Tuesday 10 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा:
भाग तिसरा
माझे काका एक नंबरचे चक्रम आहेत असं बऱ्याच लोकांचं मत होतं. हे जनमत काकांचं लग्न होईपर्यंत शाबूत होतं. काकांनी लग्न करून बंगाली बायको घरात आणली तेव्हापासून त्यांना दोन नंबरचे चक्रम असं लोकांनी म्हणायला सुरुवात केली.
काका तसे माझ्याशी प्रेमानं वागायचे. मला कधी माराबिरायचे नाहीत. स्वतःलाच पाढे पाठ नसल्यानं मला विचारायचा काही प्रश्न नव्हता. सहारा वाळवंटात नेऊन सोडलं तरी मी परत येईन याची खात्री असल्यानं ते आपण हरवू अशी शक्यता असल्याखेरीज मला कुठं घेऊन जायचे नाहीत. मी अंघोळ केली किंवा नाही केली तरी त्यांना त्याची फिकीर नसायची. आजी मला बदडायची त्यातल्या निम्म्यांदा खुद्द काकाच माळ्यावर काही खुडबुड करत असायचे. थोडक्यात, बाकी कुणासारखे ते नव्हते. पण तरीही...
तरीही काका कायम विरोधीपक्षात असल्यासारखे आपण म्हणू त्याला विरोध करत. म्हणजे असं-
"काका काका..."
"काय रे ज्युनियर? शाळेला नाही गेलास?"
"आज शाळेला सुट्टी नाही का? रविवार आहे आज."
"म्हणून काय झालं गधड्या? आम्ही रविवारीही शाळेला जायचो. इतके कष्ट केलेत म्हणून आज असे उभे आहोत!" बंडी आणि पायजम्यावर उभं राहण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागतात हे मला तेव्हा कळलं.
"काका..." मी पुन्हा मूळ विषयावर.
"हं?" काका गुरकावतात.
"आपण गणपती बघायला जाऊयात?"
"कशाला? काय असतं रे त्यात बघण्यासारखं?"
"गणपती! आम्हाला शाळेत गणपतीवर निबंध लिहून आणायला सांगितलाय."
"हे असले फालतू उद्योग असतात म्हणून मी मध्येच शाळा सोडली. तूपण नको जाऊ उद्यापासनं."
"हो काका. आणि गणपती बघायलाही नाही जात."
"का नाही जाणार? कसा जात नाहीस ते बघतोच! तू काय तुझा काकापण जाईल!" काका आता इरेला पेटले असावेत. त्यांचे डोळे लकाकू लागतात.
"पण काका-"
"चल म्हणतो ना?" काका माझा हात धरून खस्सकन ओढतात. अचानक ओढल्याने मी त्यांच्या टणक पोटाला आदळून क्षणभरासाठी माझं नाक चपटं होतं.
"काका, जेवण करून जाऊया ना." माझा दुबळा विरोध.
"अरे, आज तुझ्या काकूनं जेवायला माझेर झोल केलाय. गेल्यावेळी खाल्ला तेव्हा दोन दिवस डोकं गरगरत होतं. चल, आज आपण बाहेरच काही खाऊ."
"परवा तुम्ही बाहेरचं काही खायचं नाही म्हणाला होतात ना?"
"गाढवा! घरात असे पदार्थ बनत असतील तर स्वसंरक्षणार्थ माणसाला बाहेरच खावं लागतं. कळलं? आणि तिथं काही अरबट-चरबट खातो म्हणालास तर मुस्काट फोडीन. समजलं?"
"हो काका."
"हो म्हणून मान काय हलवतोस लेका? परवा ती दाबेली कुठं खाल्लेली आपण?"
"हौदाजवळच्या चौकात. तिथं जायचं?"
"तिथं कशाला? परवाच काकू आणि मी बागेतल्या गणपतीला जाताना एका ठिकाणी खाल्ली. तुझ्या काकूला अजिबात आवडली नाही."
"मग?"
"अरे मग काय? म्हणजे ती नक्कीच चांगली असणार. चल तिथंच जाऊ."
अशा प्रकारे काकांबरोबर मी नाईलाजाने गणपती बघून फुगे, पिपाणी वाजवत तुडुंब पोटानं घरी परतायचो. काकांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यानं मी तेव्हाच ठरवलं होतं की आपली मुलं होतील तेव्हा त्यांना हवं तिथं- हवं तेव्हा न्यायचं. पण आता काय झालंय ते पुढच्या भागात...

ज्युनियर ब्रह्मे 

No comments:

Post a Comment