Wednesday 5 June 2019

गोकुळ आणि सफियावर ही वेळ का आली?

वय वर्ष अवघं दोन. आजूबाजूला सगळे कामात गुंतलेले. मग तीही छोट्याशा टोपलीत मातीची छोटी छोटी ढेकळं टाकत टोपली उचलण्याचा प्रयत्न करते. तिचं नाव सफिया. आणि हे दृश्य उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या भाटशिरपुरा इथलं. पाणी फाऊंडेशननं दरवर्षीप्रमाणे यंदाही वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यात ७ एप्रिलपासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासूनच श्रमदान सुरू आहे. 
उस्मानाबाद जिल्हा तसा कायमस्वरूपीच दुष्काळी. बारमाही वाहणारी एकही नदी नाही. पाणीटंचाई आठही तालुक्यांच्या पाचवीला पुजलेली. पावसाळ्यातसुद्धा टँकर लागणारी गावं जिल्ह्यात आहेत.
महाश्रमदानांतर्गत जिल्ह्यातल्या गावागावात पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी कामं सुरू आहेत. मोठ्यांचं पाहून लहानगेही हातभार लावत आहेत. वलगुड गावचा गोकुळ भोंगही त्यापैकीच. १२ वर्षांचा गोकुळ मूकबधिर आहे. गावातल्याच शाळेत तो शिकतो. नित्य नेमानं सकाळी सर्वांच्या आधी तो श्रमदानासाठी हजर असतो.
श्रमदान करणाऱ्या या चिमुरड्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण खरा प्रश्न आहे गोकुळ आणि सफियावर ही वेळ का आली ? दैनंदिन गरजांसाठी स्वच्छ , पुरेसं पाणी सहज उपलब्ध होणं हा बालकांचा अधिकार नाही का? 

-अनिल आगलावे, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment