Wednesday 5 June 2019

फुटाणे घ्या फुटाणे...

 नगर शहर आणि परिसरात दुष्काळी विदर्भातून लोक जगायला आलेत. फुटाणेविक्रीतून रोजगार शोधला आहे.
‘‘पाणी नाही भाऊ, शेतीत काय पिकणार. शेती लयाला लागली. इंकडं बी दुष्काळ हाई, पर जरा आमच्यापेक्षा बरं हाई. बाकीच्यांनी सोडलं घर. एक- एक माणुस ऱ्हायलं घरी. पाऊस पडोस्तर राहु इकडंच. केडगावांतून फुटाणे घेतो अन् घरोघर विकतो. शे- दोनशे रूपये पदरात पडतात.’’ दुष्काळाशी दोन हात करताना रोजगार शोधणाऱ्या जिद्दी महिलेचे ‘बोल़’ दाहकता सांगतात अन् बळही देतात. नगर शहर व परिसरात दुष्काळी विदर्भातील लोकांनी ‘फुटाणे’ विक्रीतून रोजगार शोधला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात यंदा दुष्काळ आहे. दुष्काळ म्हटलं की शेतीचं नुकसान, पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशीच स्थिती. शहरापेक्षा ग्रामीण भागात स्थिती बिकट. सारीच माणसं पिचलेली. निसर्गाच्या या संकटाशी सामना करताना माणसं एकमेकांना मदत करतात. खास करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांनी अशा संकटामुळे कधी हार मानलेली नाही. अनेक वेळचा, वर्षानुवर्षाचा इतिहास बनून गेलेला दुष्काळ पचवला.
अंगाची लाही लाही करणारं ऊन राज्यात विदर्भात सर्वाधिक. यंदा तर दुष्काळ गंभीर. म्हणून यवतमाळ भागातील लोक दुष्काळी नगर जिल्ह्याच्या आश्रयाला आले आहेत. डोक्यावर पास-पन्नास किलोचे ओझे घेऊन दारोदार फुटाणे विक्रीसाठी महिला भटकंती करत आहेत. ‘‘फुटाणे घ्या फुटाणे, गावराण हरभऱ्याचे फुटाणे. खोबऱ्यासारखे लागतात दादा, फुटाणे. पन्नासाला आठवा.’’ (आठवा हे ग्रामीण भागात धान्य मोजण्याचे माप.) हे वाक्य एकायला येतात. फुटाणे कसे दर्जेदार आहेत, हे सांगण्याचा विक्रेत्यांकडून प्रयत्न होताना दिसतो. चौकशी केली आणि नैसर्गिक संकटाने त्रासलेल्या माणसांची गोष्ट समोर आली.
यवतमाळ जिल्ह्यामधील केयम गावच्या साधारण पन्नाशीच्या पुढंच्या शेवंताबाई साठे, नगरपर्यंत आलेल्या. डोक्यावर तीस किलोच्या जवळपास ओझं. बोलता बोलता त्यांनी व्यथा मांडली. ‘‘भाऊ चारशे सहाशे किलोमीटरवरुन आलोय. लई दुष्काळ हाई भाऊ. शेतं पार रती झाली. गावांत नळाला पाणी येत नाही पंधरा दिवस. प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही. गावांत राहून काय करणार. आलो इंकडं. आमचं मोठं कुटुंब; पण वेगवेगळे राहतात. गावांकडं पोरं हाईत. तिथं एक-एक माणूस राहिलाय, पोरांच्या शाळांना सुटी हाई. बाकी आलोय आम्ही सगळे पोटा-पाण्याला. इथं पण दुष्काळ हाई, पर जरा आमच्या गावापेक्षा बरं हाई. अरणगावात मुक्कामाला हाई. केडगावातून (नगर शहरातील उपनगर) फुटाणे घेतो. घरुघर जाऊन विकतो. दिवसभर फिरल्यावर शे- दोनशे रुपये मिळतात. पाऊस पडोस्तर कसंतरी दिवस काढू. मग जाऊ गावाकडं.’’ हारत नाही भाऊ आम्ही, सारखाच दुष्काळ पडतूय. काय करणार, शोधतो काम. फुटाणे विकून चाललय बरं.’’ काही व्यथा सांगताना दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेवंताबाई साठे यांच्या बोलण्यात मात्र आत्मविश्वासही दिसत होता. दुष्काळातून जगण्याची उमेद शोधणाऱ्या अशा माणसांना सधन, शहरी भागातील लोकांनी आधार देण्याची गरज आहे.
- सूर्यकांत नेटके, अहमदनगर.
#नवीउमेद #दुष्काळ

No comments:

Post a Comment