Thursday 5 October 2017

कुरुंजीतलं गमभन


कुरुंजी गावाला खेटूनच भाटघर धरणाचं बॅक वॉटर आहे. खरं तर त्या धरणाच्या जागेत पूर्वी असलेलं गाव धरण भरेल तसं वरती सरकत आलंय. चार पाच डुया झाल्या आम्ही वर सरकून अशी वृद्ध मंडळी सांगतात.
कुरुंजीत घरांच्या भिंतींवर घड्याळं मी बघितली नाहीत. असं दिसतं की लोकांनी निसर्गाच्या चक्राशी स्वतः ला जोडून घेतलंय. (आपण शहरात निसर्गाला वळवू बघतो.) सूर्य उगवला की लोक कामाला लागतात, काही जण गुरांना चरायला रानात नेतात, काही शेतात जातात. थंडीच्या दिवसात उशीरा तर उन्हाळ्यात लवकर! परत येऊन शेतात कामं, दुपारी पुन्हा गुरांना रानात नेतात. संध्याकाळी घरी परततात, बाई चुलीकडे वळते, बापय माणूस जनावरांना बघतो.
थंडीच्या दिवसांत रात्री नऊपर्यंत गाव शांत झालेला असतो. उन्हाळ्यात दुपारच्या उन्हात तीन चार बायका एकत्र गोधड्या शिवायला घेतात तर रात्रीच्या जेवणानंतर बराच वेळ अंगणात गप्पांचे फड रंगतात, पावसाळ्यात भात लावतात, हिवाळ्यात गवताचे भारेच्या भारे रानातून वाहून आणतात, उन्हाळ्यात पावसाळ्याची तयारी करतात. यात बायका पुरुष असा भेद नाही.


पावसाळा सुरू व्हायच्या सुमाराला पश्चिमेकडच्या भिंती अति पावसाने खराब होऊ नयेत म्हणून गवताचे झापे बांधतात.
मी पहिल्यांदा पावसाळ्यात गेले होते. घर ठरवलं पण राहायला जाईपर्यंत पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला होता. सगळ्या घरांनी झाप्यांचे घुंगट काढून टाकायला सुरुवात केली होती. गच्च बंद असलेल्या समोरच्या घराला पश्चिमेकडेही दार आहे ते त्यावेळी समजलं.
उन्हाळ्यात घरं दुरुस्तीला काढतात. पूर्ण घरच पुन्हा बांधायचे असले तर त्याला खूप अर्थपूर्ण शब्द आहे इथे. 'आम्ही घर उलगडलं' असं म्हणतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला लोहार तीनचार दिवस झाडाखाली मुक्कामी असतो. गावातले विळे, कोयते, कुऱ्हाडी वगैरे दुरुस्त करून पुढच्या गावाला जातो.
मुलं रोज अंघोळ, जेवण आवरलं की शाळेत जातात. शाळेच्या वेळेआधी शाळेत पोहोचली तर खेळत बसतात. शनिवारी सकाळची शाळा असते. मळे गावाहून दूध गोळा करणारा टेम्पो आला की सात वाजले असे समजून मुलं शाळेची तयारी करतात.   कुणी गावकऱ्यानं गावात बस यायची वेळ दहा सांगितली तर ती साडेनऊ असू शकेल किंवा साडेदहा ! पण त्याने काही फार फरक पडत नाही. कारण बसेससुद्धा कधी वेळा पाळत नाहीत. आपण शाळा शिकलेले लोक मोजण्यासाठी आकड्यांचा वापर करतो. पण मी इथं संदर्भांचा वापर होताना जास्त बघते.

कुरुंजीत शेजारच्या बायका गप्पा मारायला आल्या होत्या. एक म्हणाली, सगळ्यात आधी आम्ही आलोय या शेजारात राहायला. इथं आल्यानंतर मला मुलं झाली. मी (शहरी सवयीनुसार) विचारलं, किती वर्षं झाली त्याला? ती म्हणाली, दहा वर्षं झाली असतील की. दुसरी तिला खोडून काढत म्हणाली, जास्त झाल्यात. आम्ही तुमच्यानंतर आलो. आम्ही आलो तेव्हा माझा विठ्ठल (मुलगा) पाच महिन्याचा होता, त्यानंतर तुला मुलं झाली. हे अवघड गणित सोडवण्यासाठी मी दुसरीला विचारलं, तुमचा विठ्ठल केवढा आहे आता? दुसरी उत्तरली, आत्ता तो चांगला जाणता आहे!
आज्जीला कोंबडया पाळायला आवडतात. एकदा तिला तिच्या मुलीने कोंबडी दिली. आज्जीने कोंबडीची नीट काळजी घेतली. कोंबडीनं अंडी घातल्यावर ती व्यवस्थित उबवून घेतली. मी तिच्या घरी गेले तर बऱ्याच पिल्लांची फौज घरात हिंडत होती. आज्जी त्यांना दाणे घालत बसली होती. त्यांचं खाऊन पिऊन होताच तिनं तत्परतेनं त्यांना डालग्यात ठेवून दिलं. घरात खूप अंधार होता. मी काळजीनं आज्जीला विचारलं, आज्जी मोजून घेतली का पिल्लं? सगळी आत गेली कसं कळेल? आज्जी उत्तरली, मोजायचं का म्हनून? कोंबडी कलकल आवाज करती सगळी पिल्लं आत येईपातूर.
मुलांच्या बरोबर मी कधीकधी शाळेत जात येत असते. त्यांचं परिसराचं निरीक्षण जबरदस्त आहे. एका पडीक जमिनीवर मातीचे बरेच भुसभुशीत लहान ढीग होते. मुलं म्हणाली या ठिकाणी भरपूर मुठं (खेकडे) मिळतील. मी विचारलं, भरपूर म्हणजे किती? एक मुलगा म्हणाला, दहा जणांचं कालवण सहज हुईल एवढं.
नुसत्या आकड्यांना खरं काही अर्थ नसतो हे इथं जास्त लक्षात येतंय.
- रंजना बाजी

No comments:

Post a Comment