रामभाऊ सोनवणे, सुनील गोरे, मधुकर वाघुले, भीमराव पांडुरंग गोरे या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. ते म्हणाले की, “शेरीतील साधारणतः ९० टक्के शेतकऱ्यांनी लिंबोणीची बाग लावलेली आहे. नक्की कधीपासून सुरुवात झाली हे सांगता येणार नाही. पण आता बहुतेकांच्या शेतात कागदी लिंबाची झाडं आहेत.” लिंबाची शेती तशी सोपी. एकदा लिंबाचं रोप लावलं की सुरुवातीची तीन वर्ष झाडाची काळजी घ्यावी लागते. नंतर लिंबं यायला सुरुवात होते. पाचव्या वर्षांपासून चांगलं उत्पादन सुरू होतं. वर्षातून तीन बहार. म्हणजे सहा ते आठ महिने उत्पादन सुरू राहते. लिंबं तोडणी झाली की गावातील लिंबू खरेदी केंद्रावर ती विकली जातात. लिंबाचं एक झाड वीस-पंचवीस वर्ष जगतं. त्यामुळं सलग वीस वर्षापर्यंत नियमित उत्पन्न मिळत राहतं. 

वर्षभरातून एकदा शेणखत, अधून मधून वाळलेल्या फांद्या कापणे आणि दिवसाआड पाणी एवढंच काम उरतं. वर्षभरात सर्व खर्च वजा जाता किमान लाखभर रुपये प्रति एकर उत्पन्न मिळतं. हंगामाच्या काळात तर दिवसभर पिवळसर झालेली लिंबं तोडायची आणि गोणीत भरून विकायला आणायची एवढंच काम असतं. याकाळात लिंबं विकून रोज पैसे मिळत असल्याने लिंबाचे झाड शेतकऱ्यांसाठी एटीएम ठरलं आहे.
इथल्या मजुरांनाही लिंबामुळे रोजगार मिळाला आहे. अशोक वाघुले, सचिन वाघुले, सतीश गोरे हे या गावातीलच तरुण. गावातील शेतकऱ्याकडून लिंबं खरेदी करायची आणि पुणे, मुंबई, नाशिकपासून थेट दिल्लीपर्यंत त्याची तिथल्या व्यापाऱ्यांना विक्री करण्याचं काम हे तरुण करतात. त्यांच्या लिंबू खरेदी केंद्रात गावातीलच तरुण काम करतात. त्यातून त्यांनाही रोजगाराचं चांगलं साधन मिळालं आहे. पाण्याची टंचाई, भावातील चढ-उतार अशा अडचणी इथंही आहेतच. दुष्काळात विकत पाणी घेऊन बाग जगवावी लागते. परंतु त्यावर मात करून एकमेकांच्या साहाय्याने इथले शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करत आहेत. लिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने सरकारने इथं एखादं लिंबू प्रक्रिया केंद्र सुरू केलं तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल एवढीच अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

- राजेश राऊत.

No comments:

Post a Comment