Wednesday, 5 June 2019

२१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि प्रश्नांची साखळी... (बातम्या तुमच्या – आमच्या मुलांच्या)

मुलांच्या रिझल्टचा मोसम. सध्या घरात, घराबाहेर एकच चर्चा. किती गुण मिळणार, कुठे प्रवेश घेणार. मुलांची शैक्षणिक प्रगती हा विषय फारच प्रतिष्ठेचा झाला आहे.
अलिकडेच तेलंगणात बारावीच्या निकालानंतर एकापाठोपाठ एक अशा २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 'बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना आणि नंतर गुणपत्रिका तयार करताना तेलंगणा राज्याच्या उच्च माध्यमिक मंडळाने या वर्षी अभूतपूर्व घोटाळे केले. अकरावीत नव्वद ते शंभर
गुण मिळवणाऱ्या अनेकांना बारावीत आपण नापास झालो आहोत वा आपल्याला अगदीच कमी गुण मिळाले आहेत याचा मोठा धक्का बसला. इतका, की आत्महत्या करेपर्यंत मुलांची मजल गेली.
सग़ळीकडून दबाव वाढला तेव्हा या मूल्यांकन प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचे सरकारने मान्य केले आणि नापास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातील असा निर्णय जाहीर केला, पण तेव्हा वेळ टळून गेली होती. गेलेले जीव परत येणार नव्हते. तेलंगणात गोंधळ सुरूच आहे. या घटनांचा विचार गंभीरपणे केला पाहिजे. या प्रकरणात सरकारकडून अक्षम्य घोटाळा, हलगर्जीपणा झाला आहे. आणि त्याचा जाब मागायलाच हवा.
जास्त चिंताजनक आहे की, कमी गुण मिळाले वा अपयश आलं म्हणून स्वतःला संपवायचा विचार आपल्या मुलांच्या मनात येतो, आत्महत्या करायला ती कचरत नाहीत.
विद्यार्थ्यांच्या या आत्महत्यांनी प्रश्नांची साखळीच तयार केली आहे. आपली मुलं या व्यवस्थेचे बळी जात आहेत का? शाळा, क्लासेस स्वतःच्या फायद्यासाठी पालकांच्या स्वप्नांना वापरून घेत आहेत का? आपण पालक मुलांना एक सक्षम व्यक्ती म्हणून घडवण्यात कमी पडतो आहोत का? मुलांचा शैक्षणिक प्रवास आनंददायी नसून आपण ताणाचा केला आहे का? पालकांचा, शिक्षकांचा मुलांशी संवाद संपला आहे का? समाजच कमकुवत आहे म्हणून आपली मुलंही दुर्बल होत आहेत का?
या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असती, तर त्या २१ मुलांनी जीवन संपवलं नसतं.
- लता परब

#नवीउमेद #Newsonchildren Swati Mohapatra #मुलांच्याबातम्या

दुष्काळाबाबत मुलींचे अनुभव (सदा आबाची ऐका वाणी)

नमस्कार दोस्तांनू. मी सदा आबा. औंदाच्या दुष्काळाची चित्तरकथा मी तुम्हास्नि वेगवेगळ्या अंगानं सांगितली. आता हा दुष्काळ कसा माणसाला छळतोय, हे औरंगाबाद, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी लिहून कळवलंय. 
हे वाचा, मंग तुम्हालाबी कळलं, ह्यो दुष्काळ नव्ह ह्यो तर दुष्टकाळच हाय.
हे पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : https://www.facebook.com/sampark.net.in/photos/pcb.2358242381165581/2358241434499009/?type=3&theater

तोरंगणचे काशिनाथ सात वर्षापासून पाड्याला देताहेत मोफत पाणी

पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण अनुभवत, विशेषतः आईला होणारा त्रास बघतच काशिनाथ मोठा झाला. लग्न झालं. बायकोलाही तोच त्रास. उन्हाळ्यात पाणी आणायचं तर रात्री पंपाच्या परिसरात मुक्काम करावा लागे, अशी स्थिती. तोरंगणचा शेतकरी युवक काशिनाथ बोरसे. 
नाशिक जिल्ह्यातल्या हरसूलपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरचं तोरंगण. दुर्लक्षित आदिवासी पाडा. ३६० घरांची वस्ती.
साधारण ८ वर्षांपूर्वी गावाला दोन जलवाहिनी योजना मंजूर झाल्या. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च झाले. पण नीट नियोजन नव्हतं. खर्च वाया गेलाच. शिवाय पाड्याला काहीच फायदा झाला नाही. जलवाहिनी योजना मंजूर असल्यानं टँकरनेही पाणी मिळेना. दोन हापसे तीन बोअर. तरीही गावात पाण्याचा खडखडाट. गावकऱ्यांना तब्बल तीन किलोमीटर अंतर पार करून हरसूल खर्डीपाडाजवळची कास नदी गाठावी लागे. तेव्हा कुठे पाणी मिळे.
तेव्हा, बोअरवेल खोदून पाहण्याचं काशिनाथनी ठरवलं. ३५ हजार रुपयांचं कर्ज, थोडी जमवलेली पुंजी, काही हातउसने असं मिळून ५० हजार रुपये जमा करत त्यांनी बोअरवेल खोदली. तिला पाणीही लागलं. गरजेपुरतं पिण्याचें पाणी उपलब्ध झालं.
आपली गरज तर भागली पण गावाचं काय? या विचारानं काशिनाथ अस्वस्थ होते. त्यांनी कुटुंबाशी चर्चा केली आणि बोरसे कुटुंबानं बोअरवेलचं पाणी गावासाठी खुलं केलं.
गाव एक किलोमीटर अंतरावर पसरलं आहे. अगदी शेवटच्या टोकाला राहणाऱ्या महिलेलाही या बोअरवेलचं पाणी मिळत आहे. गेली ७ वर्ष काशिनाथ गावाची तहान भागवत आहेत, एकही पैसा न घेता.
- प्राची उन्मेष, नाशिक

कथा एका वेगळ्या प्रदर्शनाची

प्रदर्शन म्हटलं की त्यात खाद्यपदार्थ, कपडे, दागदागिने, गृहोपयोगी वस्तू न असं बरंच काही...! पुण्यातली आर्टिस्ट्री संस्था मात्र वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन भरवते. प्रदर्शनाचं नाव- देणे समाजाचे. या प्रदर्शनात स्टॉल असतात ते वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे. 
"गरजूंसाठी काहीतरी करावं, अशी इच्छा प्रत्येकाला असते. सामाजिक संस्थाही भरपूर आहेत पण आपली मदत गरजूंपर्यंत पोहोचते का? असे अनेक प्रश्न असतात. संस्थांच्या कामाची माहिती एकाच मंचावर व्हावी, यासाठी हा उपक्रम." संस्थाप्रमुख वीणा गोखले सांगतात.
वीणाताईंच्या जुळ्या मुलींपैकी एक विशेष मुलगी. तिच्या उत्तम जडणघडणीसाठी संस्थांचा शोध सुरू असायचा. तेव्हा लक्षात आलं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कितीतरी सामाजिक संस्था आहेत. पती दिलीप गोखले यांना संकल्पना सुचली, या संस्थांचंही प्रदर्शन भरवलं तर! कामाला सुरुवात झाली.
पण, पती आणि विशेष मुलीच्या निधनानंतर उपक्रम सुरू ठेवणं वीणाताईंसाठी आव्हानच ठरलं. दुसऱ्या लेकीच्या डॉ सावनीच्या साथीनं त्यांनी उपक्रम सुरू ठेवला. हा उपक्रम म्हणजेच पतीला आदरांजली, असं त्यांनी मानलं. गेली 14 वर्ष पुण्यात हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत 165 संस्था त्यात सहभागी झाल्या आहेत. त्यातून 4 कोटींपेक्षा अधिक निधी विविध संस्थांना मिळाला आहे. पैशांबरोबरच कपडे, धान्य, गरजेच्या वस्तू, मनुष्यबळ, कार्यकर्ते यासाठीसुद्धा प्रयत्न केला जातो. स्टॉलसाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. दोन दिवस हे प्रदर्शन असतं. यासाठी आलेल्या अर्जांमधून संस्था निवडून, कुठलीही पूर्वकल्पना न देता वीणाताई संस्थेला भेट देतात. प्रत्यक्ष कार्य पाहून संस्थांची स्टॉलसाठी निवड केली जाते.
यंदा प्रथमच मुंबईत विलेपार्ले इथं मार्च महिन्यात प्रदर्शन भरलं होतं. वीणाताईंना आता वर्षातून एकदा मुंबई आणि पुण्यात दोन्हीकडे प्रदर्शन भरवण्याची इच्छा आहे.
अधिक माहितीसाठी :
website : www.artistrypune.in
आर्टिस्ट्री - वीणा गोखले - ९८२२०६४१२९
-मेघना धर्मेश ,मुंबई

शेजारचा एसी... (आखुडबुध्दी बहुशिंगी)

बेल वाजली. दार उघडलं. दारात शेजारच्या आठल्येकाकू. 
"कायै काकू?" मी विचारलं.
"आमचा एसी बंद पडलाय." काकू पदरानं घाम पुसत म्हणाल्या. मी तडक वॉशबेसिनकडं गेलो. आरशात चेहरा पाहिला. दाढीचं खुंट असलं, डोळे (झोपेमुळं) तांबरलेले असले तरी कुठल्याही अँगलनं मी एसी मेकॅनिकसारखा दिसत नव्हतो.
"आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय." कमरेशी पदर खोचत काकू बोलल्या.
"आं? माझ्यामुळं?"
"तर काय? तुमचा फ्रीज आमच्या एसीला बघून शीळ मारतो. बिचाऱ्या एसीनं सहनतरी किती करायचं? लाजमोड्या कुठला!" काकूंनी पदरानं डोळे पुसले.
"काकू, माझा फ्रीज कसलाही आवाज करत नाहीय."
"तुम्ही असलात की शहाण्यासारखा असतो. तुम्ही गेलात की चौखूर उधळतो. अगदीच ताळतंत्र सोडलंय हो मेल्यानं."
"काकू, तुम्ही स्वतः येऊन बघा. माझ्या फ्रीजला खूर सोडा, चार पायही नाहीत."
"माझ्या एसीचं काय करताय ते बोला आधी. कालपासून मान टाकलीय त्यानं."
"मी बघतो काहीतरी."
पदराला नाक पुसत काकू गेल्या. त्यांची बोळवण करून दूध आणायला खाली आलो तेवढ्यात मॉर्निंगवॉकहून येणारे आठल्येकाका दिसले. मला बघताच गडबडीनं माझ्या कानाशी आले.
"ब्रह्मे, एक शेजारी म्हणून सांगतो-"
"एसीबद्दल बोलताय का काका?"
"नाही, तुमचं वॉशिंगमशिन. जरा आवरा त्याला."
"आता त्याला काय झालंय?"
"काल दुपारी त्यानं आमच्या टीव्हीची छेड काढली."
"काय सांगता? घरात येऊन?"
"घरात कसा घुसू देईन मी त्या भामट्याला? अहो, तुमच्या बाल्कनीतून पाणी उडवत होता आमच्या टीव्हीवर. आमचा टीव्ही शरमेनं पाणीपाणी झाला."
"तुमचा टीव्ही हॉलमध्ये असतो ना हो?"
"हो, पण दुपारी हवा खात तो बाल्कनीत उभा होता."
"क्यायतरीच!"
"हे पहा, हातात विड्या आहेत. खोटं बोलत नाहीय मी. तुमचं घड्याळही आमचा मिक्सर काही गाऊ लागला की चिडवत असतं, माहीतीय?"
मी विचारात पडलो. आता मात्र हद्द झाली.
"काका, काहीतरीच बोलू नका. एकवेळ वॉशिंग मशीन आणि फ्रीजचं मान्य करेन, पण आमचं भिंतीवरचं घड्याळ बिचारं कशाला काय चिडवेल हो? उद्या म्हणाल की आमचं गोद्रेजचं कपाट तुमच्या वॉर्डरोबवर लाईन मारतं म्हणून."
"उद्या का? आजच म्हणेन. खऱ्याला भीती आहे का कुणाची?"
आठल्येकाका हे वाक्य इतक्या आवेशात म्हणाले की कट्ट्यावर वारा घेत बसलेले खरेकाका आपल्यालाच हाक मारली असं वाटून तुरूतुरू चालत आले. त्यांना कसंबसं कटवून मीही नेटानं वाद घालू लागलो.
"असं काय? मग करा की पोलिसात तक्रार."
"करणारच आहे. तुमच्या परवानगीची गरज नाहीए मला. घाबरतो का काय तुम्हांला?"
आमचे वाढलेले आवाज ऐकून सोसायटीचे माजी सेक्रेटरी शहाणे आमच्या भांडणात पडले.
"काय झालं हो आठल्ये?"
मी त्यांना अथपासून इतिपर्यंत सगळी कथा सांगितली. शहाणेंनी अत्यंत गंभीर चेहरा करून ते सगळं ऐकून घेतलं. या गोष्टीतला लॉजिकचा संपूर्ण अभाव त्यांच्या लक्षात आला असावा.
"मला एक गोष्ट पटत नाही यातली-"
"कोणती?"
"यांचा फ्रीज बाल्कनीतून तुमच्या घरावर नजर ठेवून असतो म्हणालात तुम्ही."
"मग? यात काय आहे न पटण्यासारखं?"
"अहो, यांच्या बाल्कनीतून तुमचं घरच नीट दिसत नाही. मी स्वतः आमच्या शेजारच्या फर्टाडोबाईंना पाहायचा बऱ्याचदा प्रयत्न केला, पण अजिबात दिसत नाही काही."
"शहाणेच आहात. मला दिसतं शेजारच्या फ्लॅटमधलं सगळं." आठल्ये चुकून खरं बोलून गेले.
"अहो, बिल्डरनं फसवलंय हो आपल्याला. सगळं चुकीचं बांधकाम केलंय त्यानं." कुणीतरी फाटा फोडला.
तिथून हा विषय एसी-फ्रीजपासून बिल्डरनं शेजारचं घर पाहण्याच्या हक्कापासून आपल्याला वंचित कसं ठेवलंय याकडं वळला. आमचं भांडण अर्धवट राहिलं.
पण संपलं नाही अजिबात. दर दोन दिवसांनी आठल्येंच्या घरचं काहीतरी उपकरण बंद पडायचं. आणि काका किंवा काकू माझ्याशी वाद घालायला यायचे. शिवाय सोसायटीत सगळीकडं याची बोंब मारत फिरायचे. हळूहळू, लोकांचाही यांच्या कांगाव्यावर विश्वास बसू लागला होता. आडूनआडून सगळेजण मला हे प्रकरण संपवण्याबद्दल सुचवत होते.
शेवटी हे इतकं असह्य झालं की आम्ही सोसायटी सोडून जायचं ठरवलं. भाड्यानं राहणाऱ्याला काय कुठंही जागा मिळतेच. माझ्या फ्लॅटमध्ये आठल्येंची दूरची कुणी भाची भाडेकरू म्हणून यायला टपूनच बसली होती. आठल्येंनी त्यातही एसी दुरुस्तीचे अडीच हजार माझ्या खनपटीला बसून वसूल करून घेतलेच.
नवीन घरात गेल्यावर, दुसऱ्याच दिवशी आठल्येंचा फोन आला.
"अहो ब्रह्मे, अहो ब्रह्मे..."
"बोला काका, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं चालूय ना?"
"हो, सगळं ठीकाय. पण माझी बाईक…"
"हो, तुम्हांला सांगायचंच राहून गेलं. तुमच्या बाईकनं माझ्या स्कूटीला फूस लावून पळवून नेलंय. कालपासून दोघं गायब आहेत. शेजारच्या कारवर आम्हांला शोधण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही खूप दूर जातोय अशी चिठ्ठी मिळाली. आता मी पोलिसात तक्रार करणारेय."
पलीकडून फक्त 'धप्प' असा पडल्याचा आवाज आला.

- ज्युनिअर ब्रह्मे

दुष्काळावर शिक्षण हाच एकमेव उपाय

आम्ही ग्रामीण भागात काही संस्था चालवतो. शिक्षणक्षेत्रात किती भीषण परिस्थिती आहे याची कल्पना मोठ्या शहरांत राहणा-यांना करता येणार नाही. इथल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलांना न शिकता डिग्री मिळते. कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष शिक्षण न घेताच. या गोष्टी सगळ्या कॉलेजेसमध्ये चालतात असे मी बिलकूल म्हणणार नाही, पण ब-याच छोट्या गावांमध्ये शिक्षणाचे असेच हाल आहेत. म्हणायला मुलांकडे डिग्री आहे, पण प्रत्यक्षात शिक्षणच न घेतल्याने त्या डिग्रीचा कोणताही उपयोग त्यांना मिळणं शक्य नाही. मुलं चुकीच्या पध्दतीने पास होतात, मग डिग्री हातात घेतल्यावर ते जेव्हा नोकरीच्या बाजारात जातात तेव्हा त्यांची लायकी नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. 
आता लोक विचारतात, दुष्काळावर मात कशी करता येईल, शेतक-यांचं जीवन कसं सुधारता येईल. या सगळ्या लोकांना मी एकच सांगतो, चांगल्या पध्दतीची शिक्षणपध्दती अस्तित्वात आली पाहिजे. या मुलांना या भयाण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा एकमेव उपाय हा आहे. पुढच्या पन्नास वर्षांत मराठवाड्याचं वाळवंट होईल, असं म्हणतात. मग, शेती हे या मुलांचं भविष्य असेल असं कसं म्हणायचं? प्रत्येक कुटुंबात शेतजमिनीच्या वाटण्या होऊन होऊन आता या मुलांच्या हातात, दीडदोन एकर जमीन उरली आहे. त्याचेही वाटे होत आहेत. डिग्र्या घेऊन ही मुलं जमिनी कसायला जातील. चांगलं शिक्षणही नाही आणि शेती कशी करायची याचीही फारशी माहिती नाही. अशी या मुलांची स्थिती. त्यांना मार्ग दाखवणं गरजेचं आहे. एका एकरात या मुलांची पिढी कशी टिकणार? नोकरी न मिळालेल्या शेतक-यांच्या मुलं नैराश्यातून टिकाचा विचार तर नाही ना करणार, याची भीती वाटते. त्यांना वाचवलं पाहिजे. त्यांना चांगलं शिक्षण देऊन शहाणं केलं पाहिजे. याची सुरूवात शाळेपासून झाली पाहिजे.
- सिध्दार्थ पाटील
(शेतकरी, कन्नड इथे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुरू असलेल्या कॉलेजचे संचालक, वरिष्ठ वयोगटात बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू)

१३ वर्षांच्या मुलीला, गावातल्या मंडळींसाठी खर्रा आणता आणता व्यसन लागलं, तिचं तोंड दोन बोटंसुद्धा उघडत नव्हतं..........

मुलांच्या जीवनात, १० वर्षांपर्यंत घडणाऱ्या घटनांवर त्यांचं भविष्य अवलंबून असल्याचं डॉ सीमा सांगतात. "वडिलांची पानटपरी असताना मुलगा व्यसनापासून लांब कसा राही्ल? अशाच एका विद्यार्थ्याला व्यसनातून बाहेर काढायला सहा महिने लागले. पुण्याच्या कॉलेजमधील एक तरुण. आईवडिलांचा एकुलता एक. पालकांना गलेलठ्ठ पगार. पण आपला मुलगा गेले सहा महिने ड्रग्जच्या आधीन आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. मुलाची नखं ,डोळे पिवळे पडले होते. यात चूक कोणाची? एवढे कायदे असताना लहान मुलांकडे ड्रग्ज येतात कुठून? कुठल्याही सरकारी कार्यालयात धूम्रपान करणं गुन्हा आहे. मात्र, तसं होत का? धूम्रपानामुळे त्या व्यक्तीसोबत अजून १० जीव धोक्यात येतात, हे किमान सुशिक्षितांना तरी माहीत नसतं का?" 
डॉ सीमा निकम सांगत होत्या. त्या पुण्यातल्या चिंचवड इथल्या. सायकॉलॉजी अँड काउन्सेलिंग विषयात एम एस. जवळजवळ ३७४ व्यक्तींना त्यांनी आतापर्यंत व्यसनमुक्त केलं आहे. त्यांचा मुख्य भर समुपदेशनावर. चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी भागात त्यांनी व्यसनमुक्तीचं काम केलं आहे. तिथली भीषणता त्या सांगतात.
"चंद्रपूर जिल्हा सगळ्यात जास्त व्यसनाच्या आहारी गेलेला. 'खर्रा' हा जहाल व्यसनी विषारी पदार्थ. तंबाखू, गुटखा, चुना,सुपारी अशा गोष्टींना एकत्र मळून तयार केला जातो. २५ ते ३० रुपयांच्या या व्यसनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी १२-१२ तास काम करतात. दिवसभर नशेत. त्यामुळे पोटात अन्न नाही. मग शरीराच्या समस्या. उपाय म्हणून अँटासिड घ्यायचं. तेही व्यसनच. जवळजवळ सगळ्या पेनकिलरची नावं त्यांना तोंडपाठ. खर्याची सलग ८-१० दुकान तिथे दिसतात. त्यावर आबालवृद्धांची गर्दी. १३ वर्षाच्या मुलीला गावातील मंडळी खर्रा आणायला लावत. सगळे खातात म्हणून, तीही खाऊ लागली. तिचं तोंड दोन बोटांएवढंसुद्धा उघडता येत नव्हतं. घशाच्या कॅन्सरचं निदान झालं." .
"व्यसनाचं मूळ कारण आपली समाजरचना आणि शिक्षणपद्धती. संकट आलं की पळवाट काढण्याकडे आपला कल. व्यसन हा शारीरिक आजार नसून मानसिक आजार आहे. भावनिकदृष्ट्या खचलेला रुग्ण व्यसनाकडे अधिक लवकर वळतो. एका कंपनीचा ४० वर्षांंचा सीइओ आत्महत्येचा विचार करून व्यसनाकडे वळतो, तेव्हा लक्षात घ्या की, व्यसन
गरीब-श्रीमंत असा भेद करत नाही."
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या अहवालानुसार देशात दरवर्षी १० लाखांहून अधिक मृत्यू तंबाखूमुळे होतात. व्यसनांमुळे होणारी हानी पाहता मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहेच. प्रतिकूलतेशी आपण लढायचं असतं, ही प्रेरणा मुलांमध्ये निर्माण करण्याची, जगण्यासाठी आवश्यक कौशल्य, मानसिकता, बाहेरच्या जगात वावरण्यासाठी उपयुक्त शिक्षण देण्याची गरज डॉ सीमा व्यक्त करतात.
महाराष्ट्र तसंच महाराष्ट्राबाहेर त्या व्यसनमुक्ती शिबिरं घेतात. महाराष्ट्र व्यसनमुक्ती मंडळ, सलाम फाउंडेशन या संस्थांसोबतदेखील त्या काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अधिकारीवर्गाला मार्गदर्शन त्या करतात. व्यसनाधीन व्यक्तींसोबतच त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन त्यांना गरजेचं वाटतं. 'राष्ट्रीय रणरागिणी' पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
डॉ.सीमा निकम यांच्या संपर्कासाठी - 8421534082
-संतोष बोबडे, पुणे 

घरदार सोडून शेतकरी कामाच्या शोधात

आम्हांला कुठेही रोजगारावर काम द्या नाही तर आम्ही आमचं कुटूंब चालवू शकत नाही अशी विनवणी करत शेतक-यांची कुटूंबं भटकताना पाहिली. औरंगाबादेतल्या काही कंपन्यांत या लोकांसाठी आम्ही काही जागा निर्माण केल्या आहेत. पण ती व्यवस्था पुरेशी नाही. तीनशे-साडेतीनशे रुपये रोजाने काम करण्यासाठी हे लोक औरंगाबाद एमआयडीसी भागात आश्रयाला आलेले दिसले. या लोकांमध्ये काही बागायतदार शेतकरी आहेत. उरलेले सर्व कोरडवाहू शेतकरी आहेत. 
शेतीपध्दतीत बदल आवश्यक
मुळात पीक पध्दतीमध्ये आपण बदल करु शकलो किंवा शेतीवर अवलंबून असलेल्या तोंडांची संख्या कमी करु शकलो तर शेतीमध्ये ब-यापैकी उत्पन्न घेणं शक्य आहे. पण त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन आवश्यक आहे. लोकांची स्मरणशक्ती फार वाईट आहे. पाण्याच्या अभावी जे हाल होतात, त्यांचा विसर त्यांना पाणी उपलब्ध असताना होतो. दुष्काळाच्या काळात थेंब थेंब पाणी वाचवतील, पण एकदा पाऊस पडला, विहिरीत किंवा त्यांच्याजवळच्या तलावात पाणी जमा झालं की जो काही पाण्याचा बेसुमार उपसा सुरू होतो, त्याला काही मर्यादा नाही. काही महिन्यांपूर्वीच आपण दुष्काळाचा सामना करत होतो ही गोष्ट ते विसरतात. तलावावरच्या विहिरीवरच्या मोटारी चोवीस तास सुरू असतात. आता कुठे लोकांना ठिबक सिंचनाचं महत्व थोडं थोडं पटू लागलं आहे. लोकांच्या या वागण्यामुळे पाण्याचा स्रोत आटतो. आपल्याला आलेल्या अनुभवातून लोकांनी शिकलं पाहिजे, आणि अनुभवांवर आधारित शेतीपध्दत विकसीत केली पाहिजे. असं झालं तर मराठवाड्यासारख्या भागात शेती हा व्यवसाय म्हणून फार उत्तम रित्या नाही, तर कुटुंब चालेल अशा पध्दतीने करता येईल.
- सिध्दार्थ पाटील
(शेतकरी, कन्नड इथे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुरू असलेल्या कॉलेजचे संचालक, वरिष्ठ वयोगटात बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू)
#नवीउमेद #दुष्काळ #मराठवाडा

बोरव्हातल्या गावकऱ्यांची प्रेरणा नासरी

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातलं बोरव्हा हे आदिवासी गाव. तिथली नासरी शेकट्या चव्हाण. श्रीलंका, इटली, केनिया, इंडोनेशिया या देशांमध्ये तिचं नाव पोहोचलंय. तिचे शेतीचे प्रयोग आज आजूबाजूच्या ५-६ गावात केले जातात. तिच्या गावातल्या मुलीने मध्यप्रदेशात सासरीही तिचे प्रयोग राबवायला सुरुवात केली आहे. नासरी, महाराष्ट्र भूषणसह ३३ पुरस्कारांची मानकरी. डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठाची ब्रॅण्ड अँबेसिडर. 
३० वर्षांची नासरी ८ वीपासून शेती करते. अत्यंत कठीण परिस्थितीत १२ वीपर्यंत शिकली. नेमाडी भाषिक नासरीनं भाषेच्या अडचणींवर मात करत कृषी विभागाच्या तीन शेती शाळा केल्या. नियमितपणे शेती शाळेला जाणारी ती एकमेव युवती. नासरी सेंद्रिय शेती करू लागली. सुरुवातीला तिच्या प्रयोगांना गावकरी हसले. पण महिन्याभरात परिणाम दिसू लागला. तिनं घरी खत तयार केलं. त्याचा वापर करत ५ एकर शेतात तिनं १७ क्विंटल ज्वारी घेतली. तेव्हा रासायनिक खताचा वापर करणाऱ्यांचं उत्पादन होतं ८ क्विंटल.
गावात उताराची शेती. शेतीसाठी पाणी साठवणं अवघड काम. नासरीनं प्रयोग केला. तिनं उताराला आडवी पेरणी केली आणि सोप्या पद्धतीनं शेतीला पाणी मिळवून दिलं. ज्वारी- गव्हासोबत, मका, कापूस, तूर, मूग, चवळी. आज गावातल्या १८०० एकर शेतात आडवी पेरणी केली जाते. परिसरातल्या आदिवासींनाही स्थानिक भाषेत माहिती पुरवली.
गावातल्या महिला पुरुषांप्रमाणे शेतीतली सर्व कामं करू शकतात. त्यामागची प्रेरणा आहे नासरी. तिच्या प्रयत्नांमुळे गावातली शाळा नियमितपणे सुरू झाली. गर्भवती महिला आणि मुलांची काळजी घेतल्यामुळे गाव कुपोषणमुक्त झालं. परिणामी गावात एकही बालमृत्यू नाही.
नासरीनं श्रीलंका आणि इटलीतल्या लोकांना प्रशिक्षण दिलं आहे. केनिया आणि इंडोनेशियातल्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी तीही आता पुढलं प्रशिक्षण घेत आहे. 
- नीता सोनवणे
#नवीउमेद #अकोला 

दिस-रात्र पाण्याचा ध्यास... गणेशगावची चित्तरकथा...सदा आबाची ऐका वाणी (भाग क्र.१५)


बाई म्हणून जगणं काय असतं? सण असो वा वार, दिवसातील चार ते पाच तास आम्ही केवळ पाणीच वाहतो. नांगराला जुंपलेल्या बैलावानी... दमून भागून हंडाभर पाणी येऊन बसूस्तर चिल्ली-पिल्ली भंडावून सोडतात, आई भूक लागली खायला दे? मग बिचाऱ्यांवर रागराग होतो.’ 
दोस्तांनू ही व्यथा हाई गणेशगावच्या गंगुबाई महालेंची. मराठवाडा अन‌् विदर्भच दुष्काळत पोळतोय असं ह्या सदाला वाटायचं. पर, त्र्यंबकेश्वर भागातील गंगुबाईनी सांगितलेले ह्ये चित्तर भयानक हाई.
गणेशगाव ग्रुप ग्रामपंचायतीतील हरेक महिला, युवती, गडी पाणी भरण्यात परेशान. इलेक्शन आल की हाईच जलयोजनेचं आश्वासन. पर आजपोतर काही झालं नाही. या गावच्या साऱ्या महिलांची एकच मागणी हाई, ‘सरकारने आमच्या डोईवरला हंडा उतरावा.’
यंदा तर दुष्काळ तर लईच बेकारं. त्र्यंबकपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गणेशगांव, विनायकनगर आणि गोरठाण या गावांत पाणी मिळण मुश्कील. तिन्ही गावची लोकसंख्या जवळपास १६००. यात निम्म्या महिला.
दिवाळी जवळ आली की समदे खुश होतात पर गणेशगावला मातुर दिवाळी आली की लेकीबाळी, माणसांना पाणीटंचाईचा त्रास सुरु व्हतो. गवालगत एक विहीर हाई. पहाटे चार वाजेपासून इथं हंडा घेऊन बाया येतात. सैपाक, जेवण खावण झाली की धुणे, भांड्यासाठी या महिला विहीरीपाशी आल्याच. दिस पाण्यातच जातोय.
विनायकनगरलाबी तीच गत. गावातील विहीर आटली हाई. दोन-तीन टँकर पाणी विहिरीत टाकले तरी ते एक-दोन दिवसांच्या पलिकडे पुरत नाही. गावातील महिला धुणी-भांडी करायला दोन किलोमीटर पायपीट करत गणेशगावच्या विहिरीवर येतात.
राधाबाई महाले बोलल्या ‘दिवसातील निम्माहून अधिक वेळ हा पाण्यासाठीच जातोय. उजेडापूर्वीच डोक्यावर हंडा घेऊन निघावं लागतयं.’
वेणुबाई खोटरे सांगतात, ‘घरात एक दोन बायका असतील तर ठीक एक जण पाण्यासाठी फिरत राहते. दुसरी तोवर घरातील कामे करते. पुरुष लोक पाण्यासाठी येत नाईत. एकटी बाई असेल तर मरण हाई.’
गोरठाण गावात जासाल, इथं तर विहीरबी नाई. हातपंप ह्योच काय तो आधार. या ठिकाणी टँकरबी अजूक आला नाई. हातपंपावर नंबर लागलेले. भांडण ठरलेली. पाच वर्षाची पोर ते म्हाताऱ्या बाया बी इथ भर उन्हाच कळशी घेऊन रांगेत असत्यात.
दाेस्तांनू इथलली कविता सत्वर तर डोळ्यात पाणी आणून सांगत व्हती, ‘पाण्यासाठी जाणारा वेळ पाहता घरच्यांनी दहावी नंतर शिक्षण थांबवून घरी बसवल. पाणी संपल की पंपावरून पाणी आणायचे काम नशिबी आलेल.’
... तर मंग बघा दोस्तांनू इकडे ना खासदार येतो, ना आमदार. दुष्काळ लोकास्नी पिडतोय, पर त्याच या कुणास्नीबी घेणं नाय.. हा प्रश्न सुटला पायजेल... 

- प्राची उन्मेष, नाशिक

ऐक गं ताई


ऐक ग ताई कामाची ही गोष्ट हायी
एमएचएम चे लय महत्व बाई Ilधृ lI
वयात येता पाळी ही येई
मातृचक्राची सुरुवात होई
सुरुवात होता तू घाबरायचं नाही
एमएचएम चे लय महत्व बाई I१I
पाळी ही येता त्रास होईल
ओटी पोटी दुखणे तुला जाणवेल
आहार चौरस सुरु ठेव ताई
एमएचएम चे लय महत्व बाई Il2Il
मिठाचा वापर कमी तू कर ग
कच्च्या भाज्या आणि फळे तू खा ग
निरोगी राहण्याची ही चावी ताई
एमएचएम चे लय महत्व बाई Il3lI
चिडचिड होईल भीती ही वाटेल
गोंधळ होईल राग तुला येईल
यामुळे घाबरून जायचे नाही
एमएचएम चे लय महत्व बाई Il४Il
थकवा वाटेल ,ताण तुला येईल
निराश वाटेल चिडचिड होईल
यामुळे गोंधळून जायाचे नाही
एमएचएम चे लय महत्व बाई Il५lI
सुर्यनमस्काराचा आधार घे ग
दीर्घ श्वासाचा व्यायाम कर ग
त्या चार दिवस आरामाची हि चावी बाई
एमएचएम चे लय महत्व बाई Il६Il
थोडासा व्यायाम रोज तू कर ग
स्वताची काळजी स्वता तू घे ग
स्वतासाठी थोडा वेळ दे ग ताई
एमएचएम चे लय महत्व बाई Il७Il
सँनिटरी पँडचा वापर तू कर ग
दिवसातून चार वेळा बदल तू कर ग
पाळीचा कालावधी सुखकर होई
एमएचएम चे लय महत्व बाई Il८Il
सुती कपड्याचा वापर कर ग
भिजलेले कपडे नियमित बदल ग
पाळी व्यवस्थापन सोपे हे होई
एमएचएम चे लय महत्व बाई Il९Il
आनंद तुझ्या घरात नांदो
हे चार दिवस सुखाचे जावो
उमेद तुझ्या जीवनात राही
एमएचएम चे लय महत्व बाई lI१०Il
गीतकार – गुरु भांगे
संपर्क क्र. – 8888421666

आजी, तुम्ही कधी पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात लावलाय का?" उत्तर साहजिकच नाही असतं. "मग तुम्ही एकदा हात लावून बघाच, दूध नाही खराब होत!

शर्वरीचे अनुभव खूपच गंमतीशीर आहेत. ती ‘समाजबंध’ची समुपदेशक. एका गावात हे सगळं ती वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगत होती. तेव्हा काही महिला म्हणाल्या, "बाई, असलं काही बोलू नका. देवीचा कोप होईल. पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात लावून बघा, दूध नाही नासलं तर सांगा." किंवा लोणचं, दही नासतं. पापड लाल होतात वगैरे म्हणतात. तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो, "आजी, तुम्ही कधी पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात तरी लावलाय का?" उत्तर साहजिकच नाही असतं. "मग तुम्ही एकदा हात लावून बघाच, दूध नाही खराब होत! आपल्याला हे घरातून आधीच्या बायांनी सांगितलेलं असतं आणि आपण ते भीतीपोटी खरं मानून पाळू लागतो. पण प्रत्येक महिलेकडून पाळीच्या काळात कधी ना कधीतरी घरातल्या कशाला तरी चुकून हात लागलेला असतोच आणि काहीच आभाळ फाटलेलं नसतं ना कोणता कोप झालेला असतो; पण फक्त घरातील बाकी महिला रागावतील म्हणून आपण ते कुणाला सांगत नाही. खरंय का काकू ?" आणि मग सगळ्याच महिला गालातल्या गालात हसायला लागतात. त्यांना हे पटलेलं असतं, बरंच आधीपासून माहीत ही असतं पण हे सगळं नाकारायची हिंमत त्यांच्यात अजून आलेली नसते.
आम्ही अंदाज काढला. प्रत्येक महिलेला साधारणतः पंधरा ते पंचेचाळीस या वयात पाळी चालू असते. म्हणजे आयुष्यातील सरासरी तीस वर्षे. दर महिन्याला चार ते पाच दिवस याप्रमाणे तीस वर्षातील एकूण चार ते पाच वर्षे कालावधी हा पाळीमध्ये जातो. थोडक्यात प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यातील सरासरी पाच वर्षे रक्तस्त्राव होतो. आता विचार करा. इतक्या मोठ्या कालावधीत पाळीचा शारीरिक त्रास सहन करायचा. आणि या अंधश्रद्धांमुळे तितकाच मानसिक त्रासही सहन करावा लागणं. हे किती अमानुष आणि भयंकर!
हे थांबलं पाहिजे.
किमान तरूणांनी आपल्या घरातल्या स्त्रीला या त्रासातून मुक्त केलं पाहिजे. कोणताच पुरुष स्त्रीचा त्या दरम्यान होणारा शारीरिक त्रास बंद करू शकत नाही. पण, मानसिक त्रास नक्कीच बंद करू शकतो. माझं या संदर्भात काम सुरू झालं ते याच विचाराने.
काॅलेजला असताना जुने कपडे गोळा करून आदिवासी वस्त्यांमध्ये वाटप करत होतो. तेव्हा या पाड्यांवर फिरताना महिला आरोग्याचा प्रश्न जाणवला. मासिक पाळीत योग्य काळजी न घेतल्यामुळे गर्भाशयाला संसर्ग होण्यापासून ते गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत कितीतरी आजार महिलांना होतात. परिणामी, महिलांचं गर्भाशय काढावं लागतं. त्यातून सांधेदुखी, भावनिक असंतुलन असे अनेक आजार उद्भवतात. माझ्या आईलाही अशा जंतुसंसर्गामुळे तरूण वयात गर्भाशय काढावं लागलं होतं. त्यामुळे या समस्येवर काहीतरी तोडगा काढावा, हे डोक्यात होतंच. मग देशभरात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे पॅड घेतले. त्याची उकल करून घरी बनवलं जाऊ शकेल असं कापडी आशा पॅड तयार केलं.
मासिक पाळीच्या काळात सर्वात जास्त गरज असते ती स्वच्छतेची, आरामाची आणि सकस आहाराची. पाळी आल्यानंतर बऱ्याच आया मुलीला त्याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती देणं सोडून स्वयंपाकघरात जाऊ नकोस आणि देवाला शिवू नको हेच सांगतात. आणि मग स्त्रीत्व खुलण्याच्या मुख्य टप्प्यावर, इथूनच मुलीच्या मनात आपल्या स्त्रीत्त्वा विषयी न्यूनगंड तयार व्हायला सुरुवात होते. आपण दुय्यम, हीन, अपवित्र, कमजोर आहोत, या भावना बळावू लागतात. मग ही शिवाशिव पटत नसली तरी त्याला विरोध करण्याचा आणि एकूणच लढण्याचा आत्मविश्वास मुलगी गमावून बसते.
मी या विषयावर बोलतो तेव्हा, महिला सुरूवातीला मानसुद्धा वर करत नाहीत. पण जेव्हा मी माझ्या आईची घटना सांगतो आणि विषयाचं गांभीर्य समजावून सांगतो तेव्हा त्यांचा विश्वास बसतो. त्या सहभागी होतात. त्यांच्या मनातील समजुती कशा चुकीच्या आहेत हे पटवून योग्य काय हे सांगतो तेव्हा, मात्र त्या खुलतात आणि मोकळेपणे अडचणी मांडायला लागतात.
आदिवासी भागातील प्रश्न थोडे वेगळे आहेत. त्याबद्दल उद्या.
सचिन आशासुभाष 7709488286
समन्वयक - समाजबंध, पुणे.

दुष्काळी भागातल्या मुलांना ‘निरंजन’चा आधार

शिरूरकासार (जि. बीड) इथले जयश कासट १९९७ साली व्यवसायासाठी पुण्यात आले. व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर पुण्यातच स्थायिक झाले. तरी, गावचा लळा होताच. दुष्काळापायी झालेली गावातल्या शेतकऱ्यांची झालेली दुरवस्था जयश यांना बघवत नव्हती. सामाजिक जबाबदारी म्हणून आणि त्यांच्यासाठी काही करता येईल का यासाठी जयश सतत प्रयत्नशील असायचे. यातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचं पालकत्व घेण्याची कल्पना त्यांना सुचली. निरंजन सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. साल २०११. पहिल्यांदा, शिरूर कासारच्या पंचवीस मुलांना दत्तक घेतलं. गरजू मुलांना दत्तक घेण्याचा हा उपक्रम आत्तापर्यंत अविरत सुरू आहे. जयेश कासट म्हणाले, "ग्रामीण भागात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांची मुलं शिकली, तर त्या कुटुंबांचंभवितव्य बदलेल हा उद्देश ठेवून आम्ही मदत करतो. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढवत आहोत. यातून मानसिक समाधान मिळतं."
नगर जिल्ह्यातल्या १०० मुलांना दोन वर्षांपासून, पुणे जिल्ह्यामधील नांदगाव (ता. मुळशी) इथल्या ६० मुलांना पाच वर्षांपासून, रायगड इथल्या ९८ शेतकऱ्यांच्या मुलांना सहा वर्षांपासून शैक्षणिक मदत दिली जात आहे. पंचवीस मुलांपासून सुरू केलेला हा उपक्रम ५०० मुलापर्यंत पोचला आहे. हमाल, मापाडी यांच्या मुलांसाठीही कार्यकर्ते काम करत आहेत. रायगड जिल्हा परिषद शाळा हिरकणीवाडी इथल्या ९८ विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्त्व संस्थेने स्वीकारलं आहे. दत्तक घेतलेल्या मुलांना गणवेश, बूट, दप्तर, पुस्तके, वह्या आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. या सर्व मदतीचा खर्च 'निरंजन'चे सर्व सभासद स्वतःच करतात. जयेशसोबत विराज तावरे (बारामती), स्वप्नील देवळे (पुणे), अभय जाजू (सोलापूर), अतुल डागा (नगर), जगदीश मुंदडा (हडपसर), नवनीत मानधनी (धर्माबाद, नांदेड), ब्रम्हानंद लाहोटी, अमित गायकवाड, आनंद जाखोटीया, भरत लढे, प्रतिम जगताप (अमेरिका), रमेश तोष्णीवाल (लातूर) हे सर्व तरूण एकत्र आले आहेत.
यंदा (२०१९) राज्यभरातल्या एक हजार मुलांना आधार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
संपर्क
जयश कासट, ८००७८८४४८३
अध्यक्ष, निरंजन सेवाभावी संस्था, पुणे
----------
सूर्यकांत नेटके, अहमदनगर

"कोणावर उपकार नाहीत, हे माझं कर्तव्य आहे''.

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कडा गाव. वस्ती साधारण २८०० घरांची. मराठवाड्यातल्या इतर गावांप्रमाणे इथंही दुष्काळ, पाणीटंचाई. 
''शेतकरी आपला अन्नदाता. तो संकटात असताना आपण त्याला मदत केली पाहिजे.'' डॉ भूषण पाटील सांगत होते. डॉ पाटील पुण्यातल्या एका संस्थेच्या अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य. मुळचे ते कडा गावचेच. पुण्यात स्थायिक झाले असले तरी गावाशी ऋणानुबंध कायम. अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग. आताही पत्नी डॉ नंदिनी, मुलगा प्रणव आणि सून प्रियांकासह ते एप्रिलअखेर आले होते.
गावामधल्या चारा छावणीतल्या ७०० जनावरांसाठी त्यांनी गोळापेंडीचं वाटप केलं. किंमत पाच लाख रुपये. ही गोळापेंडी जनावरांना महिनाभर पुरेल. ''हे कोणावर उपकार नाहीत. हे माझं कर्तव्य आहे.'' डॉ अत्यंत आदरानं, प्रेमानं शेतकऱ्यांना सांगतात. लहानपणी एका शेतकरी कुटुंबानेच आधार दिला,त्याचं स्मरण कायम राहील, हे सांगताना त्यांचा कंठ दाटून येतो.
२०१३ मध्येही डॉ पाटील यांनी चारा छावण्यातल्या पशूंना दोन लाख रुपये किमतीचं मिनरल मिक्श्चर आणि चाऱ्याचं वाटप केलं होतं. येत्या ३०  मे रोजी ते सोलापूर जिल्ह्यातल्या करमळा तालुक्यातल्या विहाळ इथे जाणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी २३ टन पशुखाद्य देणार आहेत . त्यासाठी प्रॉव्हिडंट फंडातून ते पैसे काढणार आहेत. 

-राजेश राऊत, बीड

हरवलेल्या मुलांचा ‘वाटाड्या’

"काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. एक लाख रूपयांच्या मोबदल्यात दोन सख्ख्या भावंडांना विकण्याचा प्रकार घडला होता. काही सजग नागरिकांना अनोळखी मुलं दिसली. आणि त्यांनी आम्हाला कळवलं, आम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचलो, चौकशी केली, तेव्हा खरा प्रकार समोर आला". तत्वशील सांगत होते. बीडमधला मुलगा इतर राज्यात सापडलेला असो असो किंवा इतर राज्यातला, जिल्ह्यातला मुलगा बीडमध्ये सापडला असो. या मुलाला त्याच्या कुटुंबियांची भेट घालून देणारा तत्पर कार्यकर्ता तत्त्वशील कांबळे. काही वर्षांपूर्वी राजस्थानची दोन मुले कुटुंबियांनी हैदराबादेत कामासाठी पाठवली होती. बांगड्यांच्या कारखान्यात ही मुलं कामाला होती. त्यांच्याकडून रात्रंदिवस काम करवून घेत, मारहाण केली जायची, चटके दिले जायचे हे सगळं असह्य झाल्याने मुलांनी तिथून पळ काढला ते थेट परळीत आले. प्रकरण आमच्यापर्यंत आलं. त्यांच्या कुटुंबियांशी बाेलणं झालं. आठवडाभराने त्यांचे पालक आले आणि त्यांना घेऊन गेले. 
तत्त्वशील सांगतो, “शासनाने चाइल्डलाइन सुरू करण्यापूर्वीच छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून बालकांसाठी काम करत होतो. बालकांचे हक्क, त्यांच्या समस्या, बालमजूर, बालविवाह यांच्यासाठी काम करताना सन २०१२ ते सन २०१६ या काळात चाइल्डलाइनसोबत काम करण्याची संधी मिळाली. देशभरातील स्वयंसेवी संस्था, चाइल्डलाइनचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क आला. आता बीड जिल्ह्यातील किंवा इतरत्रही कुठलाही मुलगा कोणत्याही राज्यात सापडला तरी मला हमखास फोन येतोे.
तत्त्वशील कांबळे यांनी बालसंरक्षण अधिकारी, बालन्याय मंडळाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. सध्या ते बीड जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य आहेत. कांबळे म्हणतात, “अनेक मुलांच्या बाबतीत वाईट प्रसंग घडलेले असतात. पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन स्माइल या सर्व उपक्रमांत आम्ही सहभागी होतो.”
बीड जिल्ह्यात आता टाकून दिलेल्या बाळांचा नवा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. एप्रिल २०१९ या महिन्यांत दोन ते तीन अशी प्रकरणे घडली. या मुलांनाही बालकल्याण समितीमार्फत शिशूगृहात पाठवलं गेलं. आतापर्यंत शेकडो मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचवलं. आई, वडिलांच्या भेटीनंतर या मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य हाच मोठा पुरस्कार, समाधान आहे, असं तत्त्वशील सांगतात.
- अमोल मुळे, बीड
तत्त्वशील कांबळे यांचा संपर्क क्र. - 9423470437

आदिवासी ‍‍‍शेतकऱ्याने पावसाचं वाया जाणारं पाणी साठवलं, पाणीवापराची आचारसंहितासुद्धा केली

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका अतिदुर्गम, सातपुड्याच्या डोंगरदर्‍यात वसलेला आहे. या भागात अनेक नद्याचां उगम आहे. मात्र, इथे पडणारं पावसाचं पाणी वाहून जातं. त्यात, गेल्या पाच वर्षापासून पर्जन्यमान कमी झालेलं. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ. या भागातलं वाहून जाणारं पाणी साठवून ठेऊन त्याचा उपयोग करायचा, अशी कल्पना काकरदा ता.धडगाव इथल्या वसंत पाडवी या आदिवासी शेतकऱ्याला सुचली. त्यांनी आपल्या शेजारील आठ-दहा शेतकर्‍यांना एकत्र केलं आणि शासनाच्या सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेतला. मात्र त्यात मिळणाऱ्या अनुदानात त्यांना पाहिजे त्या आकाराचं तळं तयार होणार नव्हतं, हे लक्षात आलं. मग त्यांनी स्वतःकडचे पैसे टाकून जवळपास ४० गुंठे क्षेत्रात शेततळं तयार करुन त्यात हजारो लिटर पाणी साठवलं. त्यांनी पाणी वापरण्याची आचारसंहिताही तयार केली, हे विशेष. नियमानुसार, प्रत्येक शेतकऱ्याला एका दिवसाआड २० मिनिटं पाणी दिलं जातं. मात्र, पाणीबचतीसाठी या शेतकऱ्यांनी ठिबक, ड्रीप, स्प्रिंकल किंवा तुषारसिंचनासारख्या पद्धतींचा वापर करणं आवश्यक आहे. या भागातील कृषीअधिकारी आर.एम.पाडवी यांनी ही वॉटर बँक घडवून आणण्यात मदत केली. 
या पाण्यावर सीताफळ, आंबा, आवळा, काजू, या सारखी पिकं, भाजीपाला घेऊन शेतकर्‍यांनी आपल जीवनमान सुधारलं आहे. सामूहिक मत्स्यशेतीही केल्याने या शेतकर्‍यांचा या वॉटर बँकेचा देखभाल दुरुस्तीचा खर्च निघाला. आणि ४० हजार रुपये नफादेखील झाला.
- रूपेश जाधव, नंदुरबार

अन्नदात्यासाठी अन्नछत्र, सदा आबाची ऐका वाणी (भाग १४)

दुष्काळ पोळतोय. हजारो जनावरे चारा छावण्यांमंधी हाईत. पर छावणीवर गुरांसाठी आलेल्या शेतकऱ्याला दोन घास मिळतील का न्हाई हा प्रश्न कायम हाई. छावणीवर मुक्कामी असलेल्यांना आज संकटात दोन घास देण्याचे काम होतयं शांतीवनच्या पाच ठिकाणच्या मदत केंद्रात. जगाचा पोशिंदा शेतकरी अन‌् त्याच्या पोटाची सोय बघायची, हे जरा विपरितच. पर अन्नदाता अडचणीत असंल तर त्याच्यासाठी गेलंच पाहिजे, ही ‘शांतीवन’ची भूमिका. 
शिरुर ह्यो मराठवाड्यातील सर्वात कमी पाऊस झालेला तालुका. त्यामुळे पाणी व चारा टंचाई ठरलेली. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू हाईत. पाडळी, वंजारवाडी, काकडहिरा, थेरला आणि वडझरी या गावच्या छावणीत शांतीवन संस्थेने शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उभारलयं. या केंद्रामधी जनावराकड शेतकऱ्यासाठी अन्नछत्र सुरु केलयं. दररोज रात्री इथं शेतकरी, शेतमजूरांची पंगत होते. पाच ठिकाणच्या या अन्नछत्राने तीन हजारांवर शेतकऱ्यास्नी आधार दिलायं..
‘शांतीवन’चे दीपक नागरगोजे म्हणतात, ‘छावण्यांत जनावरांकडे पाहण्यासाठी शेतकऱ्याला मुक्कामी थांबावे लागते. हे शेतकरी परिसरातील चार पाच गावचे असतात. त्यामुळे कधी गावाहून जेवणाचा डबा येतो तर कधी शिळे अन्नच खावे लागते, अशी स्थिती. त्यामुळे पाच ठिकाणी अन्नछत्र सुरू केलयं. मानूर, लोणी, वारणी, नांदेवाली या गावांमध्ये अन्नछत्र सुरू होणार आहे.’
याच कामासाठी झटणारे ‘सेवाश्रम’चे सुरेश राजहंस म्हणाले, ‘केवळ अन्नछत्र करून आम्ही थांबलो नाही तर शेतकऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्या, आत्महत्या करू नये म्हणून समुपदेशन, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत आहोत. हे सारे सामाजिक जाणीवेतून.’
...तर दोस्तहो दुष्काळ चटके देतोय पर माणुस माणसाला साथ देतोयं. शांतीवनचे अन्नछत्र बळीराजास्नी धीर देतयं. दुष्काळाम्होरं न झुकता लढ म्हणत... 
- अमोल मुळे, बीड 

माणसांनी गावं सोडली. वस्त्यांमधील घरांना कुलुपं लागली.

राणीऊंचे गाव, ता घनसांगवी, जि जालना. दुष्काळझळांचा पहिला फटका बसतो, शेतमजुरांना. शेतात पिकं असतील, तर काही कामं मिळतात. रोजंदारीचा प्रश्न सुटतो. राणीऊंचे गावात पाऊसच खूप कमी झाला त्यामुळे पेराच झाला नाही. ३०/४० एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचा सांभाळ कसा करावा हा प्रश्न. पावसाच्या भरवश्यावर लावलेल्या तुरीला शेंगासुद्धा आल्या नाहीत. मग त्याच्या पळहाट्या तोडून त्याची पेंढ करून त्या जनावरांना टाकत आहे. राणीऊंचेगाव परिसरात अडीच हजार हेक्टर जमीन, पण पावसाने दगा दिल्यानं जेमतेम १५/२० हेक्टर मध्ये ज्वारीचं पीक हाती लागलं. गावात काम नसल्याने लोकांनी गाव सोडण्यास सुरुवात केली आणि बंजारा,भिल वस्ती रिकामी होऊ लागली. काही कुटुंब उसतोडीसाठी गेली. काही शहराकडे कामधंद्यासाठी गेली. त्यामुळे या कुटुंबातल्या मुलांना शाळा सोडावी लागली. आधी पोटोबा, या तत्वानुसार मुलांबळांसह लोकांनी गाव सोडले . त्यामुळे पहिली कुर्‍हाड पडली ती मुलांच्या शिक्षणावर. गावात नरेगाची कामंही नाहीत. राणीऊंचे गावात एक आश्रम शाळा, एक जिल्हा परिषदेची शाळा. माणसांनी गावं सोडली. वस्त्यांमधील घरांना कुलुपं लागली.
- अनंत साळी, जालना

कुटुंबाचा कर्ता गेला, 'युवा फाऊंडेशन'ने मदतीचा हात दिला

नांदगाव तालुक्यातील ढेकू. इथल्या तांड्यावर राहणारा मोतीलाल पवार. अवघा ३० वर्षांचा. घरी अठरा विश्व दारिद्र्य. केवळ उसतोडी आणि अपंग अपत्यांकडून भिक्षुकी करत कुटुंबाचा चरितार्थ पवार कुटुंब रेटत होतं. आर्थिक विवंचनेतून आलेल्या नैराश्याने विषारी औषध घेऊन मोतीलालने १३ एप्रिल रोजी आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने औरंगाबाद येथील घाटी (ग्रामीण रुग्णालयात) दाखल केलं होतं. उपचार सुरू असतानाच दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता.
कर्ता, संपूर्ण कुटुंबाची मदारच ज्याच्यावर होती, तोच मुलगा गेल्याने कुटुंबच उघड्यावर पडलं. आता पुढं काय? मोतीलालच्या आईसह अन्य दोन सदस्य हे रातआंधळेपणाने त्रस्त आहेत. हे सगळं कळल्यानंतर ‘युवा फाऊंडेशन’ या संस्थेने मोतीलालच्या कुटुंबाची झालेली वाताहत समाजमाध्यमातून सर्वांसमोर आणली. पवार कुटुंबियांसाठी मदतीचं आवाहन केलं. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मदतही केली.
ठाण्यातील शिक्षक शिवाजी राठोड यांनी त्या कुटुंबातील तीन मुलांच्या शिक्षणाची, तर प्रहार संघटनेचे दत्तू बोडखे यांनी संपूर्ण कुटुंबियांची वैद्यकीय जबाबदारी अंगावर घेतली. दरम्यान, किराणा सामान, धान्य आणि चार हजार रुपये रोख युवा फाऊंडेशनने पोचवले. तसंच पुढचे सहा महिने दरमहा एक हजार रुपये या कुटुंबियांना देण्यात येणार आहेत. यासाठी फाऊंडेशनच्या फिरोज शेख, विक्रांत कवडे, प्रदीप सिसोदिया, विजय चोपडा, गोविंद फोफलिया,संजय पटेल, प्रशांत माळी, मोहन जेजुरकर, कृष्णा थोरात, डॉ.अतुल नावंदर , डॉ.उदय मेघावत, सिध्दार्थ पवार, दीपक घोडेराव आदींनी मदत केली.
- प्राची उन्मेष, नाशिक

१७६ मुलींचे आबा


उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातलं सावरगाव. लोकसंख्या ५ हजाराच्या घरात. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येचं एक कारण म्हणजे लग्नसमारंभांमुळे वाढलेला कर्जाच बोजा. किमान या कारणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागू नयेत, यासाठी काहीतरी केलं पाहिजे , असं रामेश्वर तोडकरी यांना वाटलं. तोडकरी सावरगावचे सरपंच. काँग्रेसचे नेते. परिसरातले सगळे त्यांना आबा म्हणून ओळखतात. गेल्या ११ वर्षात त्यांनी १७६ गरीब मुलींची लग्न लावली आहेत. त्यात पत्नी स्वातीताईंची साथ आहे. त्या माजी पंचायत समिती सदस्य. यंदाही जानेवारीअखेरीला श्री पार्श्वनाथ दिगंबर संस्तुती भवनाच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळा रंगला. 'हुंडा घेणार नाही-हुंडा देणार नाही', 'मुली वाचवा, मुली शिकवा,' फलक लग्नमंडपात लावलेले, सामाजिक जागृती करणारे. यासाठी, कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा ते ठेवत नाहीत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी ते या सोहळ्याचं आयोजन करतात.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष बोबडे यांचंही सहकार्य यासाठी लाभतं. 
- अनिल आगलावे, उस्मानाबाद

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका: एक बळी (आखुडबुद्धी बहुशिंगी)

पुणे, दि.१८ : पुणे येथे चालू असलेल्या टोळीयुद्धानं आणखी उग्र रूप धारण केलं असून त्यात काल आणखी एक बळी गेला. या घटनेत आणखी एक जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहेत असे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेमागे 'बेधुंद मनाची प्रीत ही वेडी' गटाचा हात असल्याचे कळते. मृत व्यक्तीचे खरे नाव अद्याप कळले नसून त्याचे शब्दमिञ बन्नू कुरणे हे टोपणनाव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. शब्दमिञ 'हे चंद्रसजणांचे झुरणे' या विद्रोही टोळीचा कवी होता. अधिक सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना अशी घडली-
गेली कित्येक वर्षे कवीसंमेलनातल्या काव्यगायनावरून या दोन टोळ्यांत संघर्ष चालू आहे. शब्दमिञने आपल्या कविता ऐकवून 'बेधुंद मनाची प्रीत ही वेडी'गटाच्या दोन नवकवींना 'टपकवले' असल्यानं त्याचा मोठा दरारा विद्यापीठ ते संचेती पूल या परीसरात होता. साहित्यसंघात आलेल्या व्याख्यात्याला आपल्या कविता ऐकवून अर्धमेलं केल्यापासून हा शब्दमिञ पुणे ग्रामीण पोलिसांच्या रडारवर होता. कित्येक लोक शब्दमिञला पाहताच सभामंच सोडून पळून जात. एकदा निवडणुकीच्या भाषणावेळी स्टेजचा ताबा घेऊन त्यांनी त्या पुढाऱ्याला पाडलं होतं. (त्यात त्याचं डिपॉझीटही जप्त झालं होतं.) शिवाय रात्रीअपरात्री भेटलेल्या एकट्या वाचकास पुस्तकांचा धाक दाखवून लुटणं (किंवा कविता ऐकवणं) असेही गंभीर गुन्हे त्याच्या नावावर नोंदलेले होते.
काल दुपारी तो शिवाजीनगर परिसरात आपल्या साथीदारांसोबत येणार असल्याची टीप 'बेधुंद मनाची प्रीत ही वेडी' गटाच्या कवींना मिळाली. या गटाचा शार्पशूटर हुळहुळते डोह आणि शपथ डोळ्यांची येथे दबा धरून बसले होते. त्याशिवाय चांदणे उन्हाचे आणि चरणलीलामृत ही दुक्कलही डबा धरून बसली होती. शासकीय अधिनियम या मित्राच्या दुचाकीवर बसून शब्दमिञ येणार असल्याची खबर होती. शासकीय अधिनियम हा आपल्या नावाच्या विपरीत, म्हणजे सर्व नियम पाळणारा असल्यानं तो लोकमङ्गलच्या सिग्नलला थांबणार हे नक्की होतं. त्याचा फायदा घेऊन त्याची दुचाकी थांबताच चांदणेने दुचाकीच्या चाकासमोर आपला कवितासंग्रह फेकला. कवितासंग्रहातील एक कवितेचं पान उलगडलं गेलं पण ते शासकीय अधिनियमने वाचण्यापूर्वी शब्दमिञला जीवाच्या धोक्याची कल्पना आली. त्यानं अधिनियमला ओरडून-
"धाव वेड्या, शत्रूचा असे दात
हाय! दैवानं कसा केला घात"
असे सांगत पळायचा प्रयत्न केला. शब्दमिञच्या पाठून आलेल्या चांदणेने शब्दमिञवर चाल केली तसे तो त्याला चुकवत शिमला ऑफिसच्या दिशेने पळाला. चांदणेने केलेला वार अधिनियमच्या वर्मी लागून तो जखमी होऊन जागीत विव्हळत पडला. शब्दमिञ शिमला ऑफीसच्या फूटपाथपर्यंत पोचला तोच दुर्दैवानं त्याच्या नजरेस तिथं उभा असलेला जाहीरातीचा बोर्ड पडला. शब्दमिञची नजर पडताच त्या बोर्डवरची 'माझ्या गळणाऱ्या केसांचे रहस्य आहे…' ही अक्षरं गळून पडली. त्यामुळं भांबावलेला शब्दमिञ किंकर्तव्यमितीमूढ अवस्थेत त्या जाहीरातीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही शार्पशूटरनी त्याला टिपलं. दोघेही यमकांत निपुण असल्यानं त्यांच्या माऱ्यापुढं शब्दाचे बुडबुडे अजिबात चालले नाहीत.
चौकात ड्यूटीवर असलेल्या पोलिस शिपाई दयावान चिंधडे यांनी हा प्रकार पाहून शपथ डोळ्यांचीला अडवायची धडपड केली. त्यांच्या 'धडपड'ला उत्तरादाखल गडबड, बडबड, परवड, गप्पपड, वरचढ, यमदाढ अशी अंदाधुंद यमकावली करत शपथ डोळ्यांची पळून गेला. हुळहुळते डोहला नागरिकांनी पकडायचा प्रयत्न केला पण खिशात असलेल्या रसग्रहणात्मक पुस्तकाची दहशत दाखवत त्यानं पळ काढला. हल्लेखोर गणेशखिंडीच्या दिशेने पळाल्याची खात्री होताच काही जागरूक, धीट नागरीकांनी सीओइपीच्या पिछाडीस जोरदार कोंबिंग ऑपरेशन केलं. त्यात त्यांना तीन ऊवा मिळाल्या.
यानंतर, बराच काळ लोकमङ्गल परीसरात भीतीचे वातावरण होते. जागोजागी लोक घोळक्यानं उभं राहून चर्चा करत होते. ते कवी आहेत असं वाटल्यानं वातावरणात ही दहशत पसरली होती.

- ज्युनिअर ब्रह्मे

कन्याजन्माचा उत्सव करणारं रुग्णालय

रंगबेरंगी फुग्यांची सजावट, महिलांची लगबग, फुलांचे गुच्छ, मिठाईचं वाटप. हा माहोल आहे बीड जिल्हा रुग्णालयातल्या प्रसूतीकक्षातला.. कन्याजन्माचं या रूग्णालयात असं स्वागत केलं जातं. यासाठी खास दालनच रूग्णालयात तयार केलं आहे.
नऊ वर्षांपूर्वी देशात सर्वात कमी स्त्री जन्मदर आणि स्त्री भ्रूणहत्यांची उघड झालेली प्रकरणं यामुळे बीड जिल्हा चर्चेत होता. त्यावेळी सुरू झालेली स्त्री जन्माबाबतची जनजागृती आजही सुरूच आहे. बीड जिल्हा रूग्णालयानेही कन्याजन्माचा उत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सन २०१८-१९ मध्ये जिल्हा रुग्णालयात सुमारे साडेचार हजार मुलींचा जन्म झाला आहे. शासकीय योजनांतून काही मदतही पात्र लाभार्थ्यांना होत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक थोरात म्हणतात, “९ वर्षांनंतर आज परिस्थिती बदलली आहे. ७०० पर्यंत गेलेला स्त्री जन्मदर ९३८ पर्यंत आला आहे. परंतु, अजूनही ‘मुलगी नको’ ही मानसिकता आहेच. त्यामुळेच, जनजागृती सुरूच ठेवावी लागते. म्हणूनच मुलगी झाल्याचा आनंद रुग्णालयातच साजरा करण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. प्रसूतीकक्षाजवळ एक दालन सजवून ठेवलेलं असतं. मुलगी जन्माला आली की त्या जोडप्याला या दालनात नेलं जातं. तिथं त्यांचा सत्कार केला जातो. मिठाई दिली जाते. हे सगळं आमच्या अधिपरिचारिका विजया सांगळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर परिचारिका करतात. ही कृती छोटी असली तरी मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचा संदेश देणारी आहे.”
नुकताच (14 मे) मोहिनी नाईकवाडे यांनी जिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यांचं हे पहिलंच अपत्य. कुटुंबियांच्याही आधी जिल्हा रुग्णालयाने या बाळाचे केलेले स्वागत हा एक सुखद अनुभव असल्याचं मोहिनी यांनी सांगितलं.
अधिपरिचारिका विजया सांगळे सांगत होत्या, "मुलगा झाला की अनेकदा प्रसूतीकक्षात नातेवाईकांकडून पेढे, मिठाईवाटप होतं. पण मुलगी झाल्यावर हे घडतंच, असं नाही. यातूनच मुलीबाबत नकाेशी मानसिकता सहज लक्षात येते. हेच चित्र बदलण्यासाठी कन्याजन्माचाही उत्सव व्हावा, ही कल्पना पुढं आली. आता रोज हा उत्सव साजरा होत आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुखदेव राठोड म्हणाले, “एखाद्या दांपत्याला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या चेह-यावर नाराजीचे भाव दिसायचे. पण, मुलगी होताच उत्सव साजरा होत असल्याने आता त्यांच्या चेह-यावर आनंद दिसतो. मुलींच्या एकत्रित नामकरणाचा उपक्रमही रूग्णालय आणि स्व. झूंबरलाल खटोड प्रतिष्ठानच्या वतीने राबवला जातो. विविध उपक्रमातून स्त्रीजन्माचं स्वागत करा असा संदेश दिला जात आहे.”
- अमोल मुळे, बीड

माझीही सामाजिक जाणिवेची, समंजस कृतीची 'उमेद' नेहमीच नव्या दमाने तेवत रहावी.

नवी उमेदने मला माझ्याचकडे नव्याने पहायला उमेद दिली. फेसबुकवर लेखन करताना सुरूवातीला मी माझी खरी ओळख लपवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे. माझे अनुभव सर्वसामान्य मुलींसारखे नक्कीच नाही याची वाचकांना कल्पनाही आली होती. माझं फेसबुकवरचं लिखाण कधी मनस्वी, तत्वज्ञान, कधी मिश्किल, बोल्ड. कुमारी मातांचे अनुभव तर कधी बालगृहांकडे पाहण्याचा सर्वसामान्य देणगीदारांचा पाहण्याचा दृष्टिकोन यावर माझं लेखन. मेधाताईंनी नवी उमेद पेजवर माझ्या व्यक्तिगत अनुभवांपासून अनाथ मुलांच्या हक्कांवर काम करण्यापर्यंतचा प्रवास लिहायला सांगितला आणि मी विचारात पडले.
मी खूप पर्सनल कसं लिहू? मी पाहिलेली अनाथलयातील बाळं, कुमारीमाता, परितक्त्या, अनाथपणाची जाणीव, बोच, आत्मक्लेश आणि त्यातून अनाथपणाच्या व्यापकतेला समजून घेण्यासाठीची माझी धडपड, पडझड हे सगळं 15 भागांमध्ये बसेल का? आणि हे सगळं लिहिण्याची मी हिंमत करेन का? जे लेखन केवळ माझ्या पर्सनल डायरीपुरतं सीमित असायचं ते आता सर्वांना उघड करायचं? माझी खरी ओळख अनाथआरक्षणाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या चर्चांमधून व्हायला सुरूवात झाली होती. जे 'लेबल' घेऊन जगायचं नव्हतं, तेच या ना त्या कारणाने वाट्याला येणारच आहे हे सत्य मला आता नाकारून चालणार नव्हतं. अनाथपणाची सहानुभूती न मिळवता स्वतःला समाजाच्या अनेक आघाड्यांवर सिद्ध करताना माझी होणारी दमछाक, कुतरओढ हे शब्दात व्यक्त करणं कठीण होतं. त्याचबरोबर, अनाथ मुलांचे खरे प्रश्न, त्यांना सहानुभूतीपेक्षा स्वाभिमान, आत्मसन्मान, स्वओळख हवी, त्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार आणि सजग, समंजस समाजाची नितांत आवश्यकता आहे सर्वांना सांगणं अत्यावश्यक होतं. त्यासाठी मी जे स्वतःला वारंवार झाकत होते ते उघडं करणं भाग होतं.
नवी उमेदसाठी पहिला भाग लिहून झाल्यावर वाटलं, शक्य नाही स्वतःला आलेल्या अनुभवांना पुन्हा सामोरं जाणं. जसेच्या तसे प्रसंग लिहिताना कमालीच्या अवस्थतेने मला ग्रासलं होतं. बऱ्याचदा स्वतःपासून लांब जावसं वाटायचं. हे लेखन पूर्ण न करण्यासाठी मी उमेद टीमला अनेक भन्नाट कारणं देत असे. एकेक लेख लिहिताना ते प्रसंग नव्याने जगत आहे असं झालं मला.
नवी उमेदवर लेख प्रसिद्ध व्हायला लागले तसे अनेक फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या. खूप चांगला, संवेदनशील वाचक वर्ग नवी उमेदकडे आहे याचीही जाणीव व्हायला लागली. इतकंच नव्हे, तर दोन तीन प्रकाशकांनी यावर पुस्तक लिहा, आम्ही छापू असंही सुचवलं.
नवी उमेदमुळे खूप माणसंही जोडली गेली. लोकं इनबॉक्समध्ये येऊन प्रत्यक्ष भेटूनही गेली. माझ्या मिरजेतल्या 'प्रतिगामी' विचारांच्या मैत्रिणींनाही अचंबा वाटला. ज्या मुलीची, तिच्या एकूण कपड्यांची, अवताराची आपण लहानपणी हाडतूड करायचो, किंमत द्यायचो नाही, सोयीस्कर लांब ठेवायचो, चेष्टा करायचो ती इतकं काही लिहू शकते, हा त्यांना पडलेला प्रश्नही त्यांनी बिनधास्त इनबॉक्समध्ये येऊन विचारल्यावर मला नवी उमेदचे किती आभार मानू किती नको असं झालं होतं.
मी स्वतःची ओळख त्यानंतर कधीच लपवली नाही. स्वतःची ओळख सांगण्यासाठी जी भीड माझ्या मनात कायम ठाण मांडून असायची ती नवी उमेदने अक्षरशः मुळासकट उपटून काढली.
त्यानंतर नवी उमेद पेज वाचत राहिले. अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणे, पणती तेवत ठेवणे ही काळाची गरज आहे, ही नवी उमेदची दूरदृष्टी मनाला फारच स्पर्शून गेली. मला जेव्हढं शक्य होईल तेव्हढं तर नवी उमेदच्या कार्यात सहभागी होईनच. शेवटी माझीही ही सामाजिक जाणिवेची, समंजस कृतीची 'उमेद' नेहमीच नव्या दमाने तेवत रहावी.
- गायत्री पाठक, पुणे

मुलं सांगताहेत, "पाणी वाचावा हो..."

''आंघोळीसाठी आवश्यक तेवढेच पाणी घ्या.''
''साठवलेले पाणी फेकू नका. ''
''पाण्याचा नळ दुरुस्त करा. ''
''प्यायला आवश्यक तेवढंच पाणी घ्या. "
''वाहनं ओल्या कपड्यानं पुसा''.
''हात धुण्यासाठी वापरलं जाणारं पाणी झाडांना मिळेल अशी व्यवस्था करा ''.
''कपडे धुण्याचं पाणी स्वच्छतागृहासाठी वापरा.''
घरोघरी जाऊन बीड जिल्ह्यातली जवळपास ६० हजार मुलं या सूचना देत आहेत. मुलं ५ वी ते ८ वीची. गेली काही वर्ष बीड जिल्हा सातत्यानं दुष्काळाचे चटके सहन करत आहे. यंदा तर सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झालाय. पाणीबचतीचं महत्त्व मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी सरसावले आहेत बीड जिल्हा भारत स्काऊट -गाईड आणि जिल्हा परिषद.
''पाणी ही राष्ट्राची संपत्ती. बालवयातच हे महत्त्व समजायला हवं, तरंच जलअपव्यय टाळता येऊ शकेल. '' भारत स्काऊट आणि गाईडचे राज्य आयुक्त संतोष मानूरकर सांगतात.
जलदिनापासून म्हणजे २२ मार्चपासून जलअभियान सुरू झालं. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ते चालणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मुलांना पाणीबचतीचे धडे दिले जात आहेत. त्याचबरोबर १०० पानांची स्वतंत्र वही. तिचं नाव पाणी बचत बँक पुस्तिका. पहिल्या कॉलममध्ये दिनांक,वार, दुसऱ्यात पाणीबचतीचा तपशील, त्यासाठी राबविलेला उपक्रम, तिसऱ्या कॉलममध्ये किती लीटर पाणी बचत केली?, चौथ्या कॉलममध्ये पालकाची स्वाक्षरी. शेवटच्या पानावर पाणी उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा अभिप्राय घेऊन स्वाक्षरी घ्यायची आहे. मुख्याध्यापकांना १५ ऑगस्टपर्यंत स्काऊट-गाईड कार्यालयाला अहवाल सादर करायचा आहे.
सर्वाधिक जलबचत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या उपक्रमांचं परीक्षण होईल. त्यातून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं दिली जाणार आहेत.
या उपक्रमासाठी नवी उमेदतर्फे सर्व मुलांना शुभेच्छा. 
-दिनेश लिंबेकर, बीड

सामान्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारं नवी उमेद (वाचक अभिप्राय)

'नवी उमेद' हे शीर्षकच अप्रतिम आहे. रोज नव्या कथा, लेख आणि बातम्यांमधून आपण लोकांना उभारी देण्याबरोबरच सामान्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देता. त्यासाठी तुमच्या टीमला शतश: धन्यवाद! नवी उमेदच्या अतिशय वेगळया पद्धतीनं काम करण्याच्या अशा लेखन शैलीमुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झालं आहे. सतत नाविन्य हे उमेदचं वैशिष्ट्य. सकस आणि दर्जेदार लेखन ही जमेची बाजू. यातील लेखांचा आकार कमी असल्यामुळे आणि त्यातील भाषा सामान्य माणसाला समजेल अशी असल्यामुळे ते सहज वाचून होतात. नवी उमेदच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रमांची ओळख आपण करून दिलीत. त्यातून अनेकांचं आयुष्य नक्कीच बदलायला मदत झाली आहे. काही कथा वाचून सुन्न व्हायला झालं तर काही कथा प्रेरणादायी अशा आहेत. या माध्यमातून सामान्य माणसाला एक चांगला मंच तुम्ही उपलब्ध करून दिला त्यामुळे अनेकांना व्यक्त होता आलं. इथे सामाजिक भान जपलं जातं. जगण्याची नवी उमेद मिळते.
काही बाबींचा उल्लेख व्हायलाच हवा. आपल्या खासदारांची लोकसभेतील कामगिरी त्यांच्या प्रगतीपत्रकाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवली. त्यासाठी आपण मिळवलेली माहिती आणि तपशिल अचूक होते. त्याचा उपयोग लोकसभा निवडणुकीच्यावेळी योग्य उमेदवार निवडताना मतदारांना नक्की झाला असणार. बीड जिल्ह्यातील कडा गावातल्या तरूणांचा 'एक घास एक घोट' हा वन्यजीवांसाठीचा उपक्रम स्तुत्य असून त्याचं अनुकरण इतरत्रही बघायला मिळतंय. यकृताचा त्रास असलेले छोटुलाल पाटील आणि त्यांना यकृत देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी साधनाबेन यांची गोष्ट याला आपण प्रसिद्धी दिलीत त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. अवयवदान चळवळ समाजात रूजायला हवी. त्यासाठी आपण मार्गदर्शन करावं. स्वत:च्या तुटपुंज्या मिळकतीतून आणि देणगीदारांच्या सहकार्यातून 'सावित्रीबाई फुले मुकबधीर विद्यालय' सुरू करणाऱ्या धुळ्यातील आशाताईंच्या कार्याला सलाम.
'सदा आबाची ऐका वाणी' सदरातील सर्वच लेख वाचनीय असतात. मात्र सातपुड्याच्या डोंगर रांगातील दडलेलं भयाण वास्तव वाचून अंगावर काटा आला. पंधरा दिवसांनी अंघोळ आणि पातळ भाजी आहारातून बाद ही कल्पना सहन होत नाही. उपक्रमशील शिक्षक आणि शाळांची माहिती अनेक शिक्षकानां दिशादर्शक ठरू शकते. शिक्षणाच्या वारीचीही दखल घेत प्रसिद्धी देण्याचं मोठं काम आपण केलं. सुप्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार यांचे स्मृतिदिन आणि जन्मदिन तसंच दिनविशेष यांची माहिती अतिशय उपयुक्त अशी आहे. वेड्यांना जवळ करणारे अकोल्यातील ध्येयवेडे पुरूषोत्तम शिंदे यांचं कार्य आणि त्यासाठीची त्यांची अशा व्यक्तिंप्रतीची तळमळ यांसाठी शब्द अपुरे आहेत. नांदेडचे डॉ. किशोर अतनूरकर यांनी आठवीच्या मुलग्यांशी साधलेला लैंगिकतेसंदर्भातला संवाद आणि त्यातून मुलांचं झालेलं लैंगिक शिक्षण हा आपला अनोखा प्रयोग छान होता. यातून त्यांच्या मनातील शंकांचं निरसन झालं. बीडमधील बस स्थानकावर गोरगरीबांना खिचडी वाटप करणाऱ्या भागवत सानप यांना देवदूतच म्हणायला हवं. पाखरांसाठी ज्वारीचं शेत राखून ठेवणारे पाटोद्यातले रामेश्वर गोरे यांना खऱ्या अर्थानं आधुनिक काळातील संत तुकाराम म्हणायला हवं. पालकत्वावरची विशेष लेखमाला खूप काही शिकवून गेली.
सगळ्याच गोष्टींचा धांडोळा घेणं शक्य नाही.
तीन वर्षाच्या काळातील आपलं काम आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे वाचकांना आवडलंय. असंच सकस आणि ताजं लेखन द्या. असेच वेगळे विषय घेऊन या. शून्यातून विॆश्व निर्माण करणाऱ्या युवकांच्या गोष्टींनाही जागा द्या.
- मच्छिंद्र बोऱ्हाडे