Tuesday 26 June 2018

गाडगेबाबांचे वारसदार

रत्नागिरी बसस्थानक. एक जोडपं आणि त्यांच्याबरोबरचे काही जण झाडलोट करू लागले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण स्थानक धुतलं. त्यांच्याबरोबर एक चिमुरडी. प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झालं. मग त्या दोघांनी सार्वजनिक स्वछतेचं महत्त्व सर्वांना सांगितलं.
तुळजापूरचे पंकज आणि स्नेहल शहाणे. नुसता उपदेश न देता स्वतः झाडू हाती घेणारे, कोणतंही काम करण्यात कमीपणा न मानणारे गाडगेबाबा त्यांचे आदर्श. 
दोन वर्षं झाली, लोकसेवा फाउंडेशनतर्फे त्यांनी राज्यातल्या सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं. आतापर्यंत 50-60 गावांमधली रुग्णालयं, बसस्थानकं, किनारे आणि इतर सार्वजनिक ठिकाणं त्यांनी स्वच्छ केली आहेत. वर्षातले चार महिने ते यासाठी घराबाहेरच असतात. शाळा नसते, तेव्हा चार वर्षांची प्रांजलही त्यांच्यासोबतच असते. या कामासाठी स्वतःची सर्व संपत्ती विकून त्यांनी एफडी केली आहे. शहाणे इस्टेट एजंट. सध्या सामाजिक कामासाठी व्यवसाय बाजूला ठेवल्याचं ते सांगतात. संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्या मोहिमेला पाठिंबा आहे. विशेष म्हणजे मोहिमेदरम्यान राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च ते स्वतःचा स्वतः करतात. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, हे आपलं कर्तव्य आहे, याची आपल्या प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे असे स्नेहल आणि पंकज सांगतात.
रत्नागिरी बसस्थानकात हा उपक्रम राबवल्याबद्दल विभाग नियंत्रक अनिल मेहत्तर यांनी एसटी तर्फे त्यांचे आभार मानले.
-जान्हवी पाटील.

एका हाताने हमाली करणारा बिरुदेव

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं वडवळ. इथले बिरुदेव गजेंद्र काळे. चाळिशीतले बिरुदेव एका हाताने हमाली करून संसाराचा गाडा हाकत आहेत. वयाच्या १७व्या वर्षी उसाचा रस काढताना चरख्यात हात अडकला. हात गमावल्यानं बिरुदेव निराश झाले. 
शिक्षण नववीपर्यंत. शिक्षणात, इतर कुठल्याच गोष्टीत मन रमेना. घरीच पडून राहू लागले. शेतीवर अवलंबून असलेल्या काळे कुटुंबात बिरुदेवसह पाच जण. परिस्थिती तरुण मुलानं पडून राहणं न परवडणारी. बिरुदेवची मधली काही वर्ष अशीच गेली.
मोठा भाऊ विठ्ठल सोलापूर रेल्वेस्थानकात माथाडी कामगारांमध्ये मुकादम. बिरुदेवनं पुन्हा हिमतीनं उभं राहावं म्हणून प्रयत्न करायचा. सोलापुरात येऊन काम करण्याचा सल्ला तो द्यायचा. अखेर २००४ मध्ये बिरुदेव सोलापुरातल्या रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावर दाखल झाले. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. बरोबर काम करणाऱ्यांना कौतुक वाटत असलं, सांभाळून घेण्याची तयारी असली तरी एका हातानं पोती कशी उचलणार? माल कसा भरणार असे प्रश्न होतेच. पण लहानपणापासून शेतीची कामं केली असल्यानं त्यांनी या सर्व अडचणींवर मात केली. सिमेंट , धान्य अशी कुठलीही पोती ते एका हातानं उचलतात. मालधक्क्यावर इतर कुठल्याही कामगाराप्रमाणे ते काम करतात. पत्नीच्या मदतीनं स्वतः ची आणि रामहिंगणी इथली शेतकऱ्यांची शेतीही ते करतात.
- अमोल सिताफळे.

पाढ्यांसाठी मिनी कॉम्प्युटर

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितातल्या मूलभूत क्रिया. अर्थातच त्यासाठी पाढे माहीत हवेत. पाढ्यांमुळे व्यवहारातले पैशांच्या देवाणघेवाणीचे हिशेबही सुलभ होतात, अन्यथा आपल्याला कॅलक्युलेटर सारख्या साधनाची गरज लागते. पण शाळेच्या विद्यार्थ्यांचे काय? किमान महत्त्वाचे पाढ तोंडपाठ असण्याला पर्याय नाही.
पण विद्यार्थ्यांना पाढे पाठ करणे म्हणजे संकट वाटते. शिवाय उदाहरणे सोडवताना पाढा पाठ नसेल तर प्रत्येकवेळी गुणाकार करून उत्तर काढण्यातही खूप वेळ जातो. यावर काहीतरी उपाय करावा, असं मला वाटलं. आम्ही वर्गाच्या भिंतीवर पाढे ऑईलपेंटने रंगवून घेतलेले आहेत. पाढे सतत नजरेसमोर असल्याने विद्यार्थ्यांना ते पाठ करणं सोपं जातं. पण घरी गेल्यानंतर काय, हा प्रश्न होताच.
    

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धुमाळमळा इथली आमची जिल्हा परिषद शाळा. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे शेतमजूर किंवा कामगार असतात. त्यांच्या घरी स्मार्टफोन किंवा कॅलक्युलेटर असण्याची शक्यता कमी असते. म्हणून ते ही साधने वापरुन उदाहरणं सोडवू शकत नाहीत. मग अशा पालकांच्या मुलांना न्यूनगंड वाटायला लागतो व इतर मुलांच्या तुलनेत आपण अभ्यासात मागं पडू, असं त्यांना वाटतं.
या गरीब वर्गातून आलेल्या मुलांसाठी कमीत- कमी खर्चातलं एखादं साधन बनवावं असं वाटू लागलं आणि त्यातूनच बनला- ‘मिनी कॉम्प्युटर’. एक रिकामी बिसलेरीची बाटली, डिंक, ब्लेड, कात्री, स्केचपेन आणि कार्डशीट एवढ्या मोजक्या साहित्यातून आमचा कॉम्प्युटर तयार झाला आहे.
बाटलीच्या उंचीचे आणि बाटलीला पूर्ण गुंडाळले जातील असे कार्डशीटचे दोन तुकडे कापून घेतले. मग एका कार्डशीटवर 2 ते 12 पर्यंतचे पाढे स्केचपेनने लिहून काढले. हे करताना पाढ्यांच्यावर थोडी जागा सोडली आणि तिथे केवळ 2 ते 12 अंक अंतरा- अंतराने लिहिले. १० उभ्या खिडक्या कापल्या व खिडक्यांवरही एक खिडकी कापून घेतली.
त्यावर गुणाकाराची चिन्हे आणि 1 ते 10 आकडे उभे लिहून घेतले. त्यानंतर आधी चिकटविलेल्या कार्डशीटच्या थोड्या वर दुसरं कार्डशीट चिकटवून घेतलं. आता फक्त पाढे आणि आकडे हातांनी अॅडजेस्ट केले की, हवा तो पाढा तयार. उदा. 9 चा पाढा पाहण्यासाठी बाटली फिरवत उभ्या चौकटीत नऊचा पाढा येईपर्यंत बाटली फिरवायची. झाला आमचा कमीतकमी खर्चातला ‘मिनी कॉम्प्युटर’ तयार.
आमच्या शाळेतले विद्यार्थी आता कॅलक्युलेटर विसरूनच गेले आहेत. या बाटल्यांचे आम्ही दोन संच बनविले आहेत. मुलांनी अशा बाटल्या आपल्या घरीही तयार केल्या आहेत. आमच्या या कॉम्प्युटरला वीज लागत नाही आणि बॅटरीही लागत नाही. फक्त थोडेसे कष्ट आणि कल्पकता वापरली की वर्षभर उपयोगी पडेल असा हा मिनी कॉम्प्युटर तयार होतो. पाढ्यांव्यतिरिक्त हा इंग्रजीसाठीही वापरता येऊ शकतो.
अशा प्रकारे इच्छाशक्ती आणि कल्पकतेने तयार केलेल्या या मिनी कॉम्पुटरने माझ्या व मुलांच्या सर्व अडचणी दूर केल्या. आणि मुलांमधली पाढ्यांची भीती नेहमीसाठी काढून टाकली.

- लक्ष्मी ताजेंद्र राव.

कोणाच्या हातात वही- पेन्सिल तर कोणाचं संगणक प्रशिक्षण

नाशिकमधलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. आवारात साफसफाई, सुरक्षा अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारे ६०हून अधिक चतुर्थ श्रेणी कंत्राटी कामगार. बहुतांश शिक्षणापासून वंचित. त्याचा फायदा ठेकेदार उचलत असल्याचं कुलगुरू ई वायुनंदन यांच्या लक्षात आलं. त्यांनी कामगारांना पे स्लिप द्यायला सुरुवात केली. त्यामुळे कामगारांना स्वतःचा पगार समजला. कुलगुरूंबाबत विश्वासही निर्माण झाला. त्याचा उपयोग करून कुलगुरूंनी साधारण वर्षभरापूर्वी 'सावित्रीबाई फुले अभ्यासवर्ग' सुरू केला. निरक्षर, अक्षरओळख असलेले आणि शिक्षण अर्धवट सोडलेले अशा तीन गटात विभागणी केली. एकीकडे, अक्षरओळख नसलेल्या ५८ वर्षांच्या आजीला हातात वही-पेन्सिल घेऊन अक्षर गिरवण्यासाठी प्रोत्साहन तर दुसरीकडे, शिक्षण अर्धवट सोडलेल्या कामगारांना संगणकावर विविध अभ्यासक्रम, डिजिटल वर्ग. यासाठी पीएचडी करणाऱ्यांचीही मदत घेतली. कामांच्या नियमित वेळानंतर विद्यापीठाच्या आवारात हा वर्ग भरतो. 
या वर्गातल्या २४ जणांना यंदा एफवाय बीएला प्रवेश मिळाला आहे. कामगारांसाठी कौशल्य प्रशिक्षण, त्यांचे बचतगट, त्यांना शेतीमालावर आधारित प्रक्रियाउद्याोग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन, मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न, त्यांनी केलेल्या कापडी पिशव्यांची विद्यापीठाकडून खरेदी हे सुरू आहे.
कामगार-कर्मचारी, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यांना, तसंच कुटुंबातील महिलांना मासिक पाळीकाळात मोफत नॅपकिन्स दिली जातात. चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी अशी व्यवस्था असलेलं राज्यातलं हे पहिलं विद्यापीठ आहे. हे प्रयत्न अनुकरणीय आहेत. 
-प्राची उन्मेष.

रॉबिन हूड आर्मीची गोष्ट

झोपडपट्टी, पालांवरची मुले भौतिक सुखापासून, शहरातल्या सुखैनेव जीवनापासून कोसो दूर असतात. नशिबी आलेल्या दारिद्र्यात जगताना त्यांना शहरी जीवनाचे नेहमीच कुतूहल असते. मूलभूत गरजाही भागत नसलेल्या या वर्गाला आलिशान गाड्या, हॉटेलचा अनुभव मिळणे दुर्मिळच. पण, रॉबिन हूड आर्मीने ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली. अंधाऱ्या झोपडीत वास्तव्य करणाऱ्या अशा मुला-मुलींना आलिशान गाड्यातून सफर घडवलीच. शिवाय चांगल्या प्रतीच्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद चाखण्याची संधीही दिली. उस्मानाबाद शहरातली ही रॉबिन हूड आर्मी. समाजातील गरीब भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करण्यासाठी पुढाकार घेणारी ही जागतिक स्तरावरील संघटना. होतकरू, सामाजिक जाणिवा असलेले तरुण आठवड्यातून एक वेळ गरीब व्यक्तींना जमेल तेवढं अन्नदान करतात. संघटनेला अध्यक्ष वा पदाधिकारी असत नाही. उस्मानाबाद शहरात या संघटनेने काम सुरू केलं आहे.
शहरातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सांजा चौकाजवळ कुडमुडे जोशी समाजाची वस्ती आहे. पालावर वास्तव्य करणाऱ्या या वस्तीतील २० मुला-मुलींची या आर्मीने निवड केली. त्यांना रविवारी बीएमडब्ल्यू, ऑडी, फॉर्च्युनर अशा अलिशान गाड्यांमधून फिरवून आणलं. त्यांना बार्शी रोडवरील निसर्गरम्य हातलादेवी डोंगरावर नेलं. निसर्गरम्य परिसर, मनमोहक फुलं, ससे-मोरांचा सहवास अनुभवल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाची हिरवळ पसरली. दोन-तीन तास परिसरात फिरुन झाल्यावर हातलादेवीच्या सभामंडपात या मुलांनी आपल्या अंगातील विविध सुप्त गुण दाखवून आम्हीही कमी नाही हे दाखवून दिलं. काहींनी डान्स केला तर काहींनी गाणी म्हटली. नंतर हातलादेवीवरून नामांकित अॅपल हॉटेलकडे मोटारी वळल्या. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मुलांचं स्वागत केलं. त्यानंतर मुलांनी हॉटेलमधील पंचपक्वान्नाचा यथेच्छ आस्वाद घेतला. वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळाल्याचा मनस्वी आनंद मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. केवळ स्वप्नात आणि कल्पनेत पाहिलेल्या गोष्टी काही काळ का होईना रॉबिन हूड आर्मीने सत्यात उतरवल्या.
या उपक्रमासाठी अॅड विलास चौरे यांनी आर्थिक मदत केली तर राहुल गवळी, किरण गुरव यांनी स्वत:च्या गाड्या दिल्या. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी रॉबिन हूड आर्मीच्या अक्षय माने, अॅड. मिलिंद कुलकर्णी, प्रा.मनोज डोलारे, सलमान शेख, सुरज मस्के, अक्षय सराफ, आकाश घंटे, आनंद जाधव, रणजीत माळाळे, आमीन काझी, नवज्योत शिंगाडे, नितीन देशमुख, अॅड.अविनाश गरड, अभिजीत लष्करे,रोहन लष्करे, रोहित लष्करे या रॉबिन्सनी परिश्रम घेतले.


- चंद्रसेन देशमुख.

Tuesday 19 June 2018

गरिबांची ‘खिदमद’


बीडमधले मौलाना अब्दुल बाखी. त्यांच्या परिसरातच भाजीपाल्याचा व्यापार चालायचा. बऱ्याचदा योग्य भाव न मिळाल्यानं भाजीपाला परत घेऊन जाणंही शेतकऱ्यांना परवडायचं नाही. मग तो तिथेच टाकला जाई. हाच भाजीपाला जर गरिबांच्या घरात गेला तर त्यांनाही आधार होईल आणि परिसरातली अस्वच्छताही कमी होईल असा विचार बाखी यांनी केला. 
वर्ष 2014. बाखी यांना मौलाना तोहर शेख, इब्राहिम तांबोळी, सलीम मिर्झा, अब्दूल फुदूस या चार मित्रांचीही साथ लाभली आणि सुरुवात झाली ‘खिदमद खल्क’ या गरिबांची सेवा करण्यासाठी सुरू झालेली संस्थेची.
पाचही मित्रांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरून अतिशय गरीब २५० कुटुंबांची यादी केली. भाजीपाला आडत व्यापाऱ्यांना कल्पना सांगितली आणि उपक्रम सुरू झाला. वह्या, स्वेटर, जुने कपडे, हळूहळू व्याप्ती वाढली. कुटुंबांची संख्याही वाढत ४ वर्षात एक हजार कुटुंबांवर पोहोचली.
शहरातल्या सर्व मंगल कार्यालयात ‘खिदमद खल्क’ ने संपर्क क्रमांक लावले. वाया जाणारं अन्न गरजूंना मिळू लागलं. एखाद्या आयोजकानं फोन केला, तर अन्नपदार्थ घेऊन यायचे. ते व्यवस्थित सिल्व्हर पॅकेटमधून गरजूंपर्यंत पोहोचवायचे. यासाठी कार्यालय सुरू झालं. पॅकींग मशीन, रिक्षा घेतली, चालक ठेवला. व्यवस्थापक नेमला. २० जण स्वयंसेवक. रिक्षाचं इंधन, व्यवस्थापक, वाहनचालकाचा पगार, पॅकींग खर्च आणि कुणाला शस्त्रक्रियेसाठी तर कुणाला शिक्षणासाठी रोख मदत यासाठी निधीची आवश्यकता लागते. भंगार सामान आणून द्या, असं आवाहन लोकांना केलं. त्याच्या विक्रीतून निधी मिळतो. शिवाय शहरात ५० ठिकाणी मदत पेट्या बसवल्या आहेत. त्यातही चांगला निधी जमतो." बाखी सांगतात.
मदत करताना धर्म, जात पाहिली जात नाही. यंदा ऐन दिवाळीत लक्ष्मणनगर भागात अतिक्रमणं उठवण्यात आली. उघड्यावर आलेल्या जवळपास ५० कुटुंबांना दिवाळीसाठी किराणा, कपडे अशी मदत केली. दरवर्षी दिवाळीत गरीब हिंदूंना तर रमजान ईदसाठी गरीब मुस्लीम कुटुंबियांना कपडे, महिनाभर पुरेल इतका किराणा देण्यात येतो. २०१६ मध्ये अचानकनगर परिसरात बोअर घेऊन, टाकी बांधून १५० कुटुंबियांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यात आला. आत्महत्याग्रस्त ४ शेतकऱ्यांच्या पत्नी, मुलींना शिलाई मशीन्सही देण्यात आली. गरिबांची खिदमद करणं असं सुरूच आहे.

-अमोल मुळे .

प्लॅस्टिक मल्चिंगला पर्याय तनिशीचा, उत्पादन खर्च वाचला, अडीच लाख निव्वळ नफा

भंडारा तालुक्यातल्या निमगावातले संजय एकापुरे. त्यांची ११ एकर शेती. प्लॅस्टिक मल्चिंग पेपरला त्यांनी तनिसचा (धान्य काढल्यावर उरलेल्या लोम्ब्या ) पर्याय शोधून लाखात नफा कमावला आहे. प्रगत शेतीत मल्चिंग पेपर महत्त्वाचा घटक. बाष्पीभवन रोखणं, तण वाढू न देणं, खतांच्या वापरात बचत, असे त्याचे अनेक फायदे. पण प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक. तनिसमुळे मुळांना थंडपणा मिळतो. तसंच मुळाजवळ तण उगवत नाही. 
सुरुवातीला तीन एकर जमिनीचं सपाटीकरण. मग शेणखत टाकून ट्रॅक्टरच्या साहाय्यानं उभी-आडवी नांगरणी करत बेट तयार केलं. दोन एकरवर काकडीचं बियाणं. तर पाव एकरात ढेमसे, दोडके आणि टोमॅटो लावले. अंकुर फुटताच तनीस टाकलं.
पहिल्यात तोड्यात २०० किलो, दुसऱ्या तोड्यात ३०० किलो तर तिसऱ्या तोड्यात ४०० किलो उत्पादन मिळालं. सरासरी १४ रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री झाली.
उन्हाळ्यामुळे काकडीची लागवड बांबूचा आधार न देता केली. जमिनीवर वेल वाळविल्यानं एकरी बांबूचा १० हजारांचा खर्च वाचला तर मल्चिंगचा वापर न करता तनिस टाकल्यानं एकरी १२ हजारांचा खर्च वाचला. उत्पादन खर्च कमी आल्यानं दोन एकरातून साधारणतः ३ टन काकडीचं उत्पादन. सुमारे ३ लाखांवर उत्पन्न. मजुरी खर्च आणि औषधाचा खर्च वगळता अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा.
तनिसचा वापर पुढे खत म्हणूनही होणार आहे.
संजय यांच्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी परिसरातले शेतकरी येत असून आपल्या शेतातही असाच प्रयोग करणार असल्याचं ते सांगतात. पर्यावरणपूरक, विषमुक्त शेती करण्याचं संजय यांनी ठरवलं आहे. लहरी हवामान, खतांच्या वाढत्या किंमती यातून मार्ग काढायचा असेल तर आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे असं ते सांगतात. 
-हर्षा रोटकर.

Monday 11 June 2018

गोष्ट अजेपूरच्या शाळेची

नंदुरबार जिल्ह्यातलं अजेपूर. शंभर टक्के आदिवासी गाव. इथं वस्ती आहे ती कोकणी आदिवासींची. मोलमजुरी आणि शेती व्यवसायावर अवलंबून असणारं हे गाव. या गावानं सुमारे पावणेतीन लाखांचा निधी गावातील शाळेसाठी उभा केला आहे, त्याची ही कथा.
गावातील जिल्हा परिषद शाळेत शांताराम गावित सर रुजू झाले. त्यावेळी शाळेचा पट होता अवघा 32 आणि आज हाच पट 72 वर पोहाचलेला आहे. गावित सरांची बोलीभाषा कोकणीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांना भाषेचा फारसा प्रश्न आला नाही.
हळूहळू गावित सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली. शाळा चौथीपर्यंतच आहे, पाचवीला विद्यार्थी हायस्कूलमध्ये जातात. जवळच्याच हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच आहेत. अजेपूरच्या शाळेत मात्र बेंच नव्हते. त्यामुळे अजेपूरच्या शाळेतून गेलेल्या विद्यार्थ्यांना बेंचवर बसणे अवघडल्यासारखे वाटे. म्हणूनच गावित सरांनी, आपल्या शाळेतही बेंच हवेत असा विषय गावकऱ्यांपुढे मांडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेंचेससाठी सरांनी स्वत: 10 हजार रुपयांची देणगी शाळेला दिली आणि मग गावाकडून 30 हजार रुपये आपसूक जमा झाले. आणि उत्तम दर्जाचे, दणकट बेंच अजेपूर शाळेत दाखल झाले.
अशीच गोष्ट पोषण आहारासाठी लागणाऱ्या ताटांची. गावातील बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक हे शेतमजूर आहेत. बहुतेक विद्यार्थी शाळेत डबा आणतच नसत, शिवाय दुपारच्या वेळी शाळेत जेवण मिळतेच. पण ते जेवण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डबा किंवा ताट असे काहीच नसे. बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक मजुरीला बाहेर गेल्याने, घराला दुपारी कुलुपच असायचे म्हणून ते ताटं आणू शकायचे नाहीत. असे विद्यार्थी हिरमुसून जायचे, त्यावेळी शाळेकडेही पुरेशी भांडी नव्हती. ही खंतही गावित सरांनी एकदा बोलून दाखवली आणि गावातल्या सधन पालकांनी 2010 साली शाळेला 50 ताट-वाट्या- पेले यांचा संचच भेट दिला.
ही शाळा 2015 साली डिजिटल झालेली आहे. या करिता शाळेचे शिक्षक देसले सर आणि गावित सरांनी एक वेगळीच युक्ती लढविली होती. त्यांच्या स्वत:च्या लॅपटॉपवर अभ्यासक्रमानुसार काही इंटरअॅक्टिव्ह सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घेतली आणि ती शाळा व्यवस्थापन समिती, तसेच पालकसभेत दाखविली. असा प्रत्यक्ष पाहिलेला अभ्यास मुलांच्या जास्त लक्षात राहील, हे शिक्षकांनी पटवून दिलं. नव्या युगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी संगणकाचं महत्त्व पालकांनाही पटलं आणि त्यांनी सुमारे 1,50,000 रुपयांची लोकवर्गणी उभारली. ज्यातून एक वर्ग प्रोजेक्टर आणि कॉम्प्युटरसह डिजिटल केला गेला.
महाराष्ट्रातील इतर अनेक गावांप्रमाणे अजेपूर शाळेलाही भारनियमनाची समस्या जाणवते. त्यावर मात करण्यासाठी शाळेने सोलर पॅनल उभारलं आहे. तसंच इन्व्हर्टरचीही खरेदी केली आहे. त्यामुळं आता वीज नाही म्हणून अभ्यास थांबत नाही. एकेकाळी स्वत:जवळ ताट- वाट्या नसणारे विद्यार्थी आज डायनिंग टेबलवर जेवतात, हे सर्व लोकसहभागानेच शक्य झाले आहे.
अजेपूरच्या शिक्षकांनी केवळ भौतिक सुविधांसाठीच काम केले नाहीए तर अनेक गरीब विद्यार्थ्य़ांनाही शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदतीचा हात दिलेला आहे.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

पक्ष्यांसाठी त्यांनी बांधली १२०० घरटी









उस्मानाबादमधलं श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालय. मनोज डोलारे इथं प्राध्यापक पदावर काम करतात. पेशा शिक्षकाचा असला तरी फोटोग्राफीची आवडही त्यांनी जोपासली आहे. साधारण २००९ पासून त्यांनी पक्ष्यांचे फोटो टिपायला सुरुवात केली. नंतर १२ साली त्यांनी उत्तम दर्जाचा नवा कॅमेरा खरेदी केला. आणि आता आणखी हुरुपानं त्यांची फोटोग्राफी सुरु झाली. उस्मानाबादच्या डोंगराळ परिसरात पक्ष्यांसाठी त्यांचं फिरणं सुरु झालं. त्याच काळात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जिल्ह्यात पक्षीगणना केली. या गणनेत शहराच्या अवतीभवती पक्ष्यांचं प्रमाण घटत चालल्याचं निरीक्षण नोंदविण्यात आलं. पक्ष्यांचं अस्तित्व कमी होत असल्याची चिंताजनक बाब प्रा. डोलारे यांच्याही लक्षात आली. आणि त्यांनी कारणं शोधणं सुरु केलं.
वाढतं शहरीकरण, प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे पक्षांचा पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊन अन्न साखळी बिघडत आहे. हे त्यांना जाणवलं आणि आता इथून पुढं ध्येय ठरलं की पक्ष्यांसाठी काम करायचं. पक्ष्यांचं स्थलांतर थांबण्यासाठी, त्यांना निवारा मिळवून देण्यासाठी, पक्ष्यांचं संवर्धन होऊन संख्या वाढण्यासाठी डोलारे यांनी प्रयत्न सुरु केले. प्रा.डोलारे यांनी स्वत:च्या महाविद्यालयापासून जनजागृती सुरू केली. संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मदत केली. आणि एकाचवेळी ५ हजार मातीची भांडी वाटप करण्यात आली. पक्ष्यांचे महत्त्व आणि त्यांची स्थिती सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांमध्येही पक्ष्यांप्रती जिज्ञासा तसेच आत्मीयता वाढली.
पक्ष्यांसाठी केवळ अन्न-पाणी देऊन चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर प्रा.डोलारे यांनी कृत्रिम घरटी बनविण्याचा निर्णय घेतला. कागदी रोल संपल्यानंतर उरलेल्या नळ्यांपासून कृत्रीम घरटी बनविण्यास सुरुवात झाली. ३ वर्षात अशाप्रकारची १२०० घरटी तयार करून घरोघरी देण्यात येत आहेत. ही घरटी घरांच्या अंगणात बांधण्यात आली. अर्धा फूट अंतराची नळी कापून ती एका बाजूने चिकटपट्टीने बंद केली जाते. दुसऱ्या बाजूने अर्धवट बंद करून झाडांना अडकवली जाते. त्यात पक्षी वास्तव्य करतात शिवाय पिलांना जन्म देतात. पक्ष्यांनी ही घरटी स्वीकारली आणि डोलारे यांचा हेतू सफल होऊ लागला. गेल्या पाच वर्षांपासूनच्या त्यांच्या धडपडीमुळे आता उस्मानाबादेत पक्षीमित्रांची चळवळ उभी राहत आहे.
प्रा. डोलारे म्हणतात, “फोटो काढताना पक्ष्यांचे विश्व डोळ्यात साठवित होतो. डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यातून दिसल्या. पक्ष्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचं निरीक्षण समोर आल्यानंतर अस्वस्थ झालो. उस्मानाबादमध्ये पक्ष्यांचे ज्ञान असणारे जाणकार कमी होते. मात्र पक्षीमित्र मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या अभ्यासकांची पुस्तकं वाचत गेलो. त्यातून ज्ञान मिळालं आणि पक्ष्यांचं संगोपन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीवर काम करीत गेलो”. आता पक्षीमित्र म्हणून शहरातील प्रत्येक कुटुंब प्रा.डोलारे यांना ओळखू लागलं आहे. त्यांनी आवाहन केल्यानंतर समाजातून मदत मिळू लागली आहे.
- चंद्रसेन देशमुख.






असंही द्विशतक




शतकांचे शतक अथवा द्विशतक हा शब्द आपण क्रिकेटमध्ये ऐकलेला आणि पाहिलेला आहे. मात्र सोलापुरातील एक अवलियाने चक्क रक्तदानाचं द्विशतक ठोकलं आहे. वयाच्या साडेसतराव्या वर्षांपासून म्हणजे १९७५ सालापासून त्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत एकूण दोनशे पाच वेळा त्यांनी रक्तदान केलं आहे.
अशोक नावरे असं त्यांचं नाव. सध्याचं त्यांचं वय साठ आहे. वयाच्या पासष्टाव्या वर्षांपर्यंत रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ‘ए पॉझिटिव्ह’ हा त्यांचा रक्तगट. रक्तदान करण्याबरोबरच शहर आणि जिल्ह्यामध्ये रक्तदानाविषयी शिबिरेदेखील ते भरवत होते. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने ‘शतकवीर दाता’ म्हणून प्रमाणपत्र आणि गौरव पदक देऊन त्यांना सन्मानित केलं आहे.
नावरे सांगतात, “कॉलेजात असताना एकदा रक्तपेढीला भेट दिली होती. तिथं रक्त मिळवण्यासाठी गर्दी जमली होती. अनेक गरजवंत लोक तेव्हा रक्तासाठी रक्तदात्यांच्या पाया पडत होते. हे विदारक चित्र पाहून माझं मन हेलावलं. आणि तेव्हाच आपणही रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवू शकतो हा विचार मनात आला आणि त्या दिवसापासून मी रक्तदान करण्यास सुरुवात केली”.
ते पुढं म्हणतात, “दोनशेवेळा रक्तदान करणारा भारतातला मी बहुधा पहिलाच असेन. आतापर्यंत दोनशे पाचवेळा मी रक्तदान केलेले आहे. या कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला शतकवीर म्हणून गौरवलं आहे. रक्तदाना पासून मला मोठे मानसिक समाधान मिळते. रक्तदानाची किंमत पैशात मोजता येत नाही. रक्तदान करण्यात आता माझं कुटुंबही पुढं येत आहे. समाजातही रक्तदान करण्यात मोठी जागरूकता निर्माण होत आहे”.
आतापर्यंत त्यांची पत्नी लता नावरे यांनी ५१ वेळा तर मुलगा प्रथमेश नावरे याने तीनदा रक्तदान केलं आहे. अशोक नावरे हे दररोज साडेचार तास चालण्याचा व्यायाम करतात. त्यामुळे प्रकृती उत्तम असल्याचं नावरे यांनी सांगितलं. अशोक नावरे सध्या दमाणी ब्लड बँकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम करतात.
- अमोल सिताफळे.

Tuesday 5 June 2018

सौर पॅनलच्या उदयोगातून भरारी

वर्धा जिल्ह्यातल्या केळझर इथल्या शेतकरी कुटुंबातले सुनील गुंडे आणि सचिन ढोणे. दोघांकडे विद्युत अभियांत्रिकीची पदविका. पुणे आणि नंतर नागपूर इथं चांगल्या पगाराची नोकरी. ''आपल्याकडे बुद्धी आहे, श्रम करण्याची तयारी आहे, तर दुसऱ्यासाठी का राबावं? सौर पॅनल बसवण्याचा स्वतःचाच व्यवसाय सुरू केला तर अधिक प्रगती होऊ शकेल '', असं सुनील यांना वाटत होतं. त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. सचिनही साथीला आले. २०१५ मध्ये दोघांनी एस अॅंड एस फ्युचर एनर्जी ट्रेडिंग कंपनी सुरू केली.


जमवलेले पैसे थोडे - थोडे वापरत काम सुरू केलं. मिळेल ते काम स्वीकारलं . कठोर परिश्रम सुरू होते. पण तरीही उद्योग पुढे नेण्यासाठी भांडवलाची आवश्यकता होतीच. चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानं दोघांच्याही घरचे नाराज. मग प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी सुनील यांनी केळझरच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अर्ज केला. उद्योगाचा व्यवस्थित प्रस्ताव. कामाप्रति बांधिलकी. बँकेनं ३लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं. 
लगेचच वनविभागाचं सौर पथदिवे बसवण्याचं कामही मिळालं. त्यानंतर दोघांनी मागे वळून बघितलंच नाही.
नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचं ४० लाख रुपयांचं आंध्रप्रदेश आणि उत्तर प्रदेशमधलं काम मिळालं. कामातली तत्परता, बांधिलकी, श्रम करण्याची तयारी आणि तत्पर सेवा या व्यावसायिक गुणांमुळे कामं मिळत गेली. आज कंपनीकडे केवळ महाराष्ट्रातलीच नव्हे तर उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातली सौर पॅनल बसविण्याची काम आहेत. आज कंपनीची उलाढाल आहे १ कोटी. 3 वर्षातच आयएसओ मानांकनही.
कामाला २ विद्युत अभियंते, ५ तांत्रिक सहाय्यक, आणि कार्यक्षेत्रातले मदतनीस असे १० कर्मचारी. डिसेंबर २०१७ मध्ये वर्धेत आॅफिस सुरू केलं. तेव्हा पहिल्यांदा कुटुंबियांनी शाबासकीची थाप दिली. 
-सचिन मात्रे.

Monday 4 June 2018

दुग्धव्यवसायाचा दुष्काळात आधार

अहमदनगर जिल्हा. शेवगाव तालुका. शेवगाव- बोधेगाव रस्ता. तिथलंं सुळेपिंपळगाव. पुरेसा पाऊस नसल्यानं सततची पाणीटंचाई. गावातलं देशमुख कुटुंब शेतकरी. परिस्थिती सर्वसाधारण. पाच वर्षांपूर्वी, कुटुंबातल्या राहुल यांनी ३७ एच एफ गायी आणून दुग्धव्यवसाय सुरू केला. दोनशे लिटर दूध ते संकलन केंद्राला पुरवत. मात्र मिळणारा दर आणि खर्च यांचा ताळमेळ लागत नव्हता. तेव्हा गायी विकून म्हशी आणण्याचा आणि दुधाची थेट विक्री करण्याचा निर्णय राहुल यांनी घेतला. 
सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेतून चार म्हशी खरेदी केल्या. टप्याटप्यानं खरेदी करत, आता मुऱ्हा जातीच्या २७, जाफराबादी जातीच्या १० म्हशी, ३७ वासरं , ३ गावरान गायी, १० पारठ्या म्हशी आणि कालवडी अाहेत.
राहुल यांची ३० एकर शेती आहे. चार एकर ऊस, सहा एकर मका, आणि पंधरा एकर चारा पिकं अाहेत. जनावरांचं मूत्र खड्ड्यात टाकून त्याचा शेतीला पंपाद्वारे पुरवठा केला जातो. गांडूळ खताचाही दहा गुंठ्याचा प्रकल्प अाहे. वर्षाला ३० ते ३५ टन खताची विक्री प्रतिटन सात हजार रुपये दराने होते. चारा पिकांसाठी केवळ सेंद्रिय खतच वापरलं जातं. त्यामुळे जनावरांना चारा सकस मिळतो. आणि जनावरांकडून दूध उत्तम मिळतं. रोज संकलित होणा-या २४० लिटर दुधापैकी ३० ते ४० लिटर रतीबाला आणि उर्वरित दुधाची पन्नास रुपये लिटरनं ग्राहकांना थेट विक्री होते. 
व्यवसायात राहुल यांच्या भावाची, सचिनचीही साथ आहे. अनेक ठिकाणी दुधात वाढ व्हावी, यासाठी म्हशीची वासरं (वगारी, रेडकू)सांभाळली जात नाहीत. देशमुख यांनी मात्र आत्तापर्यंत सर्व वासरं सांभाळली. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था अाहे. दूध काढणं, चाराकापणी, पाणी, अन्य कामं, व्यवस्थापन यासाठी ८ कामगार अाहेत. यंत्राएेवजी हातानं दूध काढलं जातं. प्रत्येक म्हशीच्या दुधाची नोंद केली जाते. निर्भेळ आणि सकस दुधाची खात्री देशमुख देतात. त्यांच्या गुरुदत्त दुग्धालयाचं पंचक्रोशीत नाव आहे. 
नैसर्गिक दुधाचे फायदे, म्हशीच्या दुधातून मिळणारे घटक, ऑक्‍सिटोसीन, ॲँटिबायोटिक्सचा वापर केलेल्या दुधामुळे होणारं नुकसान याबाबत देशमुख माहिती देतात.
राहुल यांनी शेताजवळून जाणारा छोटा ओढा अडवून नैसर्गिक लहान तलाव केला. मग या भागातून वाहणाऱ्या नदीवर तीन बंधारे बांधले. नदीचं खोलीकरण केलं. यामुळे आसपासच्या विहिरींची पाणीपातळीही वाढली. पूर्वी जानेवारीतच पाणीटंचाई निर्माण व्हायची.आता मे-जूनपर्यंत पाणी पुरतं.
 ---सूर्यकांत नेटके .

Sunday 3 June 2018

कसरतीचे खेळ ते पाटीपुस्तक!!

अनसरवाडा, ता. निलंगा, जिल्हा लातूर इथं डोंबारी कसरती करणारा 'गोपाळ खेळकरी' समाज राहतो. या नावाचा एखादा समाज अस्तित्त्वात आहे, हेच मुळी जगाला माहिती नव्हते. या समाजाची गॅझेटमध्ये नोंद घ्यायला लावली, त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड मिळवून दिलं ते इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या नरसिंग झरे गुरुजींनी. गेल्या 22 वर्षांपासून ते अनसरवाडा वस्तीच्या सुधारासाठी शाळेच्या माध्यमातून झटत आहेत.
कसरतीचे खेळ करून, भीक मागून अन्न किंवा पैसे मिळविणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय. लोकांना दररोज आंघोळ करणे, जेवण बनविणे या साध्या गोष्टीही माहिती नव्हत्या. प्रचंड अंधश्रद्धा, एकेका बाईला 20-20 मुलं, रोगराई असं तिथलं वातावरण. सरांनी इथं संस्कारवर्ग सुरू केले. त्यात आधी मुलांना खेळ, गाणी, नाच मग हळूहळू अंक- अक्षर ओळख अशा गोष्टी सुरु झाल्या.
अर्थातच हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. मुळात शाळा म्हणजे काय, हेच या लोकांना माहीत नव्हतं. लहान मुलांना भीक मागायला नेलं की जास्त पैसे मिळतात, मग त्यांना शाळेत कशाला बसवायचं, असा प्रश्न त्यांना पडायचा. सरांनी अनेकदा शाळेत मुलांना आंघोळी घातल्या आहेत, स्वत:च्या पैशाने मुलांचे केस कापून त्यांना नवीन कपडेही घेऊन दिले आहेत. पण त्या समाजाला वाटायचं की मुलांना ते बिघडवतायत, बंडखोरी करायला शिकवत आहेत. वेळोवेळी भांडणं आणि प्रसंगी त्यांना मारण्याचही प्रयत्न झाला.
सर मात्र या कशालाच घाबरले नाहीत. त्यांनी काम चालूच ठेवलं. या वस्तीतली मुलं रोज भिकेचं शिळं अन्न खायची. आता मात्र त्यांना शाळेत शिजवलेला ताजा पोषण आहार दिला जातो. शिवाय संध्याकाळीही त्यांना खायला मिळावं म्हणून लातूरच्या काही शाळांमधून त्यांनी मूठ- मूठ धान्य गोळा करुन या लेकरांची पोटं भरली आहेत. या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
सर मुलांसोबत समाजाच्या भल्यासाठीही धडपडत होते. वस्तीतील पुरुष कसरतीचे खेळ करताना ढोल- सनई उत्तमप्रकारे वाजवितात. त्यांना जर बँडचे चांगलं प्रशिक्षण मिळालं तर हा त्यांचा व्यवसाय होऊ शकतो व भिकेची सवयही सुटेल हे सरांना उमगलं. त्यांनी वस्तीतील निवडक तरुणांना हैदराबादला पाठविलं आणि वादनाचं प्रशिक्षण दिलं. आज हाच या समाजाचा मुख्य व्यवसाय झाला आहे.
शाळेच्या इमारतीचा प्रश्न मात्र कायमच होता. शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये भरत होती. लातूरच्या भयंकर उन्हाळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत होते. झरे सरांच्या प्रयत्नांमुळे या शाळेला जि.प. शाळेची मान्यता मिळाली. मात्र शाळेकडे स्वत:ची जागा नव्हती.
झरे सरांचे काम बघून गोपाळ खेळकरी समाजाने 37 हजार रुपयांची देणगी दिली. शिवाय सरांनी लातूरमधल्या दानशूर लोकांना आवाहन करून 50 हजार रुपये जमा केले. मग गावात शाळेसाठी 87 हजारांची जागा विकत घेतली. शेवटी शासनाने दिलेल्या इमारत निधीतून 2008 साली आजची शाळा उभी राहिली आहे.
आज जिल्हा परिषद शाळा झाल्यानंतर या वस्तीतील प्रत्येक कुंटुंबातले मूल शाळेत येते. लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजू लागलं आहे. इथून शिकून गेलेले विद्यार्थी लिहू- वाचू शकतात, बँड पथकात सामील झालेले स्वत:च्या बिदागीचा हिशोब करू शकतात, त्यांना पावती करता येते, त्यांना कोणी फसवू शकत नाही, हे लोकांना उमजलेलं आहे.

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

नांगरली नदी, पेरलं पाणी, बहरलं रान


नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका, सातपुड्या डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेला. त्यामुळे या भागात वाहणाऱ्या नदी नाल्याच्या पाण्याला प्रचंड वेग असतो. ज्या वेगानं पाणी येतं त्याच वेगानं ते वाहून जातं. अर्थातच जमिनीत पाणी मुरत नाही. या समस्यांचे भीषण रूप तालुक्यातील परिवर्धा गावाने १९९७ मध्ये अनुभवलं. दुष्काळ, पाणी टंचाई त्यात जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावलेली. या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं. एक मुखाने, एक दिलाने गावाची पाणी समस्या सोडविण्याचा संकल्प केला गेला आणि लोकवर्गणी जमा करून संपूर्ण वाकी नदी नांगरून टाकण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनी २००५ मध्ये अश्याच रूपात नदी नांगरून टाकली आणि भूजलपातळी वाढवली. यंदा या शेतकऱ्यांनी संपूर्ण दोन किलोमीटर नदीच्या प्रवाहात ठिकठिकाणी नदी कोरून बांध बनवले. तब्बल दोन किलोमीटर अंतरात सहा बांध तयार करून, साचलेल्या पाण्यामुळे या भागातील भूजलपातळी चांगलीच वर आली आहे.
वाकी नदीला पुनर्जीवित करून तिच्या पाझरांना जिवंत करणं हे यातलं मुख्य काम. त्यासाठी परिवर्धा गावाने एक समिती स्थापन केली. कलसाडी, तऱ्हाडी, काथर्दे, पाडळदा आणि परिवर्धा गावातून प्रति कूपनलिका अशी ठराविक रक्कम गोळा करण्यात आली. त्यातून जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने नदी कोरून बांध बांधण्यात आले. हे करत असताना सरकारी निधीची, यंत्रणेची कुठलंही मदत घेण्यात आली नाही. या गावकऱ्यांनी नदी नांगरल्याने आणि तिच्यावर रेतीचे बांध उभारल्याने तब्बल आठ गावांना प्रत्यक्ष फायदा होते आहे. ज्या गावांनी मदत दिली नाही अशी गावंही या शेतकऱ्यांच्या भगीरथ प्रयत्नांची फळ चाखत आहेत. आज घडीला या भागात बाराही महिने शेती हिरवीगार दिसते. या भागात ऊस, केळी, पपई, गहू, कापूस, हरभरे, अशी एक ना अनेक पिकं घेतली जात आहेत. या जलसंधारणाच्या कामामुळे भूजल पातळी तर वाढलीच मात्र वाढलेल्या पाण्याने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावला आहे. या भागातील तीन हजार एकर शेती या कामामुळे ओलिताखाली आहे. गाव करी ते राव काय करी, ही म्हण परिवर्धा आणि त्यांना साथ देणाऱ्या शेतकऱ्यांनी तंतोतंत खरी ठरवली आहे.
- कावेरी परदेशी

व्यसनमुक्त भविष्याच्या दिशेने छोटं पाऊल.

आजच्या तंबाखूविरोधी दिनानिमित्त खास 
.

“पूर्वी शाळा सुटली की रात्री शाळेतच दारूचा अड्डा भरायचा. संध्याकाळी मुलं घरी जायची आणि एकेक तळीराम शाळेत यायला लागायचे. शाळेच्या आसपासच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच असायचा. शाळेचं वातावरणच असं होतं की मुलं व्यसनांच्या आहारी जाण्याचीच शक्यता अधिक”, गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यातल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय, असरअलीचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख सर सांगत होते.
२०१४ सालानंतर शाळेत शेख सर मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. आणि बदलाला सुरुवात झाली. शाळेच्या परिसरात दारूच काय, पण खर्रा-तंबाखूही त्यांनी पूर्ण बंद केली. आज ३ वर्षानंतरही शाळेतील मुलांचं आणि शिक्षकांचंही व्यसन बंद आहे. सुरुवातीला खर्रा खाणारे शिक्षक मुलांना पाहून लपायचे, पण आता शाळेत एकही शिक्षक खर्रा खात नाही.
शेख सरांनी केलेल्या या प्रयत्नामुळे, शाळेतली मुलं स्वतः खर्रा खात नाहीतच, पण आई – वडिलांनी जरी त्यांना खर्रा आणायला सांगितलं, तरी ते खर्रा आणायला जात नाहीत. त्यामुळे अनेक पालकांचंही खर्रा खाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. एरवी आई - वडील आपल्या मुलांना काय चांगलं, काय वाईट हे सांगतात, पण इथं मुलंच आपल्या आई, वडिलांना खर्रा न खाण्याचं आवाहन करतात.
एकदा शाळेतली मुलं गणवेशाच्या कामासाठी बँकेत गेली होती. तिथं बँकेचे कर्मचारी सर्रास खर्रा खात होते. बँकेतल्या खर्रा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या मुलांनी खर्रा खाणं कसं चुकीचं आहे, हे सांगितलं.

- अदिती अत्रे, मुक्तिपथ, गडचिरोली

१९ व्या वर्षीच स्वतःची आयटी कंपनी, वार्षिक उलाढाल ३० लाख रुपये


 हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ. तिथला अतुल कापसे. कुटुंबाची तीन एकर कोरडवाहू शेती. परिस्थिती बेताचीच. अतुलचा मोठा भाऊ कष्टानं शिक्षक झाला. शिक्षणाचं महत्त्व त्यानं अतुलवर बिंबवलं. अतुलचं शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतलं. कॉम्प्युटरची खूप आवड . मात्र 12 वी पर्यंत कॉम्पुटर फारसा हाताळायलाही मिळाला नव्हता. औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात बी.एस्सी. आय. टी. ला प्रवेश घेतल्यानंतर ओळख झाली वेदांत जहागिरदार, आकाश पाथरकर, सोनीक जाधव आणि सागर महेर या मित्रांशी. माहिती तंत्रज्ञानाविषयी असलेल्या समान आवडीतूनच स्वप्न जन्माला आलं. मित्रांच्या लॅपटॉपवरून भरपूर शिकता आलं. कॉलेजमध्ये वेबसाईट करण्याचं शिकता शिकता कळत गेलं की औरंगाबादमध्ये व्यवसायिकांचं प्रमाण तर बरंच आहे पण त्यांच्या वेबसाईट बनवणारे पुण्या-मुंबईचे. त्यांना स्थानिक पातळीवर वेबसाईट तयार करून देण्याचा विचार घोळू लागला.
त्याच सुमाराला खालसा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची वेबसाईट करण्याचं काम मिळालं. या पहिल्या कामातून मिळालेल्या पैशाच्या आधारे दुसऱ्या वर्षाला असतानाच या पाच मित्रांनी मिळून सुरू केली कोडींग व्हिजन्स इन्फोटेक ही आय.टी. कंपनी. भांडवल फक्त पाच लॅपटॉप आणि अफाट मेहनत करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी. कॉलेज सुटल्यानंतर एका खोलीत कामाला सुरुवात व्हायची.
अवघ्या चार वर्षात कंपनीनं ३७० वेबसाईट, १२० कंपन्यांचं सॉफ्टवेअर्स आणि २० अँड्राईड अॅप्स तयार केले. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल आहे ३० लाख रुपये. राज्यातली विविध सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती ,शाळा आणि परदेशी कंपन्यांसाठीही काम चालतं . परदेशी कंपन्या प्रामुख्यानं स्पेन, दुबई, कॅनडा, पेरू, सेंट फ्रांसीस्को इथल्या. आता औरंगाबादसह पुण्यातही कंपनीचं सुसज्ज कार्यालय आहे. या ठिकाणी १६ जणांना रोजगार दिला आहे, सोबतच सिंपलीसीटी क्रिएशन टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीशीही करार. इथं ४० जण काम करतात. जीएसटी लागू होताच या मित्रांनी सीएंसोबत चर्चा करून जीएसटी बिलिंगचे सॉफ्टवेअर तयार केलं. त्याला कंपन्यांसह व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
अतुल आणि मित्रांनी २०१५ साली औरंगाबादला स्वतःची प्रशिक्षण संस्थाही सुरू केली. यातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. अतुल आणि मित्रांना महाविद्यालयं , विद्यापीठांमधून तज्ज्ञ म्हणून बोलावलं जातं. अतुल आणि मित्रांनी सध्या एम. एस्सी दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आहे. कंपनीचा अधिकाधिक विस्तार करून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. 

-गजानन थळपते, हिंगोली