Monday 2 October 2017

सेवानिवृत्त अधिकारी, तरीही झाडतोय रस्ता..

गांधी जयंती विशेष -
भल्या पहाटे उठून हातात फावडं, खुरपं आणि झाडू घेऊन रस्त्यावर स्वच्छता करत फिरणारा सेवानिवृत्त अधिकारी पहायचा असेल तर उस्मानाबादमधल्या लिंबोणी बागेला भेट द्या. 7 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कक्ष अधिकारी या पदावरून ते निवृत्त झाले.
लक्ष्मण दगडू धाकतोडे. लिंबोणी बागेतील जिजाऊ चौकाचा परिसर चकाचक ठेवणारी ही व्यक्ती सामान्य नाही. परिस्थितीने गांजलेली तर मुळीच नाही. किंवा कुणाकडून शाबासकी, बक्षीसी मिळावी म्हणूनही त्याची धडपड नाही. आपापला परिसर प्रत्येकाने स्वच्छ ठेवावा, हा संदेश देण्यासाठी, आपल्या परिसरात रोगराई निर्माण होऊ नये, संतांनी सांगितलेला मूलमंत्र जपण्यासाठी त्याची ही सगळी उठाठेव सुरू आहे.
उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील शिरढोण गावातले लक्ष्मण धाकतोडे. निवृत्तीच्या दिवसापासून त्यांनी स्वच्छतेच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांना दोन विवाहित मुली, एक मुलगा आहे. मुलगा पुण्यातील कात्रज भागात व्यवसाय करतोय. स्वतःचं पेन्शन, मुलाची मिळकत यावर आराम करायचं सोडून धाकतोडे पहाटे उठून गल्लीभर स्वच्छता करायला निघतात. रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करून एकत्र करतात. गेल्या सात वर्षापासूनचा त्यांचा हा नित्यक्रम. नाल्यातील घाण फावड्याने बाहेर काढणे, त्यानंतर हा कचरा घंटागाड्यांमध्ये टाकणे, परिसरात रस्त्यालगत आलेले गवत खुरप्याने काढणे आणि कुणाच्याही भावना न दुखवता स्वच्छता राखण्याचा संदेश देणे, असा त्यांचा ठरलेला दिनक्रम. या स्वच्छतेच्या दुतामुळे गल्ली स्वच्छ चकाचक दिसते.



  उस्मानाबादेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता कागदावर अधिक, प्रत्यक्षात कमीच असा त्याचा अनुभव या भागातील नागरिकांचा अनुभव. धाकतोडे यांच्या कामाने खरंतर कर्मचाऱ्यांचीही सुटका झाली. कर्मचारी येण्यापूर्वीच धाकतोडे परिसर स्वच्छ करून ठेवतात. ते म्हणतात, “माझ्यावर बालपणीपासून स्वच्छतेचे संस्कार आहेत. आमच्या गुरूजींनी शाळेत दुसरीमध्ये दिलेली ही शिकवण मी अंगिकारली आहे. सेवानिवृत्तीनंतर गप्पा मारण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वच्छता करून परिसर चांगला ठेवावा, या भावनेतून काम हाती घेतलं. माझं काम बघून आता काही नागरिक आपआपल्या भागापुरती स्वच्छता करतात. प्रत्येकाने आपल्या स्वत:पुरती स्वच्छता ठेवावी, हीच अपेक्षा आहे. या कष्टाच्या कामामुळे माझे आरोग्यही उत्तम आहे. कधीही दवाखान्यात जाण्याची वेळ आली नाही.”
खरं तर संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या शिकवणुकीचा, त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचा वर्तमानात विसर पडत चाललाय. दूरचित्रवाहिन्यांवर आणि पेपरात छबी येण्यापुरतं हातात झाडू घेतलेले नेत्यांचे चेहरे पाहिल्यानंतर लोकांना किळस येते. अशा ढोंगी पुढाऱ्यांना सणसणीत चपराक देणारं धाकतोडे यांचं काम उस्मानाबादच्या लिंबोणी बागेत पहायला मिळते.


- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment