Thursday 13 July 2017

ओ ऽऽऽऽ मी आहे!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी
कुणाचं ना कुणाचं येणंजाणं, काहीतरी काम किंवा चौकशी, कोथिंबीर नि विरजणाची देवघेव असं व्हायला लागलं नि कळलं आता खरी माणसाळायला लागलेय मी. ज्या त्या वेळच्या ‘वाढी’ची गरज वेगवेगळी! ती नेहमी एकसारखी कुठे असते!! - तर मी संस्थाळलेली होते नि आता हळूहळू माणसाळायला लागले होते. आजूबाजूचा परिसर मला कळावा म्हणून उदयबाबा मला बर्‍याचठिकाणी चालत न्यायचा. प्रत्यक्ष गेल्यामुळं मला जोडल्याचा फील यायचा. समोरच्याशी बोलता येणं ही गोष्ट माझ्यासाठी नवी नव्हती, पण सात वर्ष संस्थात्मक कामात व्यक्तीपण विरघळून गेल्यामुळं आपण समोरच्याशी नेमकं बोलायचं काय हा प्रश्न आ वासून उभा असायचा. देशभरातून येणार्‍या विकलांग व्यक्तींचे प्रश्न समजून घ्यायचे, फंड रेजिंग, त्यासंबंधातली पत्रं, इतर संस्थात्मक कामं नि सगळ्यांना प्रकल्प दाखवणं यातच मी सतततततत होते. त्यातून कितीही निग्रहानं मिळवलं तरी मिळवलेल्या स्वातंत्र्याचं नेमकं करायचं काय नि कसं याचा निश्चित काहीच आराखडा अजून केला नव्हता. शोधायचंच होतं नव्यानं सगळं. त्यावेळी निरनिराळी माणसं भेटत होती. जसं ‘स्वानंद सखी’च्या अनुराधा पोतदार. त्यांनी त्यांच्या गटाशी ओळख करून द्यायची म्हणून त्यांच्या एका मिटिंगला बोलावलं. नव्या जगात केलेलं एकप्रकारचं स्वागतच ते. तशाच उत्सुकतेनं आल्या ‘बालकुमार साहित्य सभे’च्या त्यावेळच्या अध्यक्षा रजनी हिरळीकर.
गेली दहा वर्ष साथसोबत करणारी माझी ही ज्येष्ठ मैत्रीण! उजळ रंग, चष्म्यातून पाहणारी मायाळू नजर. ताठ चालणं. साड्या एकदम फ्रेश पण बर्‍याचदा फिक्या रंगाच्या, चापून नेसलेल्या. खांद्याला छोटीशी पर्स. अशा रजनीताई एकट्या राहाणार्‍या पण अतिशय कुटुंबवत्सल. त्यांचं लिहिण्याचं जग मुख्यत: लहान मुलांशी निगडित. आज जरी कविता, कथा, ललित, एकांकिका, चिंतनात्मक अशा प्रकारातली ६० हून अधिक पुस्तकं आली असली तरी मला त्यांचं ‘कवितेचं झाड’ खूप आवडलं होतं. जवळपास ७५ कवींविषयी त्यांनी ‘सकाळ’ला लिहिलेले ते छोटेखानी लेख होते. ‘बालकुमार साहित्य सभे’तर्फे त्यांनी खूप काम केलं. छोट्याछोट्या गावांमध्ये एसटी नि वडाप अशी दगदग करून त्या कितीतरी वर्ष लहान मुलांना वाचण्याची व लिहिण्याची आवड लागावी म्हणून गप्पा मारायला जातात. आज वयाची सत्तरी उलटली तरी त्यांचं हे काम जमेल तसं चालूच आहे. माझी त्यांची ओळख झाली तेव्हा हे इतकं सगळं मला ठाऊकच नव्हतं. माझंत्यांचं जुळलं ते वेगळ्याच लिंकवर.
मी एकटी राहाण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं त्यांना खूप कौतुक. २००७ नंतर मी लिहिलेलं छापून यायचं तेव्हा आवडलं, आवडलं नाही, वगैरे सांगणारा त्यांचा सविस्तर फोन यायचा. इतकं लक्ष देऊन आपल्याकडं कुणी पाहातंय हे नवलाचं होतं त्यावेळी माझ्याकरता नि गरजेचंही. एकटं राहाणं, लग्न न करण्याचा निर्णय घेणं, त्याची जबाबदारी मानणं, लोकांच्या पूर्वग्रहांना तोट्यांची माळ लावणं वगैरे मी एका कार्यक्रमात बोलले तेव्हा त्यांचा अतिशय गदगदून फोन आला व म्हणाल्या, ‘‘सोनाली, आम्ही बोलू शकलो नाही त्यात्यावेळी, तू बोललीस तेव्हा मी बोलल्याचं समाधान मिळालं मला.’’
त्यावेळेपासून एक प्रतिष्ठित लेखक या पलीकडं रजनीताईंना मी पाहायला लागले. अत्यंत कष्टप्रद व वेदनादायी अनुभवानंतर साठच्या दशकात खूप हलाकीच्या परिस्थितीत रजनीताईंनी आपलं स्वयंपूर्ण आयुष्य बांधायला घेतलं. ते करताना त्या सुरुवातीला अत्यंत बिचकलेल्या होत्या. पण अनुभवांचा कडवटपणा त्यांनी निग्रहानं पंचगंगेत वाहायला सोडून दिला. २४ वर्ष शिक्षिकेची नोकरी केली. सडं राहायचा निर्णय घेतल्यावर माघारी काय बोललं जातं हे कळूनही त्या घट्ट राहिल्या. होणार्‍या मनस्तापाचं सावट वागवत स्वत:ला विझवलं नाही. पुस्तकांशी व लहान मुलांशी स्वत:ला जोडून घेतलं. एकटं राहून संघर्ष करताना ‘आम्ही आहोत’ म्हणणारे आवाज रजनीताईंना कमी लाभले. म्हणूनच माझ्यासारख्या छोट्या मैत्रिणीसाठी तिनं हाक मारायच्याआधी ओ द्यावी म्हणून त्या तत्पर असतात.
रजनीताईंच्या हाताला चव भारी सणसणीत! ‘सोनाली, कटाची आमची पाठवतेय...’ असं त्या म्हणतात तेव्हा त्या आमटीची चव काही फक्त नेमक्या मसाल्यांनी जमून आलेली नसते हे मला कळतंच.
सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment