Wednesday 5 June 2019

आजी, तुम्ही कधी पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात लावलाय का?" उत्तर साहजिकच नाही असतं. "मग तुम्ही एकदा हात लावून बघाच, दूध नाही खराब होत!

शर्वरीचे अनुभव खूपच गंमतीशीर आहेत. ती ‘समाजबंध’ची समुपदेशक. एका गावात हे सगळं ती वैज्ञानिकदृष्ट्या समजावून सांगत होती. तेव्हा काही महिला म्हणाल्या, "बाई, असलं काही बोलू नका. देवीचा कोप होईल. पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात लावून बघा, दूध नाही नासलं तर सांगा." किंवा लोणचं, दही नासतं. पापड लाल होतात वगैरे म्हणतात. तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो, "आजी, तुम्ही कधी पाळी आल्यावर दुधाच्या भांड्याला हात तरी लावलाय का?" उत्तर साहजिकच नाही असतं. "मग तुम्ही एकदा हात लावून बघाच, दूध नाही खराब होत! आपल्याला हे घरातून आधीच्या बायांनी सांगितलेलं असतं आणि आपण ते भीतीपोटी खरं मानून पाळू लागतो. पण प्रत्येक महिलेकडून पाळीच्या काळात कधी ना कधीतरी घरातल्या कशाला तरी चुकून हात लागलेला असतोच आणि काहीच आभाळ फाटलेलं नसतं ना कोणता कोप झालेला असतो; पण फक्त घरातील बाकी महिला रागावतील म्हणून आपण ते कुणाला सांगत नाही. खरंय का काकू ?" आणि मग सगळ्याच महिला गालातल्या गालात हसायला लागतात. त्यांना हे पटलेलं असतं, बरंच आधीपासून माहीत ही असतं पण हे सगळं नाकारायची हिंमत त्यांच्यात अजून आलेली नसते.
आम्ही अंदाज काढला. प्रत्येक महिलेला साधारणतः पंधरा ते पंचेचाळीस या वयात पाळी चालू असते. म्हणजे आयुष्यातील सरासरी तीस वर्षे. दर महिन्याला चार ते पाच दिवस याप्रमाणे तीस वर्षातील एकूण चार ते पाच वर्षे कालावधी हा पाळीमध्ये जातो. थोडक्यात प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यातील सरासरी पाच वर्षे रक्तस्त्राव होतो. आता विचार करा. इतक्या मोठ्या कालावधीत पाळीचा शारीरिक त्रास सहन करायचा. आणि या अंधश्रद्धांमुळे तितकाच मानसिक त्रासही सहन करावा लागणं. हे किती अमानुष आणि भयंकर!
हे थांबलं पाहिजे.
किमान तरूणांनी आपल्या घरातल्या स्त्रीला या त्रासातून मुक्त केलं पाहिजे. कोणताच पुरुष स्त्रीचा त्या दरम्यान होणारा शारीरिक त्रास बंद करू शकत नाही. पण, मानसिक त्रास नक्कीच बंद करू शकतो. माझं या संदर्भात काम सुरू झालं ते याच विचाराने.
काॅलेजला असताना जुने कपडे गोळा करून आदिवासी वस्त्यांमध्ये वाटप करत होतो. तेव्हा या पाड्यांवर फिरताना महिला आरोग्याचा प्रश्न जाणवला. मासिक पाळीत योग्य काळजी न घेतल्यामुळे गर्भाशयाला संसर्ग होण्यापासून ते गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत कितीतरी आजार महिलांना होतात. परिणामी, महिलांचं गर्भाशय काढावं लागतं. त्यातून सांधेदुखी, भावनिक असंतुलन असे अनेक आजार उद्भवतात. माझ्या आईलाही अशा जंतुसंसर्गामुळे तरूण वयात गर्भाशय काढावं लागलं होतं. त्यामुळे या समस्येवर काहीतरी तोडगा काढावा, हे डोक्यात होतंच. मग देशभरात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे पॅड घेतले. त्याची उकल करून घरी बनवलं जाऊ शकेल असं कापडी आशा पॅड तयार केलं.
मासिक पाळीच्या काळात सर्वात जास्त गरज असते ती स्वच्छतेची, आरामाची आणि सकस आहाराची. पाळी आल्यानंतर बऱ्याच आया मुलीला त्याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती देणं सोडून स्वयंपाकघरात जाऊ नकोस आणि देवाला शिवू नको हेच सांगतात. आणि मग स्त्रीत्व खुलण्याच्या मुख्य टप्प्यावर, इथूनच मुलीच्या मनात आपल्या स्त्रीत्त्वा विषयी न्यूनगंड तयार व्हायला सुरुवात होते. आपण दुय्यम, हीन, अपवित्र, कमजोर आहोत, या भावना बळावू लागतात. मग ही शिवाशिव पटत नसली तरी त्याला विरोध करण्याचा आणि एकूणच लढण्याचा आत्मविश्वास मुलगी गमावून बसते.
मी या विषयावर बोलतो तेव्हा, महिला सुरूवातीला मानसुद्धा वर करत नाहीत. पण जेव्हा मी माझ्या आईची घटना सांगतो आणि विषयाचं गांभीर्य समजावून सांगतो तेव्हा त्यांचा विश्वास बसतो. त्या सहभागी होतात. त्यांच्या मनातील समजुती कशा चुकीच्या आहेत हे पटवून योग्य काय हे सांगतो तेव्हा, मात्र त्या खुलतात आणि मोकळेपणे अडचणी मांडायला लागतात.
आदिवासी भागातील प्रश्न थोडे वेगळे आहेत. त्याबद्दल उद्या.
सचिन आशासुभाष 7709488286
समन्वयक - समाजबंध, पुणे.

No comments:

Post a Comment