Tuesday 31 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग पाच



टीन एजमधल्या मुलांना कसं हाताळायचं, ते पालकांना कळत नाही. एक मुलगी बारावीला आहे. दिवसातले १८ तास इंटरनेट, मोबाईल यावर असते. पालकांनी काही विचारलं तर ती त्यांच्या अंगावर ओरडते, धमक्या देते. अशा स्थितीत काय करावं?
- अशा वेळेला पालकांनी आधी संवाद साधायचा पूर्ण प्रयत्न करावा. मागच्या भागात त्याविषयी आपण बरीच चर्चा केली आहे. अनेक मार्गही सुचवलेत. पण ती मुलगी काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये तर आता काउन्सेलिंगची खरंच गरज आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. पालकांनी स्वत: त्रास करुन घेऊन परिस्थिती बदलणार नाहीये. आधी पालकांनी स्वत: काउन्सेलरला भेटून मोकळेपणाने बोलावं. आपल्याला ताप आला की डॉक्टरकडे जातो तेवढ्याच सहजपणे काउन्सेलरला भेटायचं. काउन्सेलर मध्यस्थ आणि तटस्थ व्यक्ती म्हणून आपल्याला चांगली मदत करु शकतात. फॅमिली डॉक्टरप्रमाणेच फॅमिली काउन्सेलर ही सध्या गरज बनत चालली आहे. हे समाजाने मान्य करायला हवं. शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नेहमीच ताबडतोब निदान हिताचं असतं. वेळ घालवला तर गोष्टी आणखी बिघडतील, हे लक्षात घ्यावं. मुलांमध्ये समस्या दिसत असलीत तर लगेच काउन्सेलिंग सुरु करणं बरं.
पालक आणि मुलांसाठीचे काउन्सेलिंगचे काय टप्पे असतात?
सुरवातीला पालक फोन करतात, भेट ठरवतात. पण प्रत्यक्ष यायला उशीर करतात. जेव्हा प्रकरण टोकाला जातं तेव्हाच येतात. लोक काय म्हणतील या भीतीने ते काउन्सेलरकडे यायला वेळ लावतात. पालक येतात तेव्हा इतके वैतागलेले असतात की त्यांना शांत करण्यातच एक सेशन जातं. पहिल्या भेटीत पालकांचं आणि मुलाचं रुटीन विचारलं जातं. ते मुलांशी कसं वागतात, कशा प्रतिक्रिया देतात, ते समजून घेतात. मग काउन्सेलर त्यांना समजावतात, वागण्यात काही बदल सुचवतात. पालकांनी सोशिकपणा अंमलात आणणं सोपं नसतं. आतून कितीही राग आला तरी मुलांशी वागताना बाहेरून शांत राहावं लागतं. पालकांनी स्वतःच्या वागण्या-बोलण्यात-प्रतिक्रिया देण्यात बदल केल्यानंतर बर्‍याचदा काउन्सेलरकडे न येताच मुलांच्याही प्रतिक्रिया बदलतात. अर्थात मुलांमध्ये बदल व्हायला वेळ लागतो. पालकांनी मुलांवर चिडणं जाणीवपूर्वक बंद केलं तरी मुलं सुरवातीला आपला चिडचिडेपणा, हट्ट सोडत नाहीत. अशा वेळी पालकांना खूपच सामंजस्याने घ्यावं लागतं. मुलांमध्ये बदल होण्यासाठी जास्त वाट बघावी लागते. मुलांना पालकांमध्ये झालेला बदल जाणवत असतो. पण सहजासहजी मान्य करतील ती मुलं कसली? पण हळूहळू मुलांच्या वागण्यातून ते जाणवतं.
साधारणपणे पहिल्या टप्प्यात पालकांशी बोलणं, त्यांच्याकडून मुलांची हिस्ट्री समजून घेणं आणि त्याविषयी चर्चा. पुढच्या टप्प्यात पालकांचा नेमकी समस्या शोधून त्यांना काही उपाय सुचवणं, वागण्यात बदल सुचवणं आणि त्यावर चर्चा. तिसर्‍या टप्प्यात त्यांच्यातले बदल टिकून राहिलेत का, हे तपासणं, बदलांमुळे मुलांच्या वागण्यात अपेक्षित बदल दिसताहेत अथवा नाही याची चर्चा आणि बदल दिसत नसतील तर मुलांना काउन्सेलिंगसाठी आणण्याचे प्रयत्न करणं, असं चालतं.
मुलांच्या इंटरनेटच्या वेडाची नुकती सुरवात असेल तर एखाद-दोन सेशन्समध्ये, पालकांशी बोलूनच तो प्रश्न सुटतो. असं एक उदाहरण म्हणजे ८ वर्षांची मुलगी होती. प्रिया म्हणूया तिला. आई नोकरी करत असल्यामुळे शाळेव्यतिरिक्तचा वेळ प्रिया घरात एकटीच असायची. घरात वायफाय होतं. मग ती कंप्युटरवर काहीतरी करत राहायची. मात्र एक दिवस प्रियाने आईच्या मैत्रिणीला फेसबुक रिक्वेस्ट टाकली. मैत्रिणीकडून ते आईला कळलं. आईला धक्का बसला. मग एकदा आई आणि एकदा प्रिया अशी दोन काउन्सेलिंगची सेशन्स झाली. घरातलं वायफाय बंद केलं. आणि प्रश्न सुटला.
एक चांगली गोष्ट म्हणजे हल्ली पालक जागरुक झालेत. त्यांना मुलांमध्ये इंटरनेट किंवा गॅझेट्सच्या वेडाची झलक जाणवली की लगेच काउन्सेलरकडे जातात. मुक्तांगणमध्ये तर आमचा अनुभव तर असा कीे मुलांना मोबाईल घेउन देण्याचं ठरलं की पालक आधीच मुलांना आमची संस्था सहज दाखवायला म्हणून घेउन येतात. पुढच्या भागात आपण आणखी केसेसची चर्चा करूया.
  - मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
 शब्दांकन: रूपाली गोवंडे.

पिंक पँथर अर्चना


ही गोष्ट आहे 1997 ची. एकदा रात्री झोपेत अर्चना विशये यांचा त्यांचा हात डाव्या स्तनांकडे गेला. तिथे गाठ जाणवली. पतीला सांगितलं तर तो म्हणाला, दुखत नाही ना! लक्ष देऊ नकोस. रविवारी माहेरी गेल्यावर आईला गाठीविषयी सांगितलं. आईने अर्चनाच्या भावाला सांगितलं. भावाने लगेच पैसे देऊन डॉक्टरकडे जायला सांगितलं. डॉक्टरांनी ती गाठ काढली. पण काखेजवळ आणखी एक गाठ आढळल्यामुळे टाटा हॉस्पिटलला पाठवलं. शंका खरी ठरली. भावाने पुन्हा पैसे दिले आणि अर्चनाचं हेही ऑपरेशन पार पडलं. अर्चना वेदनेनं तळमळत होती. 2 दिवस उलट्या करून शरीरातलं पाणीही कमी झालेलं.
नोकरी करत असली, तरी सर्व व्यवहार, निर्णयांसाठी ती नवऱ्यावरच अवलंबून होती. नवरा मात्र दूरदूर राहू लागला. ऑपरेशननंतरची किमो उपचार फेरी निर्णयाविना लांबत होती. पुन्हा भावाने पैसे दिल्यावर नवरा दुसऱ्या दिवशी टाटात किमोसाठी अर्चनाला घेऊन गेला. किमोकरता 1 महिना उशीरा आल्यामुळे तिथल्या डॉक्टर प्रचंड चिडल्या. नवऱ्याने अर्चनाला साफ सांगितलं, मला तुझा खर्च झेपणार नाही. किमोनंतर शून्यात हरवलेल्या अर्चना आईकडेच येऊन राहिल्या. त्यानंतर प्रत्येक किमोला आई, वडील, भाऊ आणि मैत्रीण सोबत असायचे. नवऱ्याला फोन केला की काय काम आहे? कशाला भेटायचं आहे? ही उत्तर ऐकायला मिळायची.
आजारातून बरं झाल्यावर अर्चनाने परत कामावर जायला सुरूवात केली. मुलगी पदरात असल्यामुळे नातं टिकवायला त्या नवर्‍याकडे येऊन राहू लागल्या. त्याचं त्रास देणं सुरूच राहिलं. शेवटी कंटाळून अर्चनाने माहेरी परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांच्या पतीचा 2005 मध्ये मृत्यू झाला.
अर्चनाने बचतीच्या पैशातून नवी मुंबईत घर घेतलं. मुलीसोबत राहू लागल्या. बेबीसिटींगच्या कामाला सुरूवात केली. पण 2010 मध्ये उजव्या स्तनात नखाएवढी गाठ जाणवली. आधीच्या ऑपरेशन, किमोचा त्यांनी धसका घेतल्याने आयुर्वेदीक उपचार करण्याचं ठरवलं. एक वर्ष असचं काढलं. ती गाठ टोमॅटोएवढी झाली. परत टाटाला केस ओपन केली. यावेळी गाठीचा आकार पाहून ऑपरेशनच्या आधी 3 किमो आणि नंतर 3 किमो करायच्या ठरलं. पहिल्या किमोचा खर्च 18 हजार सांगितला. ते ऐकून त्यांना धडकीच भरली. कारण घर घेण्यात सर्व बचत गेली होती. टाटाच्या पायरीवर बसून रडू फुटत होतं. इतक्यात त्यांच्या लेकीचा फोन आला. ती लगेच आईला न्यायला आली. या सर्व काऴात त्या दोघींच नातं मैत्रीणीसारख फुललं होतं. मुलीच्या नाट्यवर्तुळातल्या मित्रमैत्रिणींकडून आणि काही ओळखीतून पैशांची जमवाजमव झाली. या किमो उपचारात त्यांना आधीपेक्षा जास्त त्रास झाला. मलबद्धता, कमी रक्तदाब, हातापायांच्या असह्य वेदना व्हायच्या. अर्चनाने आणखी औषधांच्या भीतीने डॉक्टरांना ही गोष्ट सांगितलीच नाही. 2012 मध्ये ट्रिटमेंट संपली. त्यांचं बेबीसिटींगच काम सुरू होतचं.
2013 च्या महिलादिनाला कॅन्सर सर्व्हायव्हल महिलांना एक दिवसांकरता बाहेर फिरायला नेलं होतं. त्यावेळी त्यांना पुढे काय करायचं विचारलं असता मेडिकल सोशल वर्कर व्हायचंय, असं अर्चनाने सांगितलं. आणि संजिवनी लाईफ बियॉण्ड कॅन्सरच्या रूबी अहलुवालिया यांनी अर्चनाला संधी दिली. आज अर्चना दिवसाला 30-40 जणांचं काऊन्सिलिंग करतात. त्या महिलांशी सर्व विषयांवर बोलतात. त्यांचे गैरसमज, भीती दूर करतात. कुटुंबाचीही समजूत काढतात. कारण कुटुंबाने समजून घेतलं तर अर्ध्याहून अधिक लढाई जिंकली जाते. बऱ्याचदा स्त्रिया लाजेखातर बोलत नाहीत. अशा स्त्रियांना अर्चना बोलतं करतात. त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. त्या ज्या दिव्यातून गेल्या तो त्रास इतरांना होऊ नये याकरता प्रयत्न करतात. पेशंट्सनी अजाणतेपणीदेखील डॉक्टरी उपचारांखेरीज अन्य काही करू नये, अंधश्रद्धांच्या मागे लागू नये यासाठी आग्रही राहातात. उपचारांदरम्यानचा आहार, व्यायाम, एकाकीपणावर मात कशी करावी यावर मार्गदर्शन करतात. अर्चना म्हणतात, “कॅन्सर वाईट आहे. पण तो तेवढाही वाईट नाही. पहिल्या वेळी मला आपलं कोण, परकं कोण कळलं. दुसऱ्यांदा माझं ध्येय मिळालं. बचत करायला शिकले. संजीवनीमुळे सोशल वर्कर होण्याची संधी मिळाली. लेकीचं लग्न झालयं. ती सुखात आहे. माझ्या कामामुळे आपलं आयुष्य दुसऱ्याच्या उपयोगी पडत आहे, ही भावना खूप सुखावणारी आहे.”
#नवीउमेद
(ऑक्टोबर हा स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून पाळला जातो. स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देऊन बऱ्या झालेल्या महिलांना पिंक पँथर्स म्हणतात. स्तनाच्या कर्करोगासंबंधी जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गुलाबी रंग प्रतिकात्मक म्हणून वापरला जातो. पिंक पँथर्स अर्थात या आजारावर मात करून जिद्दीने उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या, सपोर्ट ग्रुप्सचं अनुभवकथन मुंबईतल्या टाटा हॉस्पीटलच्या टीमसोबत अलीकडेच वर्सोवा इथल्या ‘द लिटिल हाऊस’मध्ये माध्यम क्षेत्रातल्या शची मराठे – यादेखील कॅन्सरमधून बर्‍या झाल्या आहेत आणि प्रियंका देसाई यांनी आयोजित केलं होतं. तिथे सादर झालेल्या अनुभवावर आधारित.)
- साधना तिप्पनाकजे.

Sunday 29 October 2017

पिंक पॅंथर आशा

पतीचा हेकेखोरपणा, मुलांना मारहाण याला कंटाळून दुबईतल्या 4 वर्षाच्या वास्तव्यानंतर, 2 मुलांसोबत आशा करंदिकर 2005 मध्ये मुंबईत परतल्या. त्यांनी एका नामांकित कंपनीत मार्केटिंग विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करायला सुरूवात केली. 2009 ला त्यांनी ठाण्यात स्वत:चं घरही घेतलं. मुलांसह घर आणि ऑफिस असं छान चाललं होतं. नव्या घराच्या सजावटीचं काम सुरू होतं. दरम्यान त्यांना त्यांच्या उजव्या स्तनामध्ये गाठ जाणवली. दुखत मात्र नव्हतं. त्यांनी मैत्रिणीला तसं सांगितलं. तिनं डॉक्टरना दाखवायला सांगितलं. आशाने घरसजावटीच्या कामापायी जरा चालढकल केली. दोन महिन्यांत गाठीचा आकार वाढला. तेव्हा मैत्रीण बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. आशाचा विश्वास बसेना. सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं. तिथेही पॉझिटीव्ह रिपोर्टवर शिक्का बसला.
आशाला हा खूप मोठा धक्का होता. आपल्याला कॅन्सर झालाय हे कळतं तेव्हा तो प्रचंड आघात असतो. कितीही औषधोपचार उपलब्ध असले तरी मीच का, मलाच का, हा प्रश्न छळत राहातो. कौटुंबिक जवाबदाऱ्या, औषधोपचारांचा खर्च याची काळजी तर असतेच. शिवाय स्तनाचा कर्करोग म्हणजे त्या स्त्रीकरता आणखीच नाजूक विषय. कारण स्त्रीत्व त्याच्याशी जोडलं गेलं असल्याची भावना. किमो थेरपी सुरू असताना शरीर-मनात अनेक बदल होतात. जसं मासिक पाळी बंद होणं, अशक्तपणा, थकवा जाणवणं, प्रतिकारक्षमता कमी होणं, चव नसणं, एकटेपणा वाटणं. या काळात कुटुंबाचा आधार नसतो, तेव्हा तर लढाई आशा करंदीकर यांची झाली, तशीच बिकट होते. मात्र, त्यावर त्यांनी केलेली मात आपल्याला प्रेरणा देऊन जाते.
आशाचा मोठा मुलगा तेव्हा नववीत आणि मुलगी सातवीत शिकत होती. कायदेशीर घटस्फोट झाला नव्हता. आर्किटेक्ट असणाऱ्या नवऱ्याला याबाबत सांगितलं तर, माझ्याकडे वेळ नाही असं म्हणत त्याने पैसे द्यायलाही नकार दिला. आशा यांनी आपल्या मुलांसाठी आपल्याला बरं व्हायचचं आहे हे मनाशी पक्क ठरवलं. डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी औषधोपचार सुरू केले.
किमोच्या सहा फेर्‍या. या औषधोपचारांकरता, मुलांकरता, घर चालवण्यासाठी, कर्जाच्या हप्त्यांसाठी पैसे उभं करायचे होते. नवऱ्याने तर मुलांचा खर्च कधीच उचलला नव्हता. पण आशाचं मित्रमंडळ मदतीला आलं. मुलांना सगळी कल्पना दिली. त्यांनी आईला धीर दिला. पण हॉस्पीटलमध्ये आईला भेटायला आल्यावर आईचं एक स्तन काढल्याचं कळलं आणि खूप साऱ्या उपकरणांच्या वेढ्यात आईला पाहिल्यावर मात्र मुलं प्रचंड घाबरून गेली.
किमोचा कोर्स पूर्ण झाला. आशा आजारातून बाहेर पडल्या होत्या. आता त्यांची एमबीए कोर्स करण्याची जुनी इच्छा परत डोकं वर काढू लागली. नोकरी करणं तर आवश्यकच होतं. फीसाठी लागणारे पैसेही नव्हते. मग त्यांची धाकटी बहीण पाठीशी उभी राहिली. 2011 मध्ये आपल्या ताईला घेऊन तिनं पुण्याचं सिंबॉयसिस कॉलेज गाठलं. तिथं एमबीच्या डिस्टन्स अभ्यासक्रमाची फी स्वत: भरून बहिणीसाठी ॲडमिशन घेतली. आशा ऑफिसचं काम संध्याकाळी साडेसहाला आटोपल्यावर, तिथेच बसून अभ्यास करायच्या. नोटस् काढणं, ऑनलाइन स्टडी मटेरियल शोधणं हे सर्व त्या ऑफिसच काम आटोपल्यावर करून सीएसटीहून रात्री 8.30 ची ठाणे लोकल पकडायच्या. दोन वर्ष त्यांनी वाहून घेतलं आणि 2013 मध्ये त्यांच्या हातात एमबीएची डिग्री आली.
आजही त्या ऑफिसमध्ये कस्टमर सर्व्हिस, केअर, अलायन्स टायअप ही कामं समर्थपणे हाताळतात. दोन वर्षापूर्वी त्यांचे पती दुबईहून निवृत्त होऊन त्यांच्याकडे परत आले. एवढी वर्ष एकटीने खिंड लढवल्यावर अता त्यांच्या येण्याने काय फरक पडणार होता? अखेर गेल्या डिसेंबरमध्ये कायदेशीर घटस्फोटच घेतला. आता आशा त्यांचं ऑफिस सांभाळून कॅन्सररुग्णांमध्ये आशा जागावण्याचं काम स्वेच्छेने करतात. त्यांची मुलं उत्तम शिकून मार्गी लागली आहेत.
आशाच्या कहाणीचा कळस तर पुढेच आहे. आता त्यांना जोडीदारही मिळालाय. कामादरम्यान त्यांचा मनोजशी संपर्क आला. घटस्फोटामुळे नैराश्यात असणाऱ्या मनोज यांना आशाच्या जगण्याच्या लढाईमुळे उमेद मिळाली. आणि त्यांनी आशाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलांनीही या नव्या नात्याला स्वीकारून आईला पाठिंबा दिलाय.
साधना तिप्पनाकजे.

Friday 27 October 2017

माझं शरीर- माझा अधिकार



सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :

साताऱ्यातील माण तालुका. इथल्या भालवडीतील जिल्हा परिषद शाळा. इतर शाळांप्रमाणे त्यांच्याही शाळेत ‘मीना- राजू’ मंचाचा उपक्रम सुरू आहे. त्यात शिवीबंद अभियान, बालकांचे अधिकार, माझं शरीर- माझा अधिकार अशी वेगवेगळी सत्रं देशपांडे मॅडम घेतात. मीना- राजू मंच मुलांच्या मनावर कसा ठसला आहे, याविषयी शाळेतील सुगमकर्त्या ओनस्वी देशपांडे सांगतात.
                                                                            
‘माझं शरीर -माझा अधिकार’ हे लैंगिक शोषणाला विरोध करण्याचं बळ देणारं सत्र आहे. यामध्ये मानवी आकृतीच्या चित्रावर मुलं-मुली लाल आणि हिरव्या रंगाच्या खडूने खुणा करतात. शरीराच्या ज्या भागाला इतरांनी हात लावल्यास संकोच वाटत नाही, तिथं हिरव्या रंगाच्या खडूने खुणा करायच्या आणि शरीराच्या ज्या भागास हात लावलेला तुम्हांला आवडणार नाही, संकोच वाटेल तिथं लाल रंगाने खुणा करायच्या. हा उपक्रम मुलांकडून करवून घेता-घेता त्यांना त्यांच्या शरीराची ओळख करून दिली जाते. शरीराचे काही अवयव हे इतके खाजगी असतात की तिथं आई आणि स्वत:शिवाय इतर कुणीही स्पर्श केल्यास नकोसं वाटतं. तुम्हांला कोणी असा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला ठाम नकार द्या, ती व्यक्ती इजा करेल अशी भीती वाटली तर आरडाओरडा करा. अशाप्रकारचा त्रास होत असेल तर विश्वासातील व्यक्तींना अथवा शिक्षकांना याची माहिती द्या, अशी शिकवण उपक्रमातून दिली जाते.
देशपांडे मॅडम यांनी हा उपक्रम तसेच इतर अनेक सत्रं उत्तमप्रकारे घेतली होती. वेळोवेळी मुलांचे फोटो, मुलांनी केलेले लिखाण, गटचर्चांचे फायलिंग त्यांनी करून ठेवले होते. पण अचानक 2016 च्या मे महिन्यात भालवडी गावात अवकाळी पाऊस कोसळला आणि शाळेची अवस्था दयनीय झाली. शाळेचा पत्रा उडून गेला, फोटो आणि फाईल्स भिजल्या, त्यावर दगड माती कोसळली. हे पाहून विद्यार्थ्यांना आणि मॅडमनाही खूप वाईट वाटलं.
काही दिवसांनी या मीना- राजू मंचाचे काम पाहण्यास काही कार्यकर्ते आले, तेव्हा त्यांना दाखविण्याजोगे आपल्याकडे काहीच नाही, असं मॅडमना जाणवलं. त्याचवेळी मुलांनी मात्र, ‘आम्हांला मॅडमनी शिकविलेलं सगळं लक्षात आहे, काहीही विचारा’ असं आवाहन पाहुण्यांना केलं. आनंदाची गोष्ट म्हणजे ‘माझं शरीर- माझा अधिकार’ या सत्राचं सार अक्काताई नावाच्या मुलीने अगदी एका ओळीत सांगितलं, “माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार आहे, माझ्या परवानगीशिवाय मी कोणालाही स्पर्श करू देणार नाही. कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मी विरोध करेन” अक्काचे उत्तर ऐकून कार्यकर्तेही थक्क झाले. इतर मुलांनीही फार चांगली उत्तरं दिली.
त्यामुळे “कसलंही फायलिंग उपलब्ध नसलं, तरी तुमची हुशार मुलं हाच तुमच्या शिकवण्याचा सर्वात चांगला पुरावा आहे” असा शेरा देऊन ते निघून गेले. ‘मीना- राजू मंचाच्या’ उपक्रमामुळे असे छोटे- मोठे बदल घडून येत आहेत. मुला-मुलींमधे आत्मविश्वास आणि आत्मभान जागृत करण्यासाठी अशा उपक्रमांचा फायदा होतो आहे.
(लेखातील काही मुलींची नावे बदललेली आहेत.)

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

कुरुंजीतलं गमभन

कुरुंजीत मुलांना पार्ट्या करायला आवडते. कधी कधी आम्ही भेळेची पार्टी करतो. मुलं तिथल्या दुकानातून मुरमुरे आणि फरसाण विकत आणतात. कांदे, टोमॅटो, तिखट, मीठ इ. गोष्टी आपापल्या घरातून घेऊन येतात. ज्यांच्याकडे पैसे असतील ते पैसे एकत्र करतात, कमी पडलेले मी देते आणि मुलं दुकानातून सामान आणतात.
एप्रिल महिन्यात आम्ही अशी भेळ केली होती. तेव्हा कच्ची करवंदं जाळ्यातून लगडली होती. मुलींनी पटकन थोडी करवंदं तोडून आणली. त्यांची तिखट मीठ घालून दगडाने चटणी वाटली आणि भेळेत कांदा टोमॅटोबरोबर घातली. अप्रतिम चवीची ती भेळ आम्ही चाटून पुसून खाल्ली होती. एकूण पंधरा जणांच्या भेळेचा खर्च आला होता एकशे पंधरा रुपये फक्त. यात मुलामुलींचा पूर्ण सहभाग असतो. जमेल तसे घरातून तिखट मीठ इ तर आणतातच, पण किती आणायचं, कुणी आणायचं हेही तेच ठरवतात. सगळे बसून कांदे-टोमॅटो चिरतात, भेळ एकत्र कालवतात आणि आम्ही गोलात बसून बोकाणे भरतो




एकदा शनिवारी शाळेतून घरी येताना कुठेतरी फिरायला जाऊ या असं मुलं म्हणाली. काही कारणाने मी नको म्हटलं तर मुलं हिरमुसली. मग त्याला काय पर्याय तर पार्टी ! रस्त्यात प्लॅन तयार झाला. सगळ्यांनी घरून भाकर आणायची आणि माझ्या घरी अंड्याची भुर्जी करायची. यासाठी ‘मोठी अंडी’ मिळणाऱ्या गावातल्या दुकानातून मुलांनी अंडी आणली, ज्यांना शक्य त्यांनी पैसे दिले, कांदे तिखट, मीठ इ आणलं. आम्ही तयारी करणार तोपर्यंत दहावीतला मयूर आणि नववीचा तुषार आले. त्यांनी स्वैपाकघर ताब्यातच घेतलं. भुर्जी बनवून सगळ्यांना नीट वाढून, जेवल्यावर घर स्वच्छ करून मगच ही मुलं गेली.
गावात वर्षातून तीन चारदा तरी पूर्ण गावाची एकत्र जेवणं होतात, घराच्या दारात काही लग्नं होतात. त्यामुळे मुलांना पंक्तीत वाढणे, बसायची व्यवस्था, पाणी पुरवणे, जेवणानंतर जागा स्वच्छ करणे या गोष्टींची सवय आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या मुली पार्टी करू या म्हणाल्या. मी म्हटलं प्लॅन करा. किरकोळ काही आणायचं तर मी शुक्रवारी पुण्याहून जाताना नेऊ शकते. कुरुंजीला जाताना दोन बस बदलायला लागतात. त्यामुळे फार जड मी नेऊ शकत नाही. भोरला जाणाऱ्या कुणाकडून सामान मागवता आलं असतं. कुरुंजी खूपच लहान आहे. घरगुती दोन तीन किराणा दुकानं आहेत. पण भाज्या, दूध इ. मिळत नाही.जायच्या आदल्या रात्रीपर्यंत काही निरोप आला नाही. मी त्या आठवड्यात शनिवारी गेले. मोठ्या मुली दुपारी घरी आल्या. म्हणाल्या, ताई, काहीच सामान नाही, कशी पार्टी करायची? राहू दे. आपण चहा बिस्किटांची पार्टी करू. मग भरपूर चहा केला.रुपेशनं दुकानातून पार्ले जी ची पाकिटं आणवली आणि आमची टी पार्टी झाली. सगळी मुलं चारच्या सुमाराला घरी गेली.
बऱ्याच वेळानं प्रतीक्षा, समीर, कावेरी, कोमल, सार्थक, करण, गौरव, मयूर इ. मुलं (पाचवी ते सातवी या वयोगटातली) हातात बरंच सामान घेऊन आली, कणीक, तेल, तिखट, मीठ, अंडी, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर इ. इ. मी काही विचारायच्या आत, तुमच्या घरात आम्ही पार्टी करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. अंड्याची भाजी, भात आणि पुऱ्या असा मेनू पण सांगितला. मग सामुदायिक काम सुरू झालं. मुलगे कमी पडेल ते सामान आणायसाठी येरझाऱ्या मारू लागले. मुलींनी स्वैपाकघराचा ताबा घेतला. कांदे चिरणे, कणिक मळणे, घरात अजिबात पाणी नव्हतं म्हणून पाणी आणणे इ. कोमलने आपल्या घरून मिक्सरवर मसाला वाटून आणला.
त्यांना गॅसची सवय नाही म्हणून मी कुकर लावणे, अंडी उकडून त्याची रस्सा भाजी बनवणे, पुऱ्या तळणे अशी कामं केली. तर मुलींनी आजूबाजूच्या घरातून पोळपाट लाटणी मागून आणून पुऱ्या लाटल्या.
मोठ्या पोळ्या लाटून त्याच्यावर वाटीने कोरून मुली पुऱ्या बनवायला लागल्या तर मुलगे येऊन त्या पुऱ्या कागदावर रचू लागले. नंतर तळलेल्या पुऱ्या एक पुठ्ठ्यावर कागद टाकून जमा करू लागले. सगळ्या कामात एक लय येत होती, चर्चा न करता्च कामाची वाटणी होत होती. गप्पा तर अखंड चालू होत्या. एरवी भांडणारी मुलं मुली एक टीम म्हणून काम करत होती. सगळा स्वैपाक होईपर्यंत कोणत्याही मुलाने चुकूनही पुरी तोंडात टाकली नाही.
पुऱ्या झाल्या. घरात मुलामुलींना खेळायला मी जुन्या ओढण्या ठेवल्या आहेत. करण आणि सार्थकने त्या ओढण्या छानपैकी अंथरून पंगती तयार केल्या. सगळ्यांनी आपापली ताटं आणली होती. या सगळ्या मुलांत शेजारचा तीन वर्षांचा सोहम लुडबुडत होता. मुलांनी प्रेमानं त्यालाही पंगतीत घेतलं. कावेरीनं एखादया अनुभवी बाईप्रमाणे सगळ्यांना वाढलं. ती, प्रतीक्षा आणि कोमल सगळ्यांना वाढल्यावर जेवायला बसल्या. माझा सहभाग फक्त बघण्याचा आणि जेवणाचा.
मुलं गप्पा मारत हसत खेळत जेवली.
जेवल्यावर पुऱ्या राहिल्या त्या लहान सोहमच्या घरी दिल्या, भात राहिला तो करणने बैलांसाठी नेला, काहींच्या ताटात भात राहिला होता तो पेपरवर बाहेर कुत्र्यांना दिला. सगळा स्वैपाक असा संपवून जमीन स्वच्छ झाडून मुलं गेली. अजिबात पाणी नसल्यामुळे काही भांडी घासायची राहिली. दुसऱ्या दिवशी आठ वाजता पाणी आलं तर स्वतः च्या घराचं पाणी भरून प्रतीक्षा पळत आली. मी पाणी भरत होते तेवढ्यात तिने पटपट भांडी घासून पण टाकली. स्वैपाक घरात ती व्यवस्थित जागेवर मांडली.
मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर मुलं अतिशय जबाबदारीनं वागतात. इथं माझा रोल त्यांना अवकाश देणे, मदत मागायला आलेच तर ती देणे एवढाच आहे. माझं काम आहे ते अशा वेळी मुलांच्या होत असलेल्या आकलनाची निरीक्षणं करणे आणि त्याची नोंद ठेवणे.
: रंजना बाजी

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग चार



हॉस्टेलमध्ये रहाणार्‍या मुलांकडे लक्ष ठेवणं पालकांना थोडं अवघड जातं. या बाबतीत पालकांनी नेमकं काय करायचं?
- मी सुचवेन की तंत्रज्ञानाची मदत घ्यावी आणि स्काईपसारख्या माध्यमातून मुलांशी बोलत राहावं. आई-वडील आणि मुलं यांचा व्हॉट्स ॲप ग्रुप बनवावा. आम्ही घरात असा ग्रुप बनवला आहे. आपण काही चांगलं वाचलेलं, चांगला सिनेमा बघितलेला, हे सगळं मुलांबरोबर शेअर करावं. सतत जेवलास का आणि झोपलास का असं विचारत बसू नये. उपदेश तर नकोच नको. आपल्या संवादातून मित्रत्वाची भावना मुलांच्या मनात निर्माण करा. आपण आता मोठे झालो आहोत, हे आपल्या आई-वडिलांना समजलंय, ही जाणीव मुलांमध्ये निर्माण होऊ द्यात. माझी एक मैत्रीण म्हणते की हॉस्टेलवर रहाणार्‍या तिच्या मुलाशी तिचं स्काईपवर होणारं बोलणं जास्त जिव्हाळ्याचं असतं. दिवसातलं २० मिनिटांचं बोलणं थेट आणि समोरासमोर बसून होतं आणि दोघांकडून तेवढा वेळ एकमेकांना दिलाच जातो. काही वेळा एकाच घरात राहूनसुद्धा दिवसेंदिवस स्वत:च्या व्यापात व्यस्त असणार्‍या आई-मुलाचंही रोज एवढं बोलणं होत नाही.
डिजिटल व्हर्च्युअल गेमपायी एखाद्याने आपलं जीवन संपवलं, असं आपण ऎकतो. ही नेमकी काय मानसिकता असते?
- टीन एज किंवा ज्याला पौगंडावस्था म्हटलं जातं या अवस्थेत मुलं वहावत जातात. पटकन कोणाच्याही प्रभावाखाली येतात. मग ते मित्रमैत्रिणी असोत. किंवा फिल्मस्टार असोत. मित्रमैत्रिणी जे सांगतील तसंच मुलं करतात. नकळतपणे निगेटीव्ह गोष्टींचं आकर्षण या अवस्थेत मुलांना जास्त असतं. व्हिलनचा रोल करणार्‍याविषयी त्यांना आकर्षण वाटू शकतं आणि हे त्या वयात नैसर्गिक असतं. मग अशा गेम्सच्या आहारी ते लवकर जातात. पहिल्या भागात आपण म्हटलं की इंटरनेटवर किती वेळ बसायचं, त्याचाही नियम करावा. अर्धा तास ठीक आहे. तर, ज्या मुलांना पालकांनी अर्धा तास इंटरनेटवर बसायची परवानगी दिलेली आहे, त्या मुलांच्या बाबतीत गेमचं आकर्षण, त्यातून काही विपरित प्रकार घडण्याची शक्यता खूप कमी असते. पण जेव्हा मुलं तासच्या तास कंप्युटरसमोर किंवा मोबाईल हातात घेऊन बसलेली असतात तेव्हा ते गेम्सच्या प्रभावाखाली येतात. म्हणूनच, मुलांचा इंटरनेटवरचा वेळ कमी ठेवण्याचीच सवय पहिल्यापासून लावावी.
आणखी एक, घरातला कंप्युटर/लॅपटॉप घरात सगळ्यांचा वावर जिथे असतो, तिथेच हवा. उदा. हॉलमध्ये. म्हणजे घरातल्या सगळ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, हे मुलांच्या डोक्यात रहातं. मुलांच्या मोबाईलला शक्यतो पासवर्ड ठेवू नये. मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगा्वं की मी तुझी प्रायव्हसी जपणार आहे. मात्र मोबाईलवरचे गेम तू मला दाखवून खेळ. मुलांशी रोजचा संवाद ठेवणं गरजेचंच आहे. आपल्या कामाचे, ऑफिसमधले इंटरेस्टींग किस्से त्यांना जेवताना सांगा. त्यांच्या कॉलेजमध्ये काय घडलं, ते सहज विचारा. मात्र मुलांनी सगळं सांगितलचं पाहिजे, असा अट्टाहास धरु नका. कारण टीन एजर्स घरात जरा गप्पगप्प झालेली असतात. त्यांना मोकळं व्हायला थोडा वेळ द्यायला हवा.
एखादा मुलगा / मुलगी आज डिप्रेशनमध्ये गेला / गेली आाणि लगेच उद्या आत्महत्या केली, असं कधीच घडत नसतं. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. ही विचारप्रक्रिया किमान ६-७ महिने डोक्यात चालू असते. अशा वेळी पालकांचं मुलांकडे नीट लक्ष असेल, तर त्यांच्या वागणुकीमध्ये होणारे बदल पालकांना लगेचच जाणवतात. त्यांच्या वागणुकीत, सवयीत बदल झालेत का? त्यांचा रात्रीच्या जागरणांचा वेळ वाढलाय का? अचानक आपला मुलगा / मुलगी पहाटे उठून मोबाईलवर बराच वेळ खेळतायत का? अशा गोष्टी पालकांना लक्षात यायलाच हव्यात.
आत्महत्या हा वैफल्याचा, तीव्र नैराश्याचा परिणाम असतो. अशा वेळेला पालकांना जाणवलं की आपल्या बोलण्याने फार फरक पडत नाहीये, तर काउन्सेलरची जरुर मदत घ्यावी. पालक स्वतःसाठीच काउन्सेलरकडे जाउन बोलू शकतात. प्रत्येक वेळेला मुलांना न्यावं लागतंच असं नाही. मुलं यायला तयार नसतील, तर हल्ली काउन्सेलर घरीही येतात.
इंटरनेट आणि गॅझेटसच्या वापरामुळे कोणते शारिरिक आणि मानसिक आजार होतात?
- या दोन्हीच्या अतिवापरामुळे आपल्या शरिरावर आणि मनावर दुष्परिणाम होतात. याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर (IAD) म्हणतात. या परिणामांना अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन आणि जागतिक आरोग्य संघटनेने आजार म्हणून मान्यता दिली आहे. पहिला परिणाम डोळ्यांवर होतो. तासनतास बसल्‍याने आजार होतात. सारखं बसून राहिल्याने शरिराला काहीच व्यायाम होत नाही. मोबाईल, कंप्युटर,टीव्ही एकटक बघताना जंक फुड पोटात जात असेल, तर मुलं ओव्हरवेट किंवा अंडरवेट होतात. संध्याकाळी मोकळ्या हवेत न खेळल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
मानसिक परिणाम म्हणजे एकाग्रता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते. एकटेपणा आवडायला लागतो. नकार या मुलांना सहन होत नाही. नकारावर मुलं आक्रमक प्रतिक्रिया देतात. या सगळ्याचा नातेसंबधांवर, अभ्यासावर आणि मग पुढे करियरवर परिणाम होतोच. मग ही मुलं आणखी आणखी निराशेच्या गर्तेत जाऊ लागतात. गेम खेळणार्‍या मुलांवर आणखी एक परिणाम होतो. त्यांच्यातला चिडचिडेपणा वाढतो. मग त्यांना मारामारी, रक्त, मरणं हे सगळं खेळण्याइतकं साधं सोपं वाटायला लागतं. आणि त्यांच्यातली संवेदनशीलता संपून जाते. पुढे जाऊन ही मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळायची शक्यता जास्त असते.
हे सगळं होऊ नये, यासाठी पालकांनी मुलांना गेम्स खेळायचा वेळ ठरवून देणं आणि आपण त्या बाबतीत केलेल्या नियमांवर ठाम रहाणं गरजेचं आहे. ठाम राहाणं म्हणजे सतत कडक राहाणं नाही. इतर वेळेला मुलांना मिठी मारा, त्यांना जवळ घ्या. मुलांवर पालकांच्या अशा स्पर्शाचा चांगला सकारात्मक परिणाम होत असतो.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
शब्दांकन: रूपाली गोवंडे

Wednesday 25 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग तीन



हल्ली पालकच मुलांना बक्षीस म्हणून सहजपणे मोबाईल हातात देतात किंवा इंटरनेटवापराला परवानगी देतात. त्यापेक्षा मुक्त खेळाला प्राधान्य द्यावं, हे पालकांना आणि मुलांना कसं समजावून सांगावं ?
- गॅझेट हे बक्षीस होऊच शकत नाही. पालकांनी मुलांसोबत घालवलेला वेळ, क्वालिटी टाईम, हे मुलांचं खरं रिवॉर्ड असायला हवं. मुलांना काही गोष्टींची आवड लावता येईल. बोर्ड गेम, पत्ते असे खेळ. एखाद्या दिवशी रात्री जेवणानंतर किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांबरोबरीने हे खेळ खेळावेत. मैदानी खेळांची सवय असणारी मुलं इंटरनेटच्या आहारी फार कमी प्रमाणात जातात, अशीही निरिक्षणं आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करावी. अशी मुलं मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम बनतात. मुलांना घरकोंबडं बनू द्यायचं नाही. रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र गप्पा मारत करायचं. त्यावेळी टीव्हीही नको आणि कोणाच्याच हातात मोबाईलही नको. असे छोटे छोटे नियम घरात बनवता येतील. अशा वेळेला मुलांना काय करा आणि काय करु नका, हे दोन्हीही सांगायचं नाही. तर पर्याय उपलब्ध करुन द्यायचे. मुलांना हळूहळू या पर्यायांची गोडी लागेल.
पालकांचं म्हणणं असं आहे की, टीनएजर्स मुलांना रागावताही येत नाही. आणि त्यांचा घरातल्यांशी संवाद तुटत चालला आहे, हेही जाणवतं. मग करायचं तरी काय?
- पालकांच्या बाजूने मुलांशी संवादाचे सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवेत. मुलांकडून पालकांना सूचना मिळत असतात. उदा - मुलं आयांना म्हणतात की, तू सारखी एकच गोष्ट मला सांगत असतेस. जेव्हा बघावं तेव्हा प्रत्येक गोष्टीवरुन लेक्चर देतेस. खरोखरच चाळीशी-पंचेचाळीशीतल्या आया एकच गोष्ट पुन्हापुन्हा सांगत राहतात. किंवा बोलायला लागल्या की थांबतच नाहीत. मुलांच्या प्रतिक्रिया म्हणजे पालकांसाठी वेक अप कॉल्स असतात. ते ऐकून जागं व्हायचं. जाणीवपूर्वक आपल्या वागण्यात बदल घडवून आणायचे. एक गोष्ट खरी की सगळ्या वेळेला मुलांचं मत आईवडिलांबाबत चांगलं असू शकत नाही. पण आईवडिलांनी घरातल्या नियमांबाबत ठाम रहायला हवं. एक गोष्ट आईवडील नक्की करु शकतात. मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हटकणं सोडून द्यायचं. प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये जनरेशन गॅप असतेच.
मुलांचे कपडे, हेअरस्टाइल तुम्हाला पसंत नाही, असं होऊ शकतं. याबाबत तुमचं वेगळं मत असू शकतं. पण ह्या क्षुल्लक गोष्टींच्या मागे लागून पालक खूप त्रागा करतात. मुलांच्या मागे लागतात. यामुळे नातं खराब होतं आणि मोठ्या गो्ष्टींबाबत मुलांशी संवाद साधता येत नाही. नात्यामध्ये कोणताही संवादच उरत नाही. चर्चाही होत नाहीत.
हे करु नका.. ते करु नका असं मुलांना प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा त्यांना विविध पर्याय द्यावेत. उदाहरणार्थ आज आपण टेकडीवर फिरायला जाउया का.. तुझ्या आवडीचा खेळ आपण दोघांनी खेळूया.. एखादा चांगला सिनेमा बघूया वगैरे. तुम्हीच इंटरनेटच्या चांगल्या वापरात मुलांना सहभागी करून घ्या. त्यांच्या जिव्हाळ्याची माहिती शोधणं, नेटवरचे लेख वाचणं असं काही. मुलांशी संवाद साधायला, तो वाढवायला सुरवात करा. यासाठी दिवसातला अर्धा तास किंवा एक तासही पुरेसा आहेे.
हल्लीच्या टीनएजर्सना आजुबाजुच्या लोकांशी बोलण्यात जराही स्वारस्य नसतं. अशा मुलांना इंटरनेटच्या व्हर्चुअल जगातून बाहेर कसं काढायचं? कारण ही मुलं नातेवाईकांकडे यायला तयार होत नाहीत आणि आली तरी मोबाईलमध्ये तोंड खुपसुन बसतात.
- हो. माझी मुलं जेव्हा टीनएज मध्ये होती तेव्हा मी गंमतीने म्हणायचे की या मुलांचं पालक होण्यापेक्षा काउन्सेलर होणं सोपं आहे. मुलं आणि नातेवाईक किंवा पालकांचं मित्रवर्तुळ यात असं शोधून काढायचं की आपले कोणते नातेवाईक त्यांना आवडतात. कोण कम्फर्टेबल वाटतात. त्यांच्याबरोबर मुलांना राहू द्यायचं. किंवा नातेवाईक आल्यावर त्यांच्याशी अर्धा तास बोल आणि नंतर तू तुझ्या कामाला जा असं मुलांना सांगता येतं. मीही हे सर्व केलं आहे. थोडं मुलांचं ऐकायचं आणि थोडं तुमचं त्यांना ऐकायला लावायचं.
इंटरनेटमुळे असं होत चाललंय की लोकांना समोरासमोर येऊन बोलायची सवय राहिली नाहीये. माझ्याकडे काउन्सेलिंगला येणारी मुलं नजरेला नजर देऊन बोलू शकत नाहीत. त्यांची कोणाशी प्रत्यक्ष बोलायची सवयच गेलेली असते. टीन एजमध्ये जातात तेव्हा मुलांमध्ये अनेक बदल होतात. न्यूनगंडाची भावना निर्माण होते. आत्मविश्वास जातो. मग बोलायची, लोकांना थेट भेटायची सवय कमी होते. याच वेळी इंटरनेट हातात आलं की संपलंच. त्यामुळे प्रत्यक्ष समोर न येता संवाद साधंण सोप जातं आणि मग त्यांना तेच बरं वाटू लागतं. आणि यात बदल करावा असं वाटत नाही.
अल्बर्ट आईनस्टाइन यांनी म्हटलंय, भविष्यात तंत्रज्ञान नात्यांहून महत्वाचं होईल तेव्हा इडियटसची जनरेशन तयार होईल. आणि ते आता खरं झालयं, असं दिसतंय. लोकांना खरीखुरी माणसं, नाती याहून व्हर्च्युअल जग जास्त खरं आणि जवळचं वाटतंय. आपण मोबाइलला स्क्रॅच येऊ नये म्हणून त्याला स्क्रीन गार्ड लावतो, त्याची काळजी घेतो. त्यापेक्षा आपल्या जवळचं माणूस दुखवू नये, नात्याला तडा जाऊ नये, नातेसंबंध सुरळीत, सुरक्षित राहावेत, याची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. हे मुलांना पट्वून देणं आपली पालक म्हणून जबाबदारी आहे. मोबाईल ही निर्जीव गोष्ट आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 

शब्दांकन: रूपाली गोवंडे

गावाने घडवला बदल; तृतीयपंथी झाला सरपंच



 सोलापूर जिल्ह्यातील ता. माळशिरस या गावापासून १२ किलोमीटर अंतरावर, डोंगर, द-यात वसलेलं तरंगफळ. या गावाची ग्रामपंचायत स्थापना १९७२ सालची, तीन प्रभाग व नऊ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या या गावातील जनतेने पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचपदाच्या निवडणूकीत, तृतीयपंथी उमेदवार ज्ञानेश्वर कांबळे यांना सरपंच केले. भाजप प्रणित आघाडीचा महाराष्ट्रातील, पहिला तृतीयपंथी सरपंच होण्याचा मान, ३७ वर्षीय ज्ञानेश्वर उर्फ माऊलीने मिळवला आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या तरंगफळ या गावात, एक हजार ८५० मतदार आहेत. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या विरोधात सहा उमेदवार उभे होते, त्यातील पाच जणांचे डिपॉझीट जप्त झाले. माऊली यांनी ८६० मते मिळवत १६७ मतांनी विजय मिळवला.
तृतीयपंथी म्हटलं की, समाज अशा व्यक्तींकडे वेगळ्या नजरेने पाहतो. त्या व्यक्तीला व कुटुंबाला अनेक यातनाही सहन कराव्या लागतात. ज्ञानेश्वर शंकर कांबळेही त्याला अपवाद ठरला नाही, तृतीयपंथी असल्याचं निष्पन्न झाल्यावर १४ व्या वर्षी साडी घालायला सुरूवात केली. त्यावेळी गावापासून, दहा किलोमीटरवर मगराचे निमगाव गावात त्याने आसरा घेतला. या गावातील लोकांनी त्यास रहायला जागा देऊन, देवाचा जोगती म्हणून सांभाळून घेतले. शेळ्या, मेंढ्या, जनावरे राखत तो आपली उपजीविका भागवत होता. २००० सालापासून तो पुन्हा गावात येऊन राहू लागला. गावातील लोकांनी त्यास रहायला जागा दिली आणि तो पुन्हा समाजाशी जोडला गेला. तो म्हणतो, “तृतीयपंथी व्यक्तीने आपले कुटुंब, समाज सोडू नये”. ग्रामीण भागात आठवडी बाजारात जाऊन लोक देतील तेवढे दान घेणे व परत आपल्या घरी येणे, हा त्यांचा नित्यक्रम. परंतु, तरंगफळ गावात माऊलीने कधीच कुणाला त्रास दिला नसल्याचे, विरोधी गटातील गावकरीसुध्दा मान्य करतात. माऊली गावकऱ्यांच्या कुठल्या ही मदतीला नेहमी धावून जातो.
                                                                    गावात चांगला परिचित असल्याने तो एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आला असल्याचं गावकरी सांगत होते. एक तृतीयपंथी सरपंच गावाने निवडून दिला, याचा अभिमान अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याचं शिक्षण जेमतेम सातवी. पण, शिक्षण कमी असले तरी गावासाठी काहीतरी करण्याची धमक त्यांच्या बोलण्यातून जाणवते. हगणदारी मुक्त गाव संकल्पना राबविणार असल्याचं ते सांगतात. गावातील राजकारण बाजूला ठेवून अंतर्गत गटारी, रस्ते, स्वच्छता, पिण्याचा पाण्याची सोय अशी कामं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तृतीयपंथी वर्गाला समाजात हिणवले जाते. मात्र अशा व्यक्तीस तरंगफळ गावाक-यांनी आपला कारभारी म्हणून, ज्ञानेश्वर कांबळे यास निवडून देऊन आदर्श निर्माण केला आहे.
तृतीयपंथी समाजाबद्दल बोलताना ते म्हणतात, “या समाजातील वर्गाला मान सन्मान मिळत नाही. या समाजातील व्यक्ती वाम मार्गाला लागून व्यसनांच्या आहारी गेले आहेत. त्यांचाशी भेदभाव न करता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजे आहे.” आम्हांला कुठे तरी हक्क मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. “गावासाठी आपण काही तरी करावं. आणि तृतीयपंथी व्यक्तीने मुख्य प्रवाहात यावं, समाजापुढे एक आदर्श निर्माण व्हावा, म्हणून सरपंचपदाची निवडणूक लढवली असल्याचं माऊली सांगतो

- गणेश पोळ.

Tuesday 24 October 2017

ज्युनियर ब्रह्मे - भाग पाचवा

प्रवास पालकत्वाचा: मी घराचा कर्ता पुरुष आहे अशी माझी एक प्रामाणिक समजूत आहे. ही समजूत व्हायचं कारण इतकंच की कर्त्या माणसाला कायम कामाच्या ओझ्याखाली ठेवलं जातं. कर्त्या पुरुषाचं दुसरं लक्षण म्हणजे त्याची कधी कदर होत नाही, त्याला कुणी किंमत देत नाही. पण असो. ते माझ्या पाचवीलाच पुजलं गेलंय. खुद्द आमच्या लग्नात माझी नवरामुलगा म्हणून कुणी किंमत केली नव्हती, आता बोला! मेव्हण्यांनं लग्नाची बातमी पेपरला देताना "मोठी जाहिरात कशाला हो? इथं काय लगीन आहे का कुणाचं?"असं म्हणून छोटीशी बातमी दिली होती. फक्त ती बातमी दशक्रिया विधी आणि देहावसानच्या पानावर नको असा मी हट्ट केल्यानं मग छोट्या जाहिरातीच्या "हरवले/ सापडले" कॉलममध्ये आमच्या लग्नाची बातमी कोंबून बसवली होती. (त्यातही नवऱ्यामुलाचं गुणवर्णन करताना हसतमुख हा शब्द न आठवल्यानं हास्यास्पद असा शब्द वापरला होता.)

असो, पोरं हाच वारसा पुढं चालवत आहेत. आधीच मोठा माओ मला स्वतःचा लहान भाऊ समजतो. आणि धाकट्या मुलाचा, मिष्काचा (वय वर्ष साडेतीन) तर माझ्यावर तीळमात्रही विश्वास नाही. मी अंघोळ घालू का? असं विचारलं तर नाक उडवून 'नाई! तुला नाई येत्त.' असं उत्तर मिळतं. चित्रं काढताना मुलात मुल होऊन 'ही कार आहे का?' असं विचारलं तर 'हात्त! तो हात्ती हाये. त्याची शेपूत नाई दिशली का? वेला कुथला!' असं प्रत्युत्तर येतं. मी ऑफिसला जाताना 'डबा' घेऊन जातो तर माओ स्कूलला 'टिफिन' नेतो. म्हणजेच बाबा कुठल्या तरी डब्बा शाळेत जातो आणि दादा मात्र 'मोट्या श्कुलमदी' जातो असा निष्कर्ष या पोरानं काढलाय. जेवताना पाय हलवू नये असं माओला सांगताना ऐकल्यावर मिष्कानं यापुढं जाऊन पुढचे नियम तयार केले, जसे- ज्येवताना हात हालवायचे नाईत, ज्येवताना डोकं हालवायच्य नाई, ज्येवताना तोंड हालवायच्य नाई. त्याच्या नियमाप्रमाणं वागायचं तर जेवण करणंच बंद करावं लागेल. 'बाबा माज्या नियम पालत नाई तर मीपन बाबाच्या नियम पालनार नाई.' असं आर्ग्युमेंट या पोरानं केलं. पुढंमागं वकील होऊन नाव काढणार.
मी कोणतीही गोष्ट नीट करू शकत नाही यावर दोन्ही पोरट्यांचा ठाम विश्वास आहे. माळ्यावरून गेल्या वर्षीचं मखर काढायचं असलं, गाडी धुवायची असली, गव्हाचं पोतं रिकामं करायचं असलं किंवा डब्यातून तेल काढायचं असलं तर दोघं टीव्ही सोडून मला बघायला धावतात. एखादी गंमत बघायला मिळणार असे उत्सुकतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतात. परवा दोघांच्या टक लावून बघण्याचा त्रास इतका झाला की माळ्यावरून परात खाली आणताना ठाणकन खाली पडली. दोघं पोरं पैसे वसूल झाल्यासारखे चेहरे करून पुन्हा खेळायला निघून गेली. परात खाली पडली तेव्हा मी संतापानं जे वाक्य उच्चारलं त्यावरून बायकोनं नंतर झाडपट्टी केली ती वेगळीच. 'कुठून शिकता हो असले शब्द?' असं ती म्हणाली तेव्हा ती मला आपला मुलगाच समजते याची खात्री पटली.
एकूणात, आमचा प्रवास पाल्य ते पाल्य असाच होत राहिलाय.
(मेधाताईंच्या सांगण्यावरून मी हे पालकत्वाची कहाणी लिहिली. तेव्हा हा सगळा पाल्य ते पालक प्रवास डोळ्यांसमोर आला. जरी हा कुणी आदर्श म्हणून घ्यावा असा नसला, तरी अगदीच घेऊ नये, असाही नाही.)
(चित्र:गजू तायडे)

वैद्यकीय क्षेत्रातील ‘देवदूत’

त्याचं नाव प्रल्हाद. सोलापूरच्या वैशंपायन मेडिकल कॉलेजमधून त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. आता नोकरीचा शोध घ्यायचा होता. मग आरोग्य विभागात नोकरीची जागा रिक्त असल्याचं कळलं. त्याने तशीच कागदपत्रं पिशवीत टाकली. आणि ती नोकरीसाठी मुंबईत धावला. सरकारी नोकरी मिळालीही; पण कुठे तर सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण रुग्णालयात. साल होतं १९९०. तसंच काही न खाता-पिता त्यांनी एसटी पकडली आणि सिंधुदुर्ग गाठलं. एव्हाना रात्र पडली होती. फरशी हॉटेल्स असण्याचा तो काळी नाही. असतील तरी हातात पैसा नाही. मग, बसस्थानकाच्या कठडय़ावरचं त्यांनी झोप घेतली. इतकी वाईट परिस्थिती असतानाही आपल्याला नोकरी मिळणार या आनंदानेच हे डॉक्टर सिंधुदुर्गात रूजू झाले. तिथं चार महिने काम केल्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांची बदली झाली.
आणि आतापर्यंतच्या 25 वर्षात हजारों रूग्णांचे ‘देवदूत' ठरले. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.प्रल्हाद देवकर यांची ही गोष्ट.


मध्यंतरी रत्नागिरीत काही शाळांमध्ये आरोग्य तपासणी झाली. या तपासणीत जवळपास 200 मुलांमध्ये अपेंडीक्स, हर्निया, हृदयाला छिद्र, पायामध्ये गाठ अशा विविध गंभीर आजारांचं निदान झालं. या सर्व शस्त्रक्रिया मोजक्या काही दिवसांत डॉ. देवकर यांनी यशस्वी केल्या. इतकंच नाही तर, गेल्या 20-22 वर्षाच्या कालावधीत देवकर यांनी 15 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत केल्या आहेत. त्यामुळेच आज डॉ.देवकर हे सर्वसामान्य गरीबांसाठी तर रत्नागिरीचे ‘देवदूत' ठरले आहेत.
कामाची दखल म्हणून ‘दि प्राईड ऑफ इंडिया’चा ‘भास्कर अवॉर्ड’ही त्यांना मिळाला आहे. आजही 12 तासाहून अधिक काळ ते शासकीय रूग्णालयात काम करत असतात. रत्नागिरी शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोठा तुटवडा आहे. आणि दररोज उपचारासाठी भरती होणाऱ्यांची संख्या मात्र वाढतीच आहे. सिव्हील सर्जन म्हणून काम करताना एखादा गंभीर रूग्ण दाखल झाल्यानंतर डॉ.देवकर त्या रूग्णाची तपासणी करतात. हे करतानाच रूग्णालयाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठीही धडपडतात. त्यातूनही महिन्याला 100 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करून त्यांनी रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.
अतिशय साधी राहणीमान आणि रूग्णांप्रती असलेली तळमळ यामुळे ते रूग्णांचे देवदूतच ठरले आहेत. खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी हजारो रुपये घेतले जातात म्हणून रूग्ण शासकीय रूग्णालयात येतात. अशावेळी ड्युटी संपली असली तरी ते रूग्णांसाठी थांबून उपचार करतात. एकाच दिवशी दहा-पंधरा शस्त्रक्रियाही डॉ.देवकर यांनी केल्या आहेत. हे सगळं करत असताना त्यांनी कोणताही गाजावाजा केलेला नाही. सकाळी लवकर हॉस्पीटल गाठायचं आणि रात्री उशीरापर्यंत थांबायचं हा त्यांचा ठरलेला दिनक्रम. डॉक्टर म्हणतात, “लोकांच्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळे मी न काम थकता करू शकतो”.
डॉ.प्रल्हाद देवकर


जान्हवी पाटील.

Monday 23 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का?भाग दोन



इंटरनेट गरज न रहाता व्यसन बनतं. तसं होऊ नये यासाठी पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
- यासाठी अगदी छोट्या बाळांपासून विचार करावा लागेल. हल्ली आईवडील खूप बिझी असतातच, मग बाळ जेवत नाहीये म्हणून त्याला फोनवर गाणी, गेम, टीव्हीवर कार्टुन लावून देतात. मग ती बाळं एका जागी बसतात, त्यांना भरवणं सोपं जातं. मात्र मुलं गुंग होऊन, हिप्नोटाईज झाल्यासारखी जेवतात. व्यसनप्रवृत्तीची सुरवात अशीच होते. पूर्वी बाळांना गोष्टी सांगत भरवलं जायचं.
आजच्या पालकांनी हे लक्षात घ्यायची गरज आहे की, आपला मुलांसोबत घालवायचा वेळ, संवाद याला टिव्ही/ कंप्युटर/ मोबाईल हे पर्याय कधीच होऊ शकत नाहीत.
माझं सांगणं कदाचित अतिरेकी वाटेल.. पण मी असं सांगेन की मुलं ७-८ वर्षांची होईपर्यंत त्यांना मोबाईलची ओळख करुन देउच नका. कारण त्याच्या मेंदुवर, मानसिक वाढीवर त्याचे परिणाम होत असतात. कार्टुन्स एक वेळ ठीक आहेत. पण तेही बघण्यावर वेळेची मर्यादा घालून द्यायचीच. सुरवातीपासूनच असं केलं की मुलं ऎकतात. फक्त या बाबतीत पालकांनी ठाम असायलाच हवं. काही वेळ दुपारी आणि काही संध्याका्ळी..हे खूप झालं.
माझ्या मुलांच्या बाबतीत मी हेच केलं होतं. पालकांनी स्वत:साठीहीे मर्यादा घालून घ्यायला हव्यात. ही किंमत पालकांना द्यावीच लागते. अशी मर्यादा लहान वयातच घातली की पुढे जाऊन अनेक संभाव्य धोके टाळता येतील.
सायबर सिक्युरिटी हा एक मह्त्वाचा मुद्दा आहे. इंटरनेटवर अनोळखी लोक मुलांना काहीही खाजगी माहिती विचारु शकतात. मुलांना त्याचं गांभीर्य कळत नसतं. दहा वर्षाच्या आतली मुलं आपलं म्हणणं ऎकायच्या मनस्थितीत असतात. मात्र, टीन एजमधली मुलं पालकांना सहसा जुमानत नाहीत. म्हणूनच लवकरच्या वयात मुलांना शिकवा, समजवा. ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी आताच शहाणं व्हावं.
या नवपालकांना मी सांगू इच्छिते. या गॅजेट्सपासून दूर ठेवण्यासाठी किंवा दोन वेळा कार्टून्स बघण्यावरच त्यांनी थांबावं यासाठी आपण जे करायचं त्यातलं मुख्य म्हणजे मुलांना पुस्तकवाचनाची गोडी लावणं. मुलांसोबत काम करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी मला सांगितलं होतं, तू तुझ्या मुलाला रोज गोष्टी वाचून दाखव. ही आईने मुलाला दिलेली सगळ्यात चांगली गिफ्ट असेल. आणि खरंच, मला आणि माझ्या मुलांना खूप मजा यायची हे करताना, माझ्या आईबाबांनी पण हे केलं. यातून आपण मुलांशी जोडलेले राहातो.
माझा मुलगा १६ वर्षाचा होईपर्यंत आमचं पुस्तकवाचनाचं रुटीन असायचं. फास्टर फेणे पासुन पुलंपर्यंत खूप पुस्तकं आम्ही एकत्र वाचली. आपल्या संस्कृतीचा भाग असणारी पुस्तकं, हे लेखक. यासाठी फार वेळ द्यायचीही गरज नाही. मुलं झोपायच्या आधी १५ मि तुम्ही हे करु शकता. हे झालं लहान मुलांच्या बाबतीत. टीन एजर्सबद्द्ल आपण नंतर बोलू.
आईवडील आणि अन्य मोठी माणसं सतत मोबाईल वापरत असतात. इथूनच सुरवात होते का?
- हो. इथूनच सुरवात होते. मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचा 'नवा उपवास' नावाचा एक लेख आहे. पालकांनी हा लेख वाचायला हवा. त्यात त्यांनी सुचवलंय, कुटुबांचा एखादा उपासाचा दिवस ठरवता येईल, की त्या दिवशी घरातल्या कोणीही गॅजेट वापरायचं नाही. कुटुंबाने मिळून हा आगळावेगळा उपास करायचा. संध्याकाळी घरी आल्यावरही कोणीही गॅजेट वापरायचं नाही. आणखीही एक प्रयोग करता येईल. पालकांनी आपले मोबाईल घरी ठेऊन घराबाहेर जाता येतं का ते बघावं. किंवा रोज मी अमूक इतका वेळ फोन बघणार नाही, असा नियम करावा. हे अर्थातच मुलांना कल्पना देऊन, त्यांना बरोबर घेउनच करावं. आणखीही एक नक्की करावं. मुलांबरोबर व्यायामाचा, वॉकचा वेळही ठरवून व्यतीत करावा.
गांधीजींचं खूप छान वाक्य आहे. जगात जो बदल घडवायचाय, तो आधी स्वतः व्हा. तेव्हा मुलांमध्ये बदल घडवायचाय, तर तो स्वत:मध्ये आधी घडवा. मुलं तुमच्या वागण्याकडे बघून शिकत असतात.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 
शब्दांकन: रूपाली गोवंडे

Sunday 22 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का?



भाग एक
वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का आणि एकूणच इंटरनेट व्यसन आणि नवनवीन गॅझेट्च्या अतिवापराबद्द्ल पालकांना त्यांचे प्रश्न मांडायला ‘नवी उमेद’ने सांगितलं, तेव्हा पालकांचे तर प्रश्न आलेच.. पण एका टीन एजर मुलीचाही एक प्रश्न आला. तो असा होता: इंटरनेटची गरज आहे आमच्या पिढीला. तुम्ही त्याला व्यसन का म्हणताय?
या प्रश्नामध्येच या पिढीची मानसिकता, इंटरनेटच्या वापराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समोर आला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आणि सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मुक्ता पुणतांबेकर यांनी याच प्रश्नाच्या उत्तरापासून बोलायला सुरवात केली.
त्या म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीचा एक वापर असतो. पण वापर, अतिवापर आणि गैरवापर यातला फरक ओळखता यायला हवा. दारूचं उदाहरणच घेऊन समजून घ्यायचं झालं तर - दारु औषधांमध्येही वापरली जाते. ती जेव्हा व्यसनासाठी वापरली जाते तेव्हा तो तिचा गैरवापर ठरतो. एखाद्या चांगल्या गोष्टीचा अतिवापर होतो, तेव्हा त्याचं रूपांतर व्यसनात होऊ शकतं. एखादी व्यक्ती दिवसभर सतत व्यायामच करत बसली तर तिला व्यायामाचं व्यसन लागलं आहे, असंच म्हणावं लागतं.
इंटरनेट ही काळाची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाने जी क्रांती घडवून आणली ती खूप मह्त्वाची आहे. ती नाकारता येणारच नाही. इंटरनेटचा हा जादूचा दिवा आपण सगळेच जण कामासाठी, करमणुकीसाठी वापरतो. ते ठीक असतं. पण हळुहळु आपण त्याच्यावरती अवलंबून रहायला लागतो. त्याहीपेक्षा, त्याचे गुलाम बनून जातो. मग गैरवापर/अतिवापर सुरु होतो. आपलं असं झालंय का?
सुरवातीला आपण हे स्वतःच तपासून बघू शकतो. जसं, आपण १५ मि फोन जवळ नाहीये तर अस्वस्थ होतोय का? आपण सोशल साईट वर एखादी पोस्ट टाकली आहे. तर त्यावर किती लाईक्स आलेत, कमेंटस आल्यात हे दर दोन मिनिटांनी बघावसं वाटतयं का? त्यावर आपला मूड अवलंबून आहे का? या प्रयोगाचं उत्तर हो आलं तर समजावं की काहीतरी गंभीर गोष्ट आहे. इंटरनेट शाप की वरदान हे आपआपल्या बाबतीत असं तपासून बघायलाच हवं.
नव्या पिढीचं इंटरनेट ॲडिक्शन, मुलांचं इंटरनेटवेड हा काळजीचाच विषय आहे. मग पालक म्हणतात की मुलांना इंटरनेटच्या वापराचा वेळ कसा ठरवून द्यायचा? अर्थातच हे प्रत्येकाच्या कामाच्या स्वरुपावर अवलंबून असतं. पण साधारणापणे १८ वयापर्यंतच्या मुलांसाठी दिवसातला अर्धा पाऊण तास इंटरनेट वापरणं ठीक आहे. कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांना प्रोजेक्ट्स करायची असतात, माहिती गोळा करायची असते. त्यामुळे थोडा जास्त वेळ त्यांना इंटरनेटची गरज लागू शकते. यावर संवाद हाच उपाय आहे. सुरवातीपासूनच पालकांनीच मुलांशी संवाद साधून इंटरनेटच्या वापरावर मर्यादा घालून देणं आणि स्वत:च्या वर्तनातून त्यांना त्या मर्यादांचं मह्त्व समजावून सांगणं गरजेचं ठरतं.
जेव्हा पालकांचे आम्हाला इंटरनेट ॲडिक्शनच्या समस्यांबाबत फोन येतात. तेव्हा बरेचदा आम्ही फक्त त्यांनाच भेटायला बोलवतो. त्यांचा दृष्टिकोन बघतो. त्यांच्याशी बोलतो. त्या नंतर जेव्हा त्यांच्या वागण्यात ते आमच्या टिप्सअनुसार काही बदल करतात. पालकांनी थोडा सूर बदलला तरी फरक पडतो. अर्थात त्यासाठी पालकांनीही थोडा संयम बाळगला पाहिजे. मग मुलांना आमच्याकडे घेउन यायची गरजच पडत नाही.

- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र :
 रूपाली गोवंडे

Tuesday 17 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा:
- भाग ४
माझा ज्येष्ठ पुत्र माओ, इयत्ता तिसरी अ एके दिवशी शाळेतून चिंताक्रांत चेहऱ्यानं घरी आला.
"काय रे, ठीकाय ना सगळं?" मी जरा धाडस करून विचारलं. लहानपणी माझ्या तक्रारी ऐकण्यासाठी बाबांना शाळेत बोलावयाचे तेव्हा असाच चेहरा असायचा माझा.
"उद्या स्कूलमध्ये पीटीएम आहे." माओ वदला.
माझ्या काळजात एकदम सोळाशेबावीस रंगीबेरंगी फुलपाखरं उडाली. पॅरेन्ट टीचर मिटिंग हा माझा शाळेतला आवडता कार्यक्रम.
"अरे मग यात असं तोंड वाकडं करण्याजोगं काय झालं?" मी उत्साहानं म्हणालो.
"बसा इथं. स्कूलमध्ये यायचं तर, आधी चार चांगल्या गोष्टी तुमच्या कानी घालाव्यात म्हणतो." माओ पोक्तपणे म्हणाला. मी एखादा बापुडवाणा बाप बसतो तसा त्याच्यासमोर बसलो.
"पहिलं म्हणजे एखादी टीचर आवडली की तिच्याशी फार वेळ बोलत बसू नका."
"हो." मी आज्ञाधारकपणे मान डोलवून म्हणालो.
"आणि माझ्याच क्लासटीचरशी बोला. मागच्या वेळी भलत्याच टीचरबरोबर गप्पा हाणत बसला होतात."
आता ती टीचर इतकी बोलकी होती, यात माझा काय दोष? पण मी हे उघड बोललो नाही. काही बोललो तर हा पोरटा सरळ 'नका येऊ' म्हणाला असता.
"सगळ्या टीचरांचे फोन नंबर नका मागू."
मागच्या मिटींगला मी आपलं असावा म्हणून, दोन-तीन टीचरना फोन नंबर मागितला होता. पुढंमागं माओ त्यांच्या वर्गात आला, तर असावा म्हणून. बाकी काही नाही. पण याचाही लोक चुकीचा अर्थ काढतात?
"आणि हो, प्रेमा मिस आता स्कूलमध्ये नाहीयेत." हे मला माहीत होतं. प्रेमा मिस कुठं जॉईन झाल्यात हे मी मुद्दाम माओला सांगितलं नव्हतं. हसताना उजव्या गालावर खळी पडणारी प्रेमा मिस म्हणजे शाळेतली सर्वात लोकप्रिय टीचर होती. आमच्या वेळी जाड चष्मेवाल्या, खत्रूड चेहऱ्याच्या ढवळीकर, कारखिले असल्या आडनावाच्या बाया होत्या. सिनेमाला भेटल्या तर तिथंही अस्मद्चं सप्तमीचं द्विवचन विचारणाऱ्या.
"स्कूलमध्ये उगाच इकडंतिकडं फिरू नका."
मागच्यावेळी मी रस्ता चुकून कोऑर्डिनेटर बाईंच्या केबिनमध्ये घुसलो होतो. त्यावरून ही सूचना होती.
"हो, कळतंय. मागच्यावेळी स्टाफरूम शोधत होतो."
"तिथं काय काम होतं तुमचं? टीचर तर क्लासरूममध्ये असतात ना?"
हा पोरगा पुढंमागं पोलिस होणार. अगदी संशयिताची कसून तपासणी करावी तसं माझी झडती घेत होता.
"आणि" माओचा डोस अजून संपला नव्हता, "फक्त माझी अभ्यासातली प्रगतीच विचारा टीचरना."
"हो हो." काही न कळलं तरी मी आपलं होकार दिला.
"येताना जरा..." मला एकदम वाटलं की हा टीचरसाठी फुलंबिलं आणा म्हणतोय की काय? माझ्या डोळ्यांसमोर ब्लूबेरीजच्या कॉर्नरवरचा फूलवाला उभा राहिला. पण नाही. "येताना जरा, व्यवस्थित फॉर्मल कपडे घालून या. ते शॉर्टस्लीव्ह टीशर्ट आणि रगेड जीन्स नकोत."
"त्यात काय वाईट आहे रे? आपण फिरायला जातो तेव्हा तूही असलेच कपडे घालतोस ना?"
"हो, पण स्कूलमध्ये काहीतरी इभ्रत आहे म्हटलं आमची."
आमची? हा पोरगा दिल्लीची गादी सांभाळणाऱ्या बादशहासारखा स्वतःला आम्ही-तुम्ही करत होता. कालपर्यंत एकं आलीय की दोनं हे नीट सांगता यायचं नाही कारट्याला. आणि आता हा मला शिकवत होता.
"काय रे? तैनाती फौजेसारख्या एवढ्या अटी घालण्यापेक्षा तू सरळ आईलाच का बोलवत नाहीस पीटीएमला?"
"त्याचं कायै बाबा, आई आली की ती सरळ माझे पेपरमधले मार्क बघ, कुठं मी खोड्या करतोय का याची चौकशी कर असलीच बोअरिंग कामं करते. उगाच टीचरलाही कानकोंडं होतं आणि मलाही. त्याच्याऐवजी तुम्ही आलात तर अभ्यासातली प्रगती वगैरेचा प्रश्नच निघणार नाही."
"राहू देत मग!" माझ्यातलाही स्वाभिमानी बाप जागा झाला, "बापाबद्दलची इतकी वाईट कल्पना असेल तुझी मी नाहीच येत पीटीएमला."
ज्युनियर ब्रह्मे

Sunday 15 October 2017

ॲनीने घालून देलेला धडा

ट्रस्ट (Trust) हा २०१०चा हॉलिवूडपट. तेव्हा इंटरनेटवर चॅट साईट्स असायच्या. ओळखीचे-अनोळखी लोक एकमेकांशी त्या साईटवर चॅट करायचे. चित्रपटात अॅनी कॅमेरॉन ही चौदा वर्षाची मुलगी टीन चॅट नावाच्या साईटवर चार्ली नावाच्या अनोळखी मुलाशी बोलायला सुरवात करते. साईटच्या नावावरून उघड आहे, ती शाळकरी मुला-मुलींसाठी आहे. अॅनीबरोबर चॅट करणारा चार्ली आधी स्वत:चं वय सोळा सांगतो, नंतर ओळख वाढल्यावर वीस सांगतो, मग पंचवीस. हळूहळू ते फोनवरही बोलायला लागतात. अॅनी बराच वेळ त्याच्याबरोबर फोनवरही बोलताना दिसते. नंतर भेटायला येतो तेव्हा चाळीशीतील निघतो. अॅनी अर्थातच दचकते, त्याला जाब विचारते. पण तो पट्टीचा भामटा आहे. तो तिची समजूत काढून तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो. जबरदस्तीने तिचं लैंगिक शोषण करून निघून जातो. ते त्याने रेकॉर्डही केलं आहे. अॅनीची मैत्रीण ब्रिटनी. झाला प्रकार तिच्या लक्षात येतो. ती शाळाप्रशासनाला ते सांगते. शाळा पोलिसांना कळवते. पोलिस तपास करण्यासाठी ॲनीला पोलिस स्टेशनवर घेऊन जातात, तेही सगळ्या विद्यार्थ्यांसमोर. तिच्या आई-वडिलांना कळवण्यात येतं. ध्यानीमनी नसताना हे घडलेलं. ते हबकलेले. त्यातच हे प्रकरण एफबीआयकडे जाते.
एका चौदा वर्षाच्या मुलीला फसवणं किती सोपं आहे. तू ब्युटीफुल आहेस, आय लव्ह यू म्हटलं की झालं. एकाच वयाची मुलं-मुली असतात तेव्हा ते समजण्यासारखं. संमतीने झालेली शारिरीक जवळीकही समजण्यासारखी. इथं तसं नाही. त्या विकृत माणसाने नियोजनपूर्वक त्या निरागस मुलीला घोळात घेतलंय. इंटरनेटवर चॅट करताना बोलण्यातली लैंगिकता, कामुकता वाढवत नेत तिला वासनेकडे ओढण्याची, तेही तिला जाणवू न देता व्यवस्थित आखलेली पध्दत. हे बघून आपल्याला प्रचंड संताप येतो. त्याला चांगला चोपावंसं वाटतं. पण गुन्हेगाराला शोधणं या पठडीबद्ध दिशेने चित्रपट जातच नाही. ॲनी, तिच्या आई-वडिलांवर झालेला परिणाम याचा वेध घेणं. वडील तर गुन्हेगाराला शोधून शिक्षा द्यायची या विचाराने पछाडलेले. ॲनीची आई त्यांना ताळ्यावर आणते. सांगते, मुलीला सावरणं महत्वाचं. तिच्याजवळ बसा, धीर द्या. आपण फसवलं गेलोय, हे मानायलाच ॲनी आधी तयार नाहीये. माझ्याबरोबरच्या मुलींचेही शाळेतल्या मुलांबरोबर शरीरसंबंध आलेले आहेत, मग तुम्ही माझ्याच बाबतीत गवगवा का करताय? ती वडिलांचा रागराग करतेय.
अमेरिकेतले स्थानिक पोलिसही हे प्रकरण फारशा संवेदनशीलतेने हाताळत नाहीत. वरच्या पातळीवर ते नीट हाताळलं जातं. मुलीच्या समुपदेशनासाठी पालक स्त्री समुपदेशकाचीही मदत घेतात. मुलीचं प्रकरण एकदा शाळेत माहीत झाल्यावर काही मु्लांकडून घाणेरडी शेरेबाजी करणार, ते नेटवर टाकणं, हे सगळं तिथेही झालंय. त्याचाही ॲनीला त्रास होतो. आत्महत्येच्या प्रयत्नातू्न ती आईच्या सतर्कतेमुळे वाचते. ॲनी आणि तिचे आई-वडील यांना झालेला त्रास हा चित्रपटाचा फोकस आहे. मुलगी आणि वडील यांच्यात निर्माण झालेलं अंतर कमी होतं, ते छान दाखवलं आहे. मुलीला कळतं की त्या माणसाने आणखी काही मुलींनाही याच पध्दतीने फसवलं आहे, तेव्हा ती भानावर येते. तो फार नाजूक क्षण.
मुलीला फसवणारा तो विकृत माणूस कोणी अट्टल गुन्हेगार असण्याची गरज नाही, आजूबाजूला वावरणारा, सभ्य वाटणारा, अगदी कुटुंबवत्सल माणूसही असू शकतो. चित्रपटात शेवटी तो विकृत माणूस निघतो, एका दूरच्या शहरातील एका शाळेचा एक शिक्षक. तो विवाहित, तरुण मुलांचा तो बापही आहे. दिसायलाही खरोखर कुटुंबवत्सल, सभ्य.
चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावली दाखवताना त्याला समोर आणलं आहे. यातून दिग्दर्शकाचा हेतू कळतो. त्याला थ्रिलर बनवून गल्ला जमवायचा नाही तर जागृती करायची आहे. असे विकृत लोक असणारच, पण ॲनीची झाली तशी फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, प्रकार उघडकीला आल्यावर, पालक, शाळा, पोलिस यांनी ते कसे हाताळावेत, संवेदनशीलता दाखवावी, ते परिणामकारकपणे दाखवलं आहे.
आता चॅट साईट फारशा नाहीत, पण सोशल मिडियाचा वापर खूपच वाढला आहे. त्याचा वापर करून बदमाश लोक ॲनीची झाली, तशी फसवणूक करू शकतात. तेव्हा काळजी घ्यायलाच हवी, हाच ॲनीने घालून देलेला धडा.
- उदय कुलकर्णी

Friday 13 October 2017

ज्ञानरचनावादाचे प्रणेते- कुमठे बीट

तुम्हांला आठवतं आपण मुळाक्षरं आणि संख्या कशा शिकलो ते? एकच अक्षर सतत गिरवून आणि घोकंपट्टी करून आपण अभ्यास शिकलो. पण आता मात्र महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची मुलं फार वेगळ्या पद्धतीने शिकतात. त्या पद्धतीचे नाव आहे- ज्ञानरचनावाद आणि ही पद्धत महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवून दाखविणाऱ्या शाळा आहेत सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या.



"ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा दृष्टिकोन असा आहे की मुलांना आधीपासून ज्ञान असते. मुले जेव्हा शाळेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांचं मन म्हणजे एक कोरी पाटी असते, ही कल्पना चुकीची आहे. मुलं आपल्या सभोवतालच्या परिसरातून सारखं काहीतरी शिकत असतात. त्यांची निरीक्षण क्षमता आणि ग्रहण क्षमता जबरदस्त असते. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असते.” कुमठे बीटच्या विस्ताराधिकारी प्रतिभा भराडे सांगत होत्या. 
"कुमठे बीटमध्ये २०१२ साली पहिलीचा वर्ग दरवर्षीप्रमाणे १४ जूनला सुरु करण्याऐवजी १ मार्चलाच घ्यायचा ठरला. शाळेचं अंतर्बाह्य स्वरूप बदलून टाकण्यात आलं. या सुट्टीच्या काळात खेळांवर भर दिला गेला. अगदी लहान मुलांना एका जागी बसून रहायला आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवं हवं असतं. म्हणून आम्ही ठरवलं, की मुलांना खेळू द्यायचं आणि खेळातूनच शिकवायचं. मग शाळेत सागरगोटे, काचाकवड्या, गोट्या, सूरपारंब्या, आबाधुबी, ठिकरी यासारखे खेळ मुलं दररोज खेळू लागली. याचा खर्च काहीच नव्हता आणि मुलांना खूप मजा येत होती." 




"खरंतर, मुलं एकीकडे खेळत होती तर दुसरीकडे त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकासही होत होता. या खेळांमधून लवचिकता, शरीराचा तोल सांधणं, खिलाडूवृत्ती, सांघिक बळ, हस्तनेत्रसमन्वय, तर्कबुद्धीचा वापर अशा अनेक गोष्टी घडून येत होत्या. मुलांची शाळेशी खरी ओळख होऊ लागली. आता शिक्षकांची भीती तर वाटत नव्हतीच, उलट मैत्री झाली होती." भराडे मॅडम सांगत होत्या.
वेगवेगळ्या विषयांसाठी शिक्षकानीं अनेक प्रयोग केले. उदा. गणित म्हणजे मुलांचा नावडता विषय. यात मणी, खडे, चिंचोके आणि स्वतःचे अवयव मोजण्याने सुरुवात होते. कधी शिक्षक सांगतील त्या नंबराची आगगाडी बनवणे, तर कधी दोन विद्यार्थ्यांनी मिळून दोन अंकी संख्या तयार करणे असे खेळ घेतले जातात. उदा: २८ हा आकडा बनवायचा असेल तर, एक मूल दशक बनतं तर दुसरं एकक. दशक झालेल्या मुलाने दोन बोटं दाखवायची, त्याचवेळी एकक झालेल्या मुलाने ८ बोटे दाखवायची. 





कोणताही विद्यार्थी ‘ढ‘ नाही, कोणाविषयीही नकारात्मक बोलायचं नाही ही तत्त्वं येथील शिक्षक कटाक्षाने पाळतात. अगदी पहिलीतल्या मुलालासुद्धा जाण असते. मुलांना आपल्या बोली भाषेत बोलू द्यावं, ही सूत्रं इथं पाळली जातात. यामुळे अनेकदा असं होतं की इथली मुलं पुस्तकी बोलत नाहीत. ठोकळेबाज निबंध लिहीत नाहीत. शिक्षकांनाही माहीत नसलेले अनेक शब्द ही मुले वापरतात. स्वतःच्या शैलीत भावना व्यक्त करतात.
कुमठे बीटमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी हे मॉडेल स्वीकारलं. 





आजवर इथल्या शाळांना हजारो शिक्षकांनी भेट दिली आहे. कुमठे बीटप्रमाणे आपणही आपल्या शाळेत हे प्रयोग यशस्वी करून दाखवू हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

कुरुंजीतलं गमभन



स्वारगेट वरून भोरची बस घ्यायची. भोरच्या अलिकडे माळवाडी फाट्याला उतरायचे. तिथून भोर ते मळे / भुतोंडी बस घ्यायची आणि कुरुंजीला उतरायचे असा प्रवास असतो. बस वेळेत मिळाल्या तर सव्वा तास अधिक दीड तास असा तीनेक तासाचा प्रवास. पण भोर ते कुरुंजी बसेस मनस्वी असतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे येतात जातात.
सकाळी आठची भोर बस घेऊन नऊ सव्वानऊला माळवाडी फाट्याला उतरायचं. साडेनऊनंतर पुढची बस मिळते. ही शक्यतो वेळेत असते.
या प्रवासाचा कधी कंटाळा येत नाही. याला कारण भेटणारी माणसं. माळवाडी फाट्याला म्हसवली आरोग्यकेंद्राला जाणारी नर्स बाई भेटते. तिच्याकडे त्या भागातल्या सर्व गर्भार आणि बाळंतीण बायकांच्या नोंदी असतात. कुरुंजीतली शेजारची सून तिसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. तिला मुलगा झाल्याचं या बाईंनीच आधी सांगितलं आणि त्यांनी कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन केल्याचं पण.
माळवाडीच्या स्टॉपवर दुपारनंतर जवळपासच्या शेतकरणी स्वतः च्या शेतातली भाजी विकायला येतात. एकदा मटार घेऊन वयस्कर बाई बसली होती. किलोला चाळीस रुपयाच्या खाली एक पैसा कमी करणार नाही या तत्वावर विक्री चालू होती. एवढ्यात एका मोठ्या रिक्षातून शाळेची मुलं जाताना दिसली. हिनं हाक मारून थांबवलं. त्या अमकीचा नातू ना तू म्हणत एका मुलाच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवला आणि पिशवी भरून मटार त्याला खायला दिले आणि ड्रायव्हरला पण एक लहान पिशवी भर दिले. इथं व्यवहार मध्ये आला नाही.
या प्रवासात भेटणारी मंडळी मोकळी ढाकळी असतात.  खूपदा ते एकमेकांना ओळखत असतात, त्यामुळे बसमध्ये भेटले की लगेच गप्पा सुरु होतात.

कधी कधी शेजारचा प्रवासीपण बोलायला लागतो. एकदा शेजारी सत्तर वर्षाचे एक गृहस्थ बसले होते. ते एसटीत चालक म्हणून काम करायचे. रात्रीबेरात्री बस समोर कुणी हात केला तर ती व्यक्ती चांगली असेल का काही वाईट हेतू घेऊन चढत असेल हे ओळखायचं ट्रेनिंग एसटीत दिलं जातं असे ते सांगत होते.
दुपारच्या बसमध्ये गर्दी असते. लोक सर्रास दोघांच्या सीटवर तिघे बसतात. एकदा माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते. त्यांना दुसरा मनुष्य जरा सरकून घ्या म्हणाला. तर या गृहस्थांनी माझ्याकडे इशारा करून ‘लेडीज मॅडम बसल्यात, सरकू शकत नाही’ असं सांगितलं.
या बसेसचे चालक वाहक लोकांमध्ये मिळून मिसळून असतात. एक तरुण वाहक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या गळ्यात हात घालून गप्पा मारत असतो. एकदा बसमध्ये ब्रेक ऑइल मध्येच संपले. वाहक रस्त्यावरून जाताना खिडकीतून बघत होता. एका घरासमोर ट्रॅक्टर आणि इतर मोठी वाहने दिसली. तिथे बस थांबवून तो त्या घरातून मागून ऑइल घेऊन आला आणि काम झाले.
एकदा भोरला जाताना कांबरे गावाच्या स्टॉपवर एका बाईने बांबूचा मोठा हारा बसमध्ये टाकला आणि वाहकाला सांगितले की हरणे गावात मावशी येईल तिला द्या. हरणे स्टॉप वर मावशी आली, तिला हारा दिला. तिने वाहक नको म्हणाला तरी भाजी करून खा म्हणत आठ दहा शेवग्याच्या शेंगा प्रेमाने त्याला दिल्या.
करंदी गावात एका चालकाचे नातेवाईक राहतात. भोरला जाताना खूप वेळा हा चालक करंदीला उतरून त्याच्याकडे चहा पिऊन येतो. प्रवासी सुद्धा, जावं लागतं त्याला पावण्याकं च्या प्यायला, म्हणत आपल्या गप्पा चालू ठेवतात.
पावसाळ्यात लावणीच्या काळात बायका, पुरुष वेगवेगळ्या गावातल्या नातेवाईकांकडे गडबडीनं भात लावायला जात येत असतात. घाईत डोक्यावर इरलं किंवा पोतं, साडी गुडघ्याच्या वर खोचलेली, पुरुषांची हाफ पॅन्ट, चिखलात भरलेले कपडे असेच बसमधून प्रवास करत असतात.
वयस्कर लोकांना निम्म्या तिकिटात प्रवास या एसटीच्या अत्यंत उपयुक्त सवलतीमुळे सगळ्या वयस्कर लोकांकडे कार्ड असते. आणि ते आनंदानं कार्ड दाखवत निम्म्या तिकिटात प्रवास करत असतात. आमच्या सरुबाईला तिचं आणि नवऱ्याचं वय विचारलं तेव्हा ह्यांचं कार्ड निघालंय आणि माझं नाही असा हिशेब सांगितला होता.
या वयस्कर लोकांना खूप बोलायचं असतं. एकदा दहा नातवंडं असलेली, कपाळभर कुंकू लावलेली बाई शेजारी बसली होती. सगळ्या मुलांबाळांबद्दल, लेकीसुनांबद्दल सांगून झाले. माहेरी भावाकडे चालली होती आणि या वयात पण माहेरी जायचं म्हणून हरकलेली ती बाई भावाबद्दल सांगताना कोवळी कोवळी होऊन गेली होती.
पुणे मुंबई शहरी प्रवासात चार तास ओठांना घट्ट मिठी बसलेली असते, भरल्या बसमध्ये पण बऱ्यापैकी शांतता असते. पण या भोर कुरुंजी प्रवासात माणसांचा जिवंतपणा खळखळून वाहत असतो.
- रंजना बाजी

Tuesday 10 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा:
भाग तिसरा
माझे काका एक नंबरचे चक्रम आहेत असं बऱ्याच लोकांचं मत होतं. हे जनमत काकांचं लग्न होईपर्यंत शाबूत होतं. काकांनी लग्न करून बंगाली बायको घरात आणली तेव्हापासून त्यांना दोन नंबरचे चक्रम असं लोकांनी म्हणायला सुरुवात केली.
काका तसे माझ्याशी प्रेमानं वागायचे. मला कधी माराबिरायचे नाहीत. स्वतःलाच पाढे पाठ नसल्यानं मला विचारायचा काही प्रश्न नव्हता. सहारा वाळवंटात नेऊन सोडलं तरी मी परत येईन याची खात्री असल्यानं ते आपण हरवू अशी शक्यता असल्याखेरीज मला कुठं घेऊन जायचे नाहीत. मी अंघोळ केली किंवा नाही केली तरी त्यांना त्याची फिकीर नसायची. आजी मला बदडायची त्यातल्या निम्म्यांदा खुद्द काकाच माळ्यावर काही खुडबुड करत असायचे. थोडक्यात, बाकी कुणासारखे ते नव्हते. पण तरीही...
तरीही काका कायम विरोधीपक्षात असल्यासारखे आपण म्हणू त्याला विरोध करत. म्हणजे असं-
"काका काका..."
"काय रे ज्युनियर? शाळेला नाही गेलास?"
"आज शाळेला सुट्टी नाही का? रविवार आहे आज."
"म्हणून काय झालं गधड्या? आम्ही रविवारीही शाळेला जायचो. इतके कष्ट केलेत म्हणून आज असे उभे आहोत!" बंडी आणि पायजम्यावर उभं राहण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागतात हे मला तेव्हा कळलं.
"काका..." मी पुन्हा मूळ विषयावर.
"हं?" काका गुरकावतात.
"आपण गणपती बघायला जाऊयात?"
"कशाला? काय असतं रे त्यात बघण्यासारखं?"
"गणपती! आम्हाला शाळेत गणपतीवर निबंध लिहून आणायला सांगितलाय."
"हे असले फालतू उद्योग असतात म्हणून मी मध्येच शाळा सोडली. तूपण नको जाऊ उद्यापासनं."
"हो काका. आणि गणपती बघायलाही नाही जात."
"का नाही जाणार? कसा जात नाहीस ते बघतोच! तू काय तुझा काकापण जाईल!" काका आता इरेला पेटले असावेत. त्यांचे डोळे लकाकू लागतात.
"पण काका-"
"चल म्हणतो ना?" काका माझा हात धरून खस्सकन ओढतात. अचानक ओढल्याने मी त्यांच्या टणक पोटाला आदळून क्षणभरासाठी माझं नाक चपटं होतं.
"काका, जेवण करून जाऊया ना." माझा दुबळा विरोध.
"अरे, आज तुझ्या काकूनं जेवायला माझेर झोल केलाय. गेल्यावेळी खाल्ला तेव्हा दोन दिवस डोकं गरगरत होतं. चल, आज आपण बाहेरच काही खाऊ."
"परवा तुम्ही बाहेरचं काही खायचं नाही म्हणाला होतात ना?"
"गाढवा! घरात असे पदार्थ बनत असतील तर स्वसंरक्षणार्थ माणसाला बाहेरच खावं लागतं. कळलं? आणि तिथं काही अरबट-चरबट खातो म्हणालास तर मुस्काट फोडीन. समजलं?"
"हो काका."
"हो म्हणून मान काय हलवतोस लेका? परवा ती दाबेली कुठं खाल्लेली आपण?"
"हौदाजवळच्या चौकात. तिथं जायचं?"
"तिथं कशाला? परवाच काकू आणि मी बागेतल्या गणपतीला जाताना एका ठिकाणी खाल्ली. तुझ्या काकूला अजिबात आवडली नाही."
"मग?"
"अरे मग काय? म्हणजे ती नक्कीच चांगली असणार. चल तिथंच जाऊ."
अशा प्रकारे काकांबरोबर मी नाईलाजाने गणपती बघून फुगे, पिपाणी वाजवत तुडुंब पोटानं घरी परतायचो. काकांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यानं मी तेव्हाच ठरवलं होतं की आपली मुलं होतील तेव्हा त्यांना हवं तिथं- हवं तेव्हा न्यायचं. पण आता काय झालंय ते पुढच्या भागात...

ज्युनियर ब्रह्मे 

Friday 6 October 2017

आम्ही 'मोठ्ठ्या' साहेबांना भेटलो!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
शाळेची सहल म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी. शक्यतो या सहली जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी जातात. पण गडचिरोलीतील लेखा (मेंढा) गावातील जिल्हा परिषद शाळेची सहल मात्र यावर्षी हटके ठरली. कारण यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयांना शैक्षणिक सहलीनिमित्त भेट दिली.
सर्वसामान्यांनासुद्धा जिल्हापरिषद किंवा महानगरपालिकेत जाऊन काम करून घ्यायचे म्हटले तर कठीणच वाटते. ती भली मोठी इमारत, कामासाठी योग्य भाषेत अर्ज करणे, ‘मोठ्ठे साहेब’ म्हणजेच अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या सह्या करून आणणे, हे बहुतांश जणांना वैतागवाणे काम वाटते. आजची मुले ही उद्याचे जबाबदार नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना प्रशासकीय संस्थांच्या कार्याची चांगली ओळख व्हावी यासाठी शाळेने या आगळ्या सहलीचे नियोजन केले.
दिनांक 10 जानेवारी 2017 रोजी लेखा जि.प. शाळेतील विद्यार्थी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना भेटून दिवसभराचा कार्यक्रम आखला गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राला (NIC) दिलेली भेट विशेष रंगली. देशाच्या विज्ञान आणि माहिती- तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली एनआयसी किती महत्त्वाचे काम करीत आहे, हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.

देशातील बहुतांश शासकीय विभाग, जिल्हापरिषदा आणि महानगरपालिकांच्या वेबसाईट या संबंधित एनआयसी केंद्रानेच तयार केलेल्या असतात. तसेच प्रशासकीय कामासाठी आवश्यक असणारी इमेल सेवा, राज्याच्या मुख्यालयांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सेवाही एनआयसी पुरविते. याशिवाय गडचिरोलीतील सर्व जमिनींचे सातबारा उतारे ऑनलाईन झालेले आहेत. शिवाय देशभरातील हरविलेल्या बालकांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या ‘नॅशनल चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ची माहितीही मुलांना मिळाली.
त्यानंतर नियोजनानुसार विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मा. शांतनू गोयल साहेबांच्या दालनात पोहोचले. गोयल सरांनी विद्यार्थ्यांसोबत सुमारे अर्धा तास मनसोक्त गप्पा मारल्या. तुम्ही कुठून आलात? कितवीत शिकता? तुमच्या कुटुंबाची शेती आहे का? असे अनेक प्रश्न गोयल साहेबांनी विचारले. त्यांच्या दालनात असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या नकाशावर विद्यार्थ्यांनी आपला धानोरा तालुका आणि लेखा गाव बरोबर दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी केलेल्या नकाशावाचनाबद्दल गोयल साहेबांनी त्यांना शाबासकी दिली.
सीईओंनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारण्याची संधी दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे नाव, शिक्षण, कामाचे स्वरुप आणि गोयल साहेबांचे वडील काय करतात, याबद्दल माहिती विचारली. सीईओंनी त्यांच्या इतर प्रश्नांची उत्तरे दिली मात्र स्वत:चे नाव न सांगता विद्यार्थ्यांना एक आव्हान दिले. “या दालनात प्रवेश करण्याआधी माझे नाव बाहेरील पाटीवर मराठीत लिहिलेले होते आणि आपण बसलो आहोत तिथेही माझे नाव इंग्रजीमधे लिहिलेले आहे. ते नाव जे विद्यार्थी शोधून काढतील त्यांना माझ्याकडून 50 रुपयांचे बक्षीस!! ” आव्हान जाहीर होण्याचा अवकाश की जवळपास सात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी हात वर करून उत्तर दिलेसुद्धा- शांतनू गोयल! विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर सीईओ खुष झाले आणि त्यांनी शाबासकी देत सात विद्यार्थ्यांच्या बक्षिसाचे 350 रुपये शिक्षकांकडे दिले.
यानंतर शिक्षकांनी मुलांसाठी मिठाई मागवली आणि मग ती मिठाई आणि घरुन आणलेल्या डब्यांवर ताव मारुन मुलं घरी परत गेली.
- नकुल लांजेवार.

Thursday 5 October 2017

कुरुंजीतलं गमभन


कुरुंजी गावाला खेटूनच भाटघर धरणाचं बॅक वॉटर आहे. खरं तर त्या धरणाच्या जागेत पूर्वी असलेलं गाव धरण भरेल तसं वरती सरकत आलंय. चार पाच डुया झाल्या आम्ही वर सरकून अशी वृद्ध मंडळी सांगतात.
कुरुंजीत घरांच्या भिंतींवर घड्याळं मी बघितली नाहीत. असं दिसतं की लोकांनी निसर्गाच्या चक्राशी स्वतः ला जोडून घेतलंय. (आपण शहरात निसर्गाला वळवू बघतो.) सूर्य उगवला की लोक कामाला लागतात, काही जण गुरांना चरायला रानात नेतात, काही शेतात जातात. थंडीच्या दिवसात उशीरा तर उन्हाळ्यात लवकर! परत येऊन शेतात कामं, दुपारी पुन्हा गुरांना रानात नेतात. संध्याकाळी घरी परततात, बाई चुलीकडे वळते, बापय माणूस जनावरांना बघतो.
थंडीच्या दिवसांत रात्री नऊपर्यंत गाव शांत झालेला असतो. उन्हाळ्यात दुपारच्या उन्हात तीन चार बायका एकत्र गोधड्या शिवायला घेतात तर रात्रीच्या जेवणानंतर बराच वेळ अंगणात गप्पांचे फड रंगतात, पावसाळ्यात भात लावतात, हिवाळ्यात गवताचे भारेच्या भारे रानातून वाहून आणतात, उन्हाळ्यात पावसाळ्याची तयारी करतात. यात बायका पुरुष असा भेद नाही.


पावसाळा सुरू व्हायच्या सुमाराला पश्चिमेकडच्या भिंती अति पावसाने खराब होऊ नयेत म्हणून गवताचे झापे बांधतात.
मी पहिल्यांदा पावसाळ्यात गेले होते. घर ठरवलं पण राहायला जाईपर्यंत पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला होता. सगळ्या घरांनी झाप्यांचे घुंगट काढून टाकायला सुरुवात केली होती. गच्च बंद असलेल्या समोरच्या घराला पश्चिमेकडेही दार आहे ते त्यावेळी समजलं.
उन्हाळ्यात घरं दुरुस्तीला काढतात. पूर्ण घरच पुन्हा बांधायचे असले तर त्याला खूप अर्थपूर्ण शब्द आहे इथे. 'आम्ही घर उलगडलं' असं म्हणतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला लोहार तीनचार दिवस झाडाखाली मुक्कामी असतो. गावातले विळे, कोयते, कुऱ्हाडी वगैरे दुरुस्त करून पुढच्या गावाला जातो.
मुलं रोज अंघोळ, जेवण आवरलं की शाळेत जातात. शाळेच्या वेळेआधी शाळेत पोहोचली तर खेळत बसतात. शनिवारी सकाळची शाळा असते. मळे गावाहून दूध गोळा करणारा टेम्पो आला की सात वाजले असे समजून मुलं शाळेची तयारी करतात.   कुणी गावकऱ्यानं गावात बस यायची वेळ दहा सांगितली तर ती साडेनऊ असू शकेल किंवा साडेदहा ! पण त्याने काही फार फरक पडत नाही. कारण बसेससुद्धा कधी वेळा पाळत नाहीत. आपण शाळा शिकलेले लोक मोजण्यासाठी आकड्यांचा वापर करतो. पण मी इथं संदर्भांचा वापर होताना जास्त बघते.

कुरुंजीत शेजारच्या बायका गप्पा मारायला आल्या होत्या. एक म्हणाली, सगळ्यात आधी आम्ही आलोय या शेजारात राहायला. इथं आल्यानंतर मला मुलं झाली. मी (शहरी सवयीनुसार) विचारलं, किती वर्षं झाली त्याला? ती म्हणाली, दहा वर्षं झाली असतील की. दुसरी तिला खोडून काढत म्हणाली, जास्त झाल्यात. आम्ही तुमच्यानंतर आलो. आम्ही आलो तेव्हा माझा विठ्ठल (मुलगा) पाच महिन्याचा होता, त्यानंतर तुला मुलं झाली. हे अवघड गणित सोडवण्यासाठी मी दुसरीला विचारलं, तुमचा विठ्ठल केवढा आहे आता? दुसरी उत्तरली, आत्ता तो चांगला जाणता आहे!
आज्जीला कोंबडया पाळायला आवडतात. एकदा तिला तिच्या मुलीने कोंबडी दिली. आज्जीने कोंबडीची नीट काळजी घेतली. कोंबडीनं अंडी घातल्यावर ती व्यवस्थित उबवून घेतली. मी तिच्या घरी गेले तर बऱ्याच पिल्लांची फौज घरात हिंडत होती. आज्जी त्यांना दाणे घालत बसली होती. त्यांचं खाऊन पिऊन होताच तिनं तत्परतेनं त्यांना डालग्यात ठेवून दिलं. घरात खूप अंधार होता. मी काळजीनं आज्जीला विचारलं, आज्जी मोजून घेतली का पिल्लं? सगळी आत गेली कसं कळेल? आज्जी उत्तरली, मोजायचं का म्हनून? कोंबडी कलकल आवाज करती सगळी पिल्लं आत येईपातूर.
मुलांच्या बरोबर मी कधीकधी शाळेत जात येत असते. त्यांचं परिसराचं निरीक्षण जबरदस्त आहे. एका पडीक जमिनीवर मातीचे बरेच भुसभुशीत लहान ढीग होते. मुलं म्हणाली या ठिकाणी भरपूर मुठं (खेकडे) मिळतील. मी विचारलं, भरपूर म्हणजे किती? एक मुलगा म्हणाला, दहा जणांचं कालवण सहज हुईल एवढं.
नुसत्या आकड्यांना खरं काही अर्थ नसतो हे इथं जास्त लक्षात येतंय.
- रंजना बाजी

Tuesday 3 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा: भाग दुसरा
मी त्यांचा एकुलता एक नातू असूनही आजोबा माझ्याशी कधी प्रेमानं बोललेले आठवत नाहीत. नातवाशी बोलायचं झालं तर कायम कपाळावर आठ्या असल्या पाहिजेत असा काही त्यांचा नेम असावा. बोलण्यातल्या या नेमापेक्षा फेकून मारण्यातला त्यांचा नेम भलताच भेदक (आणि अचूक) होता. मधली काही वर्षं शब्दाविण संवादिजे, म्हणजे हातातला ग्लास, तांब्या, छत्री, काठी, छडी, झाडू इत्यादींच्या माध्यमातूनच ते माझ्याशी बोलायचे. क्वचित बोलले तरी, (एकेकाळी सहा महिने शाळामास्तरकी केली असल्यानं) मला एकोणतीसचा पाढा विचारायचे. तेवढाच एक विचारायचं कारण इतकंच की खुद्द त्यांनाही बाकी पाढे पाठ नसायचे. शेजारच्या मुजावरांनी बावीस अठ्ठे किती असं म्हटल्यावर आजोबा इतके गडबडले होते की त्यांना साडेतीन मिनिटं ठसका लागला होता. मुजावरांनी उत्तर सांगेपर्यंत आजोबा खोटंखोटं खोकतच राहिले होते. एकोणतीसचा पाढा आजही पाठ असण्याचं श्रेय केवळ आजोबांना जातं.
ज्यांचे आजोबा खवीस असतात अशा लोकांच्या आज्या मुलखाच्या प्रेमळ असतात. माझी आजी या नियमाला सणसणीत अपवाद होती. जातायेता धोपटून काढण्यासाठी नातवाचा जन्म झालाय अशी तिची समजूत होती. मी माळ्यावरच्या खोलीत काहीतरी खाऊ चोरायला जातो असं त्या माउलीला कुणी सांगितलं होतं कोण जाणे. कसलीही खुडबुड ऐकू आली की आजी कान टवकारत जागेवरूनच "ज्युनियर, ऐकत्येय हं मी. थांब आता आले की पाठीत लाटणंच घालत्ये तुझ्या." असा दम भरायची. दिवसभरात कधीही तिच्या तावडीत सापडलो की सगळ्या धमक्या एकदम खऱ्या करायची. तिला आजोबांसारखी काठी, छडी, लाटणं वगैरे शस्त्राची कधी गरज पडली नाही. 'तुला बदडून माझे हात घट्ट झाल्येत.' असं म्हणत पाठीत रट्टे देई. बायको कधीकधी 'असे कसे गेंड्याच्या कातडीचे आहात हो तुम्ही.' असं म्हणते तेव्हा यामागचे आजीचे कष्ट मला आठवतात. माझ्या ढालीआड उंदरांच्या अनेक पिढ्या आमच्या माळ्यावर सुखेनैव नांदल्या असतील.
आई फारशी त्रास द्यायची नाही. मुळात तिच्या लेखी मी म्हणजे इतर कामांसोबत करायचं एक फुटकळ काम असं काही असणार. मी अंघोळ करताना आई बाजूलाच दगडी चौथऱ्यावर भांडी घासत असायची. त्यामुळं "अरेरे, काय ही मान काळी झालीय? कावळ्याची मान बरी की रे तुझ्यापेक्षा!", "टाच घासलीस तर काय पायात किडे पडून मरशील का हरामखोरा?", "गाढवा, पाठीला काटे फुटलेत का? जरा पाणी लागू दे पाठीला." अशा तिच्या प्रेमळ सूचना चालू असायच्या. मी जेवत असताना ती परसदारी विहीरीशी कपडे धूत असायची. तिथूनही न बघता "जुन्या, गिळ की लेका घास! की रवंथ करत बसणारैस बैलासारखा?" नाहीतर "पानात भाजी शिल्लक दिसली तर खिशात भरून देईन हं." अशा धमक्या चालू असायच्या. आईला भाजी कशी दिसली असेल असा विचार मनात येण्यापेक्षा ती खरोखरच माझ्या खिशात भाजी भरेल या भीतीनं मी डोळे मिटून कशीबशी भाजी संपवायचो. आईला दिव्यदृष्टी असते असं कुण्या लेखकानं म्हटलंय. त्या लेखकाची आईही माझ्या आईसारखीच असावी.
मी शाळेचे कपडे घालत असायचो तेव्हा ती बाबांची तयारी करून त्यांचा डबा भरून देत असायची. तेव्हापण "जुन्या, साळींदरासारखे केस उभे दिसले तर मी येऊन भांग पाडेन!" अशी दटावणी यायची. आईच्या भीतीनं केस आपोआप डोक्यालगत चप्पट बसत. आजही अंगावर शहारा येतो तेव्हा माझे केस उभे न राहता अंगाला चिकटून असतात. लहानपणी आई कधीकधी रविवारी मला अंघोळ घालायची. त्याऐवजी ती मला सरळ बदडूनच का काढत नाही असा प्रश्न तेव्हा पडायचा.
हे असे पालक असताना मला तेव्हा वाटायचं आपण यांच्या तावडीतून सुटायचं असेल तर पटकन मोठं व्हायला पाहिजे. पण नाही, आज माओ आणि माओची आई मला त्यांच्यापेक्षा लहान समजून वागवतात ते पाहिलं की आधीचं लहानपणच बरं होतं असं वाटू लागतं.
ज्युनियर ब्रह्मे