Sunday 30 July 2017

ज्वारीचं शेत पक्ष्यांना अर्पण


साडेचार एकर ज्वारीचं पीक चौथ्या वाटणीने करायला
घेतलेलं. शाळू पोटरीला आलेला..अगदी मोत्यासारखे दाणे. सकाळी सकाळी शेताकडे फेरी मारायला ते दोघं गेले. पोटरीला आलेली कणसं पाहून मन हरखलं. अचानक पक्ष्यांचा थवा आला आणि कणसावर बसून इवल्याशा चोचीने कोवळे दाणे टिपू लागला. खाण्यात रमलेल्या पक्ष्यांना हुसकावण्याचं धाडस दोघांना होईना. दोघांच्याही मनात एकच विचार आला. आपण ही कणसं त्यांच्यासाठीच ठेवली तर! मिनीटभराचा अवकाश. आणि दोघांनी ठरवलं. तब्बल साडेचार एकरवरचा शाळू पाखरांसाठी ठेवायचा आणि फक्त धाटे विकूनच उत्पन्न मिळवायचं.
कोल्हापूर जिल्हा. शिरोळ तालुका. उदगाव इथली ही गोष्ट. सतीश चौगुले आणि पंकज मगदूम या तिशीतल्या शेतकऱ्यांची. गावातली किरण पाटील यांची आठ एकर शेती दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी चौथ्या वाटणीने करायला घेतली. यापैकी अडीच एकर क्षेत्रात वांगी आहेत. तर साडेचार एकरात शाळूचं (ज्वारी) पीक आहे. सतीश आणि पंकज शाळकरी मित्र. सतीश एम.सी.ए. तर पंकज बारावी झाले आहेत. दोघांनाही शेतीची आवड. सतीश यांनी नोकरीचा नाद सोडून शेती करण्याचं ठरवलं.
यंदा त्यांनी शाळूचं पीक घेतलं. पोटरी फुटल्यानंतर सुरवातीला चांगलं उत्पादन येईल या अपेक्षेने त्यांना आनंद झाला. परंतु एका क्षणी दोघांच्याही मनात पक्ष्यांप्रती आपुलकी निर्माण झाली. आणि त्यांनी फारशी चर्चा न करता फक्त धाटातूनच उत्पादन मिळविण्याचं ठरविलं. कोल्हापुरातला हा भाग सध्या औद्योगिकरकणाकडे वळतो आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.
सतीश म्हणतो, “पक्ष्यांसाठी शेत सोडल्यानंतर लोकांनी अक्षरश: वेड्यात काढलं. पण कोणाचंही न ऐकता आम्ही हे पाऊल उचललं. नोकरी सोडून इतरांची शेती करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही लोक नकारात्मक बोलले. पण ते मनावर न घेता मी शेती करायचा निर्णय पक्का ठेवला. आता तो मला फायदेशीर ठरत आहे. पंकजबरोबर शेती करताना वेगळाच आनंद मिळतो आहे”.
खाऊ लुटण्यासाठी गेल्या दोन महिन्यात अनेक पक्षी त्यांच्या शिवारात दाखल झाले. वाइल्ड लाइफ कांझर्वेशन ऍन्ड रेसक्यू संस्थेचे सदस्य संगमेश्‍वर येलूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटेपासून दुपारपर्यंत पक्षीनिरीक्षण केलं तेव्हा पंचवीसहून अधिक प्रकारचे पक्षी दाणे टिपण्यासाठी आल्याचं आढळून आलं.
पक्ष्यांना जगविण्याचं समाधान मोठं आहे. या उपक्रमामुळे आर्थिक नुकसान होत असलं तरी आम्ही इतर शेतीतून उत्पन्न काढू शकतो. भविष्यातही पक्ष्यांच्या खाण्यांना प्राधान्य देतच शेती करणार असल्याचं सतीशने सांगितलं.

- सी. सत्यजित, कोल्हापूर

No comments:

Post a Comment