Monday 23 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का?भाग दोन



इंटरनेट गरज न रहाता व्यसन बनतं. तसं होऊ नये यासाठी पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
- यासाठी अगदी छोट्या बाळांपासून विचार करावा लागेल. हल्ली आईवडील खूप बिझी असतातच, मग बाळ जेवत नाहीये म्हणून त्याला फोनवर गाणी, गेम, टीव्हीवर कार्टुन लावून देतात. मग ती बाळं एका जागी बसतात, त्यांना भरवणं सोपं जातं. मात्र मुलं गुंग होऊन, हिप्नोटाईज झाल्यासारखी जेवतात. व्यसनप्रवृत्तीची सुरवात अशीच होते. पूर्वी बाळांना गोष्टी सांगत भरवलं जायचं.
आजच्या पालकांनी हे लक्षात घ्यायची गरज आहे की, आपला मुलांसोबत घालवायचा वेळ, संवाद याला टिव्ही/ कंप्युटर/ मोबाईल हे पर्याय कधीच होऊ शकत नाहीत.
माझं सांगणं कदाचित अतिरेकी वाटेल.. पण मी असं सांगेन की मुलं ७-८ वर्षांची होईपर्यंत त्यांना मोबाईलची ओळख करुन देउच नका. कारण त्याच्या मेंदुवर, मानसिक वाढीवर त्याचे परिणाम होत असतात. कार्टुन्स एक वेळ ठीक आहेत. पण तेही बघण्यावर वेळेची मर्यादा घालून द्यायचीच. सुरवातीपासूनच असं केलं की मुलं ऎकतात. फक्त या बाबतीत पालकांनी ठाम असायलाच हवं. काही वेळ दुपारी आणि काही संध्याका्ळी..हे खूप झालं.
माझ्या मुलांच्या बाबतीत मी हेच केलं होतं. पालकांनी स्वत:साठीहीे मर्यादा घालून घ्यायला हव्यात. ही किंमत पालकांना द्यावीच लागते. अशी मर्यादा लहान वयातच घातली की पुढे जाऊन अनेक संभाव्य धोके टाळता येतील.
सायबर सिक्युरिटी हा एक मह्त्वाचा मुद्दा आहे. इंटरनेटवर अनोळखी लोक मुलांना काहीही खाजगी माहिती विचारु शकतात. मुलांना त्याचं गांभीर्य कळत नसतं. दहा वर्षाच्या आतली मुलं आपलं म्हणणं ऎकायच्या मनस्थितीत असतात. मात्र, टीन एजमधली मुलं पालकांना सहसा जुमानत नाहीत. म्हणूनच लवकरच्या वयात मुलांना शिकवा, समजवा. ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी आताच शहाणं व्हावं.
या नवपालकांना मी सांगू इच्छिते. या गॅजेट्सपासून दूर ठेवण्यासाठी किंवा दोन वेळा कार्टून्स बघण्यावरच त्यांनी थांबावं यासाठी आपण जे करायचं त्यातलं मुख्य म्हणजे मुलांना पुस्तकवाचनाची गोडी लावणं. मुलांसोबत काम करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी मला सांगितलं होतं, तू तुझ्या मुलाला रोज गोष्टी वाचून दाखव. ही आईने मुलाला दिलेली सगळ्यात चांगली गिफ्ट असेल. आणि खरंच, मला आणि माझ्या मुलांना खूप मजा यायची हे करताना, माझ्या आईबाबांनी पण हे केलं. यातून आपण मुलांशी जोडलेले राहातो.
माझा मुलगा १६ वर्षाचा होईपर्यंत आमचं पुस्तकवाचनाचं रुटीन असायचं. फास्टर फेणे पासुन पुलंपर्यंत खूप पुस्तकं आम्ही एकत्र वाचली. आपल्या संस्कृतीचा भाग असणारी पुस्तकं, हे लेखक. यासाठी फार वेळ द्यायचीही गरज नाही. मुलं झोपायच्या आधी १५ मि तुम्ही हे करु शकता. हे झालं लहान मुलांच्या बाबतीत. टीन एजर्सबद्द्ल आपण नंतर बोलू.
आईवडील आणि अन्य मोठी माणसं सतत मोबाईल वापरत असतात. इथूनच सुरवात होते का?
- हो. इथूनच सुरवात होते. मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचा 'नवा उपवास' नावाचा एक लेख आहे. पालकांनी हा लेख वाचायला हवा. त्यात त्यांनी सुचवलंय, कुटुबांचा एखादा उपासाचा दिवस ठरवता येईल, की त्या दिवशी घरातल्या कोणीही गॅजेट वापरायचं नाही. कुटुंबाने मिळून हा आगळावेगळा उपास करायचा. संध्याकाळी घरी आल्यावरही कोणीही गॅजेट वापरायचं नाही. आणखीही एक प्रयोग करता येईल. पालकांनी आपले मोबाईल घरी ठेऊन घराबाहेर जाता येतं का ते बघावं. किंवा रोज मी अमूक इतका वेळ फोन बघणार नाही, असा नियम करावा. हे अर्थातच मुलांना कल्पना देऊन, त्यांना बरोबर घेउनच करावं. आणखीही एक नक्की करावं. मुलांबरोबर व्यायामाचा, वॉकचा वेळही ठरवून व्यतीत करावा.
गांधीजींचं खूप छान वाक्य आहे. जगात जो बदल घडवायचाय, तो आधी स्वतः व्हा. तेव्हा मुलांमध्ये बदल घडवायचाय, तर तो स्वत:मध्ये आधी घडवा. मुलं तुमच्या वागण्याकडे बघून शिकत असतात.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 
शब्दांकन: रूपाली गोवंडे

No comments:

Post a Comment