Sunday 30 July 2017

झोपेनंतरची जाग!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी : झोपेनंतरची जाग!
अलीकडं वातावरण असं झालंय ना की खूप झोप येत असते. नव्या घराची जागा अशा मस्त अट्टल ठिकाणी आहे आणि घर असलं भारी आवडतंय की नरममऊ फिलिंग येतं नि गोधडी घेऊन झोपून जावं वाटत असतं. जे वाटतं ते मी लगेच खरं करते. उद्यापासून लवकर उठायचं, वाचायचंबिचायचं असं जे ठरवलेलं असतं ते रात्री झोप लागेपर्यंतच. सकाळी या निश्चयाचा मागमूस उरलेला नसतो आणि उठल्याउठल्याही मला खूप झोप येत असते. मी जेव्हा संस्थेतल्या कामाचा राजीनामा द्यायचा ठरवला तेव्हा स्वातंत्र्याच्या सुखाच्या ज्या सर्वोच्च कल्पना माझ्या मनात होत्या त्यात ‘खूप झोपायचं’, ‘पहाटे अज्जिबात उठायचं नाही.’ हे मुद्दे सर्वोच्च स्थानी होते. नोकरीत असताना, हॉस्टेलमध्ये लवकर उठून आवरणं, वेळापत्रकानुसार चटचट गोष्टी होणं आवश्यकच होतं, आवडतही होतं. पण वाट्टेल तितक्या लवकर उठण्याचा अतिरेकच कदाचित इतका जास्त होता की नोकरी संपल्यानंतर मी झोपेचा बॅकलॉग पूर्ण करायचा म्हणून फारफार झोपायचे. आणि झोपेत मला जी स्वप्न पडायची ती मी झोपलेय आणि कुणीतरी मला या ना त्या कामासाठी सारखं उठवतंय किंवा मी झोपलेय, शेजारी दरी आहे, ती मला कळतेय, पण झोप मोडायची नाहीये... श्वासांच्या लयीमुळं व्हीलचेअर कणाकणानं पुढे सरकतेय, मला ते बहुतेक कळतंय...मी दरीच्या अगदी टोकावर आहे, ‘हाच’ नेमका श्वास ज्यामुळं माझा कडेलोट होणारे... मी अधोन्मिलित नजरेनं दरीत बघते तर मला खाली सगळीकडे गाद्या घातलेल्या दिसतात...मग मी म्हणते, ठीकाय, खाली पडेपर्यंत मोडेल तितकीच मोडेल झोप! खाली झोपायचंच आहे... मग मी पडते नि झोपते. - ही असली स्वप्नं मी बघत असायचे.
लहानपणी शिराळ्यात बाबा पहाटे फिरायला गेले की आई उठायची. साधारण साडेसहापावणेसातला मला व धाकट्या बहिणीला संपदाला उठवायची. माझ्या चॅलेन्ज्ड असण्याची सवलत तिने मला व मी ही मला मनोमन दिली असायची त्यामुळं मी हाका मारल्या तरी दाद द्यायचे नाही. संपदा निमूट उठायची. बाबांनी वाड्याचा अगदी पहिला दरवाजा उघडला की मनातून कळायचं की बाबा चिडतील, आता उठायला हवं, तेव्हा मी उठल्यासारखं करून दहा मिनिटं पांघरुणाची घडी घातल्यासारखी करत पेंगायचे. उठून हातावर सरकत स्वयंपाकघरातल्या उंबर्‍यावर बसून दात घासायचे. बाबा लगेच छोट्या गुंडीतून बंबातलं गरम पाणी काढून द्यायचे. आवरून मी आईनं ठेवलेला चहा घ्यायचे नि परत कमरेतून मुडपून जमिनीवर हातांचं रिंगण घालायचे नि त्यावर डोकं ठेवून गुडूप व्हायचे. सेकंदात झोप लागायची. आईनं हाक मारलीच तर म्हणायचे, ‘‘झोपले नाहीये, मी नागरिकशास्त्राचा विचार करतेय... ’
झोपेचं काजळ डोळ्यांत घातलेलं असायचं असेही दिवस असायचे नि कुठाय ती उंडगी झोप, च्यायला, झोप का येत नाहीये असेही दिवस असायचे. मात्र झोपेचे दिवस जागेच्या दिवसांपेक्षा अधिक तरतरीत करायचे. परीक्षेच्यावेळी किंवा इतर ताणतणावांच्यावेळी ‘नको याला सामोरं जायला’ असं वाटत असायचं तेव्हा येणारी झोप नि आज येते ती झोप यात बराच गुणात्मक फरक आहे.
सध्या कविता महाजन किंवा अशीच खूप्प खूप्प काम करणारी जी मित्रमंडळी आहेत त्यांना मी सामोरी जात नाहीये कारण मला कळतंय की जी कामं करायची आहेत त्यांना वळसा घालून स्वत:ला शिस्तीत आणणं मी टाळतेय. केवळ चार-पाच तास झोप घेऊन कामात बुडून जाणारी ही माणसं पाहाण्याऐवजी मी सध्या ‘आठ तास झोप खूप गरजेची’, ‘शरीराला नि मनाला विश्रांतीची तितकी गरज असल्याशिवाय माणूस झोपेच्या अधीन होत नाही.’ वगैरे बोलणारी माणसं पाहातेय नि स्वत:ला झोपेचा गिल्ट येऊ देत नाहीये. कोण जाणे का, कधीकधी आपल्याला गिल्ट का येत नाही याचाही गिल्ट येतो.
सगळी गंमतजंमत जाऊदे. एक आहे, मला कळलंय, कधीही झोपण्याचं नि उठण्याचं स्वातंत्र्य मला आहे तर त्या स्वातंत्र्यानं मी उतूमातू नये यासाठी मला लख्ख जाग असणं गरचेचंय. ती आलीय मला आता! ~ मात्र याची खात्री आहे की नीट, शांत व सुखाची झोप घेतल्यामुळंच मी आता तरतरीत जागी झालेय. भरपूर काम करणारे.
विश मी लक!
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment