Thursday 13 July 2017

...तरीही ती जिद्दीने संसार सावरतेय!


दररोज वेळेवर घरी येणारा नवरा अजून आला नव्हता. काळजीनं ती सारखी त्याला फोन लावत होती. आणि काही वेळातच पोलीस स्टेशनवरून फोन आला. ‘ताबडतोब शासकीय रूग्णालयात या.’ निरोप मिळाला. अन् तिच्या पायाखालची जमीन सरकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला पाहून ती खचून गेली. क्षणभरच. दुसऱ्याच मिनिटाला तिने स्वत:ला सावरलं. आणि सुरु झाला खडतर प्रवास. तो आजही सुरूच आहे. रत्नागिरीतील सुलतानबी खाँजा शेख हिची ही गोष्ट. 
कामावरून परतताना खाँजा शेख यांना अपघात झाला. पायावरून चारचाकी अवजड वाहन गेलं. केस गुंतागुंतीची असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं. तिचा मात्र ठाम विश्वास की, माझा नवरा काही करून बरा होणारच! म्हणूनच पुढच्या उपचारासाठी तिने कोल्हापूर सीपीआर गाठलं. इथली परिस्थिती अजूनच कठीण. हजारो रूग्ण. डॉक्टरांचं या नव्या पेशंटकडे लक्ष जाणं शक्यच नव्हतं. चार भिंतीच्या बाहेरचं जग माहित नसलेली सुलतानबी या अपघातानंतर खूप काही शिकली. बरेवाईट अनुभव घेतले. दोन्ही मुलांना माहेरी ठेवून ती महिनाभर सीपीआर या सरकारी रूग्णालयात राहिली.
खाँजा शेख यांच्या उजव्या पायाचं या अपघातात नुकसान झालं. पायामधील चरबी बाहेर आली. नसा दाबल्या गेल्या. गेल्या सात महिन्यापासून त्यावर उपचार सुरू आहे. उपचाराकरिता निधी सहाय्य मिळावं म्हणून तिने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठी अर्ज केला. हा अपघातप्रकार योजनेत बसत नाही म्हणून अर्ज नामंजूर झाला. सीपीआरनेही तज्ञ नसल्याचे सांगून उपचार टाळला. कोल्हापूरमधल्या खाजगी रूग्णालयात 5 ते 6 लाख रूपये प्लास्टीक सर्जरीसह इतर दोन शस्त्रकियेसाठी मागण्यात आले.
खाँजा शेख बांधकामावर मजूर. 200 स्वेअर फुटाच्या छोट्या खोलीत राहणाऱ्या या जोडप्याकडे जमापुंजी काहीच नव्हती. असं असूनही पतीवर उपचार व्हायलाच हवा, या ध्यासाने तिने कोल्हापूर नॉर्थ स्टार रूग्णालय गाठलं. डॉक्टरांना फी उशीरा भरेन, अशी विनवणी केली. नातेवाईकांच्या हातापाया पडून 50 हजार जमवले. शेवटी मंगळसूत्र गहाण ठेवलं. तरीही गरजेइतकी रक्कम जमली नव्हती. कोल्हापुरातील काही व्यक्तींनी 30 हजारांची मदत केली. खर्च आला तो 1 लाख 80 हजार. मात्र नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज, मुलांचा शैक्षणिक खर्च शिवाय खाँजा शेख यांना दर महिना तपासणीसाठी कोल्हापूर वारी. हे कर्ज फेडण्यासाठी सुलतानबी जेवणाचे डबे बनविते, शिवणकाम करते. इतकं सगळं सोसूनही सुलतानबी हरलेली नाही. आजही ती परिस्थितीशी लढते आहे आणि संसार सावरते आहे.
सुलतानबी शेख, रत्नागिरी 


- जान्हवी पाटील, रत्नागिरी

No comments:

Post a Comment