Monday 11 June 2018

गोष्ट अजेपूरच्या शाळेची

नंदुरबार जिल्ह्यातलं अजेपूर. शंभर टक्के आदिवासी गाव. इथं वस्ती आहे ती कोकणी आदिवासींची. मोलमजुरी आणि शेती व्यवसायावर अवलंबून असणारं हे गाव. या गावानं सुमारे पावणेतीन लाखांचा निधी गावातील शाळेसाठी उभा केला आहे, त्याची ही कथा.
गावातील जिल्हा परिषद शाळेत शांताराम गावित सर रुजू झाले. त्यावेळी शाळेचा पट होता अवघा 32 आणि आज हाच पट 72 वर पोहाचलेला आहे. गावित सरांची बोलीभाषा कोकणीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांना भाषेचा फारसा प्रश्न आला नाही.
हळूहळू गावित सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली. शाळा चौथीपर्यंतच आहे, पाचवीला विद्यार्थी हायस्कूलमध्ये जातात. जवळच्याच हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच आहेत. अजेपूरच्या शाळेत मात्र बेंच नव्हते. त्यामुळे अजेपूरच्या शाळेतून गेलेल्या विद्यार्थ्यांना बेंचवर बसणे अवघडल्यासारखे वाटे. म्हणूनच गावित सरांनी, आपल्या शाळेतही बेंच हवेत असा विषय गावकऱ्यांपुढे मांडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बेंचेससाठी सरांनी स्वत: 10 हजार रुपयांची देणगी शाळेला दिली आणि मग गावाकडून 30 हजार रुपये आपसूक जमा झाले. आणि उत्तम दर्जाचे, दणकट बेंच अजेपूर शाळेत दाखल झाले.
अशीच गोष्ट पोषण आहारासाठी लागणाऱ्या ताटांची. गावातील बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक हे शेतमजूर आहेत. बहुतेक विद्यार्थी शाळेत डबा आणतच नसत, शिवाय दुपारच्या वेळी शाळेत जेवण मिळतेच. पण ते जेवण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डबा किंवा ताट असे काहीच नसे. बहुतेक विद्यार्थ्यांचे पालक मजुरीला बाहेर गेल्याने, घराला दुपारी कुलुपच असायचे म्हणून ते ताटं आणू शकायचे नाहीत. असे विद्यार्थी हिरमुसून जायचे, त्यावेळी शाळेकडेही पुरेशी भांडी नव्हती. ही खंतही गावित सरांनी एकदा बोलून दाखवली आणि गावातल्या सधन पालकांनी 2010 साली शाळेला 50 ताट-वाट्या- पेले यांचा संचच भेट दिला.
ही शाळा 2015 साली डिजिटल झालेली आहे. या करिता शाळेचे शिक्षक देसले सर आणि गावित सरांनी एक वेगळीच युक्ती लढविली होती. त्यांच्या स्वत:च्या लॅपटॉपवर अभ्यासक्रमानुसार काही इंटरअॅक्टिव्ह सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घेतली आणि ती शाळा व्यवस्थापन समिती, तसेच पालकसभेत दाखविली. असा प्रत्यक्ष पाहिलेला अभ्यास मुलांच्या जास्त लक्षात राहील, हे शिक्षकांनी पटवून दिलं. नव्या युगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी संगणकाचं महत्त्व पालकांनाही पटलं आणि त्यांनी सुमारे 1,50,000 रुपयांची लोकवर्गणी उभारली. ज्यातून एक वर्ग प्रोजेक्टर आणि कॉम्प्युटरसह डिजिटल केला गेला.
महाराष्ट्रातील इतर अनेक गावांप्रमाणे अजेपूर शाळेलाही भारनियमनाची समस्या जाणवते. त्यावर मात करण्यासाठी शाळेने सोलर पॅनल उभारलं आहे. तसंच इन्व्हर्टरचीही खरेदी केली आहे. त्यामुळं आता वीज नाही म्हणून अभ्यास थांबत नाही. एकेकाळी स्वत:जवळ ताट- वाट्या नसणारे विद्यार्थी आज डायनिंग टेबलवर जेवतात, हे सर्व लोकसहभागानेच शक्य झाले आहे.
अजेपूरच्या शिक्षकांनी केवळ भौतिक सुविधांसाठीच काम केले नाहीए तर अनेक गरीब विद्यार्थ्य़ांनाही शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदतीचा हात दिलेला आहे.
- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment