Wednesday 5 June 2019

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका: एक बळी (आखुडबुद्धी बहुशिंगी)

पुणे, दि.१८ : पुणे येथे चालू असलेल्या टोळीयुद्धानं आणखी उग्र रूप धारण केलं असून त्यात काल आणखी एक बळी गेला. या घटनेत आणखी एक जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहेत असे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेमागे 'बेधुंद मनाची प्रीत ही वेडी' गटाचा हात असल्याचे कळते. मृत व्यक्तीचे खरे नाव अद्याप कळले नसून त्याचे शब्दमिञ बन्नू कुरणे हे टोपणनाव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. शब्दमिञ 'हे चंद्रसजणांचे झुरणे' या विद्रोही टोळीचा कवी होता. अधिक सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना अशी घडली-
गेली कित्येक वर्षे कवीसंमेलनातल्या काव्यगायनावरून या दोन टोळ्यांत संघर्ष चालू आहे. शब्दमिञने आपल्या कविता ऐकवून 'बेधुंद मनाची प्रीत ही वेडी'गटाच्या दोन नवकवींना 'टपकवले' असल्यानं त्याचा मोठा दरारा विद्यापीठ ते संचेती पूल या परीसरात होता. साहित्यसंघात आलेल्या व्याख्यात्याला आपल्या कविता ऐकवून अर्धमेलं केल्यापासून हा शब्दमिञ पुणे ग्रामीण पोलिसांच्या रडारवर होता. कित्येक लोक शब्दमिञला पाहताच सभामंच सोडून पळून जात. एकदा निवडणुकीच्या भाषणावेळी स्टेजचा ताबा घेऊन त्यांनी त्या पुढाऱ्याला पाडलं होतं. (त्यात त्याचं डिपॉझीटही जप्त झालं होतं.) शिवाय रात्रीअपरात्री भेटलेल्या एकट्या वाचकास पुस्तकांचा धाक दाखवून लुटणं (किंवा कविता ऐकवणं) असेही गंभीर गुन्हे त्याच्या नावावर नोंदलेले होते.
काल दुपारी तो शिवाजीनगर परिसरात आपल्या साथीदारांसोबत येणार असल्याची टीप 'बेधुंद मनाची प्रीत ही वेडी' गटाच्या कवींना मिळाली. या गटाचा शार्पशूटर हुळहुळते डोह आणि शपथ डोळ्यांची येथे दबा धरून बसले होते. त्याशिवाय चांदणे उन्हाचे आणि चरणलीलामृत ही दुक्कलही डबा धरून बसली होती. शासकीय अधिनियम या मित्राच्या दुचाकीवर बसून शब्दमिञ येणार असल्याची खबर होती. शासकीय अधिनियम हा आपल्या नावाच्या विपरीत, म्हणजे सर्व नियम पाळणारा असल्यानं तो लोकमङ्गलच्या सिग्नलला थांबणार हे नक्की होतं. त्याचा फायदा घेऊन त्याची दुचाकी थांबताच चांदणेने दुचाकीच्या चाकासमोर आपला कवितासंग्रह फेकला. कवितासंग्रहातील एक कवितेचं पान उलगडलं गेलं पण ते शासकीय अधिनियमने वाचण्यापूर्वी शब्दमिञला जीवाच्या धोक्याची कल्पना आली. त्यानं अधिनियमला ओरडून-
"धाव वेड्या, शत्रूचा असे दात
हाय! दैवानं कसा केला घात"
असे सांगत पळायचा प्रयत्न केला. शब्दमिञच्या पाठून आलेल्या चांदणेने शब्दमिञवर चाल केली तसे तो त्याला चुकवत शिमला ऑफिसच्या दिशेने पळाला. चांदणेने केलेला वार अधिनियमच्या वर्मी लागून तो जखमी होऊन जागीत विव्हळत पडला. शब्दमिञ शिमला ऑफीसच्या फूटपाथपर्यंत पोचला तोच दुर्दैवानं त्याच्या नजरेस तिथं उभा असलेला जाहीरातीचा बोर्ड पडला. शब्दमिञची नजर पडताच त्या बोर्डवरची 'माझ्या गळणाऱ्या केसांचे रहस्य आहे…' ही अक्षरं गळून पडली. त्यामुळं भांबावलेला शब्दमिञ किंकर्तव्यमितीमूढ अवस्थेत त्या जाहीरातीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही शार्पशूटरनी त्याला टिपलं. दोघेही यमकांत निपुण असल्यानं त्यांच्या माऱ्यापुढं शब्दाचे बुडबुडे अजिबात चालले नाहीत.
चौकात ड्यूटीवर असलेल्या पोलिस शिपाई दयावान चिंधडे यांनी हा प्रकार पाहून शपथ डोळ्यांचीला अडवायची धडपड केली. त्यांच्या 'धडपड'ला उत्तरादाखल गडबड, बडबड, परवड, गप्पपड, वरचढ, यमदाढ अशी अंदाधुंद यमकावली करत शपथ डोळ्यांची पळून गेला. हुळहुळते डोहला नागरिकांनी पकडायचा प्रयत्न केला पण खिशात असलेल्या रसग्रहणात्मक पुस्तकाची दहशत दाखवत त्यानं पळ काढला. हल्लेखोर गणेशखिंडीच्या दिशेने पळाल्याची खात्री होताच काही जागरूक, धीट नागरीकांनी सीओइपीच्या पिछाडीस जोरदार कोंबिंग ऑपरेशन केलं. त्यात त्यांना तीन ऊवा मिळाल्या.
यानंतर, बराच काळ लोकमङ्गल परीसरात भीतीचे वातावरण होते. जागोजागी लोक घोळक्यानं उभं राहून चर्चा करत होते. ते कवी आहेत असं वाटल्यानं वातावरणात ही दहशत पसरली होती.

- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment