Sunday 29 October 2017

पिंक पॅंथर आशा

पतीचा हेकेखोरपणा, मुलांना मारहाण याला कंटाळून दुबईतल्या 4 वर्षाच्या वास्तव्यानंतर, 2 मुलांसोबत आशा करंदिकर 2005 मध्ये मुंबईत परतल्या. त्यांनी एका नामांकित कंपनीत मार्केटिंग विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करायला सुरूवात केली. 2009 ला त्यांनी ठाण्यात स्वत:चं घरही घेतलं. मुलांसह घर आणि ऑफिस असं छान चाललं होतं. नव्या घराच्या सजावटीचं काम सुरू होतं. दरम्यान त्यांना त्यांच्या उजव्या स्तनामध्ये गाठ जाणवली. दुखत मात्र नव्हतं. त्यांनी मैत्रिणीला तसं सांगितलं. तिनं डॉक्टरना दाखवायला सांगितलं. आशाने घरसजावटीच्या कामापायी जरा चालढकल केली. दोन महिन्यांत गाठीचा आकार वाढला. तेव्हा मैत्रीण बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. आशाचा विश्वास बसेना. सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं. तिथेही पॉझिटीव्ह रिपोर्टवर शिक्का बसला.
आशाला हा खूप मोठा धक्का होता. आपल्याला कॅन्सर झालाय हे कळतं तेव्हा तो प्रचंड आघात असतो. कितीही औषधोपचार उपलब्ध असले तरी मीच का, मलाच का, हा प्रश्न छळत राहातो. कौटुंबिक जवाबदाऱ्या, औषधोपचारांचा खर्च याची काळजी तर असतेच. शिवाय स्तनाचा कर्करोग म्हणजे त्या स्त्रीकरता आणखीच नाजूक विषय. कारण स्त्रीत्व त्याच्याशी जोडलं गेलं असल्याची भावना. किमो थेरपी सुरू असताना शरीर-मनात अनेक बदल होतात. जसं मासिक पाळी बंद होणं, अशक्तपणा, थकवा जाणवणं, प्रतिकारक्षमता कमी होणं, चव नसणं, एकटेपणा वाटणं. या काळात कुटुंबाचा आधार नसतो, तेव्हा तर लढाई आशा करंदीकर यांची झाली, तशीच बिकट होते. मात्र, त्यावर त्यांनी केलेली मात आपल्याला प्रेरणा देऊन जाते.
आशाचा मोठा मुलगा तेव्हा नववीत आणि मुलगी सातवीत शिकत होती. कायदेशीर घटस्फोट झाला नव्हता. आर्किटेक्ट असणाऱ्या नवऱ्याला याबाबत सांगितलं तर, माझ्याकडे वेळ नाही असं म्हणत त्याने पैसे द्यायलाही नकार दिला. आशा यांनी आपल्या मुलांसाठी आपल्याला बरं व्हायचचं आहे हे मनाशी पक्क ठरवलं. डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी औषधोपचार सुरू केले.
किमोच्या सहा फेर्‍या. या औषधोपचारांकरता, मुलांकरता, घर चालवण्यासाठी, कर्जाच्या हप्त्यांसाठी पैसे उभं करायचे होते. नवऱ्याने तर मुलांचा खर्च कधीच उचलला नव्हता. पण आशाचं मित्रमंडळ मदतीला आलं. मुलांना सगळी कल्पना दिली. त्यांनी आईला धीर दिला. पण हॉस्पीटलमध्ये आईला भेटायला आल्यावर आईचं एक स्तन काढल्याचं कळलं आणि खूप साऱ्या उपकरणांच्या वेढ्यात आईला पाहिल्यावर मात्र मुलं प्रचंड घाबरून गेली.
किमोचा कोर्स पूर्ण झाला. आशा आजारातून बाहेर पडल्या होत्या. आता त्यांची एमबीए कोर्स करण्याची जुनी इच्छा परत डोकं वर काढू लागली. नोकरी करणं तर आवश्यकच होतं. फीसाठी लागणारे पैसेही नव्हते. मग त्यांची धाकटी बहीण पाठीशी उभी राहिली. 2011 मध्ये आपल्या ताईला घेऊन तिनं पुण्याचं सिंबॉयसिस कॉलेज गाठलं. तिथं एमबीच्या डिस्टन्स अभ्यासक्रमाची फी स्वत: भरून बहिणीसाठी ॲडमिशन घेतली. आशा ऑफिसचं काम संध्याकाळी साडेसहाला आटोपल्यावर, तिथेच बसून अभ्यास करायच्या. नोटस् काढणं, ऑनलाइन स्टडी मटेरियल शोधणं हे सर्व त्या ऑफिसच काम आटोपल्यावर करून सीएसटीहून रात्री 8.30 ची ठाणे लोकल पकडायच्या. दोन वर्ष त्यांनी वाहून घेतलं आणि 2013 मध्ये त्यांच्या हातात एमबीएची डिग्री आली.
आजही त्या ऑफिसमध्ये कस्टमर सर्व्हिस, केअर, अलायन्स टायअप ही कामं समर्थपणे हाताळतात. दोन वर्षापूर्वी त्यांचे पती दुबईहून निवृत्त होऊन त्यांच्याकडे परत आले. एवढी वर्ष एकटीने खिंड लढवल्यावर अता त्यांच्या येण्याने काय फरक पडणार होता? अखेर गेल्या डिसेंबरमध्ये कायदेशीर घटस्फोटच घेतला. आता आशा त्यांचं ऑफिस सांभाळून कॅन्सररुग्णांमध्ये आशा जागावण्याचं काम स्वेच्छेने करतात. त्यांची मुलं उत्तम शिकून मार्गी लागली आहेत.
आशाच्या कहाणीचा कळस तर पुढेच आहे. आता त्यांना जोडीदारही मिळालाय. कामादरम्यान त्यांचा मनोजशी संपर्क आला. घटस्फोटामुळे नैराश्यात असणाऱ्या मनोज यांना आशाच्या जगण्याच्या लढाईमुळे उमेद मिळाली. आणि त्यांनी आशाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलांनीही या नव्या नात्याला स्वीकारून आईला पाठिंबा दिलाय.
साधना तिप्पनाकजे.

No comments:

Post a Comment