Wednesday 5 June 2019

माझीही सामाजिक जाणिवेची, समंजस कृतीची 'उमेद' नेहमीच नव्या दमाने तेवत रहावी.

नवी उमेदने मला माझ्याचकडे नव्याने पहायला उमेद दिली. फेसबुकवर लेखन करताना सुरूवातीला मी माझी खरी ओळख लपवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे. माझे अनुभव सर्वसामान्य मुलींसारखे नक्कीच नाही याची वाचकांना कल्पनाही आली होती. माझं फेसबुकवरचं लिखाण कधी मनस्वी, तत्वज्ञान, कधी मिश्किल, बोल्ड. कुमारी मातांचे अनुभव तर कधी बालगृहांकडे पाहण्याचा सर्वसामान्य देणगीदारांचा पाहण्याचा दृष्टिकोन यावर माझं लेखन. मेधाताईंनी नवी उमेद पेजवर माझ्या व्यक्तिगत अनुभवांपासून अनाथ मुलांच्या हक्कांवर काम करण्यापर्यंतचा प्रवास लिहायला सांगितला आणि मी विचारात पडले.
मी खूप पर्सनल कसं लिहू? मी पाहिलेली अनाथलयातील बाळं, कुमारीमाता, परितक्त्या, अनाथपणाची जाणीव, बोच, आत्मक्लेश आणि त्यातून अनाथपणाच्या व्यापकतेला समजून घेण्यासाठीची माझी धडपड, पडझड हे सगळं 15 भागांमध्ये बसेल का? आणि हे सगळं लिहिण्याची मी हिंमत करेन का? जे लेखन केवळ माझ्या पर्सनल डायरीपुरतं सीमित असायचं ते आता सर्वांना उघड करायचं? माझी खरी ओळख अनाथआरक्षणाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या चर्चांमधून व्हायला सुरूवात झाली होती. जे 'लेबल' घेऊन जगायचं नव्हतं, तेच या ना त्या कारणाने वाट्याला येणारच आहे हे सत्य मला आता नाकारून चालणार नव्हतं. अनाथपणाची सहानुभूती न मिळवता स्वतःला समाजाच्या अनेक आघाड्यांवर सिद्ध करताना माझी होणारी दमछाक, कुतरओढ हे शब्दात व्यक्त करणं कठीण होतं. त्याचबरोबर, अनाथ मुलांचे खरे प्रश्न, त्यांना सहानुभूतीपेक्षा स्वाभिमान, आत्मसन्मान, स्वओळख हवी, त्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार आणि सजग, समंजस समाजाची नितांत आवश्यकता आहे सर्वांना सांगणं अत्यावश्यक होतं. त्यासाठी मी जे स्वतःला वारंवार झाकत होते ते उघडं करणं भाग होतं.
नवी उमेदसाठी पहिला भाग लिहून झाल्यावर वाटलं, शक्य नाही स्वतःला आलेल्या अनुभवांना पुन्हा सामोरं जाणं. जसेच्या तसे प्रसंग लिहिताना कमालीच्या अवस्थतेने मला ग्रासलं होतं. बऱ्याचदा स्वतःपासून लांब जावसं वाटायचं. हे लेखन पूर्ण न करण्यासाठी मी उमेद टीमला अनेक भन्नाट कारणं देत असे. एकेक लेख लिहिताना ते प्रसंग नव्याने जगत आहे असं झालं मला.
नवी उमेदवर लेख प्रसिद्ध व्हायला लागले तसे अनेक फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या. खूप चांगला, संवेदनशील वाचक वर्ग नवी उमेदकडे आहे याचीही जाणीव व्हायला लागली. इतकंच नव्हे, तर दोन तीन प्रकाशकांनी यावर पुस्तक लिहा, आम्ही छापू असंही सुचवलं.
नवी उमेदमुळे खूप माणसंही जोडली गेली. लोकं इनबॉक्समध्ये येऊन प्रत्यक्ष भेटूनही गेली. माझ्या मिरजेतल्या 'प्रतिगामी' विचारांच्या मैत्रिणींनाही अचंबा वाटला. ज्या मुलीची, तिच्या एकूण कपड्यांची, अवताराची आपण लहानपणी हाडतूड करायचो, किंमत द्यायचो नाही, सोयीस्कर लांब ठेवायचो, चेष्टा करायचो ती इतकं काही लिहू शकते, हा त्यांना पडलेला प्रश्नही त्यांनी बिनधास्त इनबॉक्समध्ये येऊन विचारल्यावर मला नवी उमेदचे किती आभार मानू किती नको असं झालं होतं.
मी स्वतःची ओळख त्यानंतर कधीच लपवली नाही. स्वतःची ओळख सांगण्यासाठी जी भीड माझ्या मनात कायम ठाण मांडून असायची ती नवी उमेदने अक्षरशः मुळासकट उपटून काढली.
त्यानंतर नवी उमेद पेज वाचत राहिले. अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणे, पणती तेवत ठेवणे ही काळाची गरज आहे, ही नवी उमेदची दूरदृष्टी मनाला फारच स्पर्शून गेली. मला जेव्हढं शक्य होईल तेव्हढं तर नवी उमेदच्या कार्यात सहभागी होईनच. शेवटी माझीही ही सामाजिक जाणिवेची, समंजस कृतीची 'उमेद' नेहमीच नव्या दमाने तेवत रहावी.
- गायत्री पाठक, पुणे

No comments:

Post a Comment