Tuesday 31 October 2017

पिंक पँथर अर्चना


ही गोष्ट आहे 1997 ची. एकदा रात्री झोपेत अर्चना विशये यांचा त्यांचा हात डाव्या स्तनांकडे गेला. तिथे गाठ जाणवली. पतीला सांगितलं तर तो म्हणाला, दुखत नाही ना! लक्ष देऊ नकोस. रविवारी माहेरी गेल्यावर आईला गाठीविषयी सांगितलं. आईने अर्चनाच्या भावाला सांगितलं. भावाने लगेच पैसे देऊन डॉक्टरकडे जायला सांगितलं. डॉक्टरांनी ती गाठ काढली. पण काखेजवळ आणखी एक गाठ आढळल्यामुळे टाटा हॉस्पिटलला पाठवलं. शंका खरी ठरली. भावाने पुन्हा पैसे दिले आणि अर्चनाचं हेही ऑपरेशन पार पडलं. अर्चना वेदनेनं तळमळत होती. 2 दिवस उलट्या करून शरीरातलं पाणीही कमी झालेलं.
नोकरी करत असली, तरी सर्व व्यवहार, निर्णयांसाठी ती नवऱ्यावरच अवलंबून होती. नवरा मात्र दूरदूर राहू लागला. ऑपरेशननंतरची किमो उपचार फेरी निर्णयाविना लांबत होती. पुन्हा भावाने पैसे दिल्यावर नवरा दुसऱ्या दिवशी टाटात किमोसाठी अर्चनाला घेऊन गेला. किमोकरता 1 महिना उशीरा आल्यामुळे तिथल्या डॉक्टर प्रचंड चिडल्या. नवऱ्याने अर्चनाला साफ सांगितलं, मला तुझा खर्च झेपणार नाही. किमोनंतर शून्यात हरवलेल्या अर्चना आईकडेच येऊन राहिल्या. त्यानंतर प्रत्येक किमोला आई, वडील, भाऊ आणि मैत्रीण सोबत असायचे. नवऱ्याला फोन केला की काय काम आहे? कशाला भेटायचं आहे? ही उत्तर ऐकायला मिळायची.
आजारातून बरं झाल्यावर अर्चनाने परत कामावर जायला सुरूवात केली. मुलगी पदरात असल्यामुळे नातं टिकवायला त्या नवर्‍याकडे येऊन राहू लागल्या. त्याचं त्रास देणं सुरूच राहिलं. शेवटी कंटाळून अर्चनाने माहेरी परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांच्या पतीचा 2005 मध्ये मृत्यू झाला.
अर्चनाने बचतीच्या पैशातून नवी मुंबईत घर घेतलं. मुलीसोबत राहू लागल्या. बेबीसिटींगच्या कामाला सुरूवात केली. पण 2010 मध्ये उजव्या स्तनात नखाएवढी गाठ जाणवली. आधीच्या ऑपरेशन, किमोचा त्यांनी धसका घेतल्याने आयुर्वेदीक उपचार करण्याचं ठरवलं. एक वर्ष असचं काढलं. ती गाठ टोमॅटोएवढी झाली. परत टाटाला केस ओपन केली. यावेळी गाठीचा आकार पाहून ऑपरेशनच्या आधी 3 किमो आणि नंतर 3 किमो करायच्या ठरलं. पहिल्या किमोचा खर्च 18 हजार सांगितला. ते ऐकून त्यांना धडकीच भरली. कारण घर घेण्यात सर्व बचत गेली होती. टाटाच्या पायरीवर बसून रडू फुटत होतं. इतक्यात त्यांच्या लेकीचा फोन आला. ती लगेच आईला न्यायला आली. या सर्व काऴात त्या दोघींच नातं मैत्रीणीसारख फुललं होतं. मुलीच्या नाट्यवर्तुळातल्या मित्रमैत्रिणींकडून आणि काही ओळखीतून पैशांची जमवाजमव झाली. या किमो उपचारात त्यांना आधीपेक्षा जास्त त्रास झाला. मलबद्धता, कमी रक्तदाब, हातापायांच्या असह्य वेदना व्हायच्या. अर्चनाने आणखी औषधांच्या भीतीने डॉक्टरांना ही गोष्ट सांगितलीच नाही. 2012 मध्ये ट्रिटमेंट संपली. त्यांचं बेबीसिटींगच काम सुरू होतचं.
2013 च्या महिलादिनाला कॅन्सर सर्व्हायव्हल महिलांना एक दिवसांकरता बाहेर फिरायला नेलं होतं. त्यावेळी त्यांना पुढे काय करायचं विचारलं असता मेडिकल सोशल वर्कर व्हायचंय, असं अर्चनाने सांगितलं. आणि संजिवनी लाईफ बियॉण्ड कॅन्सरच्या रूबी अहलुवालिया यांनी अर्चनाला संधी दिली. आज अर्चना दिवसाला 30-40 जणांचं काऊन्सिलिंग करतात. त्या महिलांशी सर्व विषयांवर बोलतात. त्यांचे गैरसमज, भीती दूर करतात. कुटुंबाचीही समजूत काढतात. कारण कुटुंबाने समजून घेतलं तर अर्ध्याहून अधिक लढाई जिंकली जाते. बऱ्याचदा स्त्रिया लाजेखातर बोलत नाहीत. अशा स्त्रियांना अर्चना बोलतं करतात. त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. त्या ज्या दिव्यातून गेल्या तो त्रास इतरांना होऊ नये याकरता प्रयत्न करतात. पेशंट्सनी अजाणतेपणीदेखील डॉक्टरी उपचारांखेरीज अन्य काही करू नये, अंधश्रद्धांच्या मागे लागू नये यासाठी आग्रही राहातात. उपचारांदरम्यानचा आहार, व्यायाम, एकाकीपणावर मात कशी करावी यावर मार्गदर्शन करतात. अर्चना म्हणतात, “कॅन्सर वाईट आहे. पण तो तेवढाही वाईट नाही. पहिल्या वेळी मला आपलं कोण, परकं कोण कळलं. दुसऱ्यांदा माझं ध्येय मिळालं. बचत करायला शिकले. संजीवनीमुळे सोशल वर्कर होण्याची संधी मिळाली. लेकीचं लग्न झालयं. ती सुखात आहे. माझ्या कामामुळे आपलं आयुष्य दुसऱ्याच्या उपयोगी पडत आहे, ही भावना खूप सुखावणारी आहे.”
#नवीउमेद
(ऑक्टोबर हा स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून पाळला जातो. स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देऊन बऱ्या झालेल्या महिलांना पिंक पँथर्स म्हणतात. स्तनाच्या कर्करोगासंबंधी जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गुलाबी रंग प्रतिकात्मक म्हणून वापरला जातो. पिंक पँथर्स अर्थात या आजारावर मात करून जिद्दीने उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या, सपोर्ट ग्रुप्सचं अनुभवकथन मुंबईतल्या टाटा हॉस्पीटलच्या टीमसोबत अलीकडेच वर्सोवा इथल्या ‘द लिटिल हाऊस’मध्ये माध्यम क्षेत्रातल्या शची मराठे – यादेखील कॅन्सरमधून बर्‍या झाल्या आहेत आणि प्रियंका देसाई यांनी आयोजित केलं होतं. तिथे सादर झालेल्या अनुभवावर आधारित.)
- साधना तिप्पनाकजे.

No comments:

Post a Comment