Wednesday 5 June 2019

शेजारचा एसी... (आखुडबुध्दी बहुशिंगी)

बेल वाजली. दार उघडलं. दारात शेजारच्या आठल्येकाकू. 
"कायै काकू?" मी विचारलं.
"आमचा एसी बंद पडलाय." काकू पदरानं घाम पुसत म्हणाल्या. मी तडक वॉशबेसिनकडं गेलो. आरशात चेहरा पाहिला. दाढीचं खुंट असलं, डोळे (झोपेमुळं) तांबरलेले असले तरी कुठल्याही अँगलनं मी एसी मेकॅनिकसारखा दिसत नव्हतो.
"आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय." कमरेशी पदर खोचत काकू बोलल्या.
"आं? माझ्यामुळं?"
"तर काय? तुमचा फ्रीज आमच्या एसीला बघून शीळ मारतो. बिचाऱ्या एसीनं सहनतरी किती करायचं? लाजमोड्या कुठला!" काकूंनी पदरानं डोळे पुसले.
"काकू, माझा फ्रीज कसलाही आवाज करत नाहीय."
"तुम्ही असलात की शहाण्यासारखा असतो. तुम्ही गेलात की चौखूर उधळतो. अगदीच ताळतंत्र सोडलंय हो मेल्यानं."
"काकू, तुम्ही स्वतः येऊन बघा. माझ्या फ्रीजला खूर सोडा, चार पायही नाहीत."
"माझ्या एसीचं काय करताय ते बोला आधी. कालपासून मान टाकलीय त्यानं."
"मी बघतो काहीतरी."
पदराला नाक पुसत काकू गेल्या. त्यांची बोळवण करून दूध आणायला खाली आलो तेवढ्यात मॉर्निंगवॉकहून येणारे आठल्येकाका दिसले. मला बघताच गडबडीनं माझ्या कानाशी आले.
"ब्रह्मे, एक शेजारी म्हणून सांगतो-"
"एसीबद्दल बोलताय का काका?"
"नाही, तुमचं वॉशिंगमशिन. जरा आवरा त्याला."
"आता त्याला काय झालंय?"
"काल दुपारी त्यानं आमच्या टीव्हीची छेड काढली."
"काय सांगता? घरात येऊन?"
"घरात कसा घुसू देईन मी त्या भामट्याला? अहो, तुमच्या बाल्कनीतून पाणी उडवत होता आमच्या टीव्हीवर. आमचा टीव्ही शरमेनं पाणीपाणी झाला."
"तुमचा टीव्ही हॉलमध्ये असतो ना हो?"
"हो, पण दुपारी हवा खात तो बाल्कनीत उभा होता."
"क्यायतरीच!"
"हे पहा, हातात विड्या आहेत. खोटं बोलत नाहीय मी. तुमचं घड्याळही आमचा मिक्सर काही गाऊ लागला की चिडवत असतं, माहीतीय?"
मी विचारात पडलो. आता मात्र हद्द झाली.
"काका, काहीतरीच बोलू नका. एकवेळ वॉशिंग मशीन आणि फ्रीजचं मान्य करेन, पण आमचं भिंतीवरचं घड्याळ बिचारं कशाला काय चिडवेल हो? उद्या म्हणाल की आमचं गोद्रेजचं कपाट तुमच्या वॉर्डरोबवर लाईन मारतं म्हणून."
"उद्या का? आजच म्हणेन. खऱ्याला भीती आहे का कुणाची?"
आठल्येकाका हे वाक्य इतक्या आवेशात म्हणाले की कट्ट्यावर वारा घेत बसलेले खरेकाका आपल्यालाच हाक मारली असं वाटून तुरूतुरू चालत आले. त्यांना कसंबसं कटवून मीही नेटानं वाद घालू लागलो.
"असं काय? मग करा की पोलिसात तक्रार."
"करणारच आहे. तुमच्या परवानगीची गरज नाहीए मला. घाबरतो का काय तुम्हांला?"
आमचे वाढलेले आवाज ऐकून सोसायटीचे माजी सेक्रेटरी शहाणे आमच्या भांडणात पडले.
"काय झालं हो आठल्ये?"
मी त्यांना अथपासून इतिपर्यंत सगळी कथा सांगितली. शहाणेंनी अत्यंत गंभीर चेहरा करून ते सगळं ऐकून घेतलं. या गोष्टीतला लॉजिकचा संपूर्ण अभाव त्यांच्या लक्षात आला असावा.
"मला एक गोष्ट पटत नाही यातली-"
"कोणती?"
"यांचा फ्रीज बाल्कनीतून तुमच्या घरावर नजर ठेवून असतो म्हणालात तुम्ही."
"मग? यात काय आहे न पटण्यासारखं?"
"अहो, यांच्या बाल्कनीतून तुमचं घरच नीट दिसत नाही. मी स्वतः आमच्या शेजारच्या फर्टाडोबाईंना पाहायचा बऱ्याचदा प्रयत्न केला, पण अजिबात दिसत नाही काही."
"शहाणेच आहात. मला दिसतं शेजारच्या फ्लॅटमधलं सगळं." आठल्ये चुकून खरं बोलून गेले.
"अहो, बिल्डरनं फसवलंय हो आपल्याला. सगळं चुकीचं बांधकाम केलंय त्यानं." कुणीतरी फाटा फोडला.
तिथून हा विषय एसी-फ्रीजपासून बिल्डरनं शेजारचं घर पाहण्याच्या हक्कापासून आपल्याला वंचित कसं ठेवलंय याकडं वळला. आमचं भांडण अर्धवट राहिलं.
पण संपलं नाही अजिबात. दर दोन दिवसांनी आठल्येंच्या घरचं काहीतरी उपकरण बंद पडायचं. आणि काका किंवा काकू माझ्याशी वाद घालायला यायचे. शिवाय सोसायटीत सगळीकडं याची बोंब मारत फिरायचे. हळूहळू, लोकांचाही यांच्या कांगाव्यावर विश्वास बसू लागला होता. आडूनआडून सगळेजण मला हे प्रकरण संपवण्याबद्दल सुचवत होते.
शेवटी हे इतकं असह्य झालं की आम्ही सोसायटी सोडून जायचं ठरवलं. भाड्यानं राहणाऱ्याला काय कुठंही जागा मिळतेच. माझ्या फ्लॅटमध्ये आठल्येंची दूरची कुणी भाची भाडेकरू म्हणून यायला टपूनच बसली होती. आठल्येंनी त्यातही एसी दुरुस्तीचे अडीच हजार माझ्या खनपटीला बसून वसूल करून घेतलेच.
नवीन घरात गेल्यावर, दुसऱ्याच दिवशी आठल्येंचा फोन आला.
"अहो ब्रह्मे, अहो ब्रह्मे..."
"बोला काका, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं चालूय ना?"
"हो, सगळं ठीकाय. पण माझी बाईक…"
"हो, तुम्हांला सांगायचंच राहून गेलं. तुमच्या बाईकनं माझ्या स्कूटीला फूस लावून पळवून नेलंय. कालपासून दोघं गायब आहेत. शेजारच्या कारवर आम्हांला शोधण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही खूप दूर जातोय अशी चिठ्ठी मिळाली. आता मी पोलिसात तक्रार करणारेय."
पलीकडून फक्त 'धप्प' असा पडल्याचा आवाज आला.

- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment