Wednesday 5 June 2019

जीवनस्पर्शी कहाण्यांचं नवी उमेद (वाचक अभिप्राय)


नवी उमेदच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे शहरी कक्षेच्या पलीकडील जगणाऱ्या लोकांच्या कहाण्या आहेत.
नवी उमेदची ‘प्रवास पालकत्वाचा’ ही मालिका माझी अतिशय आवडती आणि जिव्हाळ्याची.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील काळेवाडीच्या शेतमजूर, ऊस तोडणाऱ्या कामगाराचे दारूचे व्यसन त्याचीच बायको, मुलगा मुलगी कसे सोडवतात त्याची कहाणी आठवते. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील एका गावाचा हालअपेष्टात जगणारा पांडुरंग आपल्या मोठया मुलीच्या लग्नातच, लहान मुलीचे लग्न करायचे ठरवतो तेव्हा या लग्नाला अंगणवाडी सेविका कसे रोखते ती कहाणी, दुष्काळात विदर्भ, मराठवाडयातील स्थलांतरितांचे प्रश्न सोडवण्याचे केले जाणारे प्रयत्न, तर भटक्या जमातीतल्या महिलांना पाळीच्या दिवसात काळजी कशी घ्यायची, स्वच्छता कशी राखायची, सॅनिटरी नॅपकिन कसे वापरायचे याचं छाया काकडे यांनी केलेलं मार्गदर्शन, या आणि अशा कितीतरी कहाण्या. जगायला बळ, ऊर्जा, आधार, ताकद देणाऱ्या, म्हणूनच आशावादी प्रेरणादायी. हीच तर नवी उमेद.
माणूस समस्यांनी गांजून जीवघेण्या संघर्षातून जगतो, कुटुंबाला जगवतो. त्यावेळी मार्गदर्शन, दिशा दाखवण्याचं काम संवेदनशील व्यक्ती, तसेच कितीतरी माणसे समर्पित वृत्तीने करतात. हेच मानवतेचे प्रासादिक लक्षण म्हणता येईल.
गेल्या तीन वर्षात लहानसहान गावच्या विविध क्षेत्रातील समस्यापूर्ततेच्या प्रयत्नांच्या जीवनस्पर्शी कहाण्या आपल्यापुढे नवी उमेदने आणल्या.
उमेदचा ताजा उपक्रम म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उभे राहिलेल्या खासदारांच्या कामगिरीचा आढावा प्रगतीपत्रातून घेतला गेला. नवी उमेदच्या तिसऱ्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा आहेतच. आता अपेक्षा आहेत. मालिका अधिक व्यापक व्हाव्यात. शहरी परिसरातील व्यक्तींच्या वेगळ्या विशेष कहाण्याही द्याव्यात.
#नवीउमेदतिसरावर्धापनदिन

- अरूणा रानडे, पुणे

No comments:

Post a Comment