Tuesday 3 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा: भाग दुसरा
मी त्यांचा एकुलता एक नातू असूनही आजोबा माझ्याशी कधी प्रेमानं बोललेले आठवत नाहीत. नातवाशी बोलायचं झालं तर कायम कपाळावर आठ्या असल्या पाहिजेत असा काही त्यांचा नेम असावा. बोलण्यातल्या या नेमापेक्षा फेकून मारण्यातला त्यांचा नेम भलताच भेदक (आणि अचूक) होता. मधली काही वर्षं शब्दाविण संवादिजे, म्हणजे हातातला ग्लास, तांब्या, छत्री, काठी, छडी, झाडू इत्यादींच्या माध्यमातूनच ते माझ्याशी बोलायचे. क्वचित बोलले तरी, (एकेकाळी सहा महिने शाळामास्तरकी केली असल्यानं) मला एकोणतीसचा पाढा विचारायचे. तेवढाच एक विचारायचं कारण इतकंच की खुद्द त्यांनाही बाकी पाढे पाठ नसायचे. शेजारच्या मुजावरांनी बावीस अठ्ठे किती असं म्हटल्यावर आजोबा इतके गडबडले होते की त्यांना साडेतीन मिनिटं ठसका लागला होता. मुजावरांनी उत्तर सांगेपर्यंत आजोबा खोटंखोटं खोकतच राहिले होते. एकोणतीसचा पाढा आजही पाठ असण्याचं श्रेय केवळ आजोबांना जातं.
ज्यांचे आजोबा खवीस असतात अशा लोकांच्या आज्या मुलखाच्या प्रेमळ असतात. माझी आजी या नियमाला सणसणीत अपवाद होती. जातायेता धोपटून काढण्यासाठी नातवाचा जन्म झालाय अशी तिची समजूत होती. मी माळ्यावरच्या खोलीत काहीतरी खाऊ चोरायला जातो असं त्या माउलीला कुणी सांगितलं होतं कोण जाणे. कसलीही खुडबुड ऐकू आली की आजी कान टवकारत जागेवरूनच "ज्युनियर, ऐकत्येय हं मी. थांब आता आले की पाठीत लाटणंच घालत्ये तुझ्या." असा दम भरायची. दिवसभरात कधीही तिच्या तावडीत सापडलो की सगळ्या धमक्या एकदम खऱ्या करायची. तिला आजोबांसारखी काठी, छडी, लाटणं वगैरे शस्त्राची कधी गरज पडली नाही. 'तुला बदडून माझे हात घट्ट झाल्येत.' असं म्हणत पाठीत रट्टे देई. बायको कधीकधी 'असे कसे गेंड्याच्या कातडीचे आहात हो तुम्ही.' असं म्हणते तेव्हा यामागचे आजीचे कष्ट मला आठवतात. माझ्या ढालीआड उंदरांच्या अनेक पिढ्या आमच्या माळ्यावर सुखेनैव नांदल्या असतील.
आई फारशी त्रास द्यायची नाही. मुळात तिच्या लेखी मी म्हणजे इतर कामांसोबत करायचं एक फुटकळ काम असं काही असणार. मी अंघोळ करताना आई बाजूलाच दगडी चौथऱ्यावर भांडी घासत असायची. त्यामुळं "अरेरे, काय ही मान काळी झालीय? कावळ्याची मान बरी की रे तुझ्यापेक्षा!", "टाच घासलीस तर काय पायात किडे पडून मरशील का हरामखोरा?", "गाढवा, पाठीला काटे फुटलेत का? जरा पाणी लागू दे पाठीला." अशा तिच्या प्रेमळ सूचना चालू असायच्या. मी जेवत असताना ती परसदारी विहीरीशी कपडे धूत असायची. तिथूनही न बघता "जुन्या, गिळ की लेका घास! की रवंथ करत बसणारैस बैलासारखा?" नाहीतर "पानात भाजी शिल्लक दिसली तर खिशात भरून देईन हं." अशा धमक्या चालू असायच्या. आईला भाजी कशी दिसली असेल असा विचार मनात येण्यापेक्षा ती खरोखरच माझ्या खिशात भाजी भरेल या भीतीनं मी डोळे मिटून कशीबशी भाजी संपवायचो. आईला दिव्यदृष्टी असते असं कुण्या लेखकानं म्हटलंय. त्या लेखकाची आईही माझ्या आईसारखीच असावी.
मी शाळेचे कपडे घालत असायचो तेव्हा ती बाबांची तयारी करून त्यांचा डबा भरून देत असायची. तेव्हापण "जुन्या, साळींदरासारखे केस उभे दिसले तर मी येऊन भांग पाडेन!" अशी दटावणी यायची. आईच्या भीतीनं केस आपोआप डोक्यालगत चप्पट बसत. आजही अंगावर शहारा येतो तेव्हा माझे केस उभे न राहता अंगाला चिकटून असतात. लहानपणी आई कधीकधी रविवारी मला अंघोळ घालायची. त्याऐवजी ती मला सरळ बदडूनच का काढत नाही असा प्रश्न तेव्हा पडायचा.
हे असे पालक असताना मला तेव्हा वाटायचं आपण यांच्या तावडीतून सुटायचं असेल तर पटकन मोठं व्हायला पाहिजे. पण नाही, आज माओ आणि माओची आई मला त्यांच्यापेक्षा लहान समजून वागवतात ते पाहिलं की आधीचं लहानपणच बरं होतं असं वाटू लागतं.
ज्युनियर ब्रह्मे

1 comment:

  1. कर्ज! कर्ज !! कर्ज !!!
    आपण एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त खाजगी कर्ज कंपनी शोधत आहात जो संपूर्ण आयुष्यासाठी कर्ज प्रदान करतो. आम्ही सर्व प्रकारचे कर्जे अतिशय वेगवान आणि सोप्या पद्धतीने, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज, तारण कर्ज, विद्यार्थी कर्ज, व्यवसाय कर्ज, गुंतवणूक कर्ज, कर्ज एकत्रीकरण आणि बरेच काही देत आहोत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी आपल्याला नाकारले आहे का? आपल्याला एकत्रीकरण कर्ज किंवा तारण गरजेची आहे का? आपल्या सर्व आर्थिक समस्यांना भूतकाळातील एक गोष्ट बनवण्यासाठी आम्ही येथे आहोत असे आणखी दिसत नाही. आम्ही 2% च्या दराने आर्थिक सहाय्य आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी आणि कंपन्यांना निधी देतो. आवश्यक सामाजिक सुरक्षा क्रमांक आवश्यक नाही क्रेडिट तपासणी आवश्यक, 100% हमी. मी तुम्हाला या माध्यमाचा उपयोग करून सांगू इच्छितो की आम्ही विश्वसनीय आणि सहायक मदत देतो आणि आम्हाला तुम्हाला कर्ज देण्यास आनंदच होईल.
    मग आम्हाला एक ईमेल पाठवा: (victoriaemmanuelloan@gmail.com) कर्जाकरता अर्ज करण्यासाठी

    ReplyDelete