Friday 27 October 2017

कुरुंजीतलं गमभन

कुरुंजीत मुलांना पार्ट्या करायला आवडते. कधी कधी आम्ही भेळेची पार्टी करतो. मुलं तिथल्या दुकानातून मुरमुरे आणि फरसाण विकत आणतात. कांदे, टोमॅटो, तिखट, मीठ इ. गोष्टी आपापल्या घरातून घेऊन येतात. ज्यांच्याकडे पैसे असतील ते पैसे एकत्र करतात, कमी पडलेले मी देते आणि मुलं दुकानातून सामान आणतात.
एप्रिल महिन्यात आम्ही अशी भेळ केली होती. तेव्हा कच्ची करवंदं जाळ्यातून लगडली होती. मुलींनी पटकन थोडी करवंदं तोडून आणली. त्यांची तिखट मीठ घालून दगडाने चटणी वाटली आणि भेळेत कांदा टोमॅटोबरोबर घातली. अप्रतिम चवीची ती भेळ आम्ही चाटून पुसून खाल्ली होती. एकूण पंधरा जणांच्या भेळेचा खर्च आला होता एकशे पंधरा रुपये फक्त. यात मुलामुलींचा पूर्ण सहभाग असतो. जमेल तसे घरातून तिखट मीठ इ तर आणतातच, पण किती आणायचं, कुणी आणायचं हेही तेच ठरवतात. सगळे बसून कांदे-टोमॅटो चिरतात, भेळ एकत्र कालवतात आणि आम्ही गोलात बसून बोकाणे भरतो




एकदा शनिवारी शाळेतून घरी येताना कुठेतरी फिरायला जाऊ या असं मुलं म्हणाली. काही कारणाने मी नको म्हटलं तर मुलं हिरमुसली. मग त्याला काय पर्याय तर पार्टी ! रस्त्यात प्लॅन तयार झाला. सगळ्यांनी घरून भाकर आणायची आणि माझ्या घरी अंड्याची भुर्जी करायची. यासाठी ‘मोठी अंडी’ मिळणाऱ्या गावातल्या दुकानातून मुलांनी अंडी आणली, ज्यांना शक्य त्यांनी पैसे दिले, कांदे तिखट, मीठ इ आणलं. आम्ही तयारी करणार तोपर्यंत दहावीतला मयूर आणि नववीचा तुषार आले. त्यांनी स्वैपाकघर ताब्यातच घेतलं. भुर्जी बनवून सगळ्यांना नीट वाढून, जेवल्यावर घर स्वच्छ करून मगच ही मुलं गेली.
गावात वर्षातून तीन चारदा तरी पूर्ण गावाची एकत्र जेवणं होतात, घराच्या दारात काही लग्नं होतात. त्यामुळे मुलांना पंक्तीत वाढणे, बसायची व्यवस्था, पाणी पुरवणे, जेवणानंतर जागा स्वच्छ करणे या गोष्टींची सवय आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या मुली पार्टी करू या म्हणाल्या. मी म्हटलं प्लॅन करा. किरकोळ काही आणायचं तर मी शुक्रवारी पुण्याहून जाताना नेऊ शकते. कुरुंजीला जाताना दोन बस बदलायला लागतात. त्यामुळे फार जड मी नेऊ शकत नाही. भोरला जाणाऱ्या कुणाकडून सामान मागवता आलं असतं. कुरुंजी खूपच लहान आहे. घरगुती दोन तीन किराणा दुकानं आहेत. पण भाज्या, दूध इ. मिळत नाही.जायच्या आदल्या रात्रीपर्यंत काही निरोप आला नाही. मी त्या आठवड्यात शनिवारी गेले. मोठ्या मुली दुपारी घरी आल्या. म्हणाल्या, ताई, काहीच सामान नाही, कशी पार्टी करायची? राहू दे. आपण चहा बिस्किटांची पार्टी करू. मग भरपूर चहा केला.रुपेशनं दुकानातून पार्ले जी ची पाकिटं आणवली आणि आमची टी पार्टी झाली. सगळी मुलं चारच्या सुमाराला घरी गेली.
बऱ्याच वेळानं प्रतीक्षा, समीर, कावेरी, कोमल, सार्थक, करण, गौरव, मयूर इ. मुलं (पाचवी ते सातवी या वयोगटातली) हातात बरंच सामान घेऊन आली, कणीक, तेल, तिखट, मीठ, अंडी, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर इ. इ. मी काही विचारायच्या आत, तुमच्या घरात आम्ही पार्टी करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. अंड्याची भाजी, भात आणि पुऱ्या असा मेनू पण सांगितला. मग सामुदायिक काम सुरू झालं. मुलगे कमी पडेल ते सामान आणायसाठी येरझाऱ्या मारू लागले. मुलींनी स्वैपाकघराचा ताबा घेतला. कांदे चिरणे, कणिक मळणे, घरात अजिबात पाणी नव्हतं म्हणून पाणी आणणे इ. कोमलने आपल्या घरून मिक्सरवर मसाला वाटून आणला.
त्यांना गॅसची सवय नाही म्हणून मी कुकर लावणे, अंडी उकडून त्याची रस्सा भाजी बनवणे, पुऱ्या तळणे अशी कामं केली. तर मुलींनी आजूबाजूच्या घरातून पोळपाट लाटणी मागून आणून पुऱ्या लाटल्या.
मोठ्या पोळ्या लाटून त्याच्यावर वाटीने कोरून मुली पुऱ्या बनवायला लागल्या तर मुलगे येऊन त्या पुऱ्या कागदावर रचू लागले. नंतर तळलेल्या पुऱ्या एक पुठ्ठ्यावर कागद टाकून जमा करू लागले. सगळ्या कामात एक लय येत होती, चर्चा न करता्च कामाची वाटणी होत होती. गप्पा तर अखंड चालू होत्या. एरवी भांडणारी मुलं मुली एक टीम म्हणून काम करत होती. सगळा स्वैपाक होईपर्यंत कोणत्याही मुलाने चुकूनही पुरी तोंडात टाकली नाही.
पुऱ्या झाल्या. घरात मुलामुलींना खेळायला मी जुन्या ओढण्या ठेवल्या आहेत. करण आणि सार्थकने त्या ओढण्या छानपैकी अंथरून पंगती तयार केल्या. सगळ्यांनी आपापली ताटं आणली होती. या सगळ्या मुलांत शेजारचा तीन वर्षांचा सोहम लुडबुडत होता. मुलांनी प्रेमानं त्यालाही पंगतीत घेतलं. कावेरीनं एखादया अनुभवी बाईप्रमाणे सगळ्यांना वाढलं. ती, प्रतीक्षा आणि कोमल सगळ्यांना वाढल्यावर जेवायला बसल्या. माझा सहभाग फक्त बघण्याचा आणि जेवणाचा.
मुलं गप्पा मारत हसत खेळत जेवली.
जेवल्यावर पुऱ्या राहिल्या त्या लहान सोहमच्या घरी दिल्या, भात राहिला तो करणने बैलांसाठी नेला, काहींच्या ताटात भात राहिला होता तो पेपरवर बाहेर कुत्र्यांना दिला. सगळा स्वैपाक असा संपवून जमीन स्वच्छ झाडून मुलं गेली. अजिबात पाणी नसल्यामुळे काही भांडी घासायची राहिली. दुसऱ्या दिवशी आठ वाजता पाणी आलं तर स्वतः च्या घराचं पाणी भरून प्रतीक्षा पळत आली. मी पाणी भरत होते तेवढ्यात तिने पटपट भांडी घासून पण टाकली. स्वैपाक घरात ती व्यवस्थित जागेवर मांडली.
मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर मुलं अतिशय जबाबदारीनं वागतात. इथं माझा रोल त्यांना अवकाश देणे, मदत मागायला आलेच तर ती देणे एवढाच आहे. माझं काम आहे ते अशा वेळी मुलांच्या होत असलेल्या आकलनाची निरीक्षणं करणे आणि त्याची नोंद ठेवणे.
: रंजना बाजी

No comments:

Post a Comment