Sunday 3 June 2018

कसरतीचे खेळ ते पाटीपुस्तक!!

अनसरवाडा, ता. निलंगा, जिल्हा लातूर इथं डोंबारी कसरती करणारा 'गोपाळ खेळकरी' समाज राहतो. या नावाचा एखादा समाज अस्तित्त्वात आहे, हेच मुळी जगाला माहिती नव्हते. या समाजाची गॅझेटमध्ये नोंद घ्यायला लावली, त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड मिळवून दिलं ते इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या नरसिंग झरे गुरुजींनी. गेल्या 22 वर्षांपासून ते अनसरवाडा वस्तीच्या सुधारासाठी शाळेच्या माध्यमातून झटत आहेत.
कसरतीचे खेळ करून, भीक मागून अन्न किंवा पैसे मिळविणे हा या समाजाचा मुख्य व्यवसाय. लोकांना दररोज आंघोळ करणे, जेवण बनविणे या साध्या गोष्टीही माहिती नव्हत्या. प्रचंड अंधश्रद्धा, एकेका बाईला 20-20 मुलं, रोगराई असं तिथलं वातावरण. सरांनी इथं संस्कारवर्ग सुरू केले. त्यात आधी मुलांना खेळ, गाणी, नाच मग हळूहळू अंक- अक्षर ओळख अशा गोष्टी सुरु झाल्या.
अर्थातच हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. मुळात शाळा म्हणजे काय, हेच या लोकांना माहीत नव्हतं. लहान मुलांना भीक मागायला नेलं की जास्त पैसे मिळतात, मग त्यांना शाळेत कशाला बसवायचं, असा प्रश्न त्यांना पडायचा. सरांनी अनेकदा शाळेत मुलांना आंघोळी घातल्या आहेत, स्वत:च्या पैशाने मुलांचे केस कापून त्यांना नवीन कपडेही घेऊन दिले आहेत. पण त्या समाजाला वाटायचं की मुलांना ते बिघडवतायत, बंडखोरी करायला शिकवत आहेत. वेळोवेळी भांडणं आणि प्रसंगी त्यांना मारण्याचही प्रयत्न झाला.
सर मात्र या कशालाच घाबरले नाहीत. त्यांनी काम चालूच ठेवलं. या वस्तीतली मुलं रोज भिकेचं शिळं अन्न खायची. आता मात्र त्यांना शाळेत शिजवलेला ताजा पोषण आहार दिला जातो. शिवाय संध्याकाळीही त्यांना खायला मिळावं म्हणून लातूरच्या काही शाळांमधून त्यांनी मूठ- मूठ धान्य गोळा करुन या लेकरांची पोटं भरली आहेत. या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
सर मुलांसोबत समाजाच्या भल्यासाठीही धडपडत होते. वस्तीतील पुरुष कसरतीचे खेळ करताना ढोल- सनई उत्तमप्रकारे वाजवितात. त्यांना जर बँडचे चांगलं प्रशिक्षण मिळालं तर हा त्यांचा व्यवसाय होऊ शकतो व भिकेची सवयही सुटेल हे सरांना उमगलं. त्यांनी वस्तीतील निवडक तरुणांना हैदराबादला पाठविलं आणि वादनाचं प्रशिक्षण दिलं. आज हाच या समाजाचा मुख्य व्यवसाय झाला आहे.
शाळेच्या इमारतीचा प्रश्न मात्र कायमच होता. शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये भरत होती. लातूरच्या भयंकर उन्हाळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत होते. झरे सरांच्या प्रयत्नांमुळे या शाळेला जि.प. शाळेची मान्यता मिळाली. मात्र शाळेकडे स्वत:ची जागा नव्हती.
झरे सरांचे काम बघून गोपाळ खेळकरी समाजाने 37 हजार रुपयांची देणगी दिली. शिवाय सरांनी लातूरमधल्या दानशूर लोकांना आवाहन करून 50 हजार रुपये जमा केले. मग गावात शाळेसाठी 87 हजारांची जागा विकत घेतली. शेवटी शासनाने दिलेल्या इमारत निधीतून 2008 साली आजची शाळा उभी राहिली आहे.
आज जिल्हा परिषद शाळा झाल्यानंतर या वस्तीतील प्रत्येक कुंटुंबातले मूल शाळेत येते. लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजू लागलं आहे. इथून शिकून गेलेले विद्यार्थी लिहू- वाचू शकतात, बँड पथकात सामील झालेले स्वत:च्या बिदागीचा हिशोब करू शकतात, त्यांना पावती करता येते, त्यांना कोणी फसवू शकत नाही, हे लोकांना उमजलेलं आहे.

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment