Friday 13 October 2017

ज्ञानरचनावादाचे प्रणेते- कुमठे बीट

तुम्हांला आठवतं आपण मुळाक्षरं आणि संख्या कशा शिकलो ते? एकच अक्षर सतत गिरवून आणि घोकंपट्टी करून आपण अभ्यास शिकलो. पण आता मात्र महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची मुलं फार वेगळ्या पद्धतीने शिकतात. त्या पद्धतीचे नाव आहे- ज्ञानरचनावाद आणि ही पद्धत महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवून दाखविणाऱ्या शाळा आहेत सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या.



"ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा दृष्टिकोन असा आहे की मुलांना आधीपासून ज्ञान असते. मुले जेव्हा शाळेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांचं मन म्हणजे एक कोरी पाटी असते, ही कल्पना चुकीची आहे. मुलं आपल्या सभोवतालच्या परिसरातून सारखं काहीतरी शिकत असतात. त्यांची निरीक्षण क्षमता आणि ग्रहण क्षमता जबरदस्त असते. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असते.” कुमठे बीटच्या विस्ताराधिकारी प्रतिभा भराडे सांगत होत्या. 
"कुमठे बीटमध्ये २०१२ साली पहिलीचा वर्ग दरवर्षीप्रमाणे १४ जूनला सुरु करण्याऐवजी १ मार्चलाच घ्यायचा ठरला. शाळेचं अंतर्बाह्य स्वरूप बदलून टाकण्यात आलं. या सुट्टीच्या काळात खेळांवर भर दिला गेला. अगदी लहान मुलांना एका जागी बसून रहायला आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवं हवं असतं. म्हणून आम्ही ठरवलं, की मुलांना खेळू द्यायचं आणि खेळातूनच शिकवायचं. मग शाळेत सागरगोटे, काचाकवड्या, गोट्या, सूरपारंब्या, आबाधुबी, ठिकरी यासारखे खेळ मुलं दररोज खेळू लागली. याचा खर्च काहीच नव्हता आणि मुलांना खूप मजा येत होती." 




"खरंतर, मुलं एकीकडे खेळत होती तर दुसरीकडे त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकासही होत होता. या खेळांमधून लवचिकता, शरीराचा तोल सांधणं, खिलाडूवृत्ती, सांघिक बळ, हस्तनेत्रसमन्वय, तर्कबुद्धीचा वापर अशा अनेक गोष्टी घडून येत होत्या. मुलांची शाळेशी खरी ओळख होऊ लागली. आता शिक्षकांची भीती तर वाटत नव्हतीच, उलट मैत्री झाली होती." भराडे मॅडम सांगत होत्या.
वेगवेगळ्या विषयांसाठी शिक्षकानीं अनेक प्रयोग केले. उदा. गणित म्हणजे मुलांचा नावडता विषय. यात मणी, खडे, चिंचोके आणि स्वतःचे अवयव मोजण्याने सुरुवात होते. कधी शिक्षक सांगतील त्या नंबराची आगगाडी बनवणे, तर कधी दोन विद्यार्थ्यांनी मिळून दोन अंकी संख्या तयार करणे असे खेळ घेतले जातात. उदा: २८ हा आकडा बनवायचा असेल तर, एक मूल दशक बनतं तर दुसरं एकक. दशक झालेल्या मुलाने दोन बोटं दाखवायची, त्याचवेळी एकक झालेल्या मुलाने ८ बोटे दाखवायची. 





कोणताही विद्यार्थी ‘ढ‘ नाही, कोणाविषयीही नकारात्मक बोलायचं नाही ही तत्त्वं येथील शिक्षक कटाक्षाने पाळतात. अगदी पहिलीतल्या मुलालासुद्धा जाण असते. मुलांना आपल्या बोली भाषेत बोलू द्यावं, ही सूत्रं इथं पाळली जातात. यामुळे अनेकदा असं होतं की इथली मुलं पुस्तकी बोलत नाहीत. ठोकळेबाज निबंध लिहीत नाहीत. शिक्षकांनाही माहीत नसलेले अनेक शब्द ही मुले वापरतात. स्वतःच्या शैलीत भावना व्यक्त करतात.
कुमठे बीटमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी हे मॉडेल स्वीकारलं. 





आजवर इथल्या शाळांना हजारो शिक्षकांनी भेट दिली आहे. कुमठे बीटप्रमाणे आपणही आपल्या शाळेत हे प्रयोग यशस्वी करून दाखवू हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

No comments:

Post a Comment