Wednesday 5 June 2019

"तू घरी चल, तुला बघायला पाहुणे आले आहेत." "त्यांना सांगा, '२२ मे नंतर या'. मला माझं गाव पाणीदार करायचं आहे."

"तू घरी चल, तुला बघायला पाहुणे आले आहेत."
"त्यांना सांगा, '२२ मे नंतर या'. मला माझं गाव पाणीदार करायचं आहे."
निलसिंग आणि त्यांची मुलगी अलका यांच्यातला हा संवाद. विरपूर, ता शहादा, जि नंदुरबार. गावाची तरूण सरपंच असलेल्या अलका पवारने गावाला पाणीदार करण्याचा निश्चय केला आहे. या कामासाठी तिनं इतकं वाहून घेतलं आहे की, सोयरीक जुळवण्यासाठी घरी आलेल्या पाहुण्यांना २२ मे नंतर येण्याचा निरोप धाडत तिने काम सुरू ठेवलंय. पाच साथीदारांच्या सोबतीने अलका दररोज श्रमदान करत आहे.
गेल्या काही वर्षापासून गावात भीषण पाणीटंचाई आहे. दरवर्षी कृतीआराखड्यात गावाला समाविष्ट केलं जातं. तात्पुरत्या उपाययोजना होतात. परिस्थितीत काहीच बदल होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. यावर कायमस्वरूपी उपाय काढणं गरजेचं आहे, हे सरपंच अलका यांच्या लक्षात आलं. त्यांनी गावकऱ्यांना जलसंवर्धनाबाबत माहिती दिली. पाणी फाउंडेशनच्या सदस्यांनीही अलका यांना सहकार्य केलं. सध्याच्या 40 ते 43 अंश डिग्री तापमानात अलका व तिचे सहकारी रणरणत्या उन्हात श्रमदान करत आहेत. 22 मे पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून त्या दरम्यान पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणं सुरू आहे.
“गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्यास माझं प्राधान्य राहील. गावात पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांच्या साथीने काम सुरू आहे. आम्ही आज केलेलं श्रमदान भविष्यात आम्हाला उपयोगी ठरणार असून परिसरात पाण्याची पातळी निश्चितच वाढेल”, असं सरपंच अलका पवार म्हणतात.
- रूपेश जाधव, नंदुरबार

No comments:

Post a Comment