Monday 11 June 2018

पक्ष्यांसाठी त्यांनी बांधली १२०० घरटी









उस्मानाबादमधलं श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालय. मनोज डोलारे इथं प्राध्यापक पदावर काम करतात. पेशा शिक्षकाचा असला तरी फोटोग्राफीची आवडही त्यांनी जोपासली आहे. साधारण २००९ पासून त्यांनी पक्ष्यांचे फोटो टिपायला सुरुवात केली. नंतर १२ साली त्यांनी उत्तम दर्जाचा नवा कॅमेरा खरेदी केला. आणि आता आणखी हुरुपानं त्यांची फोटोग्राफी सुरु झाली. उस्मानाबादच्या डोंगराळ परिसरात पक्ष्यांसाठी त्यांचं फिरणं सुरु झालं. त्याच काळात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जिल्ह्यात पक्षीगणना केली. या गणनेत शहराच्या अवतीभवती पक्ष्यांचं प्रमाण घटत चालल्याचं निरीक्षण नोंदविण्यात आलं. पक्ष्यांचं अस्तित्व कमी होत असल्याची चिंताजनक बाब प्रा. डोलारे यांच्याही लक्षात आली. आणि त्यांनी कारणं शोधणं सुरु केलं.
वाढतं शहरीकरण, प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे पक्षांचा पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊन अन्न साखळी बिघडत आहे. हे त्यांना जाणवलं आणि आता इथून पुढं ध्येय ठरलं की पक्ष्यांसाठी काम करायचं. पक्ष्यांचं स्थलांतर थांबण्यासाठी, त्यांना निवारा मिळवून देण्यासाठी, पक्ष्यांचं संवर्धन होऊन संख्या वाढण्यासाठी डोलारे यांनी प्रयत्न सुरु केले. प्रा.डोलारे यांनी स्वत:च्या महाविद्यालयापासून जनजागृती सुरू केली. संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मदत केली. आणि एकाचवेळी ५ हजार मातीची भांडी वाटप करण्यात आली. पक्ष्यांचे महत्त्व आणि त्यांची स्थिती सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांमध्येही पक्ष्यांप्रती जिज्ञासा तसेच आत्मीयता वाढली.
पक्ष्यांसाठी केवळ अन्न-पाणी देऊन चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर प्रा.डोलारे यांनी कृत्रिम घरटी बनविण्याचा निर्णय घेतला. कागदी रोल संपल्यानंतर उरलेल्या नळ्यांपासून कृत्रीम घरटी बनविण्यास सुरुवात झाली. ३ वर्षात अशाप्रकारची १२०० घरटी तयार करून घरोघरी देण्यात येत आहेत. ही घरटी घरांच्या अंगणात बांधण्यात आली. अर्धा फूट अंतराची नळी कापून ती एका बाजूने चिकटपट्टीने बंद केली जाते. दुसऱ्या बाजूने अर्धवट बंद करून झाडांना अडकवली जाते. त्यात पक्षी वास्तव्य करतात शिवाय पिलांना जन्म देतात. पक्ष्यांनी ही घरटी स्वीकारली आणि डोलारे यांचा हेतू सफल होऊ लागला. गेल्या पाच वर्षांपासूनच्या त्यांच्या धडपडीमुळे आता उस्मानाबादेत पक्षीमित्रांची चळवळ उभी राहत आहे.
प्रा. डोलारे म्हणतात, “फोटो काढताना पक्ष्यांचे विश्व डोळ्यात साठवित होतो. डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यातून दिसल्या. पक्ष्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचं निरीक्षण समोर आल्यानंतर अस्वस्थ झालो. उस्मानाबादमध्ये पक्ष्यांचे ज्ञान असणारे जाणकार कमी होते. मात्र पक्षीमित्र मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या अभ्यासकांची पुस्तकं वाचत गेलो. त्यातून ज्ञान मिळालं आणि पक्ष्यांचं संगोपन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीवर काम करीत गेलो”. आता पक्षीमित्र म्हणून शहरातील प्रत्येक कुटुंब प्रा.डोलारे यांना ओळखू लागलं आहे. त्यांनी आवाहन केल्यानंतर समाजातून मदत मिळू लागली आहे.
- चंद्रसेन देशमुख.






No comments:

Post a Comment