Tuesday 17 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा:
- भाग ४
माझा ज्येष्ठ पुत्र माओ, इयत्ता तिसरी अ एके दिवशी शाळेतून चिंताक्रांत चेहऱ्यानं घरी आला.
"काय रे, ठीकाय ना सगळं?" मी जरा धाडस करून विचारलं. लहानपणी माझ्या तक्रारी ऐकण्यासाठी बाबांना शाळेत बोलावयाचे तेव्हा असाच चेहरा असायचा माझा.
"उद्या स्कूलमध्ये पीटीएम आहे." माओ वदला.
माझ्या काळजात एकदम सोळाशेबावीस रंगीबेरंगी फुलपाखरं उडाली. पॅरेन्ट टीचर मिटिंग हा माझा शाळेतला आवडता कार्यक्रम.
"अरे मग यात असं तोंड वाकडं करण्याजोगं काय झालं?" मी उत्साहानं म्हणालो.
"बसा इथं. स्कूलमध्ये यायचं तर, आधी चार चांगल्या गोष्टी तुमच्या कानी घालाव्यात म्हणतो." माओ पोक्तपणे म्हणाला. मी एखादा बापुडवाणा बाप बसतो तसा त्याच्यासमोर बसलो.
"पहिलं म्हणजे एखादी टीचर आवडली की तिच्याशी फार वेळ बोलत बसू नका."
"हो." मी आज्ञाधारकपणे मान डोलवून म्हणालो.
"आणि माझ्याच क्लासटीचरशी बोला. मागच्या वेळी भलत्याच टीचरबरोबर गप्पा हाणत बसला होतात."
आता ती टीचर इतकी बोलकी होती, यात माझा काय दोष? पण मी हे उघड बोललो नाही. काही बोललो तर हा पोरटा सरळ 'नका येऊ' म्हणाला असता.
"सगळ्या टीचरांचे फोन नंबर नका मागू."
मागच्या मिटींगला मी आपलं असावा म्हणून, दोन-तीन टीचरना फोन नंबर मागितला होता. पुढंमागं माओ त्यांच्या वर्गात आला, तर असावा म्हणून. बाकी काही नाही. पण याचाही लोक चुकीचा अर्थ काढतात?
"आणि हो, प्रेमा मिस आता स्कूलमध्ये नाहीयेत." हे मला माहीत होतं. प्रेमा मिस कुठं जॉईन झाल्यात हे मी मुद्दाम माओला सांगितलं नव्हतं. हसताना उजव्या गालावर खळी पडणारी प्रेमा मिस म्हणजे शाळेतली सर्वात लोकप्रिय टीचर होती. आमच्या वेळी जाड चष्मेवाल्या, खत्रूड चेहऱ्याच्या ढवळीकर, कारखिले असल्या आडनावाच्या बाया होत्या. सिनेमाला भेटल्या तर तिथंही अस्मद्चं सप्तमीचं द्विवचन विचारणाऱ्या.
"स्कूलमध्ये उगाच इकडंतिकडं फिरू नका."
मागच्यावेळी मी रस्ता चुकून कोऑर्डिनेटर बाईंच्या केबिनमध्ये घुसलो होतो. त्यावरून ही सूचना होती.
"हो, कळतंय. मागच्यावेळी स्टाफरूम शोधत होतो."
"तिथं काय काम होतं तुमचं? टीचर तर क्लासरूममध्ये असतात ना?"
हा पोरगा पुढंमागं पोलिस होणार. अगदी संशयिताची कसून तपासणी करावी तसं माझी झडती घेत होता.
"आणि" माओचा डोस अजून संपला नव्हता, "फक्त माझी अभ्यासातली प्रगतीच विचारा टीचरना."
"हो हो." काही न कळलं तरी मी आपलं होकार दिला.
"येताना जरा..." मला एकदम वाटलं की हा टीचरसाठी फुलंबिलं आणा म्हणतोय की काय? माझ्या डोळ्यांसमोर ब्लूबेरीजच्या कॉर्नरवरचा फूलवाला उभा राहिला. पण नाही. "येताना जरा, व्यवस्थित फॉर्मल कपडे घालून या. ते शॉर्टस्लीव्ह टीशर्ट आणि रगेड जीन्स नकोत."
"त्यात काय वाईट आहे रे? आपण फिरायला जातो तेव्हा तूही असलेच कपडे घालतोस ना?"
"हो, पण स्कूलमध्ये काहीतरी इभ्रत आहे म्हटलं आमची."
आमची? हा पोरगा दिल्लीची गादी सांभाळणाऱ्या बादशहासारखा स्वतःला आम्ही-तुम्ही करत होता. कालपर्यंत एकं आलीय की दोनं हे नीट सांगता यायचं नाही कारट्याला. आणि आता हा मला शिकवत होता.
"काय रे? तैनाती फौजेसारख्या एवढ्या अटी घालण्यापेक्षा तू सरळ आईलाच का बोलवत नाहीस पीटीएमला?"
"त्याचं कायै बाबा, आई आली की ती सरळ माझे पेपरमधले मार्क बघ, कुठं मी खोड्या करतोय का याची चौकशी कर असलीच बोअरिंग कामं करते. उगाच टीचरलाही कानकोंडं होतं आणि मलाही. त्याच्याऐवजी तुम्ही आलात तर अभ्यासातली प्रगती वगैरेचा प्रश्नच निघणार नाही."
"राहू देत मग!" माझ्यातलाही स्वाभिमानी बाप जागा झाला, "बापाबद्दलची इतकी वाईट कल्पना असेल तुझी मी नाहीच येत पीटीएमला."
ज्युनियर ब्रह्मे

No comments:

Post a Comment