Wednesday 5 June 2019

गणिताचं गाव


गावातील प्रत्येक घरावर, घराबाहेरील भिंतीवर गणिताची सूत्रं, पाढे, प्रमेय.
सोबतचे फोटो पाहिलेत का?
या गावात प्रत्येक घरावर, घराबाहेरील भिंतीवर गणिताची सूत्रं, पाढे, प्रमेय पाहायला मिळतात. 
जिल्हा सातारा. इथल्या खंडाळा तालुक्यातलं हे भादे गाव. गावातली शाळा चौथीपर्यंत. पटसंख्या 127. मुलांची गणित विषयाची भीती घालवायची, तर लहानपणीच गणिताच्या संकल्पना त्यांना सहजपणे समजायला हव्यात. केवळ वर्गखोलीतच नव्हे, तर सहजपणे दिसेल अशा ठिकाणांहून मुलांना गणित शिकायला मिळावं, यासाठी लढवलेली ही अभिनव कल्पना. बघा, या भिंतीवर दिनदर्शिकाही दिसून येत आहे. हे आगळं गणिताचं गाव तयार केलं आहे, उमेश पवार यांनी. उमेश इंटिरियर डिझायनर आहेत.
गणित सोडवणं हीच मोठी कसोटी असते. क्षेत्रफळाची सूत्रं लक्षात ठेवणं अवघड काम. पण तेही या गावात सोपं झालं आहे. संख्यारेषा हा गणितातला भागही गावातील भिंतींवर पाहायला मिळेल. कोन, त्रिकोण मोजणं हे महत्त्वाचं गणित. स्पर्धा परीक्षांमध्ये हे गणितं आवर्जून विचारली जातात. नफा-तोटा, समान गुणोत्तर हे जर गावातच शिकायला मिळालं तर शाळेत कित्ती सोपं जाईल. कर्ज आणि व्याज समजण्याची गरज दैनंदिन व्यवहारात असते. आणि बहुतेकांना शाळेपासून आजपर्यंत व्याज अन् चक्रीवाढ व्याजाचं गणित जमत नाही. उद्याच्या या भारताचा एखादा गणितज्ञ घडविण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे ही गणिताच्या गावाची कल्पना असल्याचं उमेश पवार यांनी म्हणतात.
भादे इथल्या प्राथमिक शाळेतले शिक्षक तुषार कांबळे म्हणाले, “शाळेत मुलांना गणित शिकवलं जातंच. परंतु चार भिंतीबाहेर गणिताचा अभ्यास झाल्याने पाढ़े, कसोटी, व्याज, सूत्र, प्रमेय अशा असंख्य गोष्टी मुलांच्या सहज ध्यानात आल्या. आता, मुलंच येऊन 30च्या पुढचे पाढ़े बनवून दाखवतात, शंका विचारतात. अशामुळे, आमच्या शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. म्हणून, आम्ही एक पुस्तिका तयार करत आहोत. अशा प्रकारच्या गणिताची उदाहरणं पुस्तकात असतील. उमेश यांनी मुगुटराव विठोबा पवार यांच्या स्मरणार्थ ही कल्पना साकारली आहे.
उमेश पवार यांचा संपर्क क्र. - 95454 58338
- संतोष बोबडे
#नवीउमेद #सातारा

No comments:

Post a Comment