Wednesday 5 June 2019

पुलं आणि मी... (आखुडबुद्धी बहुशिंगी)

पुलंची जन्मशताब्दी चालूय सध्या. जन्मशताब्दी म्हणजे माझी कथा वाचल्यावर भाई डोळ्यात पाणी आणून माझा हात दाबत 'मराठीचं भवितव्य आता तुमच्याच हाती आहे ज्युनियरराव." असं म्हणाले किंवा मी 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' गाताना पुलं डोळे बंद करून कसे निश्चेष्ट बसले होते हे सांगण्याचा घाऊक सीझन! या निमित्तानं मला माझा जीवनातला पुलंचा एक प्रसंग आठवला.
कुठल्याश्या मल्टीनॅशनल कंपनीत इंटरव्ह्यूसाठी अचानक कॉल आला होता. कोल्हापूरहून मुंबईला जायचं होतं. रिझर्वेशन काही मिळणार नव्हतं. मग पुण्यापर्यंतची यष्टी पकडली. सुदैवानं खिडकी (तीही हवी तेव्हा उघडबंद होणारी) मिळाली. बस सुरू होताहोता माझ्याशेजारी एक चाळिशीचा माणूस बसला. हा गब्दुल गालांचा, चष्मिष्ट, पांढऱ्या केसांचा, झब्बावाला हा माणूस म्हणजेच पुलं नव्हे हे चतुर वाचकांनी ओळखलं असेलच.
गाडी सुरू होताच मी निमूटपणे पुस्तक काढलं, दमामिंचं होतं कुठलंतरी. पाचेक मिनिटांनी काकांनी पुस्तकात (आपल्याच बापाची पेंड असल्यासारखं) डोकावून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव दिसले. मी दुर्लक्ष केलं. मग त्यांनाच राहावलं नाही-
"काय वाचताय?"
"पुस्तक."
"ते दिसलंच. पण त्यातलं काय वाचताय?"
"व्यंकूची शिकवणी."
"विनोदी आहे का हे?" माझ्या चेहऱ्यावरचे कोरे भाव पाहून त्यांना प्रश्न पडला असावा.
"हो, मिरासदारांचं आहे."
"ह्या! हल्ली काय कुणीही उठतो आणि विनोदी लेखक बनतो." खरंतर तेव्हा मिरासदार ऑलरेडी रिटायरमेंटला आले होते. त्यांनी कधी अचानक उठून विनोदी लेखक असल्याचा दावा केलेलं ऐकलं नव्हतं.
मी नुसतंच "हं." केलं.
"कुठं पुण्याला जाताय का?"
"नाही, मुंबई."
"मग तुम्ही चांगलं एखादं विनोदी पुस्तक का वाचत नाही हो?" पुण्याऐवजी मुंबईला जाणं आणि 'चांगलं विनोदी पुस्तक' वाचणं यातला कार्यकारणभाव माझ्या लक्षात नाही आला. माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न त्यांना कळला असावा.
"... म्हणजे आमच्या वेळेला कितीतरी चांगले लेखक लिहायचे."
"हो हो. चिंवि, अत्रे, कोल्हटकर अशी तगडी मंडळी होती तेव्हा."
"पुलं माहितीयेत का तुम्हांला?" काका थोड्याश्या दुखऱ्या स्वरात म्हणाले.
"वाचलेत थोडेफार. पण मला चिंवि-"
"अहो, चिंवि खाडिलकर म्हणजे नुस्ती नाटकं लिहिणारा माणूस हो."
मला जोरदार धक्काच बसला. फक्त मलाच नाही, पण माझ्या मागच्यापुढच्या सीटवरच्या सर्वांनाच धक्का बसला. बससमोर म्हैस आडवी आल्यानं डायवरनं (जो काय गाडी फास मारत न्हवता) कच्चकन ब्रेक मारला होता.
काका पुढं वदते झाले, "पण पुलंचं तसं नाही. काय समजलेत? त्यांनी विनोदी लिहिलं, गंभीर लिहिलं, नाटकं लिहिली..."
"हं." मी पातकाची कबुली दिली, "मी नाटकं वाचली नाहीत त्यांची." हे खरं होतं. त्यावेळेपर्यंत पुलंची बहुतेक पुस्तकं मी वाचली होती. गोळाबेरीजपासून एका कोळियाने आणि खिल्लीपासून मुक्काम शांतिनिकेतनपर्यंत, पण नाटकं राहून गेली होती.
"ह्या! मग काहीच वाचलं नाही तुम्ही." काका माझ्याकडं तुच्छतेचा कटाक्ष टाकत म्हणाले, "किमान त्यांचं नटसम्राटतरी पाह्यलंय की नाही?"
"अहो, पण ते तर कुसुमाग्रजांनी लिहिलंय ना?"
"ते टोपणनावानं. पण मूळ लेखक पुलंच ना!" काका डोळे झाकून ही माहिती माझ्या कानात ओतत होते. हे मलाच काय शिरवाडकरांनाही नवी असणार. मी पुस्तक मिटून बॅगेत ठेवलं. वाचनापेक्षा श्रवणात जास्त मजा होती.
"मी त्यांचं अपूर्वाई वाचलंय थोडंसं."
"अहो ते वपुंचं. वपु वेगळे, पुलं वेगळे. हे बघा, वपुंना टक्कल आहे, पुलंना टक्कल नाहीय. आहे की नाही सोप्पं?" दोन लेखकांतला फरक हा लेखनशैली किंवा त्यांनी काय लिहिलं यापेक्षा तोंडावळा असू शकतो हे पहिल्यांदाच ऐकत होतो.
"बरोबर आहे."
"आणि शिवाय पुलं कथाकथन करायचे."
मला वपुही कथाकथन करायचे असं सांगायचं होतं तेवढ्यात काकांनी पुढंची खबर दिली
"आणि वपु एकपात्री नाटक करायचे." हे सांगताना काकांचा आवाज 'अहो, तो वसंत आहे ना, तो सिगारेट ओढतो म्हणे.' असं सांगत असल्यासारखा होता.
"हसवणूक वाचलंय मी थोडंफार."
"हो हो, हसवणूक जाम भारी पुस्तक आहे हो. माझे जालीम शत्रू आणि कायकाय…"
माझ्या मांडीवरून पुस्तक दचकून खाली पडलं. ते उचलायच्या निमित्तानं मी काकांच्या पायाचं दर्शन घेतलं. अज्ञानाच्या गंजीत ही सत्यमाहितीची सुई उगाचच मला टोचून गेली. पण पुलंच्या इतक्या खऱ्याखोट्या गोष्टी ऐकल्या की माझं डोकं कलकलू (की पुलंपुलू?) लागलं. गाडी साताऱ्याच्या स्टॅंडमध्ये शिरली तेव्हा मात्र मी एक धाडसी निर्णय घेतला. थोड्या जरबेच्या सुरातच त्यांना म्हणालो, "काका जरा सरकता का?" त्यांनी बाजूला सरकून मला वाट दिली तसं काही कळण्याआधीच मी जीव मुठीत घेऊन उतरलो.
एसटी पुण्याला जायला निघाली तेव्हा कुणीतरी खिडकीतून "अहो, ते सुदाम्याचे पोहेतरी वाचलंत का?" असा ओरडलेलं अस्पष्ट ऐकू आलं. यथावकाश सातारा-मुंबई एसटी मिळाली. इंतरव्ह्यूची वेळ टळून गेल्यावर मुंबईत पोचल्यानं ती नोकरी काही मिळाली नाही. पण आजही त्या कंपनीची जाहीरात दिसली की केवळ पुलंमुळं माझी ही नोकरी कशी हुकली ते आठवतं.
#नवीउमेद
Hrishikesh Rangnekar

No comments:

Post a Comment